इफिसकरांस पत्र 2:11-22
इफिसकरांस पत्र 2:11-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून आठवण करा, एकेकाळी तुम्ही शरीराने परराष्ट्रीय होता आणि ज्यांची शरीराची सुंता मनुष्याच्या हाताने झालेली होती ते लोक स्वतःला सुंती असे म्हणत, ते त्यांना बेसुंती संबोधत. त्यावेळी तुम्ही ख्रिस्तापासून वेगळे होता, इस्राएलाच्या बाहेरचे होता, वचनाच्या कराराशी तुम्ही अपरिचित असे होता, तुम्ही तुमच्या भविष्याविषयी आशाविरहित आणि देवहीन असे जगात होता. पण आता, ख्रिस्त येशूमध्ये जे तुम्ही एकेकाळी देवापासून दूर होता, पण आता, येशू ख्रिस्तामध्ये ते तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताने त्याच्याजवळ आले आहात. कारण तोच आमची शांती आहे, त्याने यहूदी आणि विदेशी या दोघांना एक लोक असे केले. त्याच्या देहाने त्याने आम्हास एकमेकांपासून दुभागणारी आडभिंत पाडून टाकली. त्याने आज्ञाविधीचे कायदे आणि नियमशास्त्र आपल्या देहाने रद्द केले. यासाठी की स्वतःमध्ये दोघांचा एक नवा मनुष्य निर्माण करून शांती आणावी. त्याने वधस्तंभावर वैर जीवे मारून त्याच्याव्दारे एका शरीरात दोघांचा देवाबरोबर समेट करावा. ख्रिस्त आला आणि त्याने जे दूर होते त्यांना अणि जे जवळ होते त्यांना शांतीची सुवार्ता सांगितली. कारण येशूच्याद्वारे, आम्हा दोघांचा एका पवित्र आत्म्यात देवाजवळ प्रवेश होतो. यामुळे तुम्ही आता परके आणि विदेशी नाही. तर त्याऐवजी तुम्ही पवित्रजनांच्या बरोबरचे सहनागरीक आणि देवाचे कुटुंबीय आहात तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे यांच्या शिक्षणाच्या पायावर बांधलेली इमारत आहात आणि ख्रिस्त येशू स्वतः तिचा कोनशिला आहे. संपूर्ण इमारत त्याच्याद्वारे जोडली गेली आणि प्रभूमध्ये पवित्र भवन होण्यासाठी वाढत आहे. त्याच्यामध्ये तुम्हीसुद्धा इतरांबरोबर देवाच्या आत्म्याद्वारे देवाचे राहण्याचे ठिकाण तयार करण्यासाठी एकत्र बांधले जात आहात.
इफिसकरांस पत्र 2:11-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यास्तव, आठवण ठेवा की जे आपण पूर्वी जन्माने गैरयहूदी व सुंता झालेल्याकडून असुंती समजले जात होतो, ती सुंता शरीरात मनुष्यांच्या हाताने केली जात असे. लक्षात असू द्या, त्या दिवसांमध्ये तुम्ही ख्रिस्तापासून अलिप्त, इस्राएलाच्या नागरिकत्वापासून वेगळे केलेले, कराराच्या वचनाला परके, आणि जगात परमेश्वरावाचून व आशेवाचून जगत होता. जे तुम्ही एकेकाळी खूप दूर होता, त्या तुम्हाला आता ख्रिस्त येशूंमध्ये, त्यांच्या रक्ताद्वारे निकट आणले आहे. कारण ते स्वतःच आपली शांती आहेत, त्यांनी दोन गटास एक केले आणि त्यांना विभक्त करणारी शत्रुत्वाची भिंत पाडली. त्यांनी आपल्या देहाने नियमशास्त्राला त्यांच्या आज्ञापालन व विधीसहित दूर केले. यात त्यांचा उद्देश हा होता की या दोघांमधून स्वतःसाठी एक नवा मनुष्य उत्पन्न करून शांती प्रस्थापित करावी. कारण त्यांनी क्रूसाद्वारे वैरभाव नाहीसा करून व दोघांना एक शरीर करून परमेश्वराशी समेट घडवून आणला. तुम्ही जे त्यांच्यापासून फार दूर होते आणि जे जवळ होते, अशा दोघांसाठी ते आले व त्यांनी शांतीचा प्रचार केला. कारण त्यांच्याद्वारे आम्हा दोघांनाही एकाच आत्म्याद्वारे पित्याजवळ येण्याचे स्वातंत्र्य आहे. या कारणाने तुम्ही आता परदेशी आणि परके नाही, तर परमेश्वराच्या लोकांबरोबर सहनागरिक आणि त्यांच्या कुटुंबाचे सदस्य झाला आहात. तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे यांच्या भक्कम पायावर बांधलेले आहात, ज्याची मुख्य कोनशिला ख्रिस्त येशू आहेत. त्यांच्यामध्ये पूर्ण इमारत एकत्र जोडली जात असताना वाढत जाऊन प्रभूचे पवित्र मंदिर होत आहे. त्याचप्रमाणे तुम्हीही पवित्र आत्म्याद्वारे एकत्र बांधले गेले असताना परमेश्वराचे वसतिस्थान झाला आहात.
इफिसकरांस पत्र 2:11-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणून आठवण करा की, तुम्ही पूर्वी देहाने परराष्ट्रीय आणि ज्यांची सुंता हाताने केलेली म्हणजे देहाची आहे अशा स्वतःला सुंती म्हणवणार्या लोकांकडून बेसुंती म्हणवले जाणारे होता; ते तुम्ही त्या वेळेस ख्रिस्तविरहित, इस्राएलाच्या राष्ट्राबाहेरचे, वचनाच्या करारांना परके, आशाहीन व देवविरहित असे जगात होता. परंतु जे तुम्ही पूर्वी ‘दूर’ होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठायी ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे ‘जवळचे’ झाला आहात. कारण तोच आमची शांती आहे; त्याने दोघांना एक केले आणि मधली आडभिंत पाडली; त्याने आपल्या देहाने वैर, म्हणजे आज्ञाविधींचे नियमशास्त्र नाहीसे केले; ह्यासाठी की, स्वत:च्या ठायी दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी; आणि त्यांचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव जिवे मारून त्याच्या द्वारे दोघांचा देवाशी समेट करावा. आणि त्याने येऊन जे तुम्ही ‘दूर होता’ त्या तुम्हांला ‘शांतीची सुवार्ता सांगितली व जे जवळ होते त्यांनाही शांतीची सुवार्ता सांगितली; कारण त्याच्या द्वारे आत्म्याच्या योगे आपणा उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो. तर ह्यावरून तुम्ही आतापासून परके व उपरे नाहीत; पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात; प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचलेले आहात; स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे; त्याच्यामध्ये सबंध इमारत जोडून रचली असता प्रभूच्या ठायी वाढत वाढत पवित्र मंदिर होते; प्रभूच्या ठायी तुम्हीही आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात.
इफिसकरांस पत्र 2:11-22 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ज्यांची शारीरिक सुंता झालेली आहे व जे स्वतःला सुंता झालेले असे म्हणवून घेत असत अशा यहुदी लोकांकडून तुम्ही पूर्वी जन्माने यहुदीतर लोक म्हणविले जात होता; म्हणजेच शरीराची सुंता न झालेले म्हणून ओळखले जात होता, हा तुमचा पूर्वेतिहास लक्षात आणा. तुम्ही त्या वेळेस ख्रिस्तविरहित, इस्राएल राष्ट्राबाहेरचे, वचनांच्या करारांना परके, आशाहीन व देवाविना असे जीवन जगत होता. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता, ते तुम्ही आता ख्रिस्त येशूमध्ये ख्रिस्ताच्या रक्तायोगे जवळचे झाला आहात; कारण तो आपली साक्षात शांती आहे, त्याने दोघांना एक केले आणि मधली भिंत पाडली. त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले, हे वैर म्हणजे आज्ञाविधींचे नियमशास्त्र, ह्यासाठी की, स्वतःमध्ये दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी, व त्याच्या क्रुसावरील बलिदानाने दोघांतील वैर नाहीसे करून दोघांना एक शरीर करून दोघांचा देवाशी समेट करावा. त्याने येऊन जे तुम्ही दूर होता, त्या तुम्हांला आणि जे जवळ होते त्या यहुदी लोकांनाही शांतीचे शुभवर्तमान सांगितले. त्याच्याद्वारे आत्म्याच्यायोगे आपणा उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो. तर मग तुम्ही आत्तापासून परके व उपरे नाही, पवित्र लोकांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घराण्यातील लोक आहात. प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्हीदेखील रचलेले आहात. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे. त्याच्यामध्ये सबंध इमारत एकत्र जोडली जाते व ती प्रभूला समर्पित केलेले मंदिर बनते. देवाने पवित्र आत्म्याद्वारे तुमच्यामध्ये वसती करावी म्हणून प्रभूमध्ये तुम्हीदेखील इतरांबरोबर एकत्र उभारले जात आहात.