दानीएल 7:1-14
दानीएल 7:1-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
बाबेलाचा राजा बेलशस्सर याच्या राज्याच्या पहिल्या वर्षी दानीएल आपल्या पलंगावर पडलेला असता त्यास स्वप्न पडले आणि दृष्टांत त्याच्या मनात फिरू लागले मग त्याने ते स्वप्न आणि त्यातील महत्वाच्या घटना लिहून काढत्या. दानीएलाने म्हटले, “रात्रीच्या माझ्या दृष्टांतात मी पाहीले स्वर्गातील चार वारे महासागरावर घोळत होते. चार मोठी श्वापदे जी एकमेकांपासून वेगळी होती, अशी समुद्रातून बाहेर आली. पहिले सिंहासारखे असून त्यास गरुडाचे पंख होते. असा मी पाहत असता त्याचे पंख उपटून त्यास जमिनीवर मानवाप्रमाणे दोन पायावर उभे केले. त्यास मानवाचे हृदय देण्यात आले होते. नंतर दुसरे श्वापद अस्वलासारखे होते त्याच्या दातामध्ये तिन फासोळया धरल्या होत्या. त्यास सांगण्यात आले ‘उठ, पुढे पुष्कळ मांस खा.’ त्यानंतर मी पुन्हा पाहीले तो आणखी एक श्वापद चित्त्याप्रमाणे होते त्याच्या पाठीवर पक्षासारखे चार पंख होते. आणि त्यास चार शिरे होती. त्यास राज्य करण्यासाठी आधिकार दिला होता. त्यानंतर मी रात्री माझ्या स्वप्नात चौथे श्वापद पाहीले, विक्राळ, भयानक आणि अतिशय मजबूत असे ते होते. त्यास मोठे लोखंडी दात होते, ते सर्व काही चावून त्याचा चुरा करी. आणि उरलेले पायाखाली तुडवी ते इतरांपेक्षा वेगळे होते. आणि त्यास दहा शिंगे होती. मी ती शिंगे पाहत असतांना, मग त्यांच्यातून आणखी लहान शिंगे निघाले आणि आधिच्या शिंगातून तीन मुळासह उपटली गेली मी पाहिले त्या शिंगास मानवासारखे डोळे होते आणि मोठ्या फुशारक्या मारणारे तोंड होते. मी पाहत होतो तेव्हा, आसने मांडण्यात आली; आणि एक पुराणपुरूष आसनावर बसला. त्याची वस्त्रे हिमाप्रमाणे शुभ्र होती आणि त्याचे केस लोकरीसारखे स्वच्छ होते. त्याचे आसन आग्नीज्वाला होते. आणि त्याची चाके जळणारा अग्नी होते. त्याच्या समोर अग्नीची नदी वाहत होती, हजारो लोक त्याची सेवा करीत होते, लाखो लोक समोर उभे होते, न्यायसभा चालू होती आणि पुस्तके उघडी होती. मी सतत त्याकडे पाहत होतो कारण ते लहान शिंग फुशारकी मारत होते. मी पाहत असता त्या श्वापदाचा वध करण्यात आला त्याच्या शरीराचे तूकडे करून ते जाळण्यास देण्यात आले. इतर चार श्वापदाचे प्राण हरण करून त्यांना काही काळ जिवंत ठेवण्यात आले. त्या रात्रीच्या माझ्या दृष्टांतात मी पाहिले, आकाशातील मेघावर स्वार होऊन कोणी मानवपूत्रासारखा येताना मी पाहिला तो पुराणपुरूषाकडे आला व त्यास त्याने जवळ केले. आणि त्यास प्रभुत्व व वैभव व राज्य दिले, ते असे की, सर्व लोक, राष्ट्रे व भाषा यांनी त्याची सेवा करावी; त्याचे प्रभुत्व सनातन प्रभुत्व आहे, ते टळून जायचे नाही, आणि जे नष्ट व्हायचे नाही असे त्याचे राज्य आहे.
दानीएल 7:1-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
बाबेलचा राजा बेलशस्सर याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी दानीएल आपल्या बिछान्यावर पडला असताना त्याने स्वप्न पाहिले व मनात दृष्टान्त पाहिला. त्याने आपल्या स्वप्नाचा सारांश लिहून ठेवला. दानीएल म्हणाला: रात्री मी आपल्या दृष्टान्तात पाहिले, माझ्यापुढे स्वर्गातील चार वाऱ्यांनी मोठ्या समुद्राला घुसळले. चार महाकाय पशू समुद्रातून वर आले. प्रत्येक पशू एकमेकांपासून वेगळा होता. “पहिला पशू सिंहासारखा होता आणि त्याला गरुडाचे पंख होते. मी पाहत असतानाच त्याचे पंख उपसून काढण्यात आले आणि त्याला जमिनीवरून उचलून माणसासारखे दोन पायांवर उभे करण्यात आले आणि त्याला मानवाचे अंतःकरण देण्यात आले. “आणि तिथे मी माझ्यापुढे दुसरा पशू पाहिला, जो अस्वलासारखा दिसत होता. त्याच्या शरीराची एका बाजू वर उचललेली होता. त्याने आपल्या दातांमध्ये तीन फासळ्या धरल्या होत्या. त्याला सांगण्यात आले, ‘ऊठ! पोटभर मांस खा!’ “यानंतर मी पाहिले तो, मला आणखी एक पशू माझ्यापुढे दिसला, तो एखाद्या चित्त्यासारखा दिसत होता. त्याच्या पाठीवर पक्ष्यांसारखे चार पंख होते. या पशूला चार डोकी होती आणि सत्ता गाजविण्याचा त्याला अधिकार देण्यात आला होता. “यानंतर रात्री मी दृष्टान्तात पाहत होतो आणि तिथे माझ्यापुढे चौथा पशू होता—तो भयंकर आणि विक्राळ आणि फार बलिष्ठ होता. त्याला मोठे लोखंडी दात होते; त्याने आपल्या काही बळींना चिरडून टाकले, काहींना फाडून खाल्ले आणि उरलेल्यांना पायाखाली तुडविले. पूर्वीच्या सर्व पशूपेक्षा हा पशू वेगळा होता. त्याला दहा शिंगे होती. “या शिंगांविषयी मी विचार करीत असता, त्या शिंगांमध्ये आणखी एक लहान शिंग उगवले आणि आधीच्या शिंगांपैकी तीन शिंगांना या नव्या शिंगाने मुळासकट उपटून टाकले. या शिंगाला माणसासारखे डोळे होते आणि बढाई करणारे तोंडही होते. “जसे मी पाहिले, “सिंहासने मांडली गेली आणि प्राचीन पुरुष आपल्या आसनावर बसला आहे. त्याची वस्त्रे हिमासारखी शुभ्र होती; त्याच्या मस्तकावरील केस लोकरीप्रमाणे पांढरे होते. त्याचे सिंहासन अग्निज्वालायुक्त होते, आणि त्याच्या सिंहासनाची चाके प्रज्वलित केलेल्या अग्नीप्रमाणे होती. अग्नीची नदी निघून वाहत होती जी त्याच्यामधून बाहेर येत होती. हजारोच्या हजार लोक त्याची सेवा करीत होते; कोट्यावधी लोक त्याच्यासमोर उभे होते. न्यायालयाचे कामकाज सुरू झाले आणि पुस्तके उघडली गेली. “मग मी सतत त्याच्याकडे पाहत होतो कारण ते शिंग फुशारकीचे शब्द बोलत होते. मी सतत पाहत राहिलो जोपर्यंत चौथ्या पशूचे वध करण्यात आले नाही आणि त्याचे शरीर अग्निज्वालांमध्ये फेकण्यात आले नाही. (इतर पशूंचे अधिकार काढून घेण्यात आले, परंतु त्यांना आणखी काही काळ जिवंत राहण्याची परवानगी देण्यात आली.) “नंतर रात्री दृष्टान्तात पाहत होतो आणि मी पाहिले, मानवपुत्रासारखा आकाशात मेघारूढ होऊन येत असलेला दिसला. तो प्राचीन पुरुषाकडे गेला आणि त्याच्या उपस्थितीत त्याला सादर करण्यात आले. त्याला अधिकार, गौरव व सार्वभौम सामर्थ्य देण्यात आले; सर्व राष्ट्रांनी आणि प्रत्येक सर्व भाषा बोलणार्यांनी त्याची उपासना केली. त्याचे सामर्थ्य शाश्वतचे आहे, जे कधीही ढळणार नाही आणि त्याचा कधी अंत होत नाही आणि म्हणून त्याचे राज्य हे असे राज्य आहे, ज्याचा कधीही नाश होणार नाही.
दानीएल 7:1-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
बाबेलचा राजा बेलशस्सर ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी दानीएल आपल्या पलंगावर पडला असता त्याला स्वप्न पडले व त्याच्या डोक्यात दृष्टान्त घोळू लागले; मग त्याने ते स्वप्न लिहून काढले व त्याचे सार कथन केले. दानिएलाने म्हटले, “मी रात्री दृष्टान्तात पाहिले तर चार्ही दिशांचे वारे महासागरावर सुटले; आणि भिन्नभिन्न अशी चार मोठाली श्वापदे समुद्रातून बाहेर निघाली. पहिले सिंहासारखे असून त्याला गरुडाचे पंख होते; मी पाहत असता त्याचे पंख उपटून त्याला जमिनीवरून उचलण्यात आले; त्याला मानवाप्रमाणे दोन पायांवर उभे केले; त्याला मानवाचे हृदय दिले. मी आणखी पाहिले की दुसरे एक श्वापद अस्वलासारखे होते; ते एक अंग वर करून उभे राहिले, त्याने आपल्या तोंडात, आपल्या दातांमध्ये तीन फासोळ्या धरल्या होत्या; लोक त्याला म्हणाले, “ऊठ, पुष्कळ मांस खा.” ह्यानंतर मी पाहिले तर आणखी एक श्वापद चित्त्यासारखे दिसले; त्याच्या पाठीवर पक्ष्याचे चार पंख होते; त्या श्वापदाला चार शिरेही होती; त्याला अधिकार दिला होता. ह्यानंतर मी रात्रीच्या दृष्टान्तात पाहिले तो पाहा, एक चौथे श्वापद विक्राळ, भयानक व अतिशय बळकट असे होते; त्याला मोठाले लोखंडी दात होते; ते सर्वकाही चावून त्याचा चुरा करी व उरलेले आपल्या पायांखाली तुडवी; ते अगोदरच्या सर्व श्वापदांहून भिन्न होते; आणि त्याला दहा शिंगे होती. मी ती शिंगे न्याहाळून पाहत असता, पाहा, त्यांच्यामध्ये आणखी एक लहानसे शिंग निघाले; त्याच्यामुळे अगोदरच्या शिंगांपैकी तीन समूळ उपटली गेली; आणि त्या शिंगाला मनुष्याच्या डोळ्यांसारखे डोळे होते व त्याला मोठमोठ्या गोष्टी बोलणारे तोंड होते. मी पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराणपुरुष आसनारुढ झाला; त्याचा पेहराव बर्फासारखा पांढरा होता, त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते; त्याचे आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय होते; व त्या आसनाची चक्रे धगधगीत अग्निरूप होती. त्याच्यासमोरून अग्निप्रवाह वाहत होता; हजारो लोक त्याची सेवा करीत होते; लाखो लोक त्याच्यासमोर उभे होते; न्यायसभा भरली; वह्या उघडल्या गेल्या. त्या वेळी त्या शिंगांतून निघालेला मोठा शब्द ऐकून मी पाहत असता त्या श्वापदाचा वध करण्यात आला; त्याचे शरीर छिन्नभिन्न करण्यात आले; व ते जळावे म्हणून अग्नीत टाकण्यात आले; एवढे मी पाहिले. इतर श्वापदांविषयी म्हणाल तर त्यांचा अधिकार हरण करण्यात आला; तरी काही मुदतीपर्यंत काही काळपावेतो त्यांचा प्राण वाचवण्यात आला. तेव्हा मी रात्रीच्या दृष्टान्तात पाहिले तर आकाशातील मेघांवर आरूढ होऊन, मानवपुत्रासारखा कोणी आला; तो त्या पुराणपुरुषाकडे आला व त्याला त्यांनी त्याच्याजवळ नेले. सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक, ह्यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्याला प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिली; त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे; त्याचे राज्य अविनाशी आहे.