YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 19:14-26

उत्पत्ती 19:14-26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग लोट बाहेर गेला व ज्या मनुष्यांनी त्याच्या मुलींशी लग्न केले होते त्या आपल्या जावायांना तो म्हणाला, “उठा, तुम्ही, लवकर या ठिकाणातून बाहेर पडा; कारण परमेश्वर देव या नगराचा नाश करणार आहे.” परंतु लोट गंमत करत आहे असे त्याच्या जावयांना वाटले. मग पहाट झाल्यावर दूत लोटाला घाई करून म्हणाले, “ऊठ, या नगराला शिक्षा होणार आहे; तेव्हा तू, तुझी पत्नी व तुझ्या येथे असलेल्या दोन मुली यांना घेऊन नीघ म्हणजे मग या नगराच्या शिक्षेत तुमचा नाश होणार नाही.” परंतु तो उशीर करीत राहिला. तेव्हा परमेश्वराची त्याच्यावर कृपा होती, म्हणून त्या पुरुषांनी त्याचा हात आणि त्याच्या पत्नीचा आणि त्याच्या दोन मुलींचे हात धरून त्यांना बाहेर आणले आणि नगराबाहेर आणून सोडले. त्यांनी त्यांना बाहेर आणल्यावर त्यातील एक पुरुष म्हणाला, “आता पळा व तुमचे जीव वाचवा, नगराकडे मागे वळून पाहू नका आणि या मैदानात कोणत्याही ठिकाणी थांबू नका; डोंगराकडे निसटून जा म्हणजे तुमचा नाश होणार नाही.” लोट त्यांना म्हणाला, “हे माझ्या प्रभू, असे नको, कृपा कर! माझा जीव वाचवून तू माझ्यावर मोठी दया दाखवली आहेस आणि तुझी कृपादृष्टी तुझ्या दासास प्राप्त झाली आहे, परंतु मी डोंगरापर्यंत पळून जाऊ शकणार नाही, कारण आपत्ती मला गाठेल व मी मरून जाईन. पाहा, पळून जाण्यासाठी हे नगर जवळ आहे, आणि ते लहान आहे, कृपा करून मला तिकडे पळून जाऊ दे, ते लहान नाही काय? म्हणजे माझा जीव वाचेल.” तो त्यास म्हणाला, “ठीक आहे, मी तुझी ही विनंतीसुद्धा मान्य करतो. तू उल्लेख केलेल्या नगराचा नाश मी करणार नाही. त्वरा कर! तिकडे पळून जा, कारण तू तेथे पोहचेपर्यंत मला काही करता येणार नाही.” यावरुन त्या नगराला सोअर असे नाव पडले. जेव्हा लोट सोअर नगरामध्ये पोहचला तेव्हा सूर्य उगवला होता, नंतर परमेश्वराने सदोम व गमोरा या नगरांवर आकाशातून गंधक व अग्नी यांचा वर्षाव केला. त्याने त्या नगरांचा नाश केला, तसेच त्या सगळ्या खोऱ्याचा आणि त्या नगरात राहणाऱ्या सगळ्यांचा, आणि जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतींचा नाश केला. परंतु लोटाची पत्नी त्याच्यामागे होती, तिने मागे वळून पाहिले, आणि ती मिठाचा खांब झाली.

सामायिक करा
उत्पत्ती 19 वाचा

उत्पत्ती 19:14-26 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तेव्हा लोट आपल्या जावयांकडे गेला, जे त्याच्या मुलींशी विवाह करण्यास वचनबद्ध होते. तो म्हणाला, “घाई करा आणि या ठिकाणातून बाहेर चला, कारण याहवेह या शहराचा नाश करणार आहेत!” पण त्याच्या जावयांना वाटले की, तो विनोद करीत आहे. पहाट होताच, दूत लोटाला आग्रह करीत म्हणाले, “त्वरा कर! तुझी पत्नी व तुझ्या दोन कन्या ज्या इथे आहेत त्यांना घेऊन नीघ, नाहीतर या नगराचा नाश होत असताना तुझाही नाश होईल.” पण लोट आढेवेढे घेऊ लागला, तेव्हा दूतांनी त्याचा, त्याच्या पत्नीचा आणि त्याच्या दोन्ही कन्यांचे हात धरून त्यांना नगराबाहेर एका सुरक्षित ठिकाणी आणून सोडले, कारण त्या कुटुंबावर याहवेहची कृपा होती. दूतांनी त्यांना ताकीद दिली, “आता जीव घेऊन पळा! पाठीमागे अजिबात वळून पाहू नका, सपाट भूमीवर रेंगाळत राहू नका! थेट डोंगरावर जा, नाहीतर तुम्हीही त्याच्या आवाक्यात याल!” यावर लोट विनवणी करीत म्हणाला, “स्वामींनो, कृपा करून असे करू नका! तुम्ही तुमच्या सेवकाशी इतके दयाळूपणाने वागला आहात व तुम्ही माझा जीव वाचविला आहे. परंतु मला डोंगरावर पाठवू नका; तिथे कदाचित माझ्यावर काही अरिष्ट येईल आणि मी मरेन. पाहा, तिथे जवळच एक गाव आहे आणि ते लहानही आहे. तिथे पळून जाण्याची परवानगी द्या—हे अगदी लहानसे आहे, नाही का? म्हणजे माझा जीव वाचेल.” तो त्याला म्हणाला, “ठीक आहे, मी तुझी विनंती मान्य करतो; तू म्हणतोस त्या गावाचा मी नाश करणार नाही. पण त्वरा कर आणि तिथे जा, कारण तू तिथे पोहोचेपर्यंत मला काहीच हालचाल करता येत नाही.” (त्या वेळेपासून त्या गावाचे नाव सोअर नगरी असे पडले.) सूर्योदयाच्या सुमारास लोट सोअर गावात जाऊन पोहोचला. मग याहवेहने सदोम आणि गमोरा या नगरांवर स्वर्गातून—याहवेहकडूनच—ज्वलंत गंधकाचा वर्षाव केला; आणि त्या दोन नगरांबरोबर आसपासची इतर गावे, तसेच सर्व वनस्पतीचा संपूर्ण नाश केला. परंतु लोटाच्या पत्नीने मागे वळून पाहिले, ती मिठाचा खांब झाली.

सामायिक करा
उत्पत्ती 19 वाचा

उत्पत्ती 19:14-26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तेव्हा लोट बाहेर जाऊन आपल्या मुलींशी विवाह केलेल्या1 आपल्या जावयांना म्हणाला, “उठा, ह्या स्थानातून बाहेर पडा, कारण परमेश्वर ह्या नगराचा नाश करणार आहे;” परंतु त्याच्या जावयांना तो केवळ गंमत करत आहे असे भासले. पहाट होताच दूतांनी लोटाला घाई करून म्हटले, “ऊठ, तुझी बायको व येथे असलेल्या तुझ्या दोन मुली ह्यांना घेऊन नीघ, नाहीतर ह्या नगराच्या शिक्षेत तुझा संहार होईल.” पण तो दिरंगाई करू लागला, तेव्हा परमेश्वराची करुणा त्याच्यावर होती म्हणून त्या पुरुषांनी त्याच्या, त्याच्या बायकोच्या आणि दोन्ही मुलींच्या हातांना धरून त्यांना ओढून बाहेर काढले आणि नगराबाहेर आणून सोडले. त्यांना बाहेर आणल्यावर दूत त्यांना म्हणाला, “आपला जीव घेऊन पळ; मागे पाहू नकोस व खोर्‍यात कोठे थांबू नकोस; डोंगराकडे पळ काढ, नाहीतर तुझा संहार होईल.” तेव्हा लोट त्यांना म्हणाला, “हे प्रभू, नको! नको! पाहा, ह्या तुझ्या दासावर तुझी कृपादृष्टी झाली आहे; माझा जीव वाचवला ही तुझी माझ्यावर अपार दया झाली आहे; मला डोंगराकडे पळून जाववणार नाही, न जाणो, माझ्यावर हे अरिष्ट येऊन मी मरून जाईन. तर पाहा, पळून जायला हे नगर जवळ असून लहान आहे; पाहा, ते किती लहान आहे; तिकडे मला पळून जाऊ दे, म्हणजे माझा जीव वाचेल.” तेव्हा तो त्याला म्हणाला, “तुझ्या ह्याही गोष्टीला मी मान्य आहे; तू म्हणतोस त्या नगराचा मी नाश करणार नाही. त्वरा कर, तिकडे पळून जा; कारण तू तेथे जाऊन पोहचेपर्यंत मला काही करता येत नाही.” ह्यावरून त्या नगराचे नाव सोअर (लहान) असे पडले. लोट सोअरात जाऊन पोहचला तेव्हा पृथ्वीवर सूर्योदय झाला होता. तेव्हा परमेश्वराने सदोम व गमोरा ह्यांच्यावर गंधक व अग्नी ह्यांचा वर्षाव आकाशातून केला; आणि ती नगरे आणि ती सर्व तळवट, त्या नगरातले सर्व रहिवासी आणि तेथे जमिनीत उगवलेले सर्वकाही ह्यांचा त्याने नाश केला; पण लोटाची बायको त्याच्यामागून चालली होती ती मागे पाहत राहिली आणि ती मिठाचा खांब झाली.

सामायिक करा
उत्पत्ती 19 वाचा