गलतीकरांस पत्र 5:16-24
गलतीकरांस पत्र 5:16-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून मी म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहाची वासना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना देवाच्या आत्म्याविरुद्ध आहे आणि आत्मा देहवासनेविरुद्ध आहे; हे परस्परांस विरूद्ध आहेत, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुम्ही करू नये. तुम्ही देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. आता देहाची कामे उघड आहेत आणि ती हीः व्यभिचार, अमंगळपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, जादूटोणा, वैर, कलह, ईर्ष्या, राग, विरोध, फुटी, गट, मत्सर, धुंदी, दंगल आणि ह्यांसारखी आणखी; ह्यांविषयी मी जसे पूर्वी सांगितले होते तसे आता आधी सांगतो की, या गोष्टी करणार्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. पवित्र आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळही आहेत प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन हे आहे; अशांविरूद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी देहाच्या भावना व वासनांसहित देहस्वभावाला वधस्तंभावर खिळले आहे.
गलतीकरांस पत्र 5:16-24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी तुम्हाला सांगतो, आत्म्याच्या प्रेरणेने चला, मग तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. दैहिक इच्छा आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहाविरुद्ध आहे. ते आपसात विरोधी आहेत, यासाठी की ज्यागोष्टी तुम्ही केल्या पाहिजे त्या तुम्ही करू नये. जर तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालता तर तुम्ही नियमशास्त्राधीन नाही. देहस्वभावाची कृत्ये उघड आहेत: लैंगिक अनैतिकता, अशुद्धता आणि दुर्व्यसनीपणा, मूर्तिपूजा आणि जादूटोणा, द्वेष, मतभेद, मत्सर, क्रोध, स्वार्थी इच्छा, कलह, तट, हेवा, दारुबाजी, गोंधळ आणि अशा प्रकारच्या गोष्टी ज्याबद्दल मी तुम्हाला पूर्वी सावध केले होते की जे कोणी असे जीवन जगतात त्यांना परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळणार नाही. परंतु आत्म्याचे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता व आत्मसंयमन; अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूंचे आहेत, त्यांनी आपल्या दैहिक वासनांना व इच्छांना क्रूसावर खिळले आहे.
गलतीकरांस पत्र 5:16-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी तर म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने1 चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहेत व आत्मा देहवासनांविरुद्ध आहे; ही परस्परविरोधी आहेत, ह्यासाठी की, जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. देहाची कर्मे तर उघड आहेत; ती ही : जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, खून, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. ह्यांविषयी मी तुम्हांला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की, अशी कर्मे करणार्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन हे आहे, अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना ह्यांच्यासह देहस्वभाव वधस्तंभावर खिळला आहे.
गलतीकरांस पत्र 5:16-24 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मी तर म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला आणि देहवासना पूर्ण करू नका. देहवासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहवासनेविरूद्ध आहे, दोन्ही परस्परविरुध्द आहे आणि ह्यामुळे जे काही तुम्ही करू इच्छिता ते तुमच्या हातून घडू शकत नाही. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालविलेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. देहाची कर्मे तर उघड आहेत, ती ही: जारकर्म, अशुद्धता, कामातुरपणा, मूर्तिपूजा, जादूटोणा, वैर, कलह, मत्सर, राग, भांडणतंटे, फुटिरता, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. ह्यांविषयी मी तुम्हांला पूर्वी जे सांगून ठेवले होते, तेच आता सांगतो की, अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. परंतु आत्म्याद्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, चांगुलपणा, औदार्य, विश्वासूपणा, सौम्यता व आत्मनियंत्रण हे आहे, अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना ह्यांच्यासह देहस्वभावाला वधस्तंभावर खिळले आहे.