उपदेशक 8:2-15
उपदेशक 8:2-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी तुम्हास सल्ला देतो की, राजाची आज्ञा पाळा कारण त्याचे संरक्षण करण्याची तू देवाची शपथ घेतली आहे. त्याच्या समोरून जाण्याची घाई करू नको आणि जे काही चुकीचे आहे त्यास पाठींबा देऊ नको. कारण राजाच्या इच्छेला येईल तसे तो करतो. राजाच्या शब्दाला अधिकार आहे, म्हणून त्यास कोण म्हणेल, तू काय करतो? जो राजाच्या आज्ञा पाळतो तो अनिष्ट टाळतो. शहाण्या मनुष्याचे मन योग्य वेळ व न्यायसमय समजते. प्रत्येक गोष्टीला योग्य उत्तर मिळण्याचा आणि प्रतिक्रिया दर्शविण्याचा समय आहे. कारण मनुष्याच्या अडचणी मोठ्या आहेत. पुढे काय होणार आहे कोणाला माहित नाही. काय होणार आहे हे त्यास कोण सांगू शकेल? जीवनाच्या श्वासास थांबून धरण्याचा अधिकार कोणालाही नाही; आणि कोणालाही त्याच्या मरणाच्या दिवसावर अधिकार नाही. युध्द चालू असताना कोणाचीही सैन्यातून सुटका होत नाही, आणि दुष्टाई त्याच्या दासास सोडवणार नाही. मी या सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत. आणि कोणतेही काम जे भूतलावर करण्यात येत आहे त्याकडे मी आपले लक्ष लावले आहे. एक समय आहे त्यामध्ये दुसरा मनुष्य आपल्या वाईटासाठी दुसऱ्यावर अधिकार करतो. मी दुष्टांना सार्वजनिकरित्या पुरताना बघितले. त्यांना पवित्र जागेतून नेले आणि पुरले आणि त्यांनी ज्या शहरात दुष्ट कामे केली तेथील लोक त्यांची स्तुती करत होते. हेसुद्धा निरुपयोगी आहे. जेव्हा वाईट गुन्ह्याबद्दल शिक्षेचा हुकूम होऊनही ती लवकर अंमलात आणली जात नाही. त्यामुळे मानवजातीचे मन वाईट करण्याकडे तत्पर असते. पापी शंभर दुष्कृत्य करेल आणि तरीही तो भरपूर आयुष्य जगला. असे असले तरी मला माहित आहे जे देवाचा सन्मान करतात, जे त्याच्यासमक्ष त्यास मान देतात हे अधिक चांगले आहे. पण दुष्टाचे हित होणार नाही. त्यास दीर्घायुष्य लाभणार नाही. त्यांचे दिवस क्षणभंगूर सावलीसारखे असतील. कारण तो देवाला मान देत नाही. पृथ्वीवर आणखी एक निरर्थक गोष्ट घडते, असे काही नीतिमान असतात की, दुष्टांच्या करणीमुळे त्यांची जी स्थिती व्हावी ती यांची होते आणि असे काही दुष्ट असतात की, नीतिमानाच्या करणीमुळे त्यांची जी स्थिती व्हावी ती यांची होते. मी हे म्हणतो हेही व्यर्थ आहे. मग मी आनंदाची शिफारस केली, कारण मनुष्याने खावे, प्यावे व आनंद करावा यापेक्षा सूर्याच्या खालती त्यास काही उत्तम नाही. कारण त्याच्या आयुष्याचे जे दिवस देवाने त्यास पृथ्वीवर दिले आहेत त्यामध्ये त्याच्या श्रमामध्ये हे त्याच्याजवळ राहील.
उपदेशक 8:2-15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी म्हणतो, राजाच्या आज्ञेचे पालन करा, कारण तशी तुम्ही परमेश्वरासमोर शपथ घेतली आहे. राजाची उपस्थिती सोडण्याची घाई करू नका. परंतु एखाद्या वाईट गोष्टींच्या बाजूने उभे राहू नका, कारण राजा त्याला योग्य वाटेल ते करतो. कारण राजाच्या वाणीत अधिकार आहे, “हे तू काय करतो” असे त्याला कोण म्हणणार? त्याच्या आज्ञांचे पालन करणार्यांना इजा होणार नाही, आणि सुज्ञ माणसाच्या अंतःकरणाला योग्य वेळ आणि प्रक्रिया माहीत होईल. जरी त्या व्यक्तीला भारी यातना सोसाव्या लागतात, तरी प्रत्येक गोष्टींसाठी योग्य वेळ आणि प्रक्रिया ठरलेली असते. जर कोणालाही आपले भविष्य माहीत नसते, तर पुढे काय घडणार हे तो इतरांना कसे सांगणार? जसे कोणत्या मनुष्याला वार्यावर नियंत्रण करण्याचे सामर्थ्य नाही, तसेच त्यांच्या मृत्यूच्या वेळेवरही कोणाला अधिकार नाही. जसे कोणालाही युद्धाच्या वेळी सुट्टी नसते, तसेच दुष्टता करणाऱ्यांना ती त्यातून सुटका देत नाही. मी हे सर्व पाहिले, सूर्याखाली होत असलेल्या प्रत्येक गोष्टींकडे माझे चित्त लावले. अशीही एक वेळ आहे, जेव्हा एखादा व्यक्ती दुसर्यावर स्वतःच्याच यातनेमुळे अधिकार चालवितो. जे पवित्रस्थानात येत-जात होते आणि या नगरीत त्यांची उगीच स्तुती केली जात असे, अशा दुष्टांना पुरले जात असताना सुद्धा मी पहिले; हे देखील अर्थहीन आहे. जर एखाद्या अपराधासाठी त्वरित शिक्षा करण्यात आली नाही, तर लोकांचे हृदय चुकीचे कार्य करण्याच्या योजनेने भरतात. जर एखादा दुष्ट मनुष्य शंभर गुन्हे करतो तरी तो दीर्घायुष्य जगतो, तरी मला माहीत आहे की जे परमेश्वराचे भय बाळगतात व जे त्यांचा आदर करतात त्यांचे अधिक हित होईल. दुष्ट परमेश्वराचे भय बाळगत नाहीत, म्हणून त्यांचे भले होणार नाही आणि संध्याकाळच्या सावलीप्रमाणे त्यांचे दिवस वाढणार नाही. पृथ्वीवर आणखी काही घडत आहे जे निरर्थक आहे: जे दुष्टासाठी निर्धारित असते ते नीतिमानाला मिळते व नीतिमानाच्या वाट्याचे दुष्टाला मिळते. मी म्हणतो हे सुद्धा अर्थहीन आहे. म्हणून मी जीवनाच्या आनंदाची प्रशंसा केली, कारण मनुष्याने खावे, प्यावे, व आनंद करावा, सूर्याखाली त्याहून अधिक चांगले काही नाही. तेव्हा सूर्याखाली परमेश्वराने दिलेल्या त्यांच्या कष्टदायक जीवनाच्या सर्व दिवसात, त्यांना आनंदाची साथ लाभेल.
उपदेशक 8:2-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी म्हणतो की राजाची आज्ञा पाळ; तू देवाची शपथ घेतली आहेस म्हणून ती पाळ. त्याला सोडून जाण्याची घाई करू नकोस; दुष्ट मसलतीत शिरू नकोस; कारण त्याला आवडेल ते तो करतो, राजाचा शब्द तर प्रबळ असतो; “तू हे काय करतोस,” असे त्याला कोण म्हणेल? जो आज्ञा पाळतो तो अनिष्ट पाहणार नाही; नेमलेला काळ व न्यायसमय हे ज्ञान्याच्या मनाला अवगत होतील. प्रत्येक गोष्टीला नेमलेला काळ व न्यायसमय असतो, कारण मनुष्याची भयंकर दुर्दशा होते. पुढे काय होणार हे त्याला ठाऊक नसते; कसे काय होणार हे त्याला कोण सांगेल? प्राणावर कोणा मनुष्याची अशी सत्ता नसते की तो त्याला जाऊ देणार नाही; मरणदिवस कोणाच्या स्वाधीन नाही; हा संग्राम कोणाला सुटणार नाही. दुष्कर्म आपल्या मालकाचा बचाव करीत नाही. हे सर्व मी पाहिले आहे; भूतलावर चालू असलेल्या सर्व कृत्यांकडे मी आपले चित्त लावले आहे; एक मनुष्य दुसर्यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करतो. त्या वेळी माझ्या नजरेस असे आले की दुष्टांना मूठमाती मिळून ते विराम पावतात; नीतीने वागणार्यांना पवित्रस्थान सोडून जावे लागते, आणि नगरातील लोक त्यांना विसरून जातात; हेही व्यर्थ. दुष्कर्माबद्दल शिक्षा तत्काळ होत नाही म्हणून मानवपुत्रांचे मन दुष्कर्म करण्याकडे प्रवृत्त होते. पापी शंभरदा पाप करून पुष्कळ दिवस वाचला तरी माझी खातरी आहे की देवाचे भय बाळगणारे जे त्याला भिऊन वागतात त्यांचे कल्याणच होईल; पण दुष्टाचे कल्याण होणार नाही, व त्याचे छायारूप आयुष्य दीर्घ असणार नाही; कारण तो देवाला भिऊन वागत नाही. पृथ्वीवर आणखी एक व्यर्थ गोष्ट घडते : असे काही नीतिमान लोक असतात की दुष्टांच्या करणीमुळे त्यांची जी स्थिती व्हावी ती ह्यांची होते; आणि असे काही दुर्जन असतात की नीतिमानांच्या करणीमुळे त्यांची जी स्थिती व्हावी ती ह्यांची होते; हेही व्यर्थ! असे मी म्हटले. मग मी हास्यविनोदाची प्रशंसा करून म्हणालो, ह्या भूतलावर मनुष्याने खावे, प्यावे व चैन करावी ह्यांपेक्षा इष्ट त्याला काही नाही; देवाने त्याला ह्या भूतलावर जो आयुष्यकाल दिला आहे त्यात श्रम करीत असता एवढेच त्याच्याबरोबर राहणार.