यहेज्केल 36:26-31
यहेज्केल 36:26-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी तुम्हास नवीन हृदय देईन, तुमच्या ठायी नवीन आत्मा घालीन; तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हास मांसमय हृदय देईन. मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन. आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल. माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल, असे मी करीन. मग तुम्ही, मी तुमच्या पूर्वजांना दिलेल्या, देशात रहाल. तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईन. कारण मी तुम्हास तुमच्या सर्व अशुद्धेतेपासून वाचवीन. मी धान्यावर हुकूम करून त्याची विपुलता करीन. मी तुमच्यावर दुष्काळ पडू देणार नाही. मी झाडाचे फळ आणि शेतांचे उत्पादन वाढवीन याकरिता की, राष्ट्रांमध्ये तुम्हास दुष्काळामुळे होणारी निंदा सहन करावी लागणार नाही. मग तुम्ही तुमच्या वाईट मार्गाचे आणि जी तुमची कृत्ये चांगली नव्हती त्यांचा विचार कराल, तेव्हा तुम्ही आपल्या पापाबद्दल आणि घृणीत कृत्यांबद्दल स्वत:चाच द्वेष कराल.
यहेज्केल 36:26-31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी तुम्हाला नवे हृदय देईन आणि तुमच्यात नवा आत्मा ओतेन; मी तुमच्यातून तुमचे पाषाणी हृदय काढून मांसमय हृदय तुम्हाला देईन. आणि मी माझा आत्मा तुमच्यामध्ये घालेन, तुम्ही माझे विधी आचारावे व माझे नियम काळजीपूर्वक पाळावे म्हणून मी तुम्हाला चालवेन. तेव्हा तुमच्या पूर्वजांना जो देश मी देऊ केला त्यात तुम्ही वस्ती कराल; तुम्ही माझे लोक व्हाल आणि मी तुमचा परमेश्वर होईन. मी तुम्हाला तुमच्या सर्व अशुद्धतेपासून मुक्त करेन. मी धान्यास आज्ञा देईन आणि ते अनेकपट करेन आणि तुमच्यावर दुष्काळ आणणार नाही. तुमच्या झाडांची फळे व तुमच्या शेतातील पीक मी वाढवेन, यासाठी की तुम्ही दुष्काळामुळे राष्ट्रांमध्ये आणखी अपमान सहन करणार नाही. तेव्हा तुम्हाला तुमचे कुमार्ग आणि दुष्कृत्यांची आठवण होईल आणि तुमच्या पापांमुळे व अमंगळ कामांमुळे तुम्हाला तुमचीच किळस वाटेल.
यहेज्केल 36:26-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी तुम्हांला नवे हृदय देईन, तुमच्या ठायी नवा आत्मा घालीन; तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हांला मांसमय हृदय देईन. मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्यांप्रमाणे आचरण कराल असे मी करीन. मी तुमच्या पूर्वजांना दिलेल्या देशात तुम्ही वस्ती कराल, आणि तुम्ही माझी प्रजा व मी तुमचा देव असे होईल. मी तुमच्या सर्व मलिनतेपासून तुम्हांला मुक्त करीन. मी धान्यावर हुकूम करून त्याची विपुलता करीन, तुमच्यावर दुष्काळ आणणार नाही. वृक्षांची फळे व शेतांचा उपज ह्यांची वृद्धी मी करीन, म्हणजे राष्ट्रांमध्ये तुम्हांला ह्यापुढे दुष्काळामुळे होणारी विटंबना भोगावी लागणार नाही. तुम्हांला आपल्या दुष्कर्माचे व अनाचाराचे स्मरण होईल; तुमचे अधर्म व अमंगळ कृत्ये ह्यांमुळे तुमचा तुम्हांलाच वीट वाटेल.


