YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 7:1-8 - Compare All Versions

दानीएल 7:1-8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

बाबेलाचा राजा बेलशस्सर याच्या राज्याच्या पहिल्या वर्षी दानीएल आपल्या पलंगावर पडलेला असता त्यास स्वप्न पडले आणि दृष्टांत त्याच्या मनात फिरू लागले मग त्याने ते स्वप्न आणि त्यातील महत्वाच्या घटना लिहून काढत्या. दानीएलाने म्हटले, “रात्रीच्या माझ्या दृष्टांतात मी पाहीले स्वर्गातील चार वारे महासागरावर घोळत होते. चार मोठी श्वापदे जी एकमेकांपासून वेगळी होती, अशी समुद्रातून बाहेर आली. पहिले सिंहासारखे असून त्यास गरुडाचे पंख होते. असा मी पाहत असता त्याचे पंख उपटून त्यास जमिनीवर मानवाप्रमाणे दोन पायावर उभे केले. त्यास मानवाचे हृदय देण्यात आले होते. नंतर दुसरे श्वापद अस्वलासारखे होते त्याच्या दातामध्ये तिन फासोळया धरल्या होत्या. त्यास सांगण्यात आले ‘उठ, पुढे पुष्कळ मांस खा.’ त्यानंतर मी पुन्हा पाहीले तो आणखी एक श्वापद चित्त्याप्रमाणे होते त्याच्या पाठीवर पक्षासारखे चार पंख होते. आणि त्यास चार शिरे होती. त्यास राज्य करण्यासाठी आधिकार दिला होता. त्यानंतर मी रात्री माझ्या स्वप्नात चौथे श्वापद पाहीले, विक्राळ, भयानक आणि अतिशय मजबूत असे ते होते. त्यास मोठे लोखंडी दात होते, ते सर्व काही चावून त्याचा चुरा करी. आणि उरलेले पायाखाली तुडवी ते इतरांपेक्षा वेगळे होते. आणि त्यास दहा शिंगे होती. मी ती शिंगे पाहत असतांना, मग त्यांच्यातून आणखी लहान शिंगे निघाले आणि आधिच्या शिंगातून तीन मुळासह उपटली गेली मी पाहिले त्या शिंगास मानवासारखे डोळे होते आणि मोठ्या फुशारक्या मारणारे तोंड होते.

सामायिक करा
दानीएल 7 IRVMAR

दानीएल 7:1-8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

बाबेलचा राजा बेलशस्सर याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी दानीएल आपल्या बिछान्यावर पडला असताना त्याने स्वप्न पाहिले व मनात दृष्टान्त पाहिला. त्याने आपल्या स्वप्नाचा सारांश लिहून ठेवला. दानीएल म्हणाला: रात्री मी आपल्या दृष्टान्तात पाहिले, माझ्यापुढे स्वर्गातील चार वाऱ्यांनी मोठ्या समुद्राला घुसळले. चार महाकाय पशू समुद्रातून वर आले. प्रत्येक पशू एकमेकांपासून वेगळा होता. “पहिला पशू सिंहासारखा होता आणि त्याला गरुडाचे पंख होते. मी पाहत असतानाच त्याचे पंख उपसून काढण्यात आले आणि त्याला जमिनीवरून उचलून माणसासारखे दोन पायांवर उभे करण्यात आले आणि त्याला मानवाचे अंतःकरण देण्यात आले. “आणि तिथे मी माझ्यापुढे दुसरा पशू पाहिला, जो अस्वलासारखा दिसत होता. त्याच्या शरीराची एका बाजू वर उचललेली होता. त्याने आपल्या दातांमध्ये तीन फासळ्या धरल्या होत्या. त्याला सांगण्यात आले, ‘ऊठ! पोटभर मांस खा!’ “यानंतर मी पाहिले तो, मला आणखी एक पशू माझ्यापुढे दिसला, तो एखाद्या चित्त्यासारखा दिसत होता. त्याच्या पाठीवर पक्ष्यांसारखे चार पंख होते. या पशूला चार डोकी होती आणि सत्ता गाजविण्याचा त्याला अधिकार देण्यात आला होता. “यानंतर रात्री मी दृष्टान्तात पाहत होतो आणि तिथे माझ्यापुढे चौथा पशू होता—तो भयंकर आणि विक्राळ आणि फार बलिष्ठ होता. त्याला मोठे लोखंडी दात होते; त्याने आपल्या काही बळींना चिरडून टाकले, काहींना फाडून खाल्ले आणि उरलेल्यांना पायाखाली तुडविले. पूर्वीच्या सर्व पशूपेक्षा हा पशू वेगळा होता. त्याला दहा शिंगे होती. “या शिंगांविषयी मी विचार करीत असता, त्या शिंगांमध्ये आणखी एक लहान शिंग उगवले आणि आधीच्या शिंगांपैकी तीन शिंगांना या नव्या शिंगाने मुळासकट उपटून टाकले. या शिंगाला माणसासारखे डोळे होते आणि बढाई करणारे तोंडही होते.

सामायिक करा
दानीएल 7 MRCV

दानीएल 7:1-8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

बाबेलचा राजा बेलशस्सर ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी दानीएल आपल्या पलंगावर पडला असता त्याला स्वप्न पडले व त्याच्या डोक्यात दृष्टान्त घोळू लागले; मग त्याने ते स्वप्न लिहून काढले व त्याचे सार कथन केले. दानिएलाने म्हटले, “मी रात्री दृष्टान्तात पाहिले तर चार्‍ही दिशांचे वारे महासागरावर सुटले; आणि भिन्नभिन्न अशी चार मोठाली श्वापदे समुद्रातून बाहेर निघाली. पहिले सिंहासारखे असून त्याला गरुडाचे पंख होते; मी पाहत असता त्याचे पंख उपटून त्याला जमिनीवरून उचलण्यात आले; त्याला मानवाप्रमाणे दोन पायांवर उभे केले; त्याला मानवाचे हृदय दिले. मी आणखी पाहिले की दुसरे एक श्वापद अस्वलासारखे होते; ते एक अंग वर करून उभे राहिले, त्याने आपल्या तोंडात, आपल्या दातांमध्ये तीन फासोळ्या धरल्या होत्या; लोक त्याला म्हणाले, “ऊठ, पुष्कळ मांस खा.” ह्यानंतर मी पाहिले तर आणखी एक श्वापद चित्त्यासारखे दिसले; त्याच्या पाठीवर पक्ष्याचे चार पंख होते; त्या श्वापदाला चार शिरेही होती; त्याला अधिकार दिला होता. ह्यानंतर मी रात्रीच्या दृष्टान्तात पाहिले तो पाहा, एक चौथे श्वापद विक्राळ, भयानक व अतिशय बळकट असे होते; त्याला मोठाले लोखंडी दात होते; ते सर्वकाही चावून त्याचा चुरा करी व उरलेले आपल्या पायांखाली तुडवी; ते अगोदरच्या सर्व श्वापदांहून भिन्न होते; आणि त्याला दहा शिंगे होती. मी ती शिंगे न्याहाळून पाहत असता, पाहा, त्यांच्यामध्ये आणखी एक लहानसे शिंग निघाले; त्याच्यामुळे अगोदरच्या शिंगांपैकी तीन समूळ उपटली गेली; आणि त्या शिंगाला मनुष्याच्या डोळ्यांसारखे डोळे होते व त्याला मोठमोठ्या गोष्टी बोलणारे तोंड होते.

सामायिक करा
दानीएल 7 MARVBSI