अनुवाद 29:1-29
अनुवाद 29:1-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
इस्राएलाशी होरेब पर्वताजवळ परमेश्वराने पवित्र करार केला होता. त्याखेरीज, मवाबात देखील पवित्र करार करायची परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली. तो पवित्र करार हा होय: मोशेने सर्व इस्राएलांना बोलावून सांगितले, मिसर देशामध्ये परमेश्वराने जे जे केले ते सर्व तुम्ही पाहिले आहे. फारो, त्याचे सेवक आणि त्याचा देश यांचे परमेश्वराने काय केले ते तुम्ही पाहिले आहे. ती महान संकटे, चिन्हे व मोठे चमत्कार तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहीले आहेत. पण आजपर्यंतही परमेश्वराने तुम्हास समजायला मन, बघण्यास डोळे व ऐकण्यास कान दिलेले नाही. परमेश्वराने तुम्हास वाळवंटातून चाळीस वर्षे चालवले. पण एवढ्या कालावधीत तुमचे कपडे विरले नाहीत की जोडे झिजले नाहीत. तुम्ही भाकरी खाल्ली नाही की द्राक्षरस अथवा मद्य प्यायला नाही. हा परमेश्वरच तुमचा देव आहे हे तुम्हास कळावे म्हणून त्याने असे केले. तुम्ही येथे आलात आणि हेशबोनचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग आपल्यावर चढाई करून आले. पण आपण त्यांचा पराभव केला. त्यांचा देश आपण घेऊन तो रऊबेनी, गादी व मनश्शेचे अर्धे घराणे यांना इनाम म्हणून दिला. या करारातील सर्व आज्ञा तुम्ही पाळल्यात तर तुम्हास सर्व कार्यात असेच यश मिळत राहील. आज तुम्ही सर्वजण म्हणजेच तुमच्यातील अंमलदार वडिलधारे, प्रमुख आणि सर्व इस्राएल वंशज, तुमचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर उभे आहात. तुमची बायकामुले तसेच लाकूड तोड्यापासून पाणक्यापर्यंत तुमच्या छावणीतले सर्व उपरे ही आज याकरीता उभे आहेत. तुमचा देव परमेश्वर ह्याच्याशी करारबद्ध व्हायला तुम्ही इथे जमलेले आहात. परमेश्वर तुमच्याशी पवित्र करार करणार आहे. त्याद्वारे तो तुम्हास आपली खास प्रजा करणार आहे आणि तो तुमचा परमेश्वर बनणार आहे. त्याने हे तुम्हास आणि अब्राहाम, इसहाक व याकोब या तुमच्या पूर्वजांना कबूल केले आहे. हा शपथपूर्वक पवित्र करार फक्त आपल्याशी आज इथे करतो असे नव्हे, तर आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आज आपल्यामध्ये या ठिकाणी हजर असलेल्या व हजर नसलेल्यासाठीही आहे. आपण मिसरमध्ये कसे राहत होतो ते तुम्हास आठवत आहेच. वेगवेगळ्या राष्ट्रातून येथपर्यंतचा आपण प्रवास कसा केला हे तुम्हास माहीतच आहे. त्या लोकांच्या लाकूड, पाषाण, चांदी, सोने यापासून बनवलेल्या मूर्ती व इतर अमंगळ वस्तूही पाहील्या, आपल्या परमेश्वर देवापासून परावृत्त होऊन त्यांच्या दैवतांच्या भजनी लागलेला कोणी पुरुष, स्त्री, एखादे कुटुंब किंवा कुळ येथे नाही ना याची खात्रीकरुन घ्या. अशी माणसे विष व कडूदवणा प्रमाणे असतात. एखादा हे कराराचे बोलणे ऐकूनही, मी मला हवे तेच करणार. माझे चागंलेच होईल असे स्वत:चे समाधान करून घेत असेल. तर त्याचा त्यास त्रास होईलच पण सुक्याबरोबर ओले ही जळून जाईल. परमेश्वर अशा मनुष्यास क्षमा करणार नाही. परमेश्वराचा त्याच्यावर भयानक कोप होईल. या ग्रंथातील सर्व शाप त्यास लागतील, आणि परमेश्वर भुतलावरून त्याची नावनिशाणी पुसून टाकील. या नियमशास्त्राच्या ग्रंथातील करारात लिहिलेला आहे. त्यातल्या सर्व शापाप्रमाणे परमेश्वर त्यांच्या वाइटासाठी त्यास इस्राएलाच्या सर्व वंशातून घालवून देईल. या देशाचा कसा नाश झाला हे पुढे तुमचे वंशज आणि दूरदूरच्या देशातील परकीय पाहतील. या देशातील विपत्ती याप्रकारे परमेश्वराने पसरवलेले रोग ते पाहतील. येथील भूमी गंधक आणि खार यांच्यामुळे जळून वैराण होईल. तिच्यात गवताचे पाते देखील उगवणार नाही. सदोम, गमोरा, अदमा व सबोयिम ही शहरे परमेश्वराच्या कोपाने उद्ध्वस्त झाली तसेच या देशाचे होईल. “परमेश्वराने या देशाचे असे का केले? त्याचा एवढा कोप का झाला?” असे इतर राष्ट्रांतील लोक विचारतील. त्याचे उत्तर असे की, “आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्याशी केलेला करार इस्राएलांनी धुडकावून लावल्यामुळे परमेश्वराचा त्यांच्यावर कोप झाला. मिसरमधून या लोकांस बाहेर आणल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी पवित्र करार केला होता तो यांनी मोडला. हे इस्राएल इतर दैवतांची पूजा करु लागले. यापूर्वी त्यांना हे देव माहीत नव्हते. तसेच इतर दैवतांची पूजा करु नये असे परमेश्वराने त्यांना बजावले होते. म्हणून त्यांच्यावर परमेश्वर क्रुद्ध झाला व या ग्रंथातील शापवाणी त्यांच्याबाबतीत खरी करून दाखवली. क्रोधीष्ट होऊन परमेश्वराने त्यांचे या देशातून उच्चाटन केले व आज ते जेथे आहेत तेथे त्यांची रवानगी केली?” काही गोष्टी आमचा देव परमेश्वर ह्याने गुप्त ठेवलेल्या आहेत. त्या फक्त त्यालाच माहीत. पण हे बाकी सर्व त्याने उघड केले आहे. आपल्याला व आपल्या पुढील पिढ्यांसाठी शिकवण देऊन ती नित्य पाळायला सांगितले आहे.
अनुवाद 29:1-29 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेहने मोआब देशात इस्राएली लोकांबरोबर जो करार करण्याची मोशेला आज्ञा दिली होती त्याच्या या अटी आहेत, त्यांनी होरेब पर्वतावर जो करार केला होता तो विस्तारित असा आहे. मोशेने सर्व इस्राएली लोकांना बोलाविले आणि सांगितले: इजिप्त देशात फारोह, त्याच्या अधिकार्यांशी आणि त्याच्या देशात याहवेहने जे काही केले ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिले आहे. तिथे ज्या महान पीडा आणि ते चिन्ह आणि जे महान चमत्कार केले, ते सर्व तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहेत. पण याहवेहने आजपर्यंत तुम्हाला समजणारी अंतःकरणे किंवा पाहू शकणारे डोळे किंवा ऐकू शकणारे कान दिलेले नाहीत. तरी देखील याहवेह म्हणतात, “चाळीस वर्षे तुम्हाला त्या रानात चालविले, तरी तुमचे कपडे जीर्ण झाले नाहीत ना तुमची पायतणे झिजली. खाण्यासाठी तुमच्याजवळ भाकर नव्हती अथवा पिण्यासाठी तुमच्याजवळ द्राक्षारस किंवा मद्य नव्हते. हे मी यासाठी केले की मीच याहवेह तुमचा परमेश्वर आहे, हे तुम्ही ओळखावे.” जेव्हा तुम्ही येथे आला, तेव्हा हेशबोनचा राजा सीहोन व बाशानचा राजा ओग लढाई करण्यासाठी आपल्यावर चालून आले, पण आपण त्यांचा पराभव केला. त्यांचा प्रदेश जिंकून आपण तो रऊबेन आणि गाद यांच्या गोत्रांना आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला वतन म्हणून दिला. म्हणून या कराराच्या अटींचे काळजीपूर्वक पालन करा, म्हणजे तुम्ही जे सर्वकाही कराल त्यात तुम्ही समृद्ध व्हाल. आज तुम्ही सर्वजण याहवेह तुमच्या परमेश्वराच्या उपस्थितीत उभे आहात—म्हणजे तुमचे पुढारी व तुमचे गोत्र, तुमचे वडील आणि अधिकारी आणि इस्राएलमधील इतर सर्व पुरुष, तुमचे लेकरे आणि तुमच्या स्त्रिया व मुलेबाळे आणि तुमच्या छावणीमध्ये राहणारे परदेशी, जे तुमच्यासाठी लाकूड तोडतात आणि तुमच्यासाठी पाणी भरतात. याहवेह तुमच्या परमेश्वराशी करार करण्यासाठी येथे तुम्ही उभे आहात, तो करार याहवेह आज तुमच्यासोबत करीत आहेत आणि शपथपूर्वक त्यावर अशी मोहोर लावत आहेत की, तुम्ही त्यांचे लोक आहात आणि तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब यांना प्रतिज्ञापूर्वक वचन दिल्याप्रमाणे याहवेहच तुमचे परमेश्वर आहेत याची आज तुम्हाला खात्री करून द्यावयाची आहे. हा करार मी शपथपूर्वक करीत आहे, केवळ तुमच्याशीच नव्हे, तर आज याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर जे इस्राएली उभे आहेत व जे आज येथे नाहीत त्यांच्यासोबत देखील ते आहेत. तुम्हाला माहीत आहे की, आपण इजिप्त देशामध्ये कसे राहिलो आणि आपण इतर देशातून प्रवास करीत येथपर्यंत कसे आलो. तुम्ही त्यांच्यामध्ये घृणास्पद वस्तू आणि लाकडाच्या आणि दगडाच्या, चांदीच्या आणि सोन्याच्या अमंगळ मूर्ती पाहिल्या आहेत. आज येथे उभा असणारा तुमच्यातील कोणताही पुरुष किंवा स्त्री, कूळ किंवा गोत्राचे हृदय याहवेह तुमच्या परमेश्वराला सोडून इतर राष्ट्रांच्या दैवतांची उपासना करण्यासाठी त्यांच्याकडे वळणार नाही याबद्दल खबरदारी घ्या; हे कडू विषारी फळ आणि कडू दवणा देणार्या रोपट्याचे मूळ तुम्हामध्ये उगविणार नाही याबद्दल खबरदारी घ्या. जो कोणी अशी महत्त्वाची आणि गंभीर स्वरुपाची शपथ आपल्या कानांनी ऐकतो आणि स्वतःला आशीर्वाद देऊन म्हणतो, “माझ्या स्वतःच्याच इच्छेने मी चाललो तरी माझे काही बिघडणार नाही, मी सुरक्षित राहीन;” असे म्हणणारी माणसे सिंचित भूमी आणि कोरड्या भूमीवर नाश ओढवून घेतील. याहवेह अशा लोकांना क्षमा करण्यास कधीही तयार होणार नाहीत; त्यांचा कोप व क्रोधाग्नी त्यांच्याविरुद्ध भडकेल. या ग्रंथात लिहिलेले सर्व शाप त्यांच्यावर कोसळतील आणि याहवेह त्यांचे नाव देखील या आकाशाच्या खालून नामशेष करून टाकतील. याहवेह या मनुष्याला सर्व इस्राएली गोत्रातून वेगळे काढतील आणि कराराच्या या नियमशास्त्राच्या ग्रंथात नमूद केलेले सर्व शाप त्याच्यावर कोसळतील. मग तुमची भावी पिढी, तुमची मुलेबाळे आणि दूरदेशातील परदेशी लोक, तुमच्या देशावर याहवेहने पाठविलेली पीडा आणि रोगराई पाहतील. तुमचा संपूर्ण देश गंधक आणि क्षारयुक्त होऊन—पूर्णपणे जळून गेल्यामुळे ती एक निरुपयोगी भूमी झाली आहे असे त्यांना आढळून येईल आणि याहवेहने क्रोधाविष्ट होऊन त्याचा सदोम, गमोरा, अदमाह व सबोईम या देशांसारखाच नाश केला आहे हे त्यांना दिसेल. सर्व राष्ट्रे विचारतील: “याहवेहने या देशाचे असे का केले? हा एवढा कोप व क्रोधाग्नी कशाला?” आणि त्याचे उत्तर असेल: “ज्यावेळी याहवेह त्यांच्या पूर्वजांच्या परमेश्वराने इस्राएली लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणले होते, त्यावेळी त्यांच्याशी जो करार केला होता तो या लोकांनी मोडला म्हणून असे झाले. सक्त मनाई असतानाही, ते ओळखत नसलेली दैवते, जी त्यांना देण्यात आली नाहीत, त्या दैवतांची त्यांनी उपासना केली आणि त्यांना नमन केले. म्हणूनच याहवेहचा क्रोध या देशाविरुद्ध इतका भडकला की, या पुस्तकात नमूद केलेले सर्व शाप त्यांनी त्यांच्यावर आणले. तेव्हा याहवेहने रागाने आणि मोठ्या क्रोधाने त्यांचे या देशातून उच्चाटन केले आणि त्यांना दूरच्या देशात घालवून दिले, जिथे ते आज देखील राहत आहेत.” रहस्यमय बाबी याहवेह आमच्या परमेश्वराच्या आहेत; परंतु त्यांनी ज्यागोष्टी उघड रीतीने सांगितल्या, त्या आपल्यासाठी आणि आपल्या लेकरांसाठी आहेत, यासाठी की आपण या नियमशास्त्राच्या सर्व शब्दांचे पालन करावे.
अनुवाद 29:1-29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जो करार होरेबात परमेश्वराने इस्राएल लोकांशी केला होता त्याखेरीज जो करार मवाब देशात त्याने त्यांच्याशी करण्याची मोशेला आज्ञा दिली होती त्या कराराची वचने ही. मोशेने सर्व इस्राएलाला बोलावून सांगितले : “परमेश्वराने मिसर देशात तुमच्यासमक्ष फारोचे व त्याच्या सर्व सेवकांचे व त्याच्या सर्व देशाचे काय केले ते सर्व तुम्ही पाहिलेच आहे; म्हणजे तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिलेली महान संकटे, चिन्हे व मोठे चमत्कार; पण आजपर्यंत परमेश्वराने तुम्हांला समजायला मन, पाहायला डोळे व ऐकायला कान दिले नाहीत. मी तुम्हांला चाळीस वर्षे रानातून चालवले, पण तुमच्या अंगावरचे कपडे विरले नाहीत किंवा तुमच्या पायांतील पायतणे झिजली नाहीत. मी परमेश्वर तुमचा देव आहे हे तुम्हांला कळावे म्हणून तुम्हांला खाण्यासाठी भाकर मिळाली नाही आणि पिण्यासाठी द्राक्षारस किंवा मद्य मिळाले नाही. तुम्ही ह्या स्थानी आल्यावर हेशबोनाचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग आपणांबरोबर सामना करण्यास समोर आले, तेव्हा आपण त्यांचा मोड केला; आणि त्यांचा देश घेऊन रऊबेनी, गादी आणि मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना वतन म्हणून दिला. तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हांला यश मिळावे म्हणून ह्या कराराची वचने काळजीपूर्वक पाळा. तुम्ही सगळे आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आज उभे आहात; तुमचे प्रमुख, तुमचे वंश, तुमचे वडील जन आणि तुमचे अंमलदार व सर्व इस्राएल लोक, तुमची मुलेबाळे, तुमच्या स्त्रिया व लाकूडतोड्यापासून पाणक्यापर्यंत तुमच्या छावणीतले सर्व उपरे आज ह्यासाठी उभे आहेत की, जो करार तुमचा देव परमेश्वर आज तुमच्याशी करीत आहे व जे वचन शपथपूर्वक तुम्हांला देत आहे त्यात तुम्ही सामील व्हावे; आणि त्याने तुम्हांला सांगितल्याप्रमाणे व तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना दिलेल्या शपथेनुसार तुम्हांला आपली प्रजा ठरवावे आणि त्याने तुमचा देव व्हावे. हा करार व ही आणभाक मी केवळ तुमच्याशीच करतो असे नाही, तर आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर जो आज येथे उभा आहे आणि जो येथे हजर नाही त्याच्याशीही करतो. आपण मिसर देशात कसे राहत होतो व निरनिराळ्या राष्ट्रांमधून प्रवास करीत आपण कसे आलो हे तुम्हांला ठाऊकच आहे; त्यांच्या काष्ठपाषाणाच्या व सोन्यारुप्याच्या मूर्ती व इतर अमंगळ वस्तू तुम्ही पाहिल्या; आज आपला देव परमेश्वर ह्याच्यापासून परावृत्त होऊन त्या राष्ट्रांच्या देवांची सेवा करायला आपले मन प्रवृत्त करील असा एखादा पुरुष, स्त्री, कूळ किंवा वंश तुमच्या लोकांत कदाचित असायचा! कोण जाणे! विष व कडूदवणा येणारे मूळ तुमच्यामध्ये असेल! ‘जरी मी आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे वागलो तरी माझे कुशलच होईल’ असे तो आपल्या मनाचे समाधान करून घेईल, पण त्यामुळे सुक्याबरोबर ओलेही जळून जाईल. परमेश्वर त्याला मुळीच क्षमा करणार नाही; पण त्याचा कोप व त्याची ईर्ष्या असल्या मनुष्यावर पेटेल, व ह्या ग्रंथात लिहिलेले सर्व शाप त्याला लागतील, आणि परमेश्वर भूतलावरून त्याचे नाव खोडून टाकील. नियमशास्त्राच्या ह्या ग्रंथात जो करार लिहिलेला आहे त्यातल्या सर्व शापवचनांप्रमाणे परमेश्वर त्याच्या वाइटासाठी त्याला इस्राएलाच्या सर्व वंशांतून वेगळे करील. तुमच्यानंतर येणारी पुढल्या पिढीतील तुमची मुले आणि दूर देशाहून येणारा परका ह्या देशाची विपत्ती आणि ह्यात परमेश्वराने पसरवलेले रोग पाहतील, आणि हा सर्व देश गंधक व खार ह्यांनी इतका जळून गेला आहे की, येथे काही पेरणीकापणी होत नाही, येथे गवत उगवत नाही, पण परमेश्वराने कोपायमान व क्रोधयुक्त होऊन सदोम, गमोरा, अदमा व सबोईम ह्यांचा विध्वंस केला तसा ह्याचाही केला आहे, हे त्यांना दिसेल; तेव्हा ते, किंबहुना सर्व राष्ट्रांतले लोक विचारतील, ‘परमेश्वराने ह्या देशाचे असे का केले असावे? एवढा कोप भडकण्याचे कारण काय?’ तेव्हा लोक म्हणतील की, ‘ह्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने मिसर देशातून ह्यांना काढून आणतेवेळी ह्यांच्याशी जो करार केला होता तो ह्यांनी मोडला, व जे देव त्यांना अपरिचित होते व जे परमेश्वराने त्यांना नेमून दिले नव्हते अशा अन्य देवांची त्यांनी सेवा केली व त्यांना दंडवत घातले; म्हणून परमेश्वराचा कोप ह्या देशावर भडकून त्याने ह्या ग्रंथात लिहिलेला सर्व शाप त्यांना दिला. परमेश्वराने रागाने, क्रोधाने व महाकोपाने ह्या त्यांच्या देशातून त्यांचे उच्चाटन केले व दुसर्या देशात त्यांना फेकून दिले, हे आज आपण पाहतच आहोत.’ गुप्त गोष्टी आपला देव परमेश्वर ह्याच्या स्वाधीन आहेत, पण प्रकट केलेल्या गोष्टी आपल्या व आपल्या वंशजांच्या निरंतरच्या आहेत; ह्याचा हेतू हा की, ह्या नियमशास्त्राची सर्व वचने आपण पाळावीत.