निर्गम 16:22-36 - Compare All Versions
निर्गम 16:22-36 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सहाव्या दिवशी त्यांनी दुप्पट म्हणजे प्रत्येक माणशी दोन ओमर गोळा केले, तेव्हा त्या मंडळीच्या सर्व सरदारांनी मोशेकडे येऊन त्याला हे कळवले. तो त्यांना म्हणाला, “परमेश्वराचे सांगणे असे आहे की, उद्या विसाव्याचा दिवस, परमेश्वराचा पवित्र शब्बाथ आहे; तुम्हांला भाजायचे ते भाजा आणि शिजवायचे ते शिजवा. जे काही उरेल ते आपल्यासाठी सकाळपर्यंत ठेवा.” मोशेने त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी ते सकाळपर्यंत ठेवले; पण त्याची घाण सुटली नाही की त्यात किडे पडले नाहीत. मग मोशे म्हणाला, “ते आज खा, कारण आज परमेश्वराचा शब्बाथ आहे, आज रानात ते तुम्हांला मिळायचे नाही. सहा दिवस तुम्ही ते गोळा करावे; सातवा दिवस शब्बाथ आहे, त्या दिवशी काहीएक नसणार.” तरी सातव्या दिवशी ते गोळा करण्यासाठी काही लोक बाहेर गेले, पण त्यांना काही मिळाले नाही. तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, “माझ्या आज्ञा व माझे नियम पाळायचे तुम्ही कोठवर नाकारणार? पाहा, परमेश्वराने तुम्हांला शब्बाथ दिला आहे म्हणून सहाव्या दिवशी तो तुम्हांला दोन दिवसांचे अन्न देतो. सातव्या दिवशी प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी स्वस्थ असावे, आपले ठिकाण सोडून कोणीही बाहेर जाऊ नये.” ह्याप्रमाणे लोकांनी सातव्या दिवशी विसावा घेतला. इस्राएल लोकांनी त्या अन्नाचे नाव मान्ना1 ठेवले. ते धण्यासारखे पांढरे असून त्याची चव मध घालून केलेल्या पोळीसारखी होती. मोशे म्हणाला, “परमेश्वराने अशी आज्ञा दिली आहे की, ह्यातले एक ओमरभर पुढील पिढ्यांच्या लोकांसाठी ठेवा; मी तुम्हांला मिसर देशातून काढून आणून रानात कोणत्या प्रकारचे अन्न दिले हे त्यांना ह्यावरून दिसेल.” तेव्हा मोशे अहरोनाला म्हणाला, “एक पात्र घेऊन त्यात एक ओमरभर मान्ना घाल; ते तुमच्या पुढील पिढ्यांसाठी परमेश्वरासमोर राखून ठेवायचे आहे.” परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे ते जतन करावे म्हणून साक्षपटासमोर अहरोनाने ठेवले. इस्राएल लोक वस्ती असलेल्या देशात जाऊन पोहचेपर्यंत चाळीस वर्षे मान्ना खात होते. कनान देशाच्या सरहद्दीपर्यंत जाऊन पोहचेपर्यंत ते मान्ना खात होते. ओमर हा एफाचा दहावा भाग आहे.
निर्गम 16:22-36 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सहाव्या दिवशी त्यांनी दुप्पट म्हणजे प्रत्येक माणशी दोन ओमर गोळा केले. तेव्हा मंडळीचे सर्व पुढारी लोक मोशेकडे आले व त्यांनी हे त्यास कळवले. तो त्यांना म्हणाला, “परमेश्वराचे सांगणे असे आहे की, उद्या विश्रामवार, परमेश्वराचा पवित्र शब्बाथ आहे. तुम्हास भाजावयाचे ते भाजा आणि शिजवायचे ते शिजवा आणि जे काही उरेल ते आपल्यासाठी सकाळपर्यंत ठेवावे.” मोशेने सांगितल्याप्रमाणे त्यांनी ते सकाळपर्यंत ठेवले. पण त्याची घाण सुटली नाही किंवा त्यामध्ये कोठेही किडे पडले नाहीत. मग मोशे म्हणाला, “ते आज खा, कारण आज परमेश्वराचा शब्बाथ आहे, आज रानात ते तुम्हास मिळावयाचे नाही. तुम्ही सहा दिवस ते गोळा करावे, परंतु आठवड्याचा सातवा दिवस हा शब्बाथ आहे. त्या दिवशी काही मिळणार नाही.” तरी काही लोक सातव्या दिवशी ते गोळा करावयास बाहेर गेले, परंतु त्यांना काहीच मिळाले नाही. नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “माझ्या आज्ञा व माझे नियम पाळावयास तुम्ही कोठवर नाकारणार? पाहा परमेश्वराने तुम्हास शब्बाथ दिला आहे; म्हणून सहाव्या दिवशी तो तुम्हास तो दोन दिवस पुरेल एवढे अन्न देतो, तेव्हा सातव्या दिवशी आपआपल्या ठिकाणी स्वस्थ असावे, आपले स्थान सोडून कोणीही बाहेर जाऊ नये.” याप्रमाणे लोकांनी सातव्या दिवशी विसावा घेतला. इस्राएल लोकांनी त्या अन्नाचे नाव मान्ना ठेवले; ते धण्यासारखे पांढरे असून त्याची चव मध घालून केलेल्या पोळीसारखी होती. मोशे म्हणाला, “परमेश्वराने अशी आज्ञा दिली आहे की ह्यातले एक ओमर पुढील पिढ्यांच्या लोकांसाठी राखून ठेवा. मी तुम्हास मिसर देशातून काढून नेल्यावर रानात कसे अन्न दिले हे त्यांना समजेल.” तेव्हा मोशेने अहरोनाला सांगितले, “एक भांडे घे आणि त्यामध्ये एक ओमर मान्ना घाल. तो परमेश्वरापुढे सादर करण्यासाठी आपल्या पुढील पिढ्यांसाठी राखून ठेव.” मग परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे अहरोनाने परमेश्वराच्या आज्ञापटापुढे ते भांडे ठेवले. इस्राएल लोक तो मान्ना चाळीस वर्षे, कनान देशाच्या सरहद्दीपर्यंत जाऊन पोहोचेपर्यंत खात होते. एक ओमर मान्ना म्हणजे “एक एफाचा दहावा भाग” आहे.
निर्गम 16:22-36 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आठवड्याच्या सहाव्या दिवशी ते रोजच्यापेक्षा दुप्पट—प्रत्येकी दोन ओमेर अन्न गोळा करीत—आणि सर्व इस्राएली वडीलमंडळींनी येऊन मोशेला याबद्दल हवाला दिला. मोशेने त्यांना सांगितले, “याहवेहची आज्ञा हीच आहे: ‘उद्या विसाव्याचा दिवस, याहवेहचा पवित्र शब्बाथ आहे. तर तुम्हाला जे काही शिजवायचे आहे ते शिजवा व जे उकळावयाचे असेल ते उकळून घ्या. जे उरेल ते सकाळपर्यंत ठेवा.’ ” म्हणून त्यांनी मोशेने आज्ञापिल्याप्रमाणे ते सकाळपर्यंत ठेवले तेव्हा त्याला ना दुर्गंधी आली ना त्यात किडे पडले. मोशे म्हणाला, “आज हे खा, कारण आज याहवेहचा शब्बाथ आहे. म्हणून तुम्हाला आज त्यातील काही जमिनीवर मिळणार नाही. सहा दिवस तुम्ही ते गोळा करावे, पण सातव्या दिवशी शब्बाथ आहे. या दिवशी ते मिळणार नाही.” पण काही लोक सातव्या दिवशी सुद्धा ते गोळा करावयाला बाहेर गेले. पण त्यांना काहीही सापडले नाही. मग याहवेहने मोशेला म्हटले, “किती काळ तुम्ही माझे नियम व माझ्या आज्ञा पाळण्याचे नाकारणार? हे लक्षात घ्या की याहवेहने तुम्हाला हा शब्बाथ दिलेला आहे; म्हणून सहाव्या दिवशी ते तुम्हाला दोन दिवसासाठी भाकर देतात. सातव्या दिवशी प्रत्येकाने ते जिथे आहेत तिथेच थांबावे; कोणीही बाहेर जाऊ नये.” म्हणून लोकांनी सातव्या दिवशी विसावा घेतला. इस्राएली लोकांनी त्या भाकरीला मान्ना असे नाव दिले. ते धण्याच्या बीजाप्रमाणे पांढरे असून त्याची चव मध घालून केलेल्या पापडीप्रमाणे होती. मोशे म्हणाला, “याहवेहने अशी आज्ञा दिली आहे: ‘एक ओमेर मान्ना घेऊन तो येणार्या पिढ्यांसाठी ठेवा, की तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणल्यावर रानामध्ये मी तुम्हाला खायला दिलेली भाकरी ते पाहू शकतील.’ ” मोशेने अहरोनाला सांगितले, “एक पात्र घे व त्यात एक ओमेर मान्ना घाल. मग तो पुढे येणार्या पिढ्यांसाठी याहवेहसमोर ठेव.” याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे, अहरोनाने तो मान्ना कराराच्या पाट्यांबरोबर ठेवला, अशासाठी की तो राखून ठेवला जाईल. इस्राएली लोक स्थायिक असलेल्या भूमीवर येईपर्यंत, त्यांनी चाळीस वर्षे मान्ना खाल्ला; ते कनान देशाच्या सीमेवर पोहोचेपर्यंत त्यांनी मान्ना खाल्ला. (एक ओमेर हा एका एफाचा दहावा भाग आहे.)