यहेज्केल 23:22-49 - Compare All Versions
यहेज्केल 23:22-49 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यास्तव अहलीबे परमेश्वर देव म्हणतो, “पहा, मी तुझ्या प्रियकरांना तुझ्याविरूद्ध करीन; ज्यांच्या हून तुझे मन दूर झाले आहे त्या सर्वांना तुझ्याविरूद्ध सभोवतालच्या लोकांस करीन. बाबेलचे तरुण सर्व खास्दी, पकोड, शोआ, व कोआ येथील लोक व अश्शूरी तरुण पुरुष जे देखणे तरुण, अधिकारी, प्रमुख अधिकारी, पराक्रमी मंत्री व सरदार घोड्यावर बसणारे आहेत त्यांना तुझ्याविरूद्ध उभा करीन. ते तुझ्या विरुध्द शस्त्रे, रथ, वाहने, घेऊन येतील. ते मोठे कवच, ढाली, शिरस्त्राण सभोवताली घेऊन येतील तुला शासन करण्याची संधी त्यांना देईन आणि ते तुझ्या कृत्यासाठी तुला शिक्षा करतील. मी माझा राग त्यांच्यावर रोखीन मी त्वेषाने त्यांचा समाचार घेईन ते तुझे कान नाक कापून टाकतील, उरलेले तलवारीने पडतील, तुझ्या पुत्र कन्येला ते घेऊन जातील, व तुझ्या संतानाला अग्नी खाऊन टाकील. ते तुझे कपडे काढून टाकतील व दागिनेही घेऊन जातील. मग मी तुझा सर्व लज्जास्पद स्वभाव व मिसरातील वेश्यावर्तन तुझ्यापासून दूर करेन. तुझ्याकडे त्यांचे डोळे फार काळ लागून रहाणार नाही, तू मिसराबद्द्ल फार काळ विचार करणार नाही. यास्तव परमेश्वर देव असे म्हणतो, पाहा! ज्यांचा तू द्वेष करतेस मी तुला त्यांच्या हाती देईन, ज्यांच्यावरुन तुझे मन दूर झाले त्यांच्या हाती मी तुला देईन. क्रोधाने ते तुझ्याशी सौदा करतील; ते तुझे पद हिरावून घेतील व उघडे नागडे करून काहीच परत करणार नाही, वेश्याकर्माची लाज उघडी केली जाईल, लज्जास्पद स्वभाव, रसमिसळ भाव जाहीर केला जाईल. या सर्वकाही बाबी तुझ्या वेश्या कामासाठी केले जाईल तू मुर्तीसोबत राष्ट्रांना अशुद्ध केलेस. तू तुझ्या बहिणीच्या मार्गाने चाललीस, म्हणून मी शिक्षेचा प्याला तिच्या हाती सोपवून देईन. प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, तू तुझ्या बहिणीचा प्याला पिणार आहेस, जो खोल व मोठा आहे, तू मस्करीचा व उपहासाचा विषय बनशील या प्याल्यात मोठा भरणा असेल. तू मद्यपानाने व दुःखाने भरली जाशील व भिती, धुळधाण हा प्याल्या शोमरोन तुझ्या बहिणीचा आहे. तू पिणार व नाल्यात रिकामे सोडशील, तुझे अनेक तुकडे केले जातील आणि तुझ्या स्तनांचे अनेक तुकडे केले जातील. असे मी जाहीर करतो, मी परमेश्वर देव जाहीर करत आहे. यास्तव प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, कारण तू मला विसरलास व मला मागे फेकून दिलेस तसेच स्वत:ला उंच करून आपला लाजीरवाणा जारकर्मी स्वभाव प्रकट केला.” परमेश्वर देव मला म्हणाला, “मानवाच्या मुला, तू अहला आणि अहलीबा यांचा न्याय करशील काय? म्हणून त्यांना त्यांचे किळसवाणे मार्ग सादर कर, जेव्हापासून त्यांनी व्यभिचार मुर्तीसोबत केला व त्यांच्या संतानांना पुढे वारशाने दिला व पिऊन टाकणाऱ्या अग्नीसाठी भगदड पाडले. आणि त्यांनी सतत माझ्याशी असेच वर्तन ठेवले, त्यांनी माझे स्थान अपवित्र केले आणि त्याच दिवशी त्यांनी माझा शब्बाथात भेसळ केली. जेव्हा मूर्तीसाठी त्यांनी आपल्या मुलाबाळांचे तुकडे केले, त्याच दिवशी ते माझ्या स्थानी येऊन माझा शब्बाथ भेसळ केला मग पाहा! त्यांनी माझ्या घरात हेच केले. लांबून आलेल्या लोकांस तू बाहेर पाठवून दिले तू निरोप्याला पाठवलेस आता पाहा ते खरोखर येतील ज्यांची तू आंघोळ घालशील डोळ्यात अंजन घातलेस व दागीन्यांनी आपणास नटवीले. वेल बुट्टीदार पलंगावर आणि त्याज पुढे मेज मांडला व त्यावर सुगंधी द्रव्य व तेल मांडले. मग लोकांच्या गर्दीच्या आवाजात काळजी करणारे होते आणि रानातून मद्यपी, नालायक लोकांस जंगलातून आणण्यात आले. त्यांनी आपल्या हातात कडे घातले होते व मस्तकावर मुकुट घातला होता. मग मी त्यांना एक झिजून गेलेली व्यभिचाराच्या कृत्यांबद्दल सांगितले, ‘आता ते तिच्याशी व ती त्यांच्याशी जारकर्म करील.’ ते जसे वेश्येकडे जातात तसे ते अहला व अहलीबा या दोषी वेश्येकडे गेले. पण धार्मिक लोक तिच्या व्यभिचारासाठी व रक्तपातासाठी तिच्या हातून घडलेल्या पातकांचा न्याय निवाडा करतील. प्रभू परमेश्वर म्हणतो, मी त्याजवर लोकसमुदाय आणून दहशत घालीन व ते आतंक, लुटमार करतील. मग लोकसमुदाय त्यांना धोंडमार करतील व तलवारीने त्यांचे तुकडे करतील, त्यांच्या मुलाबाळांना मारुन टाकतील व त्यांच्या घरांना जाळून टाकतील. मी भूमीतील लज्जास्पद स्वभाव काढून टाकीन व सर्व स्त्रियांना शिस्त लावीन यापुढे ते वेश्याकर्म करणार नाहीत. मग त्यांचे लज्जास्पद वर्तन तुझ्याविरुध्द करीन तू मुर्तीसोबत केलेल्या पापाचे फळ भोगशील मग यामार्गाने तुला कळेल मी परमेश्वर देव आहे.”
यहेज्केल 23:22-49 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“म्हणून, हे ओहोलीबाह, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्या तुझ्या प्रियकरांपासून तू तिरस्काराने दूर झालीस त्यांना मी तुझ्याविरुद्ध भडकवीन, प्रत्येक बाजूंनी मी त्यांना तुझ्याविरुद्ध आणेन; बाबेल व खास्द्यांचे लोक, पकोड, शोआ व कोआतील पुरुष आणि त्यांच्यासह सर्व अश्शूरी, सुंदर तरुण पुरुष, त्यांचे राज्यपाल आणि सरदार, रथ अधिकारी, उच्च पदाधिकारी व घोडेस्वार. हत्यारे, रथ व गाडे व लोकांचा घोळका घेऊन ते तुझ्याविरुद्ध येतील; ते सर्व बाजूंनी तुझ्याविरुद्ध मोठ्या व लहान ढाली आणि शिरटोप घालून तुझ्याविरुद्ध येतील. तुला शिक्षा करावी म्हणून मी तुला त्यांच्या हाती देईन आणि त्यांच्या मापदंडानुसार ते तुला शिक्षा करतील. मी आपला ईर्षायुक्त क्रोध तुझ्यावर आणेन आणि संतापाने ते तुझ्याशी वागतील. ते तुझे नाक व कान कापतील आणि तुझ्यातील मागे राहिलेले ते तलवारीने पडतील आणि त्यातूनही जे वाचतील ते अग्नीने भस्म होतील. ते तुझी वस्त्रे काढून घेतील व तुझे दागिने हिसकावून घेतील. म्हणजे जी अश्लीलता व वेश्यावृत्ती तू इजिप्तमध्ये चालू केली तिचा शेवट मी करेन. या गोष्टींकडे तू पुन्हा पाहणार नाहीस आणि यापुढे इजिप्तचे स्मरण आणखी करणार नाहीस. “कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्यांचा तू द्वेष करतेस, तिरस्काराने ज्यांच्यापासून तू दूर झालीस त्यांच्या हाती मी तुला देत आहे. ते तुझ्याशी द्वेषाने वागतील आणि ज्यासाठी तू काम केले त्या सर्व गोष्टी ते तुझ्यापासून हिसकावून घेतील. ते तुला अगदी नग्न करतील आणि तुझ्या वेश्यावृत्तीची लाज उघडी पडेल. तुझी अश्लीलता व दुराचारांनी हे सर्व तू तुझ्यावर ओढवून घेतले आहे, कारण तू राष्ट्रांची अभिलाषा धरलीस आणि त्यांच्या मूर्तींनी स्वतःला विटाळून टाकले. तू आपल्या बहिणीच्या मार्गाने गेलीस; म्हणून तिचा पेला मी तुझ्या हाती देईन. “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “तू तुझ्या बहिणीचा पेला पिशील, जो पेला मोठा व खोल आहे; तो तुझ्यावर हास्य व थट्टा आणेल, कारण त्यात पुष्कळ मावते. नशा व दुःख यांनी तू भरशील हा पेला नाश व विध्वंसाचा आहे, तो पेला तुझी बहीण शोमरोन हिचा आहे. तू तो पेला पिऊन कोरडा करशील आणि त्याचे तुकडे चावशील; आणि तू आपली छाती फाडशील. हे मी बोललो आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. “म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तू मला विसरलीस व माझ्याकडे पाठ फिरवलीस, म्हणून त्याचा परिणाम तू भोगलाच पाहिजे, तू तुझ्या अश्लीलतेचे व वेश्यावृत्तीचे प्रतिफळ भोगलेच पाहिजे.” याहवेहने मला म्हटले: “मानवपुत्रा, ओहोलाह व ओहोलीबाहचा न्याय तू करशील काय? मग त्यांच्या अमंगळ कृत्यांबद्दल त्यांचा निषेध कर. कारण त्यांनी व्यभिचार केला आहे आणि रक्त त्यांच्या हातावर आहे. त्यांनी त्यांच्या मूर्तींशी व्यभिचार केला; त्या मूर्तींना अन्न म्हणून ज्या लेकरांना त्यांनी माझ्यापासून जन्म दिला त्यांचा यज्ञ त्यांनी मूर्तींना केला. त्यांनी मलाही असेच केले: त्याचवेळी त्यांनी माझे पवित्रस्थान अपवित्र आणि माझे शब्बाथ भ्रष्ट केले. त्याच दिवशी त्यांनी त्यांच्या लेकरांचे यज्ञ त्यांच्या मूर्तींना केले, ते माझ्या पवित्रस्थानात आले आणि ते अपवित्र केले. माझ्या घरात त्यांनी ही कृत्ये केली. “जी माणसे दुरून आली होती त्यांना देखील त्यांनी बोलाविणे पाठवले आणि जेव्हा ते आले त्यांच्यासाठी तू स्नान केले, डोळ्यात काजळ घातले आणि आपले दागिने चढविले. तू एका सुंदर पलंगावर बसलीस, ज्यापुढे एक मेज ठेवलास त्यावर जे माझे होते ते धूप व जैतुनाचे तेल ठेवले. “चैनबाजी करणाऱ्या लोकांच्या गर्दीचा आवाज तिच्या आजूबाजूला होता; गोंधळी लोकांबरोबर दारूबाज लोक आणले गेले होते आणि त्यांनी स्त्रिया व त्यांच्या बहिणीच्या हातात बांगड्या आणि त्यांच्या डोक्यावर सुंदर मुकुट घातले. तेव्हा जी स्त्री व्यभिचार करून निकामी झाली होती तिच्याविषयी म्हटले, ‘वेश्या म्हणून त्यांनी तिचा उपयोग करावा, कारण ती वेश्याच तर आहे.’ आणि ते तिच्याबरोबर झोपले. पुरुष जसे वेश्यांबरोबर झोपतात तसेच ते त्या अश्लील स्त्रिया, ओहोलाह व ओहोलीबाह यांच्याबरोबर झोपले. परंतु ज्या व्यभिचार करतात आणि रक्त सांडतात, त्या स्त्रियांना नीतिमान न्यायाधीश दंड देतील, कारण त्या व्यभिचारी आहेत आणि त्यांचे हात रक्ताने भरले आहेत. “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: त्यांच्याविरुद्ध मोठा जमाव आणा आणि त्यांना आतंक व लुटेच्या स्वाधीन करा. लोकांचा जमाव त्यांना धोंडमार करतील आणि त्यांना तलवारीने कापतील; ते त्यांच्या मुलांना व मुलींना जिवे मारतील आणि त्यांची घरे जाळून टाकतील. “देशातील अश्लीलतेचा मी शेवट करेन, म्हणजे सर्व स्त्रिया सावध राहतील आणि तुमच्याप्रमाणे त्या करणार नाही. तुमच्या अश्लीलतेचा दंड तुम्ही भोगाल आणि तुमच्या मूर्तिपूजेच्या पापाचे परिणाम तुम्ही भोगाल. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच सार्वभौम याहवेह आहे.”
यहेज्केल 23:22-49 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यामुळे अगे अहलीबे, प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा, ज्या तुझ्या जारांवरून तुझे मन उडाले आहे त्यांना मी तुझ्याविरुद्ध उठवीन त्यांना तुझ्यावरून चोहोकडून आणीन; बाबेलचे पुरुष, सर्व खास्दी, पकोड, शोआ व कोआ येथले लोक व अश्शूरी पुरुष, जे सर्व मनोहर तरुण, अधिपती व नायब अधिपती, वीर व मंत्री व शिलेदार आहेत; त्यांना तुझ्यावर आणीन. ते शस्त्रे, रथ, चाकांची वाहने, निरनिराळ्या लोकांचा दळभार घेऊन तुझ्यावर येतील; ते कवचे, ढाली व शिरस्त्राणे धारण करून तुला चोहोंकडून घेरतील; मी न्याय करण्याचे काम त्यांना सोपवून देईन, म्हणजे ते आपल्या कायद्यांना अनुसरून न्याय करतील. मी तुझ्यावर माझी ईर्ष्या रोखीन म्हणजे ते संतापून तुझा समाचार घेतील; ते तुझे नाक व कान कापून टाकतील; तुझी अवशिष्ट माणसे तलवारीने पडतील; ते तुझ्या कन्या व पुत्र हरण करतील, तुझी अवशिष्ट माणसे अग्नीने भस्म होतील. ते तुझी वस्त्रे हरण करतील, तुझे उत्कृष्ट जवाहीर हिसकावून घेतील. अशी तुझी शिंदळकीची खोड, मिसर देशात तुला लागलेली व्यभिचाराची चट, मी मोडीन, म्हणजे तू त्यांच्याकडे पुन्हा ढुंकून पाहणार नाहीस व मिसर देशाचे स्मरण तू ह्यापुढे करणार नाहीस. प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, ज्यांचा तू द्वेष करतेस त्यांच्या स्वाधीन तुला मी करीन, ज्यांच्यावरून तुझे मन उडाले आहे त्यांच्या हाती तुला देईन; ते द्वेषाने तुझा समाचार घेतील, ते तुझी सर्व मालमत्ता हरण करून तुला नागवीउघडी करतील; अशाने तुझ्या शिंदळचाळ्यांची, तुझ्या कामासक्तीची व तुझ्या व्यभिचाराची लाज उघडी पडेल. तू व्यभिचार करण्यासाठी अन्य राष्ट्रांच्या मागे लागलीस व त्यांच्या मूर्तींनी आपणांस विटाळलेस म्हणून हे सर्व तुला प्राप्त होईल. तू आपल्या बहिणीच्या मार्गाने गेलीस म्हणून मी तिच्याप्रमाणे तुझ्याही हाती पेला देईन. प्रभू परमेश्वर म्हणतो, तू आपल्या बहिणीच्या पेल्यासारखा खोल व मोठा पेला पिशील, त्याचे माप मोठे असल्यामुळे तू हास्य व थट्टा ह्यांना पात्र होशील. तू नशा व शोक ह्यांनी व्याप्त होशील. तुझी बहीण शोमरोन हिचा पेला विस्मय व विध्वंस ह्यांचा आहे. तू तो निथळून पिशील, त्याच्या खापर्या तू कुरतडून खाशील व त्यांनी तू आपले ऊर ओरबाडशील; कारण मी हे बोललो आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, तू मला विसरली आहेस, व तू माझ्याकडे पाठ फिरवली आहेस, म्हणून तू आपल्या कामासक्तीचे व व्यभिचाराचे फळ भोग.” आणखी परमेश्वर मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू अहला व अहलीबा ह्यांचा न्याय करतोस ना? तर त्यांना त्यांची अमंगळ कृत्ये दाखव. कारण त्यांनी व्यभिचार केला आहे, त्यांच्या हातांना रक्त लागले आहे, त्यांनी आपल्या मूर्तींबरोबर व्यभिचार केला आहे आणि माझ्यापासून त्यांना झालेले पुत्र मूर्तींना भक्ष्य व्हावे म्हणून त्यांनी अग्नीत त्यांचे होम केले आहेत. त्यांनी आणखी माझ्याबरोबर हेही वर्तन केले आहे की, त्यांनी त्याच दिवशी माझे पवित्रस्थान अपवित्र केले आणि माझे शब्बाथ भ्रष्ट केले. कारण त्यांनी आपल्या पुत्रांचा वध करून ते आपल्या मूर्तींना अर्पण केले, तेव्हा त्याच दिवशी त्या माझे पवित्रस्थान अपवित्र करण्यासाठी त्यांत आल्या; पाहा, माझ्या मंदिरांत त्यांनी असे वर्तन केले. तसेच तुम्ही दूरदूरच्या पुरुषांना बोलावणे पाठवले; त्यांच्याकडे जासूद पाठवला आणि पाहा, ते आले; त्यांच्यासाठी तू स्नान केले, डोळ्यांत काजळ घातले व दागिन्यांनी आपणास सजवले; तू उत्कृष्ट मंचकावर बसलीस, त्यापुढे मेज मांडून त्यावर माझा धूप व तेल ठेवले. तेथे चैनी लोकांची धामधूम चालू झाली; सामान्य पुरुषांबरोबर रानातून आणखी दारूबाज लोक आणण्यात आले; त्यांनी त्यांच्या हातांत बांगड्या घातल्या व डोक्यांना उत्तम शिरोभूषणे घातली. तेव्हा जी शिंदळकी करून निःसत्त्व झाली होती तिच्याविषयी मी म्हणालो की, आता ते तिच्याबरोबर व ती त्यांच्याबरोबर व्यभिचार करील काय? लोक वेश्येकडे जातात तसे ते तिच्याकडे गेले; ते अहला व अहलीबा ह्या शिंदळ स्त्रियांकडे गेले. तथापि नीतिमान लोक जारिणींचा व खुनी स्त्रियांचा न्याय करतात तसा त्यांचा करतील; कारण त्या जारिणी आहेत व त्यांच्या हातांना रक्त लागले आहे.” प्रभू परमेश्वर म्हणतो, “मी त्यांच्यावर लोकांचा जमाव आणून त्यांना दहशत पडेल व त्यांना लुटतील असे करीन. लोकांचा जमाव त्यांना दगडमार करील, व आपल्या तलवारीने त्यांचा उच्छेद करील. ते त्यांच्या मुलाबाळांची कत्तल करतील व त्यांची घरे अग्नीने जाळून टाकतील. अशा प्रकारे मी देशातून शिंदळकी नाहीशी करीन, म्हणजे सर्व स्त्रिया सावध होऊन तुमच्याप्रमाणे शिंदळकी करणार नाहीत. ते तुमच्या शिंदळकीचे प्रतिफळ तुम्हांला देतील; तुम्ही आपल्या मूर्तिपूजेच्या पातकांचे फळ भोगाल; तेव्हा तुम्हांला समजेल की मी प्रभू परमेश्वर आहे.”