आमोस 3:1-10
आमोस 3:1-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
इस्राएलाच्या लोकांनो, जे सर्व घराणे मी मिसरामधून बाहेर आणले त्यांच्याविषयी, परमेश्वराने तुमच्याविरुध्द जे वचन सांगितले ते ऐका, “पृथ्वीवरील सर्व घराण्यांमधून, मी फक्त तुम्हास निवडले आहे. म्हणून मी तुमच्या सर्व पापांसाठी तुम्हास शिक्षा करीन.” दोन मनुष्यांचे एकमत झाल्याशिवाय ते एकमेकांबरोबर चालू शकतील काय? शिकार मिळाली नाही तर जंगलात सिंह गर्जना करील काय? तरुण सिंहाने काही धरले नसेल तर त्याच्या गुहेतून तो गुरगुरेल काय? जाळ्यावाचून पक्षी भूमीवरच्या पाशांत पडेल काय? पाशांत काही सापडले नाही तर तो पाश वर उडेल काय? रणशिंगे फुंकली गेली, तर लोक भिणार नाहीत काय? नगरावर संकट आले आणि ते परमेश्वराने घडवून आणले नाही असे होईल का? खरोखर आपला बेत त्याच्या सेवकांना म्हणजेच संदेष्ट्यांना प्रगट केल्यावचून, प्रभू परमेश्वर काहीच करणार नाही. सिंहाने डरकाळी फोडल्यास, कोण भिणार नाही? परमेश्वर बोलला आहे; तर कोणाच्याने भविष्य सांगितल्यावाचून राहवेल? अश्दोद व मिसर देशाच्या उंच मनोऱ्यांवरून पुढील संदेशाची घोषणा करा: “शोमरोनच्या पर्वतांवर एकत्र जमा, आणि त्यामध्ये किती भयंकर गोंधळ आणि काय जुलूम आहेत ते पाहा. परमेश्वर असे म्हणतो, ते आपल्या राजवाड्यात हिंसा व नाश साठवतात, ते योग्य आचरण जाणत नाहीत.”
आमोस 3:1-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
इस्राएलच्या लोकांनो, हे वचन ऐका, जे याहवेह तुमच्याविरुद्ध बोलले आहेत—त्या संपूर्ण घराण्याविरुद्ध आहे ज्यांना मी इजिप्तमधून बाहेर आणले आहे: “पृथ्वीवरील सर्व राष्ट्रातील लोकांमधून मी फक्त तुझीच निवड केली आहे; म्हणून तुझ्या सर्व पापांबद्दल मी तुला शिक्षा करेन.” दोन व्यक्ती एकमताचे झाल्यावाचून ते सोबत चालू शकतील काय? शिकार नसली तर सिंह गर्जना करेन काय? काही धरल्याशिवाय तो त्याच्या गुहेत गुरगुरणार काय? अमिष नसताना पक्षी भूमीवरील सापळ्यात अडकतो काय? जर सापळ्यात काही अडकले नसेल तर ते भूमीवरून उडेल काय? नगरात जेव्हा रणशिंगाचा आवाज येतो, तेव्हा लोक घाबरत नाही काय? शहरात विपत्ती आली तर, ती याहवेहने घडवून आणली नाही काय? सार्वभौम याहवेह आपल्या सेवक संदेष्ट्यांना त्याच्या योजना प्रकट केल्याशिवाय निश्चितच काहीही करणार नाही. सिंहाने गर्जना केली आहे— कोण भिणार नाही? सार्वभौम याहवेहने बोलले आहेत; तर मग संदेश दिल्यावाचून कोणी राहील काय? अश्दोदच्या गडांना आणि इजिप्तच्या गडांना ही घोषणा करा: “शोमरोनच्या पर्वतावर एकत्र व्हा; तिच्यामधील गोंधळ आणि तिच्या लोकांवरील अत्याचाराकडे पाहा.” “जे योग्य ते कसे करावे हे त्यांना माहीत नाही,” याहवेह जाहीर करतात, “त्यांनी लुटलेला व चोरी केलेला माल त्यांच्या महालात कोणी साठवून ठेवला आहे.”
आमोस 3:1-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
इस्राएलवंशजहो, तुमच्याविरुद्ध म्हणजे जे सर्व कूळ मी मिसर देशातून बाहेर आणले त्याच्याविरुद्ध परमेश्वराने सांगितलेले वचन ऐका, ते असे : “भूतलावरील सर्व कुळांत केवळ तुमच्याबरोबरच मी परिचय केला; म्हणून तुमच्या सर्व दुष्कृत्यांबद्दल मी तुमची झडती घेईन. पूर्वसंकेत केल्याशिवाय दोघे जण एकमेकांबरोबर चालतील काय? पारध नसल्यास वनात सिंह गर्जना करतो काय? काही धरले नसल्यास तरुण सिंह आपल्या गुहेत गुरगुरतो काय? पाशच मांडला नाही तर पक्षी जमिनीवरल्या जाळ्यात अडकेल काय? जाळ्यात काही अडकले नसल्यास ते जाळे जमिनीवरून वर उडेल काय? नगरात रणशिंग वाजवल्यास लोक घाबरायचे नाहीत काय? नगरावर विपत्ती आली असून ती परमेश्वराने आणली नाही असे होईल काय? प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे ह्यांना कळवल्याशिवाय खरोखर काहीच करत नाही. सिंहाने गर्जना केली आहे; त्याला भिणार नाही असा कोण? प्रभू परमेश्वर बोलला आहे; संदेश दिल्यावाचून कोणाच्याने राहवेल?” अश्दोदातील महालातून व मिसर देशातील महालातून असे जाहीर करून सांगा : “शोमरोनाच्या डोंगरावर जमा व्हा; त्यामध्ये केवढी दंगल चालली आहे ती पाहा, त्यांच्यात काय जुलूम होत आहे तो पाहा.” परमेश्वराचे असे म्हणणे आहे की, “हे जे आपल्या महालात बलात्कार व विध्वंस ह्यांच्या योगे धनसंचय करतात त्यांना सरळ आचरण करण्याचे ठाऊक नाही.”