YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 10:1-29

निर्गम 10:1-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू फारोकडे जा. त्याचे मन व त्याच्या सेवकांची मने मीच कठीण केली आहेत. माझ्या सामर्थ्याची चिन्हे त्यांच्यामध्ये दाखवावी म्हणून मी हे केले. मी मिसऱ्यांना कसे कठोरपणे वागवले आणि त्यांच्यामध्ये अनेक सामर्थ्याची चिन्हे कशी केली हे तुम्ही तुमच्या मुलांना व नातवांना सांगावे म्हणून मी हे केले. या प्रकारे मी परमेश्वर आहे हे तुम्हास कळेल.” मग मोशे व अहरोन फारोकडे गेले. त्यांनी त्यास सांगितले, “इब्र्यांचा देव परमेश्वर म्हणतो, ‘तू माझ्यापुढे नम्र होण्याचे कोठवर नाकारशील? माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांस जाऊ दे. जर तू माझ्या लोकांस जाऊ देण्याचे नाकारशील, तर उद्या मी तुझ्या देशावर टोळधाड आणीन. ते टोळ सर्व जमीन झाकून टाकतील. ते इतके असतील की तुला जमीन दिसणार नाही. गारा व पावसाच्या तडाख्यातून जे काही वाचले असेल त्यास टोळ खाऊन टाकतील. शेतांतील सर्व झाडांचा पाला ते खाऊन फस्त करतील. ते टोळ तुझी घरे, तुझ्या सेवकांची घरे, व मिसरमधील घरे, व्यापून टाकतील. तुझ्या वाडवडिलांनी आजपर्यंत पाहिले नसतील त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक ते असतील.” नंतर मोशे फारोसमोरून निघून गेला. फारोचे सेवक फारोला म्हणाले, “हा मनुष्य आम्हावर कोठपर्यंत संकटे आणणार आहे? या इस्राएलांना आपला देव परमेश्वर ह्यांची उपासना करण्याकरिता जाऊ द्यावे. मिसराचा नाश झाला आहे हे तुम्हास अजून कळत नाही काय?” मोशे व अहरोन यांना पुन्हा फारोकडे आणले, तो त्यांना म्हणाला, “जा व तुमचा देव परमेश्वर याची उपासना करा. परंतु कोण कोण जाणार आहेत?” मोशेने उत्तर दिले, “आमची तरुण व वृध्द मंडळी, तसेच आम्ही, आमची मुले व कन्या, आमचे शेरडामेंढरांचे कळप व गुरेढोरे या सर्वांस आम्ही घेऊन जाणार. कारण आम्हांला परमेश्वराचा उत्सव करायचा आहे.” फारो त्यांना म्हणाला, “तुम्ही व तुमची मुलेबाळे यांना मिसरमधून जाऊ दिले तर परमेश्वराची शपथ. सांभाळा, पाहा, तुमच्या मनात काहीतरी वाईट आहे. नाही! फक्त तुमच्यातील पुरुषांनी तुमच्या परमेश्वराची उपासना करावयास जावे. कारण तेच तर तुम्हास पाहिजे आहे.” त्यानंतर त्यांना फारोपुढून घालवून दिले. मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “आपली काठी मिसर देशावर उगार म्हणजे टोळधाड येईल! ते टोळ मिसर देशभर पसरतील आणि पाऊस व गारा यांच्या सपाट्यातून वाचलेल्या वनस्पती खाऊन टाकतील.” मग मोशेने आपल्या हातातील काठी मिसर देशावर उगारली तेव्हा परमेश्वराने एक दिवसभर व रात्रभर पूर्वेकडून वारा वाहविला, तेव्हा सकाळी वाऱ्याबरोबर टोळच टोळ आले. ते उडत आले व अवघ्या मिसर देशभर जमिनीवर पसरले. इतके टोळ ह्यापूर्वी मिसर देशावर कधी आले नव्हते व इतके येथून पुढेही कधी येणार नाहीत. त्या टोळांनी सर्व जमीन झाकून टाकली, आणि त्यांच्या आकाशात उडण्यामुळे सर्व देशभर अंधार पडला. गारांच्या तडाख्यातून वाचलेल्या वनस्पती आणि झाडावरील वाचलेली फळे त्यांनी खाऊन फस्त केली; आणि मिसरातील कुठल्याच झाडाझुडपांवर एकही पान राहिले नाही. फारोने तातडीने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले. तो म्हणाला, “तुमचा देव परमेश्वर याच्याविरुद्ध व तुम्हाविरुध्द मी पाप केले आहे. तेव्हा या वेळी माझ्या पापाबद्दल मला क्षमा करा आणि हे टोळ माझ्यापासून दूर करण्याकरिता तुमचा देव परमेश्वर याकडे प्रार्थना करा.” मोशे फारोसमोरून निघून गेला व त्याने परमेश्वराची प्रार्थना केली. तेव्हा परमेश्वराने पश्चिमेकडून जोराचा वारा वाहविला तेव्हा त्या वाऱ्याने सर्व टोळांना उडवून तांबड्या समुद्रात लोटले. मिसरमध्ये एकही टोळ राहिला नाही. तरी परमेश्वराने फारोचे मन पुन्हा कठीण केले आणि त्याने इस्राएल लोकांस जाऊ दिले नाही. मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आपला हात आकाशात उंच कर म्हणजे अवघा मिसर देश अंधारात गडप होईल तो अंधार इतका दाट असेल की तुम्हास चाचपडत जावे लागेल.” तेव्हा मोशेने आपला हात आकाशाकडे उभारिला आणि तीन दिवस सर्व मिसर देशात निबिड अंधकार झाला. कोणालाही काहीही दिसेना आणि म्हणून कोणीही उठून तीन दिवस आपले घर सोडून गेले नाही; परंतु जिथे इस्राएली लोकांची वस्ती होती तेथे प्रकाश होता. तेव्हा फारोने मोशेला बोलावले. तो म्हणाला, “तुम्ही जा व तुमच्या परमेश्वराची उपासना करा. तुम्ही तुमची मुलेबाळेही बरोबर न्या. परंतु तुमचे कळप व गुरेढोरे येथेच राहिली पाहिजेत.” मोशे म्हणाला, “आमचा देव परमेश्वर याच्यासाठी यज्ञ करण्यास यज्ञपशू व होमबली तू आमच्या हाती दिले पाहिजेत. यज्ञ व होमार्पणासाठी आम्ही आमची गुरेढोरेही आमच्याबरोबर नेऊ. एक खूरही आम्ही मागे ठेवणार नाही. आमचा देव परमेश्वर याला यज्ञ व होमार्पण करण्यासाठी यातूनच घ्यावे लागेल आणि परमेश्वराची सेवा करण्यास आम्हांला काय लागेल ते आम्ही तेथे पोहचेपर्यंत सांगता येणार नाही;” परमेश्वराने फारोचे मन पुन्हा कठीण केले. तेव्हा फारो इस्राएली लोकांस जाऊ देईना. मग फारो मोशेवर ओरडला व म्हणाला, “तू येथून चालता हो! आपले तोंड मला पुन्हा दाखवू नकोस! यानंतर तू आपले तोंड मला दाखवशील त्या दिवशी तू मरशील!” मोशे म्हणाला, “तू बरोबर बोललास, मी तुझे तोंड पुन्हा कधीही पाहणार नाही!”

सामायिक करा
निर्गम 10 वाचा

निर्गम 10:1-29 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मग याहवेह मोशेला म्हणाले, “फारोहकडे जा, कारण मी त्याचे व त्याच्या अधिकार्‍यांची मने कठीण केली आहेत, अशासाठी की मी त्यांच्यामध्ये माझे चमत्कार करावे व तुम्हीही आपल्या लेकरांस व नातवंडास मी इजिप्तच्या लोकांशी कसे कठोरपणे वागलो व त्यांच्यामध्ये माझे चमत्कार कसे केले ते सांगावे आणि तुम्हाला समजावे की मी याहवेह आहे.” मग मोशे व अहरोन फारोहकडे गेले व त्याला म्हणाले, “इब्री लोकांचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात, ‘अजून किती काळ माझ्यासमोर नम्र होण्यास तू नाकारशील? माझ्या लोकांना जाऊ दे, म्हणजे ते माझी उपासना करतील. तू जर त्यांना जाऊ दिले नाहीस, तर उद्या मी तुझ्या संपूर्ण देशावर टोळ आणेन. ते तुझी भूमी आच्छादून टाकतील की, जमीन मुळीच दिसणार नाही, शेतात असलेल्या झाडांसह, गारांच्या व पावसाच्या मारातून जे पीक वाचले आहे त्याचा ते नाश करतील, एवढेच नव्हे तर वनात वाढणारी झाडेही ते खाऊन टाकतील. ते तुझी घरे व तुझ्या अधिकार्‍यांची व सर्व इजिप्तच्या लोकांची घरे भरून टाकतील; इजिप्तच्या इतिहासात तुझे वडील व तुझे पूर्वज या देशाचे रहिवासी झाले तेव्हापासून आजपर्यंत असे झालेले त्यांनी कधी पाहिले नाही.’ ” मग मोशे वळून फारोहपासून निघून गेला. फारोहचे अधिकारी त्याला म्हणाले, “किती काळ हा मनुष्य आम्हाला पाश म्हणून असणार? याहवेह त्यांचा परमेश्वर यांची उपासना करावी म्हणून या लोकांना जाऊ द्या. इजिप्तचा नाश झाला आहे याची तुम्हाला जाणीव नाही काय?” मग मोशे व अहरोन यांना फारोहकडे पुन्हा बोलाविण्यात आले. फारोह त्यांना म्हणाला, “याहवेह तुमचा परमेश्वर याची उपासना करावी म्हणून तुम्ही जा, पण कोण कोण जाणार हे मला सांग.” मोशेने उत्तर दिले “आम्ही आमचे तरुण व वृद्ध, आमचे पुत्र व कन्या आणि आमची शेरडेमेंढरे व गुरे या सर्वांसह जाणार. कारण आम्ही सर्वांनीच याहवेहचा सण साजरा करणे आवश्यक आहे.” तेव्हा फारोह त्यांना म्हणाला, “मी तुमच्या मुलाबाळांस व स्त्रियांना जाऊ दिले तर याहवेह तुम्हाबरोबर असो! खचितच तुम्ही दुष्टता योजली आहे. नाही! याहवेहची उपासना करण्यासाठी फक्त पुरुषांनीच जावे, कारण तशीच मागणी तुम्ही करत होता.” मग मोशे व अहरोनास फारोहच्या पुढून हाकलून देण्यात आले. मग याहवेह मोशेला म्हणाले, “तू आपला हात इजिप्त देशावर लांब कर म्हणजे टोळधाड येईल व गारांच्या वर्षावातून वाचलेली वनस्पती जी भूमीवर वाढत आहे त्या सर्वांचा ती नाश करेल.” तेव्हा मोशेने आपली काठी इजिप्त देशावर उगारली, आणि याहवेहने तो संपूर्ण दिवस व ती संपूर्ण रात्र पूर्वेचा वारा देशावर वाहविला. सकाळपर्यंत वार्‍याने टोळ आणले. त्यांनी संपूर्ण इजिप्त देश व्यापून टाकला व ते मोठ्या संख्येने देशाच्या प्रत्येक भागात जाऊन राहिले. इतिहासात अशी भयंकर टोळांची पीडा ना कधी आली होती ना पुढे कधी येणार. कारण टोळांनी जमिनीचा पृष्ठभाग अगदी काळा होईपर्यंत झाकून टाकला व गारातून जे वाचले होते ते सर्वकाही—शेतातील सर्व पीक व झाडावरील प्रत्येक फळ त्यांनी फस्त केले. संपूर्ण इजिप्त देशात ना झाडे ना वनस्पती, काहीही हिरवे असे राहिले नाही. मग फारोहने मोशे व अहरोन यांना त्वरेने बोलावून घेतले आणि म्हटले, “मी तुमच्या याहवेह परमेश्वराविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. परत एकदा माझ्या पापाची मला क्षमा करा आणि तुमच्या याहवेह परमेश्वराने ही पीडा माझ्यापासून दूर करावी म्हणून त्यांच्याकडे विनंती करा.” मग मोशे फारोह पुढून निघून गेला व त्याने याहवेहकडे प्रार्थना केली; आणि याहवेहने पश्चिमेच्या दिशेने वार्‍याची दिशा बदलली व त्या वार्‍याने टोळांना एकवटून तांबड्या समुद्रात टाकले. इजिप्तमध्ये एकही टोळ शिल्लक राहिला नाही. पण याहवेहने फारोहचे हृदय कठीण केले व त्याने इस्राएली लोकांना जाऊ दिले नाही. नंतर याहवेहने मोशेला म्हटले, “तू आपला हात वर आकाशाकडे लांब कर, म्हणजे इजिप्त देशावर अंधार पडेल—इतका अंधार की त्याला लोक चाचपडतील.” तेव्हा मोशेने आपला हात आकाशाकडे लांब केला, आणि तीन दिवसांसाठी निबिड अंधकाराने संपूर्ण इजिप्त देश व्यापून टाकला. कोणी कोणाला पाहू शकत नव्हते व तीन दिवस कोणी आपल्या ठिकाणाहून हलला नाही, परंतु जिथे इस्राएली लोक राहत होते तिथे मात्र प्रकाश होता. तेव्हा फारोहने मोशेला बोलावून घेतले. तो म्हणाला, “जा, आणि याहवेहची उपासना करा. तुमच्या स्त्रिया व लेकरे सुद्धा तुमच्याबरोबर जाऊ शकतात; तुमची जनावरे व शेरडेमेंढरे मात्र सोडून जा.” परंतु मोशे म्हणाला, “याहवेह, आमचा परमेश्वर यास आम्ही यज्ञ व होमबली अर्पण करावे म्हणून जाऊ दे. आमची जनावरे सुद्धा आमच्याबरोबर गेली पाहिजेत; एक खूर देखील आम्ही मागे ठेवणार नाही. आम्हाला त्यांच्यापैकी काहींचा याहवेह आमचे परमेश्वर यांची उपासना करण्यास वापर करावयाचा आहे, आणि त्यात आम्ही काय वापरावे हे आम्ही त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत आम्हाला समजणार नाही.” पण याहवेहने फारोहचे हृदय कठीण केले, व तो त्यांना जाऊ देण्यास मान्यता देईना. फारोह मोशेला म्हणाला, “माझ्यासमोरून चालता हो! आपले तोंडसुध्दा मला पुन्हा दाखवू नकोस! ज्या दिवशी तू माझे तोंड पाहशील त्या दिवशी तू मरशील.” “तू म्हणालास तसेच होईल,” मोशे म्हणाला. “मी पुन्हा तुझ्यासमोर उभा राहणार नाही.”

सामायिक करा
निर्गम 10 वाचा

निर्गम 10:1-29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “फारोकडे जा, कारण मी त्याचे व त्याच्या सेवकांचे मन कठीण केले आहे ते ह्यासाठी की, त्यांच्यामध्ये मी ही आपली चिन्हे प्रकट करावी. मी परमेश्वर आहे हे तुम्हांला कळावे म्हणून मी मिसर्‍यांची कशी फजिती केली आणि त्यांच्यामध्ये काय काय चिन्हे प्रकट केली ते तुझ्या पुत्रपौत्रांच्या कानी जाऊ दे.” मग मोशे आणि अहरोन फारोकडे आत जाऊन त्याला म्हणाले, “इब्री लोकांचा देव परमेश्वर असे म्हणतो, ‘तू माझ्यासमोर नमायला कोठवर नाकारशील? माझ्या लोकांना माझी सेवा करायला जाऊ दे. तू माझ्या लोकांना जाऊ देण्याचे नाकारशील तर पाहा, मी उद्या तुझ्या देशात टोळ आणीन; ते भूतल एवढे झाकून टाकतील की जमीन दिसेनाशी होईल; गारांच्या वृष्टीपासून निभावून जे काही शेष उरले असेल त्याचा ते फन्ना उडवतील; शेतात तुमची जितकी झाडे वाढत आहेत तीही ते खाऊन टाकतील; तुझी घरे, तुझ्या सर्व सेवकांची घरे आणि सर्व मिसरी लोकांची घरे ते व्यापून टाकतील, इतके टोळ तुझ्या बापदादांनी किंवा त्यांच्या वाडवडिलांनी त्यांच्या जन्मात आणि आजवरदेखील पाहिले नसतील.”’ मग मोशे मागे फिरून फारोपुढून निघून गेला. फारोचे सेवक त्याला म्हणाले, “हा मनुष्य कोठपर्यंत आमच्यासाठी पाश असा राहील? जाऊ द्या ह्या लोकांना आणि त्यांचा देव परमेश्वर ह्याची सेवा त्यांना करू द्या. मिसर देशाचा नाश झाल्याचे आपल्याला अजून कळत नाही का?” तेव्हा मोशे आणि अहरोन ह्यांना पुन्हा फारोकडे आणण्यात आले आणि तो त्यांना म्हणाला, “तुम्ही जाऊन आपला देव परमेश्वर ह्याची सेवा करा; पण कोणकोण जाणार?” मोशेने म्हटले, “आम्ही आमचे तरुण व म्हातारे ह्यांच्यासह जाऊ; आमचे मुलगे, आमच्या मुली, आमची शेरडेमेंढरे आणि आमची गुरेढोरे ह्या सर्वांना घेऊन आम्ही जाणार; कारण परमेश्वराप्रीत्यर्थ आम्हांला उत्सव करायचा आहे.” तो त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला तुमच्या मुलाबाळांसह जाऊ दिले तर परमेश्वर तुमच्याबरोबर असो! खबरदार, तुमच्या मनात वाईट हेतू आहे. असे होणार नाही; तुम्ही पुरुषच जा आणि परमेश्वराची सेवा करा; कारण तुम्ही तरी हेच मागत आहात.” मग त्यांना फारोपुढून घालवून दिले. परमेश्वर मोशेला म्हणाला, “मिसर देशावर टोळधाड यावी म्हणून त्यावर आपला हात उगार, म्हणजे ती गारांच्या सपाट्यातून उरलेली वनस्पती खाऊन टाकील.” मोशेने मिसर देशावर आपली काठी उगारली, तेव्हा परमेश्वराने दिवसभर व रात्रभर देशावर पूर्वेचा वारा वाहवला; आणि सकाळ झाली तेव्हा पूर्वेच्या वार्‍याबरोबर टोळ आले. सर्व मिसर देशावर टोळांनी धाड घातली आणि ते सर्व देशावर उतरले. ते असंख्य होते. ह्यापूर्वी एवढे टोळ कधी आले नव्हते व ह्यापुढेही कधी येणार नाहीत. त्यांनी सर्व भूमी झाकून टाकल्यामुळे सार्‍या देशावर अंधार पडला; आणि त्यांनी भूमीवरील सर्व वनस्पती आणि गारांच्या वृष्टीतून वाचलेली सर्व फळेही खाऊन टाकली. सर्व मिसर देशात झाडांपैकी किंवा शेतातील वनस्पतींपैकी हिरवे म्हणून काही उरले नाही. मग फारोने मोशे आणि अहरोन ह्यांना ताबडतोब बोलावून आणून म्हटले, “मी तुमचा देव परमेश्वर ह्याच्याविरुद्ध आणि तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. तर आता एवढ्या एकाच वेळेस माझ्या पापाची क्षमा करा आणि ही एवढी मरणावस्था माझ्यापासून दूर व्हावी म्हणून तुमचा देव परमेश्वर ह्याच्याजवळ विनंती करा.” तेव्हा मोशेने फारोजवळून निघून जाऊन परमेश्वराला विनंती केली. तेव्हा परमेश्वराने पश्‍चिमेचा प्रचंड वारा वाहवला; त्याने त्या टोळांना उडवून तांबड्या समुद्रात लोटले; मिसर देशाच्या सर्व हद्दीत एकही टोळ राहिला नाही. तथापि परमेश्वराने फारोचे मन कठीण केले; आणि त्याने इस्राएल लोकांना जाऊ दिले नाही. मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “आकाशाकडे आपला हात उगार म्हणजे मिसर देशावर अंधार पडेल, इतका की तो हाताला लागेल.” तेव्हा मोशेने आपला हात आकाशाकडे उगारला, आणि तीन दिवस सर्व मिसर देशभर निबिड अंधार पसरला. तीन दिवस कोणी कोणाला दिसेना की कोणी आपले ठिकाण सोडून हालेना; पण इस्राएल लोकांच्या सगळ्या वस्तीत उजेड होता. मग फारो मोशेला बोलावून म्हणाला, “तुम्ही जाऊन परमेश्वराची सेवा करा; पण तुमची शेरडेमेंढरे व गुरेढोरे मात्र येथेच राहिली पाहिजेत; तुमच्या मुलाबाळांनाही तुमच्याबरोबर घेऊन जा.” मोशे म्हणाला, “आमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करण्यासाठी यज्ञपशू आणि होमबली तू आमच्या हवाली केले पाहिजेत; आमचे पशूही आमच्याबरोबर गेले पाहिजेत, एक खूरही मागे राहता कामा नये; कारण ह्यांतूनच आमचा देव परमेश्वर ह्याच्या सेवेसाठी यज्ञपशू घ्यावे लागतील; आणि परमेश्वराच्या सेवेला काय लागेल ते आम्हांला तेथे जाऊन पोहचेपर्यंत कळायचे नाही.” तथापि परमेश्वराने फारोचे मन कठीण केले, आणि तो त्यांना जाऊ देईना. फारो त्याला म्हणाला, “माझ्यापुढून चालता हो आणि सांभाळ, पुन्हा मला आपले तोंड दाखवू नकोस. तू आपले तोंड मला दाखवशील, त्या दिवशी तू मरशील.” मोशे म्हणाला, “तू ठीक बोललास, मी पुन्हा तुझे तोंड कधीही पाहणार नाही.”

सामायिक करा
निर्गम 10 वाचा