YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उपदेशक 9:11-18

उपदेशक 9:11-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मी सूर्याच्या खालती काही कुतुहलाच्या गोष्टी पाहिल्या. वेगाने धावणारा शर्यत जिंकत नाही, सर्वशक्तिमान लढाई जिंकतो असे नाही. शहाण्याला अन्न खाता येते असे नाही. समंजसास संपत्ती मिळते असे नाही, आणि ज्ञान्यावरच अनुग्रह होतो असे नाही. त्याऐवजी समय व संधी त्या सर्वावर परीणाम होतात. कोणालाही त्याचा मृत्यू समय माहीत नाही, जसा मासा मरणाच्या जाळ्यात सापडतो, किंवा सापळ्यात अडकणाऱ्या पक्ष्याप्रमाणे, त्याचप्रमाणे जनावरे, मानवजात अरिष्टाच्या समयी, तो त्यांच्यावर अचानक येऊन पडला म्हणजे सापळ्यात अडकतो. हे ज्ञानही मी भूतलावर पाहिले आहे आणि हे मला फार महत्वाचे वाटते. थोडे लोक असलेले एक लहान शहर होते. एक महान राजा त्या शहराविरुध्द लढला आणि त्याने त्याचे सैन्य त्या शहराभोवती ठेवले. पण त्या शहरात एक विद्वान होता. तो विद्वान गरीब होता. पण त्याने आपल्या ज्ञानाने त्या शहराचा बचाव केला. सगळे काही संपल्यानंतर लोक त्या गरीब मनुष्यास विसरून गेले. मग मी निर्णय केला, बळापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे पण गरीबाच्या ज्ञानाला तुच्छ मानतात आणि त्याचे शब्द ऐकत नाही. विद्वान मनुष्याने शांतपणे उच्चारलेले काही शब्द हे मूर्ख राजाने ओरडून सांगितलेल्या शब्दांपेक्षा चांगले असतात. शहाणपण हे युध्दातल्या तलवारी आणि भाले यापेक्षा चांगले असते. पण एक मूर्ख अनेक चांगल्यांचा नाश करतो.

सामायिक करा
उपदेशक 9 वाचा

उपदेशक 9:11-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मी सूर्याखाली आणखी काहीतरी वेगळे पाहिले: शर्यत वेगवानांसाठी नाही, किंवा युद्ध बलवानाचे नाही, सुज्ञानी लोकांनाच भोजन मिळते असे नाही किंवा बुद्धिमानाला धन मिळते असे ही नाही किंवा कुशल कारागिरांवरच अनुग्रह होईल, असे नाही; परंतु समय व प्रसंग सर्वांनाच येतो. आपल्यावर कधी वेळ येणार हे कोणालाही ठाऊक नाही: जसा मासा त्या क्रूर जाळ्यात सापडतो, किंवा पक्षी फासात अडकला जातो, तसेच लोकसुद्धा त्यांच्यावर अचानक पडलेल्या वाईट समयात अडकले जातात. सुज्ञानाचे हे उदाहरण मी सूर्याखाली पाहून फार प्रभावित झालो: एक छोटेसे शहर होते. त्यात थोडेच लोक राहत होते आणि एक अतिशय पराक्रमी राजा त्यांच्या विरोधात सैन्य घेऊन आला व त्या शहराला त्याने वेढा दिला आणि गराडा घातला. त्या शहरात एक गरीब पण सुज्ञ मनुष्य होता, आणि आपल्या सुज्ञानाने त्याने शहर वाचविले. पण त्या गरीब माणसाची कोणी आठवण केली नाही. म्हणून मी म्हणालो, “सुज्ञान बळापेक्षा बरे आहे.” परंतु गरीब मनुष्याचे ज्ञान तुच्छ लेखले गेले आणि त्याचा शब्द कोणी मानला नाही. सुज्ञानी मनुष्याच्या शांत शब्दांकडे लक्ष देणे हे मूर्खांच्या राजाचे ओरडणे ऐकण्यापेक्षा बरे. युद्धाच्या शस्त्रांपेक्षा सुज्ञान बरे, पण एक पापी पुष्कळ चांगल्या गोष्टींचा नाश करतो.

सामायिक करा
उपदेशक 9 वाचा

उपदेशक 9:11-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मी परत येऊन भूतलावर आणखी पाहिले तो वेगवानांनाच शर्यतीत यश व वीरांनाच युद्धात विजयश्री मिळते असे नाही; शहाण्यांनाच अन्न व समंजसांनाच धन मिळते आणि ज्ञात्यांवरच अनुग्रह होतो असे नाही; तर सर्व कालवश व दैववश आहेत. कारण मनुष्याला स्वतःवर येणारा प्रसंग कळत नाही; अपायकारक जाळ्यात सापडणार्‍या माशांप्रमाणे, पाशात अडकणार्‍या पक्ष्यांप्रमाणे, मानवपुत्रांवर अनिष्ट कालपाश अकस्मात पडतो; त्यात ते सापडतात. मी भूतलावर पुढील प्रकारचे ज्ञान पाहिले, ते मला फार थोर भासले; ते असे : एक लहानसे नगर होते, त्यात थोडेच लोक होते; त्यावर एका मोठ्या राजाने चढाई करून त्याला वेढा दिला व त्याच्यासमोर मोठाले मोर्चे लावले. त्यात एक गरीब पण बुद्धिमान मनुष्य होता; त्याने आपल्या बुद्धिबलाने त्या नगराचा बचाव केला; पण त्या गरीब मनुष्याचे स्मरणही कोणाला राहिले नाही. तेव्हा मी म्हणालो, बलाहून ज्ञान श्रेष्ठ खरे; तथापि गरिबाची अक्कल लोक तुच्छ मानतात आणि त्याचे शब्द ऐकत नाहीत. मूर्खांच्या राजाने केलेल्या ओरडीपेक्षा शांतपणे ऐकलेले शहाण्यांचे शब्द बरे. युद्धशस्त्रांपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे; एकटा पापी बहुत हिताची नासाडी करतो.

सामायिक करा
उपदेशक 9 वाचा