उपदेशक 2:17-23 - Compare All Versions
उपदेशक 2:17-23 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यावरून जीविताचा मला वीट आला; कारण ह्या भूतलावर जे काही मानवी व्यवहार होतात ते मला अनुचित वाटले; एकूण सर्वकाही व्यर्थ व वायफळ उद्योग आहे. माझ्या सर्व श्रमाचे फळ माझ्यामागून येणार्याला ठेवून मला जावे लागणार आहे, हे लक्षात येऊन मी ह्या भूतलावर जे काही परिश्रम केले त्या सगळ्यांचा मला वीट आला. तो सुज्ञ निघेल की मूर्ख निघेल कोणास ठाऊक? तरी जे काही मी परिश्रम करून व शहाणपण खर्चून ह्या भूतलावर संपादले आहे त्यावर तो ताबा चालवणार; हेही व्यर्थच! ह्यास्तव ह्या भूतलावर जे काही परिश्रम मी करीत होतो ते मी सोडून दिले; आणि माझे मन हताश झाले. कोणी सुज्ञता, ज्ञान व चतुराई ह्यांनी परिश्रम करून काही संपादावे, आणि त्यासाठी ज्याने परिश्रम केले नाहीत त्याच्या वाट्यास ते ठेवून सोडून जावे; हेही व्यर्थ व मोठे अनिष्ट होय. मनुष्य जे काही परिश्रम करतो व आपला जीव उलथापालथा करून ह्या भूतलावर खटाटोप करतो त्याचा त्याला काय लाभ? त्याचे सर्व दिवस दुःखमय असतात; त्याची दगदग कष्टमय असते; रात्रीही त्याच्या मनास चैन नसते; हेही व्यर्थच!
उपदेशक 2:17-23 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यामुळे मला जीवनाचा तिरस्कार वाटला. जे काम भूतलावर करण्यात येते त्याचे मला वाईट वाटले. सर्व गोष्टी व्यर्थ आहेत आणि वायफळ प्रयत्न करण्यासारखे आहेत. माझे अपार कष्ट, जे मी भूतलावर केले त्याचा मी तिरस्कार करू लागलो. कारण जो मनुष्य माझ्यामागून येईल त्याच्याकडे ते सोडून मला जावे लागणार. आणि तो मनुष्य शहाणा असेल की मूर्ख असेल कोणाला माहित? परंतु माझे सर्व श्रम, जे मी भूतलावर केले आहेत आणि ज्यात मी आपणास ज्ञान दाखवले आहे, त्यावर तो अधिकार चालवील. हेही व्यर्थ आहे. म्हणून जे माझे श्रम भूतलावर केले होते त्याविषयी माझे मन निराश झाले. कारण ज्याचे श्रम ज्ञानाने, विद्येने आणि कौशल्याने होतात असा मनुष्य कोण आहे? तरी त्यासाठी ज्याने काही श्रम केले नाहीत त्याच्या वाट्यास ते ठेऊन सोडून जावे हेही व्यर्थच आहे आणि मोठी शोकांतिका आहे. कारण मनुष्य सूर्याच्या खाली जे सर्व श्रम करतो आणि आपल्या मनाने जे प्रयत्न करतो त्याकडून त्यास काय फायदा होतो? कारण मनुष्याच्या कामाचा प्रत्येक दिवस दुःखदायक आणि तणावपूर्ण असतो. रात्रीदेखील त्याच्या मनास विसावा मिळत नाही. हेही वायफळच आहे.
उपदेशक 2:17-23 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून आता मला जीवनाचा वीट आला आहे, कारण सूर्याखाली जे काही केले जात आहे, ते मला दुःख देणारे आहे. ते सर्वकाही व्यर्थ, वार्यामागे धावण्यासारखे आहे. या सूर्याखाली मी ज्याच्यासाठी कष्ट केले, त्या सर्वाचा मला द्वेष वाटू लागला, कारण जे लोक माझ्यानंतर येणार त्यांच्यासाठी ते मला सोडून द्यावे लागणार. कोणाला माहीत की तो व्यक्ती सुज्ञ असेल वा मूर्ख? तरीही सूर्याखाली ज्यामध्ये मी माझे प्रयत्न आणि कौशल्य ओतले, त्या माझ्या या कष्टाच्या प्रतिफळांचा ताबा त्यांच्याकडे असेल. हे सुद्धा व्यर्थच आहे. म्हणून या सूर्याखाली केलेल्या माझ्या सर्व श्रमाबद्दल माझे हृदय निराश होऊ लागले. कारण एखादी व्यक्ती सुज्ञान, विद्या आणि कौशल्य यांच्या साहाय्याने कष्ट करते आणि ते अशा व्यक्तीच्या हाती सोडते, की ज्याने त्यासाठी काहीही श्रम केलेले नाहीत. हे सुद्धा निरर्थक आणि मोठ्या दुर्भाग्याचे आहेत. सूर्याखाली त्या लोकांचे सर्व कष्ट, ज्यासाठी त्यांनी मनापासून परिश्रम केले त्याचे त्यांना काय मिळणार? त्यांच्या सर्व दिवसांत, त्यांचे काम त्यांना दुःख आणि वेदना अशा आहेत; रात्रीच्या वेळीसुध्दा त्यांचे मन विश्रांती घेत नाही. हे सुद्धा व्यर्थच आहे.