निर्गम 13:1-16
निर्गम 13:1-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला, “इस्राएली लोकांमध्ये मनुष्याचा व पशूचा या दोहोंचे प्रत्येक प्रथम जन्मलेले सर्व नर माझ्यासाठी पवित्र कर. प्रथम जन्मलेले ते माझे आहेत.” मोशे लोकांस म्हणाला, “आजच्या दिवसाची आठवण ठेवा. तुम्ही मिसर देशात गुलाम म्हणून होता; परंतु या दिवशी परमेश्वराने आपल्या हाताच्या बळाने तुम्हास गुलामगिरीतून सोडवून बाहेर आणले म्हणून तुम्ही खमीर घातलेली भाकर खाऊ नये. आज अबीब महिन्यात तुम्ही मिसर सोडून निघत आहात. परमेश्वराने तुमच्या पूर्वजांशी शपथपूर्वक करार केला होता की कनानी, हित्ती, अमोरी, हिव्वी व यबूसी ह्याच्या देशात, जेथे दुधामधाचे प्रवाह वाहतात त्या देशात आणल्यानंतर तुम्ही या महिन्यात ही सेवा करावी. या सात दिवसात तुम्ही बेखमीर भाकर खावी. सातव्या दिवशी परमेश्वरासाठी तुम्ही हा सण पाळावा; या सात दिवसात तुम्ही बेखमीर भाकर खावी. तुमच्या देशाच्या हद्दीत कोठेही खमिराचे दर्शनसुध्दा होऊ नये. या दिवशी परमेश्वराने आम्हांला मिसर देशातून बाहेर आणले म्हणून आम्ही हा सण पाळीत आहोत असे तुम्ही आपल्या पुत्रपौत्रांना सांगावे. हे चिन्ह तुझ्या हातावर, तुझ्या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये स्मारक असे असावे, परमेश्वराचा नियम तुझ्या मुखी असावा. कारण की परमेश्वराने बलवान भुजाने तुला मिसर देशामधून बाहेर आणले. म्हणून तू वर्षानुवर्षे नेमलेल्या वेळी हा विधी पाळावा. परमेश्वराने तुमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे तो तुम्हास आता कनानी लोक राहत असलेल्या देशात घेऊन जाईल व तो देश तुझ्या हाती देईल. तेव्हा उदरातून निघालेला प्रथम पुरुष व जनावराच्या पोटचा प्रथम वत्स यांना परमेश्वरासाठी वेगळे करावे, सर्व नर परमेश्वराचे होत. गाढवाचा प्रथम वत्स एक कोकरू देऊन सोडवून घ्यावा; त्याचा मोबदला काही न दिल्यास त्याची मान मुरगाळावी. तुझ्या मुलातील प्रथम नर मोबदला देऊन सोडवून घ्यावा. पुढील काळी तुमची मुलेबाळे विचारतील की हे काय? तेव्हा त्यांना सांग, ‘मिसर देशातून गुलामगिरीतून परमेश्वराने आम्हांला आपल्या हाताच्या बलाने बाहेर काढले. आणि फारो आम्हांस मिसर सोडून जाऊ देईना, तेव्हा परमेश्वराने मिसर देशामधील मनुष्य व पशू यांचे सर्व प्रथम नर मारून टाकले; आणि म्हणूनच आम्ही उदरातून निघालेल्या सर्व प्रथम नरांचा मी परमेश्वरास बली अर्पितो. पण माझे सर्व ज्येष्ठ पुत्र देऊन सोडवून घेतो. तुझ्या हातावर आणि तुझ्या दोहो डोळ्यांच्या मध्यभागी हे स्मारक चिन्ह व्हावे. कारण परमेश्वराने आपल्या हाताच्या बलाने आम्हांला मिसर देशातून बाहेर आणले.”
निर्गम 13:1-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेहने मोशेला सांगितले, “इस्राएली लोकांचे प्रथम जन्मलेले प्रत्येक नर मला समर्पित कर. उदरातून आलेले इस्राएलातील प्रत्येक प्रथम संतान माझ्या मालकीचे आहे, ते मनुष्याचे असो किंवा पशूंचे.” तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, हा दिवस स्मरणात ठेवा, याच दिवशी याहवेहने आपल्या पराक्रमी हाताने इजिप्त देशातून, गुलामगिरीतून तुम्हाला बाहेर आणले. खमीर असलेले तुम्ही काहीही खाऊ नये. आज, अवीव महिन्यात तुम्ही निघालात. जेव्हा तुम्हाला कनानी, हिथी, अमोरी, यबूसी आणि हिव्वी यांचा देश, ज्यात दूध व मध वाहतो, ते तुम्हाला देतील अशी तुमच्या पूर्वजांशी शपथ वाहिली, त्यात याहवेह तुम्हाला नेतील; तेव्हा या महिन्यात हा विधी तुम्ही पाळावा. सात दिवस तुम्ही बेखमीर भाकर खावी आणि सातव्या दिवशी याहवेहचा उत्सव साजरा करावा. या सात दिवसात बेखमीर भाकर खावी; खमीर असलेले काहीही तुमच्यात आढळू नये किंवा तुमच्या सीमेत कुठेही खमीर दृष्टीस पडू नये. त्या दिवशी आपल्या लेकरांना सांगा, जेव्हा आम्ही इजिप्तमधून बाहेर आलो तेव्हा याहवेहने आमच्यासाठी जे केले, त्याचे चिन्ह म्हणून आम्ही हे करतो. हे तुम्हाला तुमच्या हातावरील खूण व कपाळावर स्मरणचिन्हासारखे असणार. याहवेहचा हा नियम तुमच्या मुखात असावा. कारण याहवेहने आपल्या पराक्रमी हाताने तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले. दरवर्षी हा सण तुम्ही ठराविक वेळी पाळावा. “तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिलेल्या शपथेनुसार याहवेह तुम्हाला कनानी लोकांच्या देशात घेऊन जातील व तो देश तुम्हाला देतील, तेव्हा प्रत्येक उदराचे पहिले संतान तुम्ही याहवेहला द्यावे. तुमच्या पशूंचे प्रथम जन्मलेले नर याहवेहचे आहेत. गाढवाच्या प्रथम जन्मलेल्या शिंगरूला कोकरू खंडणी म्हणून भरून सोडव, पण खंडणी भरून ते तू सोडविले नाहीस, तर त्याची मान मोड. मनुष्याच्या प्रत्येक नराला खंडणी भरून सोडव. “भविष्यकाळात तुमची मुले तुम्हाला विचारतील, ‘याचा अर्थ काय आहे?’ तेव्हा त्यांना सांगा, ‘याहवेहने आपल्या पराक्रमी हाताने आम्हाला इजिप्तमधून, त्यांच्या गुलामगिरीतून बाहेर आणले. जेव्हा फारोह हट्टाने आम्हाला जाऊ देत नव्हता, तेव्हा याहवेहने संपूर्ण इजिप्त देशातील लोकांचे व जनावरांचे प्रथम जन्मलेले मारून टाकले. म्हणून प्रत्येक उदरातून प्रथम जन्मलेला नर आम्ही याहवेहला समर्पित करतो आणि ते आम्ही खंडणी भरून सोडवितो.’ आणि हे तुमच्या हातावर खूण व कपाळावर चिन्ह असे असावे, की याहवेहने आपल्या बलवान हाताने आम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले.”
निर्गम 13:1-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग परमेश्वराने मोशेला सांगितले की, “इस्राएल लोकांमध्ये मनुष्य व पशू ह्या दोहोंच्या प्रथमजन्मलेल्या म्हणजे उदरातून प्रथम बाहेर आलेल्यांना माझ्यासाठी पवित्र म्हणून वेगळे ठेव; ते माझे आहेत.” बेखमीर भाकरीचा सण मोशे लोकांना म्हणाला, “ह्या दिवसाची आठवण ठेवा; ह्याच दिवशी तुम्ही मिसरातून, दास्यगृहातून बाहेर निघालात; परमेश्वराने आपल्या बलवान हाताने तुम्हांला ह्या ठिकाणातून बाहेर आणले म्हणून ह्या दिवशी खमिराची भाकर खायची नाही. तुम्ही अबीब महिन्याच्या ह्या दिवशी निघाला आहात, कनानी, हित्ती, अमोरी, हिव्वी आणि यबूसी ह्यांच्या देशात, म्हणजे जेथे दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा जो देश तुला देण्यास परमेश्वराने तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिली त्या देशात तुला आणल्यावर ह्या महिन्यात तू हा सण पाळावा. सात दिवस बेखमीर भाकरी खाव्यात आणि सातव्या दिवशी परमेश्वरासाठी सण पाळावा. ह्या सात दिवसांत बेखमीर भाकर खावी; खमिराची भाकर तुझ्याजवळ दिसता कामा नये, तुझ्या देशभर खमीर दिसूही नये. त्या दिवशी तू आपल्या मुलाला सांगावे की, ‘मी मिसर देशातून निघालो तेव्हा परमेश्वराने माझ्यासाठी जे काही केले त्यामुळे मी हा सण पाळत आहे.’ हे तुझ्या हातावर चिन्ह व तुझ्या डोळ्यांच्या दरम्यान स्मारक असे असावे; परमेश्वराचा नियम तुझ्या तोंडी असावा; कारण परमेश्वराने भुजबलाने तुला मिसर देशातून बाहेर आणले; म्हणून तू वर्षानुवर्ष नेमलेल्या काळी हा विधी पाळावा. प्रथमजन्मलेले अपत्य परमेश्वराने तुझ्याशी व तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिल्याप्रमाणे तो तुला कनान्यांच्या देशात नेऊन तो देश तुझ्या हाती देईल, तेव्हा उदरातून निघालेला प्रथमपुरुष आणि जनावरांच्या पोटचा प्रथमवत्स ह्यांना परमेश्वरासाठी वेगळे करावे. हे सर्व नर परमेश्वराचे आहेत. गाढवाच्या प्रथमवत्साला एक कोकरू देऊन सोडवून घ्यावे, त्याला तसे सोडवले नाही तर त्याची मान मोडावी. तुझ्या मुलांतील ज्येष्ठ मुलाला मोबदला देऊन सोडवून घ्यावे. पुढील काळी तुझा मुलगा तुला विचारील की हे काय आहे? तेव्हा त्याला सांग, ‘मिसर देशातून, दास्यगृहातून परमेश्वराने आम्हांला आपल्या भुजबलाने बाहेर आणले, आणि फारो आम्हांला जाऊ देईना; तेव्हा परमेश्वराने मिसर देशातील मनुष्य व पशू ह्यांचे सर्व प्रथमनर मारून टाकले; म्हणून उदरातून निघालेल्या सर्व प्रथमनरांचा मी परमेश्वराला बली अर्पण करतो; पण माझ्या मुलांतील ज्येष्ठ मुलाला मोबदला देऊन सोडवून घेतो.’ हे तुझ्या हातावर चिन्ह व तुझ्या डोळ्यांच्या दरम्यान कपाळपट्टी असे असावे; कारण परमेश्वराने आपल्या बलवान हाताने आम्हांला मिसर देशातून बाहेर आणले.”