YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 3:17-24

उत्पत्ती 3:17-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

नंतर परमेश्वर देव आदामाला म्हणाला, तू तुझ्या पत्नीची वाणी ऐकली आहे आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस अशी आज्ञा दिलेली होती, त्या झाडाचे फळ तू खाल्ले आहेस. म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. तू तिजपासून अन्न मिळवण्यासाठी आपल्या आयुष्याचे सर्व दिवस कष्ट करशील; जमीन तुझ्यासाठी काटे व कुसळे उत्पन्न करील आणि शेतातील वनस्पती तुला खाव्या लागतील. तू माघारी जमिनीमध्ये जाशील तोपर्यंत तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर खाशील, तू मरणाच्या दिवसापर्यंत अतिशय काम करशील. कारण मातीमधून तू निर्माण झालेला आहेस; आणि मातीमध्ये तू परत जाशील. आदामाने आपल्या पत्नीचे नाव हव्वा ठेवले, कारण सर्व जिवंत मनुष्यांची ती आई होती. परमेश्वर देवाने आदाम व त्याच्या पत्नीसाठी चामड्यांची वस्त्रे केली; आणि ती त्यांना घातली. परमेश्वर देव म्हणाला, “पाहा, मनुष्य आपल्यातल्या एका सारखा होऊन त्यास बरे व वाईट समजू लागले आहे. तर आता त्यास त्याच्या हातांनी जीवनाच्या झाडावरून ते फळ घेऊन खाऊ देऊ नये, आणि जर का तो ते फळ खाईल तर मग सदासर्वकाळ तो जिवंत राहील.” तेव्हा परमेश्वर देवाने मनुष्यास ज्या जमिनीतून उत्पन्न केले होते तिची मशागत करण्यासाठी एदेन बागेतून बाहेर घालवून दिले. देवाने मनुष्यास बागेतून घालवले, आणि जीवनाच्या झाडाचे रक्षण करण्यासाठी त्याने एदेन बागेच्या पूर्वेकडे करुब ठेवले, आणि सर्व दिशांनी गरगर फिरणारी ज्वालारूप एक तलवार ठेवली.

सामायिक करा
उत्पत्ती 3 वाचा

उत्पत्ती 3:17-24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

नंतर ते आदामाला म्हणाले, “तू तुझ्या पत्नीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस, अशी मी तुला आज्ञा केली होती, ते खाल्लेस म्हणून आता, “तुझ्यामुळे भूमी शापित झाली आहे; तू तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस अत्यंत क्लेशमय कष्ट करून तिचा उपज खाशील. भूमी तुझ्यासाठी काटे आणि कुसळे उगवील, आणि तू शेतातील पीक खाशील. ज्यामधून तू घडविला गेलास त्या मातीत परत जाऊन मिळेपर्यंत तू घाम गाळून अन्न खाशील, कारण तू माती आहेस आणि तू मातीतच परत जाऊन मिळशील.” आदामाने आपल्या पत्नीचे नाव हव्वा असे ठेवले, कारण ती सर्व सजिवांची माता होती. याहवेह परमेश्वराने आदामासाठी आणि त्याच्या पत्नीसाठी चर्मवस्त्रे केली आणि त्यांना ती घातली. नंतर याहवेह परमेश्वर म्हणाले, “पाहा, मानव आपल्यापैकी एक आणि आपल्यासारखा झाला आहे; तो बरे आणि वाईट यातील फरक समजू लागला आहे. परंतु आता जीवनवृक्षाचे फळ त्याच्या हाती लागून त्याने ते तोडून खाऊ नये, कारण मग तो सदासर्वकाळ जिवंत राहील.” म्हणून याहवेह परमेश्वराने मनुष्याला ज्या भूमीतून निर्माण केले होते तिची मशागत करण्यासाठी त्या एदेन बागेतून घालवून दिले. अशा रीतीने त्यांनी मनुष्याला एदेन बागेच्या बाहेर घालवून दिले आणि जीवनवृक्षाकडे कोणीही जाऊ नये यासाठी एदेन बागेच्या पूर्वेस करूबीम आणि प्रत्येक दिशेकडे फिरणारी एक ज्वालामय तलवार ठेवली.

सामायिक करा
उत्पत्ती 3 वाचा

उत्पत्ती 3:17-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

आदामाला तो म्हणाला, “तू आपल्या स्त्रीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस; म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे; तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील; ती तुला काटे व कुसळे देईल; तू शेतातले पीक खाशील; तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन: मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे; तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.” आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले कारण ती अवघ्या जीवधारी जनांची माता होय. परमेश्वराने आदाम व त्याची स्त्री ह्यांच्यासाठी चर्मवस्त्रे करून त्यांना घातली. मग परमेश्वर देव म्हणाला, “पाहा, मनुष्याला बरेवाईट कळू लागून तो आमच्यातल्या एकासमान झाला आहे; तर आता कदाचित तो आपला हात जीवनाच्या झाडाला लावून त्याचेही फळ काढून खाईल व सर्वकाळ जिवंत राहील;” ह्यास्तव ज्या जमिनीतून त्याला उत्पन्न केले होते, तिची मशागत करावी म्हणून परमेश्वर देवाने त्याला एदेन बागेतून बाहेर काढून लावले. देवाने मनुष्याला बाहेर घालवले आणि जीवनाच्या झाडाकडे जाणार्‍या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्वभागी करूबीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली.

सामायिक करा
उत्पत्ती 3 वाचा