YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इफिसकरांस पत्र 3:4-11

इफिसकरांस पत्र 3:4-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

जेव्हा तुम्ही ती वाचाल तेव्हा ख्रिस्ताच्या खऱ्या रहस्याविषयीचे माझे ज्ञान तुम्हास समजेल, ते रहस्य जसे आता आत्म्याच्याद्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना आणि संदेश देणाऱ्यांना प्रकट करण्यात आले आहे, तसे ते इतर पिढ्यांच्या मनुष्य संततीला सांगण्यात आले नव्हते. हे रहस्य ते आहे की, परराष्ट्रीय येशू ख्रिस्तामध्ये शुभवर्तमानाद्वारे आमच्याबरोबर वारसदार आणि एकाच शरीराचे अवयव आहेत आणि अभिवचनाचे भागीदार आहेत. देवाच्या कृतीच्या सामर्थ्याचा परिणाम म्हणून जे कृपेचे दान मला देण्यात आले होते त्यामुळे मी त्या शुभवर्तमानाचा सेवक झालो. जरी मी सर्व पवित्र जनांमध्ये अगदी लहानातील लहान आहे तरी मला हे ख्रिस्ताच्या गहन अशा संपत्तीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी हे कृपेचे दान मला दिले गेले, आणि ज्याने सर्व निर्माण केले त्या देवाने युगादीकाळापासून जे रहस्य गुप्त ठेवले होते त्याची व्यवस्था काय आहे हे सर्व लोकांस मी प्रकट करावे. यासाठी की आता मंडळीद्वारे सत्ताधीश आणि आकाशातील शक्ती यांना देवाचे पुष्कळ प्रकारचे असलेले ज्ञान कळावे. देवाच्या सर्वकाळच्या हेतुला अनुसरून जे त्याने आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्यामध्ये पूर्ण केले आहे.

इफिसकरांस पत्र 3:4-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

ते वाचल्यानंतर, ख्रिस्ताचे जे रहस्य आहे, त्याबद्दल मला झालेले ज्ञान तुम्हाला समजेल. हे रहस्य इतर पिढींच्या लोकांना प्रकट केले गेले नव्हते, पण आता त्यांनी आपल्या पवित्र प्रेषित व संदेष्टे यांना परमेश्वराच्या आत्म्याद्वारे प्रकट केले आहे. हे रहस्य असे आहे: शुभवार्तेद्वारे गैरयहूदीही इस्राएली लोकांबरोबर सहवारस, एका शरीराचे अवयव, आणि ख्रिस्त येशूंमध्ये अभिवचनाचे सहभागी असे आहेत. परमेश्वराच्या कृपेच्या वरदानाने व सामर्थ्याच्या कृतीने मी या शुभवार्तेचा सेवक झालो आहे. मी जो प्रभूच्या लोकांमध्ये लहानात लहान, त्या मला गैरयहूदीयांना ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीच्या शुभवार्तेचा प्रचार करण्याची कृपा देण्यात आली. ज्यांनी सर्वकाही निर्माण केले त्या परमेश्वरामध्ये युगानुयुगांपासून गुप्त ठेवलेले ते रहस्य प्रकट करण्याची व्यवस्था केली. यासाठी की आता मंडळीद्वारे, आकाशमंडळातील शासक आणि अधिकार्‍यांना परमेश्वराचे विविध ज्ञान कळावे हाच त्यांचा उद्देश होता, हा त्यांच्या युगानुयुगाचा उद्देश ख्रिस्त येशू आपला प्रभू यामध्ये पूर्ण व्हावा.

इफिसकरांस पत्र 3:4-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ते तुम्ही वाचून पाहाल तर ख्रिस्ताविषयीच्या रहस्याचे परिज्ञान मला झाल्याचे तुम्हांला समजेल. ते रहस्य जसे आता आत्म्याच्या द्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना व संदेष्ट्यांना प्रकट करून दाखवलेले आहे, तसे ते इतर पिढ्यांच्या मनुष्यसंतानांना कळवण्यात आले नव्हते. ते रहस्य हे की, परराष्ट्रीय ख्रिस्त येशूच्या ठायी सुवार्तेच्या योगाने आमच्याबरोबर वतनबंधू, आमच्याबरोबर एकशरीर व आमच्याबरोबर अभिवचनाचे वाटेकरी आहेत. देवाच्या सामर्थ्याच्या करणीने त्याचे जे कृपेचे दान मला देण्यात आले होते तेणेकरून मी त्या सुवार्तेचा सेवक झालो आहे. मी जो सर्व पवित्र जनांतील लहानाहून लहान त्या माझ्यावर ही कृपा अशी झाली की, मी ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी; आणि ज्याने [येशू ख्रिस्ताद्वारे] सर्वकाही निर्माण केले त्या देवाच्या ठायी युगादिकालापासून गुप्त राहिलेल्या रहस्याची व्यवस्था काय, हे सर्वांना प्रकाशित करून दाखवावे; ह्यासाठी की, जो युगादिकालाचा संकल्प त्याने ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती व अधिकारी ह्यांना मंडळीच्या द्वारे आता कळावे.

इफिसकरांस पत्र 3:4-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

ते तुम्ही वाचून पाहाल तर ख्रिस्ताविषयीच्या रहस्याचे परिज्ञान मला झाले ते तुम्हांला समजेल. ते रहस्य जसे आता आत्म्याद्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना व संदेष्ट्यांना प्रकट करून दाखविले आहे, तसे ते इतर पिढ्यांना कळविण्यात आले नव्हते. ते रहस्य हे की, यहुदीतर लोक ख्रिस्त येशूमध्ये शुभवर्तमानाच्या योगाने आमच्याबरोबर वतनबंधू, एकशरीर व अभिवचनाचे सहभागी आहेत. देवाच्या सामर्थ्याच्या कृतीने त्याचे जे कृपेचे दान मला देण्यात आले, त्यामुळे मी त्या शुभवर्तमानाचा सेवक झालो आहे. सर्व पवित्र लोकांतील कनिष्ठ अशा माझ्यावर ही कृपा अशाकरिता झाली की, मी ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीचे शुभवर्तमान यहुदीतर लोकांकरिता घेऊन जावे व ज्याने सर्व काही निर्माण केले त्या देवामध्ये युगादिकालापासून गुप्त ठेवलेल्या रहस्याची व्यवस्था कशी होणार आहे, हे सर्वांना प्रकट करून दाखवावे. ह्यासाठी की, जो युगादिकालचा संकल्प त्याने आपल्या ख्रिस्त येशूमध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे बहुरूपी ज्ञान अंतराळातील अधिपती व अधिकारी ह्यांना ख्रिस्तमंडळीद्वारे आता कळावे.