एस्तेर 3:12-15 - Compare All Versions
एस्तेर 3:12-15 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा पहिल्या महिन्याच्या त्रयोदशीस राजाचे लेखक बोलावण्यात आले आणि राजाचे प्रतिनिधी, प्रत्येक प्रांताचे सुभे व सगळ्या लोकांचे सरदार ह्यांना हामानाच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येक प्रांताच्या लिपीत व प्रत्येक जातीच्या लोकांच्या भाषेत (खलिते) लिहून पाठवण्यात आले. अहश्वेरोश राजाच्या नावाने ते लिहून त्यांवर राजाची मोहर केली होती. राजाच्या सर्व प्रांताप्रांतांतून जासुदांच्या हस्ते अशा आशयाची पत्रे पाठवण्यात आली की, एकाच दिवशी म्हणजे बाराव्या अदार महिन्याच्या त्रयोदशीस वृद्ध, तरुण, स्त्रिया, मुले अशा सर्व यहूदी लोकांचा विध्वंस, संहार व नायनाट करावा व त्यांची धनसंपत्ती लुटून घ्यावी. ह्या आज्ञापत्राच्या नकला सर्व प्रांतांतून खुल्या पाठवण्यात आल्या, त्या अशा हेतूने की सर्व लोकांनी त्या दिवशी तयार असावे. हा हुकूम शूशन राजवाड्यात देण्यात आला आणि राजाज्ञेने जासूद त्वरित निघून गेले; त्या प्रसंगी राजा व हामान हे प्यायला बसले; पण शूशन नगर चिंताक्रांत झाले.
एस्तेर 3:12-15 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यानंतर पहिल्या महिन्याच्या तेराव्या दिवशी राजाच्या लेखकांना बोलावले. राजाचे प्रतिनिधी, प्रत्येक प्रांताचे सुभे व सगळ्या लोकांचे सरदार यांस त्यांनी हामानाच्या आज्ञेप्रमाणे प्रत्येक प्रांताच्या लिपीत व प्रत्येक जातीच्या लोकांच्या भाषेत लिहून पाठविण्यात आली. राजा अहश्वेरोशच्या नावाने त्यांनी ते लिहिले आणि त्यावर राजाची मोहर केली. जासुदांनी ही पत्रे राजाच्या सर्व प्रांतात नेऊन दिली. एकाच दिवशी म्हणजे अदार महिन्याच्या, बाराव्या महिन्याच्या तेराव्या दिवशी तरुण व वृध्द माणसे, स्त्रिया, मुले अशा सर्व यहूद्यांचा नाश करावा, त्यांना ठार करावे व त्यांचा नायनाट करावा. त्यांची सर्व मालमत्ता लुटून घ्यावी म्हणून लिहून पाठवले. हा आदेश असलेल्या पत्राची प्रत कायदा म्हणून प्रत्येक प्रांतातून हा कायदा लागू होणार होता आणि राज्यातल्या सर्व लोकांस तो कळवण्यात आला, जेणेकरून त्या दिवशी सर्व लोकांनी तयार असावे. राजाच्या हुकूमानुसार सर्व जासूद तातडीने निघाले. शूशन राजावाड्यातून हा हुकूम निघाला. राजा आणि हामान पेयपान करायला बसले पण शूशन नगर मात्र गोंधळून गेले.
एस्तेर 3:12-15 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर पहिल्या महिन्याच्या तेराव्या दिवशी राजाच्या चिटणीसांना हजर राहण्याचा हुकूम करण्यात आला. त्यांनी साम्राज्यातील प्रत्येक प्रांतात व सर्व भाषेतून निरनिराळ्या राज्यपालांना आणि अधिकार्यांना हामानाच्या राजाज्ञेचा मजकूर लिहून घेतला. जी पत्रे लिहिलेली होती त्यांच्यावर अहश्वेरोश राजाच्या नावाने राजमुद्रेची मोहर लावण्यात आली. मग ती पत्रे साम्राज्याच्या सर्व प्रांतांकडे संदेशवाहकांच्या हस्ते पाठविण्यात आली. त्या पत्रांमध्ये अशी राजाज्ञा होती की, तरुण व वृद्ध, स्त्रिया व मुले अशा सर्व यहूदी लोकांना—एकाच दिवशी, बारावा महिना, अदार महिन्याच्या तेरा तारखेस ठार करण्यात यावे आणि त्यांच्या मालमत्तेची लूट करणार्यात यावी. या राजाज्ञेचा उतारा प्रत्येक प्रांतात कायदा म्हणून जाहीर केला जावा आणि प्रत्येक राज्यातील रहिवाशास त्याची माहिती दिली जावी, म्हणजे नेमलेल्या दिवशी आपले कर्तव्य करण्यास ते तयार राहतील. राजाज्ञा प्रथम शूशन शहरात जाहीर करण्यात आली, मग ती घेऊन संदेशवाहक निघाले. राजा आणि हामान मद्याची मौज लुटण्यास बसले, पण शूशन शहरात गोंधळ पसरून गेला.