दानीएल 1:5-20
दानीएल 1:5-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
राज्याच्या मिष्ठान्नातून व तो पीत असे त्या द्राक्षरसातून तो त्यांचा रोज वाटा नेमून दिला. असे त्या तरुणांना तीन वर्षाचे प्रशिक्षण देण्यात यावे. त्यानंतर त्यांनी राजाची सेवा करावी. त्या लोकांमध्ये दानीएल, हनन्या, मीशाएल व अजऱ्या हे यहूदा वंशाचे होते. प्रमुख अधिकाऱ्याने त्यांना, दानीएलास बेल्टशस्सर, हनन्यास शद्रख, मीशाएलास मेशख, अजऱ्यास अबेदनगो, नावे दिली. पण दानीएलाने आपल्या मनात ठरवले की, तो स्वत:ला राजाच्या अन्नाने किंवा त्याच्या पिण्याच्या द्राक्षरसानें विटाळविणार नाही; म्हणून त्याने षंढांच्या अधिकाऱ्याला विनंती केली की, मी आपणाला विटाळवू नये. आता देवाने दानीएलावर प्रमुख अधिकाऱ्याची कृपा आणि दया व्हावी असे केले. प्रमुख अधिकारी दानीएलास म्हणाला, “मला माझा स्वामी, राजांचे भय आहे त्याने तुम्ही काय खावे व काय प्यावे ह्याची आज्ञा केली आहे, तुमच्या वयाच्या इतर तरुणांपेक्षा तुम्ही अधिक वाईट का दिसावे? तुमच्यामुळे तो माझे डोके छाटून टाकेल.” मग प्रमुख अधिकाऱ्याने दानीएल, हनन्या, मीशाएल व अजऱ्या हयावर नेमून दिलेल्या कारभाऱ्याशी दानीएल बोलला. तो म्हणाला, “आपल्या दासांची दहा दिवस कसोटी पहा, आम्हास फक्त् शाकभोजन व पिण्यास पाणी दे. नंतर आमचे बाहयरुप व त्या तरुणांचे बाहयरुप व जे राजाचे मिष्ठान्न खात आहेत त्या तरुणांचे बाह्यरुप, त्यांची तुलना कर आणि तुझ्या नजरेस येईल तसे तुझ्या दासास कर.” मग तो कारभारी हे करण्यास मान्य झाला दहा दिवसानी त्याने त्यांची पाहणी केली. दहा दिवसाच्या शेवटी त्यांचे बाह्यरुप जे राजाचे मिष्ठान्न खात अधिक निरोगी आणि धष्टपुष्ट दिसू लागले. मग कारभाऱ्याने त्यांचे मिष्ठान्न आणि त्यांचा द्राक्षरस काढून त्यास फक्त शाकभोजन दिले. मग या चार तरुणास देवाने ज्ञान आणि सर्व प्रकारच्या शास्त्रांचा समज आणि शहाणपण दिले, आणि दानीएलास सर्व प्रकारचे स्वप्न व दृष्टांत उलगडत असत. राजाने ठरवून दिलेल्या काळाच्या समाप्तीनंतर प्रमुख अधिकारी त्यांना नबुखद्नेस्सर राजासमोर घेऊन आला. राजा त्यांच्याशी बोलला, त्या सर्व समुदायामध्ये दानीएल हनन्या, मीशाएल, व अजऱ्या यांच्या तोडीचा दुसरा कोणीच नव्हता. ते राजासमोर त्याच्या सेवेस राहू लागले. ज्ञानाच्या आणि शहाणपणाच्या बाबतीत राजाने त्यांना जे काही विचारले त्यामध्ये ते, सर्व जादूगार, भूतविद्या करणारे हयांच्यापेक्षा ते दहापट उत्तम असे संपूर्ण राज्यात राजाला आढळून आले.
दानीएल 1:5-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
राजाने स्वतःच्या भोजनातून रोजचे भोजन आणि द्राक्षारसातून देण्याचा आदेश दिला. त्यांना तीन वर्षे प्रशिक्षित करावे आणि त्यानंतर त्यांना राजाच्या सेवेत आणावे. जे निवडलेले होते, त्यामध्ये काही यहूदाह वंशातील होते: दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्याह. अश्पनज अधिकार्याने त्यांना नवीन नावे दिली: त्याने दानीएलला बेलटशास्सर; हनन्याहला शद्रख; मिशाएलला मेशख; आणि अजर्याहला अबेदनगो. पण दानीएलने राजाचे अन्न व द्राक्षारस घेऊन स्वतःला भ्रष्ट न करण्याचा निर्धार केला आणि त्याने मुख्य अधिकाऱ्याला अशा प्रकारे स्वतःला भ्रष्ट न करण्याची विनंती केली. आता परमेश्वराने दानीएलविषयी अधिकार्याची कृपा आणि दया प्राप्त होईल असे केले, परंतु अधिकारी दानीएलास म्हणाला, “मला माझे स्वामीराजाचे भय आहे, ज्यांनी मला तुमच्या खाण्या आणि पिण्याची देखरेख करण्यास नेमले आहे. तुमच्याबरोबरीच्या तरुणापेक्षा तुम्ही अशक्त का दिसावे? राजा तुमच्यामुळे माझे डोके उडवेल.” दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्याह यांच्या देखरेखीसाठी अधिकार्याने जो कारभारी नेमला होता, त्याला दानीएल म्हणाला, “कृपा करून आपल्या सेवकांना दहा दिवस पारखून पाहावे: आम्हाला काहीही देऊ नको, आम्हाला खाण्यास फक्त डाळ आणि पिण्यास पाणी द्या. मग आम्ही कसे दिसतो याची तुलना राजाच्या मेजवानीत भोजन करणार्या तरुणांशी करा आणि या तुमच्या सेवकांना तुमच्या दृष्टीस जे दिसेल त्याप्रमाणे वागवा.” तो हे करण्यास सहमत झाला आणि त्याने त्यांना दहा दिवस पारखून पाहिले. दहा दिवसानंतर राजाचे भोजन खाणार्या तरुणापेक्षा ते स्वस्थ आणि धष्टपुष्ट दिसू लागले. म्हणून कारभाऱ्याने त्यांच्यासाठी नेमलेले भोजन आणि जे द्राक्षारस पीत होते ते काढून घेतले आणि त्याऐवजी डाळी देऊ लागला. परमेश्वराने या चार तरुणांना सर्वप्रकारच्या साहित्याचे ज्ञान आणि समज दिली. दानीएलला सर्व प्रकारची स्वप्ने व दृष्टान्त समजत असत. राजाने नेमून दिलेल्या वेळेनंतर प्रमुख अधिकार्याने त्यांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरपुढे त्याच्या सेवेसाठी प्रस्तुत केले. राजा त्यांच्यासोबत बोलला आणि त्या सर्वांमध्ये दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्याह यांच्यासारखे कोणीही सापडले नाही; म्हणून त्यांना राजाच्या सेवेसाठी निवडण्यात आले. बुद्धीच्या आणि शहाणपणाच्या प्रत्येक बाबतीत ज्याबद्दल जेव्हा राजाने त्यांना विचारले, त्याला ते त्याच्या संपूर्ण राज्यातील सर्व जादूगार आणि ज्योतिषीच्या सल्ल्यापेक्षा दसपटीने चांगले आहेत, असे आढळून आले.
दानीएल 1:5-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
राजा खात असे त्या मिष्टान्नांतून व पीत असे त्या द्राक्षारसातून त्यांचे नित्य खाणेपिणे चालून तीन वर्षेपर्यंत त्यांचे संगोपन व्हावे; ही मुदत संपल्यावर त्यांनी राजाच्या हुजुरास यावे, अशी राजाने आज्ञा केली. ह्या तरुण मंडळीत यहूदा वंशातले दानीएल, हनन्या, मीशाएल व अजर्या हे होते. खोजांच्या सरदाराने त्यांना येणेप्रमाणे नावे दिली : दानिएलास बेल्टशस्सर, हनन्यास शद्रख, मीशाएलास मेशख व अजर्यास अबेद्नगो. राजा खात असे ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षारस ह्यांचा आपणास विटाळ होऊ द्यायचा नाही असा दानिएलाने मनात निश्चय केला; म्हणून त्याने खोजांच्या सरदाराला विनंती केली की मला ह्यांचा विटाळ नसावा. खोजांच्या सरदाराची दानिएलावर कृपा व दया व्हावी असे देवाने केले. खोजांचा सरदार दानिएलास म्हणाला, “माझा स्वामीराजा ह्याने तुमचे खाणेपिणे नेमून ठेवले आहे; त्याचा मला धाक आहे; तुमच्या वयाच्या इतर तरुणांपेक्षा तुमची मुखे म्लान झालेली त्याला का दिसावीत? राजापुढे माझे डोके उडवले जाण्याचा प्रसंग तुम्ही का आणावा?” तेव्हा खोजांच्या सरदाराने दानीएल, हनन्या, मीशाएल, व अजर्या ह्यांच्यावर जो कारभारी नेमला होता त्याला दानिएलाने म्हटले, “दहा दिवस आपल्या ह्या दासांवर एवढा प्रयोग करून पाहा, आम्हांला खायला शाकान्न व प्यायला पाणी मात्र दे. नंतर आमची तोंडे पाहा; आणि राजघरचे अन्न खाणार्या तरुणांचीही तोंडे पाहा; मग तुझ्या नजरेस येईल तसे तुझ्या ह्या दासांचे कर.” त्याने त्यांची ही विनंती ऐकून दहा दिवस त्यांच्यावर हा प्रयोग केला. दहा दिवसांनंतर राजघरचे अन्न खाणार्या सर्व तरुणांपेक्षा त्यांचे चेहरे अधिक सुरूप दिसून ते अंगानेही अधिक धष्टपुष्ट झाले. तेव्हा तो कारभारी त्यांचे नेमलेले अन्न व द्राक्षारस देण्याचे बंद करून त्यांना शाकान्न देऊ लागला. ह्या चौघां तरुणांना देवाने सर्व विद्या व ज्ञान ह्यांत निपुण व प्रवीण केले; दानीएल हा सर्व दृष्टान्त व स्वप्ने ह्यांचा उलगडा करण्यात तरबेज झाला. नबुखद्नेस्सर राजाने त्यांना आपल्यासमोर हजर करण्याची मुदत ठरवली होती ती संपल्यावर खोजांच्या सरदाराने त्याच्यासमोर त्यांना हजर केले. तेव्हा राजाने त्यांच्याशी संभाषण केले; त्या सर्वांमध्ये दानीएल, हनन्या, मीशाएल व अजर्या ह्यांच्या तोडीचे दुसरे कोणी दिसून आले नाहीत; म्हणून ते राजाच्या हुजुरास राहू लागले. ज्ञानाच्या व विवेकाच्या बाबतींत राजा त्यांना जे काही विचारी त्यांत ते त्याच्या अवघ्या राज्यात असलेल्या सर्व ज्योतिष्यांपेक्षा व मांत्रिकांपेक्षा दसपट हुशार आहेत असे त्याला दिसून येई.