YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उपदेशक 9:1-12

उपदेशक 9:1-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मी या सगळ्या गोष्टींचा काळजीपूर्वक विचार केला. नीतिमान आणि ज्ञानी माणसे व त्यांचे कार्ये समजण्याचा स्पष्टपणे प्रयत्न केला. ते सर्व देवाच्या हातात असते. कोणीतरी आपला तिरस्कार किंवा प्रेम करील याबद्दल काहीही माहीत नसते. जे काही घडते ते सर्वांस सारखेच घडते. नीतिमान आणि दुष्ट, चांगला आणि वाईट, शुद्ध आणि अशुद्ध, यज्ञ करणारा आणि यज्ञ न करणारा, या सर्वांची सारखीच गती होते. चांगला मनुष्य पापी मनुष्यासारखाच मरेल. शपथ वाहणाऱ्याची, तशीच शपथ वाहण्यास घाबरतो त्याची दशा सारखीच होते. जे काही सूर्याच्या खालती करण्यात येत आहे त्यामध्ये एक अनिष्ट आहे. सर्वांचा शेवट सारखाच होतो. मानवजातीच्या मनात सर्व दुष्टता भरलेली असते. ते जिवंत असतात तोपर्यंत त्यांच्या मनात वेडेपण असते. मग त्यानंतर ते मेलेल्यास जाऊन मिळतात. जो मनुष्य अजून जिवंत आहे त्याच्याबाबतीत आशेला जागा आहे. पण हे म्हणणे खरे आहे. जिवंत कुत्रा मरण पावलेल्या सिंहापेक्षा चांगला असतो. जिवंताना ते मरणार आहेत हे माहीत असते. पण मरण पावलेल्यांना काहीच माहीत नसते. मरण पावलेल्यांना कुठलेच बक्षिस मिळत नाही. कारण त्यांचे स्मरण विसरले आहे. त्यांची प्रीती, द्वेष व मत्सर ही कधीच नष्ट होऊन गेली आहेत, आणि जे काही सूर्याच्या खालती करण्यात येत आहे, त्यामध्ये त्यांना पुन्हा कधीही जागा नाही. तुझ्या मार्गाने जा, आनंदाने आपली भाकर खा आणि आनंदीत मनाने आपला द्राक्षरस पी, कारण देवाने तुझी चांगली कृत्ये साजरी करण्यास मान्यता दिली आहे. सर्वदा तुझी वस्त्रे शुभ्र असावी आणि तुझ्या डोक्यास तेलाचा अभिषेक असावा. तुझ्या व्यर्थतेच्या आयुष्याचे जे दिवस त्याने तुला सूर्याच्या खालती दिले आहेत त्यामध्ये, तुझ्या व्यर्थतेच्या सर्वच दिवसात, तुझी पत्नी जी तुला प्रिय आहे तिच्याबरोबर तू आनंदाने आपले आयुष्य घालीव, कारण आयुष्यात, आणि तू ज्या आपल्या उद्योगात सूर्याच्या खालती श्रम करतोस तेथेही तुझा वाटा हाच आहे. जे काही काम तुझ्या हाती पडेल ते सर्व तू आपल्या सामर्थ्याने कर. कारण ज्या कबरेत आपण सर्व जाणार आहोत त्यामध्ये काम, विचार, ज्ञान आणि शहाणपणही नसते. मी सूर्याच्या खालती काही कुतुहलाच्या गोष्टी पाहिल्या. वेगाने धावणारा शर्यत जिंकत नाही, सर्वशक्तिमान लढाई जिंकतो असे नाही. शहाण्याला अन्न खाता येते असे नाही. समंजसास संपत्ती मिळते असे नाही, आणि ज्ञान्यावरच अनुग्रह होतो असे नाही. त्याऐवजी समय व संधी त्या सर्वावर परीणाम होतात. कोणालाही त्याचा मृत्यू समय माहीत नाही, जसा मासा मरणाच्या जाळ्यात सापडतो, किंवा सापळ्यात अडकणाऱ्या पक्ष्याप्रमाणे, त्याचप्रमाणे जनावरे, मानवजात अरिष्टाच्या समयी, तो त्यांच्यावर अचानक येऊन पडला म्हणजे सापळ्यात अडकतो.

सामायिक करा
उपदेशक 9 वाचा

उपदेशक 9:1-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मी या सर्वांवर मनन केले आणि हा निष्कर्ष काढला की नीतिमान व सुज्ञ आणि ते जे काही करतात ते सर्व परमेश्वराच्या हाती आहे, परंतु त्याच्यासाठी पुढे प्रेम किंवा द्वेष यापैकी काय ठेवले आहे हे कोणा मनुष्याला माहीत नसते. सर्वांची नियती एकच आहे—नीतिमान आणि दुष्ट, चांगला आणि वाईट, शुद्ध आणि अशुद्ध, जे यज्ञार्पण करतात व जे करीत नाहीत. जसे चांगल्या व्यक्तीबरोबर, तसेच पापी व्यक्तीबरोबर; जसे शपथ घेणार्‍यांशी, तसेच जे ती शपथ घ्यायला घाबरतात त्यांच्याशी. सूर्याखाली घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीत हे वाईट आहे: एकसमान नियती सर्वांवर मात करते. शिवाय, लोकांची अंतःकरणे दुष्टाईने भरलेली आहेत आणि जिवंत असताना त्यांच्या अंतःकरणात वेडेपणा आहे आणि नंतर ते मृतांमध्ये सामील होतात. जिवंत लोकांमध्ये असलेल्या प्रत्येकाला ही आशा आहे—जिवंत कुत्रा सुद्धा मृत सिंहांपेक्षा बरा! जिवंतांना आपण मरणार हे माहीत असते, पण मेलेल्यांना काहीच माहीत नसते; त्यांना पुढे काही मोबदला नाही आणि त्यांच्या नावाचे सुद्धा स्मरण नाही. त्यांचे प्रेम, त्यांचा द्वेष आणि त्यांचा हेवा हे सर्व फार पूर्वीच नाहीसे झाले आहे; सूर्याखाली घडत असलेल्या कोणत्याही गोष्टीत पुन्हा त्यांचा वाटा नसेल. जा, आनंदाने तुझे भोजन कर, आणि हर्षित हृदयाने आपला द्राक्षारस पी, कारण तू जे करतो ते परमेश्वराने आधी मान्य केले आहे. तुमची वस्त्रे सर्वदा शुभ्र असावीत व तुमच्या डोक्याला नेहमी तेलाभिषेक असावा. सूर्याखाली परमेश्वराने तुला देऊ केलेल्या अर्थहीन जीवनाच्या आपल्या सर्व दिवसांत आपली पत्नी, जिच्यावर तू प्रेम करतो, तिच्याबरोबर या निरर्थक जीवनाचा आनंद उपभोग. कारण सूर्याखाली तुझ्या जीवनाचा व श्रमाचा हाच वाटा आहे. जे काम तुझ्या हाताला सापडते, ते तुझ्या सर्व शक्तीने कर, कारण मृतलोकामध्ये, जिथे तुला जायचे आहे, तिथे ना काम आहे, ना योजना, ना विद्या, ना सुज्ञान. मी सूर्याखाली आणखी काहीतरी वेगळे पाहिले: शर्यत वेगवानांसाठी नाही, किंवा युद्ध बलवानाचे नाही, सुज्ञानी लोकांनाच भोजन मिळते असे नाही किंवा बुद्धिमानाला धन मिळते असे ही नाही किंवा कुशल कारागिरांवरच अनुग्रह होईल, असे नाही; परंतु समय व प्रसंग सर्वांनाच येतो. आपल्यावर कधी वेळ येणार हे कोणालाही ठाऊक नाही: जसा मासा त्या क्रूर जाळ्यात सापडतो, किंवा पक्षी फासात अडकला जातो, तसेच लोकसुद्धा त्यांच्यावर अचानक पडलेल्या वाईट समयात अडकले जातात.

सामायिक करा
उपदेशक 9 वाचा

उपदेशक 9:1-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ह्या सगळ्यांचे मनन मी केले आणि हे स्पष्टपणे समजण्याचा प्रयत्न केला; ते हे की नीतिमान व ज्ञानी आणि त्यांची कृत्ये ही सर्व देवाच्या स्वाधीन आहेत; आपण प्रेम करणार की वैर करणार हे मनुष्याला कळत नाही; हे सर्वकाही त्याला पुढे प्राप्त होणार असते. जे काही घडते ते सर्वांना सारखेच घडते; नीतिमान व दुष्ट, सात्त्विक, शुद्ध व अशुद्ध, यज्ञ करणारा व यज्ञ न करणारा ह्या सर्वांची एकच गती होते; सात्त्विकाची व पाप्याची, शपथ वाहणार्‍याची, तशीच शपथ वाहण्यास भिणार्‍याची सारखीच दशा होते. भूतलावर जे काही घडते त्या सर्वांत हे एक अनिष्ट आहे की सर्वांची सारखीच गती होते; मानवपुत्रांच्या मनात दुष्टता भरलेली असते, त्यांचे मन जन्मभर भ्रांतिमय असते, मग ते मेलेल्यांना जाऊन मिळतात. जो जीवसृष्टीशी मिळून असतो त्याला आशा असते, कारण मृत सिंहापेक्षा जिवंत श्वान बरा. आपल्याला मरायचे आहे हे जिवंतांना निदान कळत असते; पण मेलेल्यांना तर काहीच कळत नाही; त्यांना आणखी काही फलप्राप्ती होणार नसते; त्यांचे स्मरण कोणाला राहत नाही. त्यांचे प्रेम, त्यांचे वैर व त्यांचा हेवादावा ही नष्ट होऊन गेली आहेत; ह्या भूतलावरील व्यवहारात त्यांचा भाग कधीही असणार नाही. जा, तू आनंदाने आपली भाकर खा; हर्षभराने आपला द्राक्षारस पी; कारण देवाचा तुझ्या कृत्यांवर प्रसाद झाला आहे. तुझी वस्त्रे सदा शुभ्र असोत; तुझ्या डोक्याला तेलाची वाण नसो. देवाने ह्या भूतलावर तुझ्या व्यर्थ आयुष्याचे जे दिवस नेमले आहेत ते तुझे सर्व व्यर्थ दिवस आपल्या प्रिय स्त्रीबरोबर सुखाने घालव. आयुष्यात हा तुझा वाटा आहे; ह्या भूतलावर जे परिश्रम तू करतोस त्यांचे हे फळ तुला आहे. जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर; कारण ज्या अधोलोकाकडे तू जात आहेस तेथे काही उद्योग, युक्तिप्रयुक्ती, बुद्धी व ज्ञान ह्यांचे नाव नाही. मी परत येऊन भूतलावर आणखी पाहिले तो वेगवानांनाच शर्यतीत यश व वीरांनाच युद्धात विजयश्री मिळते असे नाही; शहाण्यांनाच अन्न व समंजसांनाच धन मिळते आणि ज्ञात्यांवरच अनुग्रह होतो असे नाही; तर सर्व कालवश व दैववश आहेत. कारण मनुष्याला स्वतःवर येणारा प्रसंग कळत नाही; अपायकारक जाळ्यात सापडणार्‍या माशांप्रमाणे, पाशात अडकणार्‍या पक्ष्यांप्रमाणे, मानवपुत्रांवर अनिष्ट कालपाश अकस्मात पडतो; त्यात ते सापडतात.

सामायिक करा
उपदेशक 9 वाचा