निर्गम 33:7-23
निर्गम 33:7-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मोशे छावणीबाहेर बऱ्याच अंतरावर तंबू लावत असे. मोशेने त्यास दर्शनमंडप असे नाव दिले होते; ज्या कोणाला परमेश्वरास काही विचारावयाचे असेल तो छावणीबाहेरील दर्शनमंडपाकडे जाई. ज्या वेळी मोशे छावणीतून मंडपाकडे जाई त्या वेळी सर्व लोक आपापल्या तंबूच्या दारात उभे राहत आणि मोशे मंडपाच्या आत जाईपर्यंत त्यास निरखून बघत. जेव्हा मोशे मंडपात जाई तेव्हा मेघस्तंभ खाली उतरून येई आणि मंडपाच्या दारापाशी तो उभा राही; ह्याप्रमाणे परमेश्वर मोशेशी बोलत असे. जेव्हा लोक दर्शनमंडपाच्या दारात ढग बघत तेव्हा ते आपापल्या तंबूच्या दारात उभे राहून देवाला नमन करीत. मित्रांशी बोलावे त्याप्रमाणे परमेश्वर मोशेबरोबर समोरासमोर बोलत असे. मोशे छावणीकडे माघारी जात असे. तरी मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशवा, हा तरुण मंडप सोडून बाहेर येत नसे. मोशे परमेश्वरास म्हणाला, “पाहा या लोकांस घेऊन जाण्यास तू मला सांगितलेस, परंतु तू माझ्याबरोबर कोणाला पाठविणार ते तू सांगितले नाहीस; तू मला म्हणालास, मी तुला तुझ्या नावाने ओळखतो आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे. आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखव म्हणजे मला तुझी ओळख पटेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल. पाहा, हे राष्ट्र तुझी प्रजा आहे.” परमेश्वराने उत्तर दिले, “मी स्वत: तुझ्याबरोबर येईन व तुला विसावा देईन.” मग मोशे परमेश्वरास म्हणाला, “जर तू स्वतः येणार नाहीस तर मग आम्हांला या येथून पुढे नेऊ नकोस. तसेच तुझी कृपादृष्टी माझ्यावर व तुझ्या लोकांवर झाली आहे हे कशावरून समजावे? जर तू आमच्याबरोबर आल्याने मी व हे तुझे लोक पृथ्वीवरील इतर सर्व लोकांहून वेगळे झालो आहो यावरूनच ते समजायचे ना?” मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू मागतोस त्याप्रमाणे मी करीन, कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी व्यक्तीशः तुला तुझ्या नावाने ओळखतो.” नंतर मोशे म्हणाला, “आता कृपा करून मला तुझे तेज दाखव.” मग परमेश्वराने मोशेला उत्तर दिले, “मी माझे सर्व चांगुलपण तुझ्यापुढे चालवीन; मी परमेश्वर आहे आणि हे माझे नाव मी जाहीर करीन. ज्याच्यावर कृपा करावीशी वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करावीशी वाटते त्याच्यावर दया करीन. परंतु” तू माझा “चेहरा पाहू शकणार नाहीस, कारण माझा चेहरा पाहिलेला कोणीही मनुष्य जिवंत राहणार नाही.” परमेश्वर म्हणाला, “माझ्याजवळ या ठिकाणी एक खडक आहे; तू त्यावर उभा राहा. माझे तेज त्या जागेजवळून पुढे जाईल, तेव्हा मी तुला त्या खडकातील मोठ्या भेगेत ठेवीन; आणि मी निघून जाईपर्यंत माझ्या हाताने तुला झाकीन; नंतर मी माझा हात काढून घेईन आणि तू माझी पाठ पाहशील; परंतु तू माझा चेहरा पाहणार नाहीस.”
निर्गम 33:7-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आता छावणीबाहेर थोड्या दूर अंतरावर मोशे एक तंबू उभारीत असे, त्याला तो “सभामंडप असे म्हणे.” ज्याला याहवेहशी बोलायचे असेल तो छावणीबाहेर असलेल्या त्या सभामंडपाकडे जात असे. आणि जेव्हा मोशे बाहेर मंडपाकडे जाई, तेव्हा सर्व लोक आपआपल्या तंबूच्या दाराशी उठून उभे राहून मोशे मंडपामध्ये जाईपर्यंत त्याला पाहत असत. आणि जेव्हा मोशे मंडपामध्ये प्रवेश करी, तेव्हा याहवेह मोशेशी बोलेपर्यंत, मेघस्तंभ खाली उतरून मंडपाच्या दाराशी थांबत असे. जेव्हा लोक मेघस्तंभ मंडपाच्या दाराशी थांबलेला पाहत, ते सर्व आपआपल्या तंबूच्या दाराशी उभे राहून उपासना करीत असत. जसा एखादा व्यक्ती आपल्या मित्राशी बोलतो तसे याहवेह मोशेशी समोरासमोर बोलत असत. मग मोशे छावणीकडे परत जात असे, परंतु त्याचा तरुण सहकारी, नूनाचा पुत्र यहोशुआ हा मंडप सोडून जात नसे. मग मोशे याहवेहशी बोलला, “तुम्ही मला सांगत आला, ‘या लोकांना चालव,’ परंतु माझ्याबरोबर तुम्ही कोणाला पाठविणार हे तुम्ही मला सांगितले नाही. तुम्ही म्हणाला, ‘मी तुला नावाने ओळखतो आणि तू माझ्या दृष्टीने कृपा पावला आहेस.’ जर तुम्ही माझ्यावर संतुष्ट असाल, तर मला तुमचे मार्ग शिकवा, यासाठी की मी तुम्हाला जाणून तुमच्या दृष्टीत कृपा पावावी. हे स्मरणात असू द्या की हे राष्ट्र तुमचे लोक आहेत.” यावर याहवेहने उत्तर दिले, “माझी समक्षता तुझ्याबरोबर जाईल आणि मी तुला विसावा देईन.” मग मोशे याहवेहला म्हणाला, “जर तुमची समक्षता आमच्याबरोबर गेली नाही, तर आम्हाला येथून पुढे पाठवू नका. तुम्ही आम्हाबरोबर आला नाही, तर माझ्यावर आणि आपल्या लोकांवर तुमची कृपादृष्टी झाली आहे की नाही हे कसे कळणार? मी व तुमचे लोक पृथ्वीवरील इतर सर्व लोकांपासून वेगळे आहोत हे कसे समजणार?” यावर याहवेहने मोशेला म्हटले, “जी गोष्ट तू माझ्याकडे मागितली आहे तीच मी करेन, कारण तुझ्यावर मी संतुष्ट आहे आणि मी तुला नावाने ओळखतो.” तेव्हा मोशेने विनंती केली, “आता मला तुमचे गौरव दाखवा.” आणि याहवेह म्हणाले, “मी माझे सर्व चांगुलपण तुझ्यापुढून चालवेन आणि याहवेह म्हणून माझ्या नावाची घोषणा मी तुझ्यासमक्ष करेन. ज्याच्यावर मला कृपा करावयाची त्याच्यावर मी कृपा करेन आणि ज्याच्यावर मला दया करावयाची त्याच्यावर मी दया करेन.” याहवेह म्हणाले, “पण तू माझा चेहरा पाहू शकणार नाहीस, कारण मला पाहिल्यानंतर कोणीही मनुष्य जगत नाही.” मग याहवेह म्हणाले, “माझ्याजवळ एक जागा आहे, जिथे एका खडकावर तू उभा राहा. माझे गौरव जवळून जात असता, मी तुला खडकाच्या कपारीत ठेवेन आणि मी पार होईपर्यंत मी तुला माझ्या हाताने झाकीन. मग मी माझा हात काढून घेईन आणि तू माझी पाठ पाहशील; पण माझा चेहरा तुला दिसणार नाही.”
निर्गम 33:7-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मोशे छावणीबाहेर बर्याच अंतरावर तंबू नेऊन उभा करी व त्याला तो दर्शनमंडप1 म्हणे. कोणाला परमेश्वराकडे काही विचारायचे असले म्हणजे तो छावणीबाहेरील त्या दर्शनमंडपाकडे जात असे. आणि असे व्हायचे की, जेव्हा मोशे त्या मंडपाकडे जात असे तेव्हा सर्व लोक उठून आपापल्या तंबूच्या दारात उभे राहत आणि तो मंडपात प्रवेश करीपर्यंत त्याच्याकडे निरखून पाहत राहत. मोशे मंडपात प्रवेश करी तेव्हा मेघस्तंभ उतरून मंडपाच्या दारापुढे उभा राही आणि परमेश्वर मोशेशी भाषण करीत असे. त्या मंडपाच्या दाराशी मेघस्तंभ उभा आहे असे सर्व लोक पाहत तेव्हा ते सगळे उठून आपापल्या तंबूच्या दाराशी दंडवत घालत. मित्राशी बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोलत असे. मोशे छावणीकडे परत जात असे, तरी त्याचा सेवक नूनाचा मुलगा यहोशवा, हा तरुण पुरुष मंडप सोडून बाहेर येत नसे. परमेश्वराच्या समक्षतेचे आश्वासन मोशे परमेश्वराला म्हणाला, “पाहा, तू मला म्हणतोस की, ‘ह्या लोकांना घेऊन जा’; पण तू माझ्याबरोबर कोणाला पाठवणार हे मला अजून कळवले नाहीस. तरी तू म्हटले आहेस की, ‘मी तुला व्यक्तिश: नावाने ओळखतो, आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे.’ आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास, तुझे मार्ग मला दाखव, म्हणजे मला तुझी ओळख पटेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल. हे राष्ट्र तुझी प्रजा आहे हे लक्षात घे.” परमेश्वर म्हणाला, “मी स्वत: येईन आणि तुला विसावा देईन.” तो त्याला म्हणाला, “तू स्वत: येत नसलास तर आम्हांला येथून पुढे नेऊ नकोस. तुझी कृपादृष्टी माझ्यावर व तुझ्या प्रजेवर झाली आहे हे कशावरून समजावे? तू आमच्याबरोबर आल्याने मी व तुझे प्रजाजन पृथ्वीवरील इतर सर्व लोकांपेक्षा वेगळे झालो आहोत ह्यावरूनच ते समजायचे ना?” मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “हे जे तू सांगितले आहेस तेही मी करीन; कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी तुला व्यक्तिश: नावाने ओळखत आहे.” तो म्हणाला, “कृपा करून मला तुझे तेज दाखव.” तो म्हणाला, “मी आपले सर्व चांगुलपण तुझ्यापुढे चालवीन; तुझ्यासमोर ‘परमेश्वर’ ह्या नावाची मी घोषणा करीन; ज्याच्यावर कृपा करावी असे वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करावी असे वाटेल त्याच्यावर दया करीन. तरीपण” तो म्हणाला की, “तुला माझे मुख पाहवणार नाही, कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही.” परमेश्वर म्हणाला, “माझ्याकडे एक जागा आहे; येथे ह्या खडकावर उभा राहा; असे होईल की, माझे तेज जवळून चालले असता मी तुला खडकाच्या भेगेत ठेवीन; मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला झाकीन; मग मी आपला हात काढून घेईन आणि तुला पाठमोरा दिसेन; पण माझे मुख दिसायचे नाही.”