YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उपदेशक 6:1-12

उपदेशक 6:1-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

जे मी भूतलावर एक अरिष्ट पाहिले. आणि ते मनुष्यासाठी भारीच असते. देव कोणा मनुष्यास खूप संपत्ती, धनदौलत आणि मानसन्मान एवढा देतो की तो मनुष्य जे इच्छितो ते सर्व त्यास मिळते, कसलीही उणीव पडत नाही. परंतु नंतर देव त्यास त्याचा आनंद घेण्याची शक्ती देत नाही. त्याऐवजी कोणीतरी अनोळखी त्या गोष्टींचा उपयोग करतो. हे व्यर्थ आहे, अतिशय वाईट पीडा आहे. जर कोणा मनुष्याने शंभर मुलांस जन्म दिला आणि पुष्कळ वर्षे जगला आणि त्याच्या आयुष्याचे वर्षे पुष्कळ असली, परंतु त्याचा जीव चांगल्या सुखाने समाधान पावला नाही आणि त्यास सन्मानाने दफन केले नाही. तर त्याच्यापेक्षा मृत जन्मलेले बाळ खूप बरे आहे. असे मी म्हणतो. जसे ते जन्मलेले बाळ निरर्थक आहे आणि अंधकारात नाहीसे होते व त्याचे नाव लपलेलेच राहते. त्या बाळाने कधीही सूर्य पाहिला नाही किंवा त्यास काहीच माहीत नाही, त्यास त्या मनुष्यापेक्षा अधिक विसावा आहे. तो मनुष्य कदाचित दोन हजार वर्षे जरी जगला. पण तो चांगल्या गोष्टींचा उपभोग घेण्यास शिकला नाही तर प्रत्येकजण ज्या जागी जातात त्याच जागी तो पण जाईल. मनुष्याचे सर्व श्रम पोटासाठी आहेत. तरी त्याची भूक भागत नाही. मूर्खापेक्षा शहाण्याला काय अधिक फायदा होतो? त्याचप्रमाणे जो गरीब असून दुसऱ्या लोकांसमोर कसे वागावे हे ज्याला समजते त्यास तरी काय फायदा? जे डोळे पाहून त्यामध्ये समाधान मानतात ते चांगले आहे मन इकडे तिकडे भटकणाऱ्या हावेपेक्षा ते बरे. हे सुध्दा वाफच आहे. व वाऱ्याचा पाठलाग करणाऱ्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. जे काही झाले त्याचे नाव पूर्वीच ठेवलेले आहे आणि मनुष्य काय आहे हेही कळलेले आहे. त्याजहून जो समर्थ त्याच्याशी त्यास झगडता येणार नाही. अधिक शब्द बोलण्याने अधिक निरर्थकता वाढते. त्यामध्ये मनुष्यास काय लाभ? मनुष्य आपल्या निरर्थक आयुष्याचे छायारूप दिवस घालवतो. त्यामध्ये त्यास काय लाभ होतो ते कोणास ठाऊक? कारण त्याच्या मरणानंतर पृथ्वीवर काय होईल हे मनुष्यास कोण सांगेल?

सामायिक करा
उपदेशक 6 वाचा

उपदेशक 6:1-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

सूर्याखाली आढळणारी आणखी एक वाईट गोष्ट मला दिसली, जी मानवावर अतिशय भारी आहे: परमेश्वर काही माणसांना भरपूर संपत्ती, मान सन्मान देतात; त्यांचे हृदय इच्छिते अशा कशाचीही त्यांना वाण पडत नाही. मात्र त्याचा उपभोग घेण्याची क्षमता त्याला देत नाहीत आणि परके त्याचा आनंद उपभोगतात. हे निरर्थक आहे, फार वाईट आहे. एखाद्या व्यक्तीला शंभर लेकरे असतील आणि तो दीर्घायुषी जगला; तरी तो आपल्या समृद्धीचा आनंद उपभोगू शकत नसेल आणि त्याला योग्य रीतीने मूठमाती मिळत नाही, तर मी असे म्हणतो की, त्याच्यापेक्षा मृत जन्मलेला गर्भ बरा. ते बाळ व्यर्थच जन्मते आणि अंधारात विलीन होते आणि अंधारातच त्याचे नाव नाहीसे होऊन जाते. जरी त्याने न कधी सूर्याला बघितले ना त्याविषयी काही जाणले, त्या मनुष्यापेक्षा त्याला अधिक विसावा आहे. जरी तो हजार किंवा दोन हजार वर्षे जगला व त्याला संपत्तीसुखाचा आनंद लाभला नाही. सर्वजण एकाच ठिकाणी जात नाही काय? प्रत्येक मनुष्य आपल्या पोटासाठी कष्ट करतो, परंतु त्यांची भूक कधीही तृप्त होत नाही. शहाण्या लोकांना मूर्ख लोकांपेक्षा काय फायदा? दुसर्‍या लोकांसमोर कसे वागावे हे जाणून गरिबांना काय फायदा? ज्यागोष्टी निरर्थक वार्‍याचा पाठलाग करण्यासारख्या आहेत, वासनेमागे धावण्यापेक्षा, आपल्या दृष्टीसमोर आहे, त्यात संतुष्ट असणे बरे. जे काही अस्तित्वात आहेत त्याला आधी नाव दिलेले आहे, आणि मानवता तर ओळखीची होती; कोणीही जो आपल्यापेक्षा अधिक शक्तिशाली आहे त्याच्याशी स्पर्धा करू शकत नाही. जेवढे जास्त शब्द तेवढा अर्थ कमी होतो, मग उगाच बोलण्याने मनुष्यास काय लाभ? वायफळ सावलीसारख्या अल्पकाळच्या जीवनात उत्तम काय आहे हे कोणा मनुष्याला सांगता येईल काय? मेल्यानंतर सूर्याच्या खाली काय होईल, हे कोणाला सांगता येईल?

सामायिक करा
उपदेशक 6 वाचा

उपदेशक 6:1-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मी भूतलावर एक अनिष्ट पाहिले; ते मनुष्यावर मोठ्या बोजासारखे असते. ते हे : कोणा मनुष्याला देव धन, संपत्ती व प्रतिष्ठा ही एवढी देतो की त्याला पाहिजे ते मनसोक्त मिळते, काही कमी पडत नाही; तरी देव त्याला ते भोगू देत नाही, ते परकाच भोगतो; हेही व्यर्थ व एक मोठी विकृतीच होय. कोणा मनुष्याला शंभर मुले झाली व तो बहुत वर्षे जगला, त्याच्या आयुष्याची वर्षसंख्या मोठी असली, तरी त्याचा जीव सुखप्राप्तीने समाधान पावला नाही, त्याचे उत्तरकार्य झाले नाही, तर अशा मनुष्यापेक्षा मृतपिंड पुरवला, असे मी म्हणतो. कारण तो शून्यावस्थेत येतो व अंधकारात नाहीसा होतो; त्याचे नाव अंधकाराने व्याप्त राहते. त्याप्रमाणेच सूर्य त्याला दिसला नाही की कळला नाही; म्हणून ह्याला त्या दुसर्‍या मनुष्यापेक्षा अधिक शांती प्राप्त होते. हजारांच्या दुप्पट वर्षे जगूनही त्याने काही सुख भोगले नाही तर त्यात काय अर्थ? सर्व एकाच स्थानी जातात ना? मनुष्याचे सर्व परिश्रम पोटासाठी आहेत, तरी त्याच्या जिवाची तृप्ती म्हणून होत नाही. मूर्खापेक्षा शहाण्याला काय अधिक लाभ होतो? त्याप्रमाणेच जो दीन असून लोकांत कसे वागावे हे जाणतो त्याला तरी काय लाभ? मन इकडेतिकडे धावू देण्यापेक्षा तुझ्या दृष्टीसमोर असलेल्या गोष्टीत सुख मानणे बरे; हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय. जे काही झाले आहे त्याला पूर्वीच नाव दिले होते; मनुष्याचे काय होणार हेही पूर्वीच माहीत असते; त्याच्याहून जो समर्थ त्याच्याशी त्याला झगडता येणार नाही. व्यर्थतेची वृद्धी करणार्‍या अशा बहुत गोष्टी आहेत; त्यांपासून मनुष्याला काय लाभ? मनुष्य आपल्या निरर्थक आयुष्याचे छायारूप दिवस घालवतो, त्यात त्याला काय लाभ होतो ते कोणास ठाऊक? मनुष्याच्या पश्‍चात भूतलावर काय होईल हे त्याला कोणाच्याने सांगवेल?

सामायिक करा
उपदेशक 6 वाचा