प्रेषितांची कृत्ये 9:1-19
प्रेषितांची कृत्ये 9:1-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शौल यरूशलेम शहरामध्ये प्रभूच्या अनुयायांना अजूनही धमकावण्याचा व जिवे मारण्याचा प्रयत्न करीत होता, म्हणून तो महायाजकाकडे गेला. शौलाने दिमिष्क येथील सभास्थानातील महायाजकाकडून ख्रिस्ताच्या अनुयायांना पकडण्यासाठी अशी अधिकारपत्रे मागितली की, जर त्यास तेथे कोणी ‘तो मार्ग’ अनुसरणारा, मग तो पुरूष असो अथवा स्त्री, सापडले तर त्याने त्यांना बांधून यरूशलेम शहरास आणावे. मग शौल दिमिष्काजवळ आला तेव्हा एकाएकी, आकाशातून फारच प्रखर प्रकाश त्याच्याभोवती चमकला; शौल जमिनीवर पडला आणि एक वाणी त्याच्याशी बोलताना त्याने ऐकली, “शौला, शौला, तू माझा छळ का करतोस?” शौल म्हणाला, “प्रभू तू कोण आहेस?” ती वाणी म्हणाली, “मी येशू आहे, ज्याचा तू छळ करीत आहेस तो मीच आहे; आता ऊठ, आणि नगरात जा, तुला काय करायचे आहे, ते तुला तेथे कोणीतरी सांगेल.” जी माणसे शौलाबोबर प्रवास करीत होती, ती तेथेच स्तब्ध उभी राहिली त्या लोकांनी आवाज ऐकला, पण त्यांना कोणी दिसले नाही. शौल जमिनीवरून उठला, त्याने डोळे उघडले, पण त्यास काहीच दिसेना, म्हणून जे लोक त्याच्याबरोबर होते त्यांनी त्याचा हात धरून त्यास दिमिष्क शहरात नेले. तीन दिवसांपर्यंत शौलाला काहीच दिसत नव्हते, त्याने काही खाल्ले किंवा प्याले नाही. दिमिष्कांमध्ये येशूचा एक शिष्य होता त्याचे नाव हनन्या होते; प्रभू त्याच्याशी एका दृष्टांतात बोलला तो म्हणाला, “हनन्या.” हनन्याने उत्तर दिले, “मी इथे आहे, प्रभू.” प्रभू हनन्याला म्हणाला, “ऊठ आणि नीट नावाच्या रस्त्यावर जा, तेथे यहूदाचे घर शोध व तार्सस शहराहून आलेल्या शौल नावाच्या व्यक्तीबद्दल विचार सध्या तो तेथे आहे; व प्रार्थना करीत आहे. शौलाने दृष्टांतात पाहिले की त्यामध्ये हनन्या नावाचा मनुष्य आपल्याकडे आला, असून आपल्यावर हात ठेवत आहे व त्यानंतर त्यास पुन्हा दृष्टी प्राप्त झाली, असे त्यास दिसले.” परंतु हनन्याने उत्तर दिले, “प्रभू, मी त्या मनुष्याविषयी अनेक लोकांच्या तोंडून ऐकले आहे; यरूशलेम शहरातील तुझ्या संतांशी तो किती वाईट रीतीने वागला हे मी ऐकले आहे. आणि आता जे तुझ्या नावावर विश्वास ठेवतात अशा लोकांस बांधून नेण्यासाठी मुख्य याजकांकडून अधिकारपत्र घेऊन हा शौल येथे आला आहे.” परंतु प्रभू म्हणाला, “जा, राजांना आणि परराष्ट्रांना आणि इस्राएलाचे संतान यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे. माझ्या नावाकरीता ज्या गोष्टी त्यास सहन कराव्या लागतील त्या मी त्यास दाखवून देईन,” हनन्या निघाला आणि यहूदाच्या घरी गेला, त्याने शौलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले, “शौल, भाऊ, प्रभू येशूने तुला इकडे येत असता रस्त्यावर दर्शन दिले त्यानेच मला तुझ्याकडे पाठवले, यासाठी की, तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे.” लागलीच खपल्यासारखे काहीतरी शौलाच्या डोळ्यावरून खाली पडले, आणि त्यास पुन्हा दृष्टी आली शौल तेथून उठल्यावर त्याचा बाप्तिस्मा करण्यात आला. नंतर त्याने अन्न सेवन केल्यावर त्याच्या अंगात शक्ती आली, शौल काही दिवस दिमिष्क येथील शिष्यांबरोबर राहिला.
प्रेषितांची कृत्ये 9:1-19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
इकडे शौल अजूनही प्रत्येक श्वासागणीक प्रभूच्या शिष्यांचा घात करण्याच्या धमक्या देत होता. तो महायाजकाकडे गेला आणि दिमिष्क येथील सभागृहासाठी अशी पत्रे मागितली की, हा मार्ग अनुसरणारे कोणीही पुरुष किंवा स्त्रिया जर त्याला दिसून आले तर त्यांना बंदिवान करून यरुशलेमेत न्यावे. तो प्रवास करीत दिमिष्क जवळ पोहोचत असताना अकस्मात आकाशातून त्याच्याभोवती प्रकाश चकाकताना त्याने पाहिला. तो जमिनीवर पडला आणि त्याच्याशी बोलणारी एक वाणी त्याने ऐकली, ती म्हणाली, “शौला, शौला, तू माझा छळ का करीत आहेस?” शौलाने विचारले, “प्रभूजी, आपण कोण आहात?” “ज्याचा तू छळ करीत आहेस, तो मी येशू आहे, तर आता उठून उभा राहा आणि शहरामध्ये जा आणि जे काही तुला करणे अगत्याचे आहे ते तुला सांगण्यात येईल.” शौलाच्या बरोबर प्रवास करणारे निःशब्द होऊन उभे राहिले; त्यांनी आवाज ऐकला खरा, परंतु त्यांनी कोणाला पाहिले नाही मग शौल जमिनीवरून उठला, त्याने डोळे उघडले पण त्याला काहीच दिसत नव्हते. मग त्यांनी त्याला हाताला धरून दिमिष्क या ठिकाणी नेले. तिथे तो तीन दिवस आंधळा होता आणि त्याने अन्न व पाणी सेवन केले नाही. आता दिमिष्क येथे हनन्याह नावाचा येशूंचा एक शिष्य होता. दृष्टान्तामध्ये प्रभूने त्याला हाक मारली, “हनन्याह!” हनन्याह उत्तर देत म्हणाला, “आज्ञा प्रभूजी.” प्रभू त्याला म्हणाले, “तू सरळ नावाच्या रस्त्यावर यहूदाहच्या घरी जा. तिथे तार्सस येथील शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर, तो या घटकेला माझी प्रार्थना करीत आहे. त्याने दृष्टान्तात पहिले आहे की, हनन्याह नावाचा कोणी एक मनुष्य येईल आणि त्याची दृष्टी परत येण्यासाठी तो त्याचे हात त्याच्यावर ठेवील.” हनन्याह म्हणाला, “प्रभूजी! यरुशलेममधील तुझ्या पवित्र लोकांना या मनुष्याने किती नुकसान पोहोचविले आहे, याचा वृतांत मी अनेकांकडून ऐकला आहे. आणि तुमच्या नावाचा धावा करणार्या सर्वांना अटक करण्याचा अधिकार त्याला महायाजकाकडून मिळाला आहे.” परंतु प्रभू हनन्याला म्हणाले, “जा! कारण गैरयहूदी व त्यांचे राजे आणि त्याचप्रमाणे इस्राएली लोक यांच्याकडे माझे नाव जाहीर करण्यासाठी तो माझे निवडलेले पात्र आहे. माझ्या नावासाठी किती त्रास सहन करावा लागेल, हे मी त्याला दाखवेन.” नंतर हनन्याह त्या घरी गेला आणि त्याने घरात प्रवेश केला. त्याचे हात शौलावर ठेवीत त्याने म्हटले, “बंधू शौल, तू वाटेने येत असताना ज्या प्रभू येशूंनी तुला दर्शन दिले, त्यांनी मला यासाठी पाठविले आहे की, तुला आपली दृष्टी परत यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावेस.” त्याच क्षणी, त्याच्या डोळ्यावरून खपल्यांसारखे काहीतरी पडले आणि शौलाला पुन्हा दिसू लागले. तो उठला आणि त्याचा बाप्तिस्मा झाला, त्याने थोडेसे अन्न घेतल्यानंतर, त्याला पुन्हा शक्ती प्राप्त झाली.
प्रेषितांची कृत्ये 9:1-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
शौल अजूनही प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे व त्यांचा घात करणे ह्यांविषयीचे फूत्कार टाकत होता. त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन त्याच्यापासून दिमिष्कातल्या सभास्थानांना अशी पत्रे मागितली की, तो मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून यरुशलेमेस आणावे. मग जाता जाता असे झाले की, तो दिमिष्काजवळ येऊन पोहचला त्या वेळी अकस्मात त्याच्यासभोवती आकाशातून प्रकाश चमकला. तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की, “शौला, शौला, माझा छळ का करतोस?” तेव्हा तो म्हणाला, “प्रभो, तू कोण आहेस?” त्याने म्हटले, “ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे; [काट्यावर लाथ मारणे हे तुला कठीण. तेव्हा तो थरथर कापत व आश्चर्यचकित होऊन म्हणाला “प्रभो, मी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” प्रभू म्हणाला,] “तर ऊठ व नगरात जा, म्हणजे तू काय करायचे हे तुला सांगण्यात येईल.” त्याच्याबरोबर जी माणसे जात होती ती स्तब्ध उभी राहिली. त्यांनी वाणी ऐकली खरी पण त्यांच्या दृष्टीस कोणी पडले नाही. मग शौलाला जमिनीवरून उठवले आणि त्याने डोळे उघडले, तेव्हा त्याला काही दिसेना; मग त्यांनी त्याला हाताला धरून दिमिष्कात नेले. तेथे तो तीन दिवस आंधळ्यासारखा झाला व त्याने काही अन्नपाणी घेतले नाही. इकडे दिमिष्कात हनन्या नावाचा कोणीएक शिष्य होता; त्याला प्रभू दृष्टान्तात म्हणाला, “हनन्या!” त्याने म्हटले, “काय प्रभू?” प्रभू त्याला म्हणाला, “उठून नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहूदाच्या घरी तार्सकर शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर; कारण पाहा, तो प्रार्थना करत आहे; आणि आपल्याला पुन्हा दिसावे म्हणून हनन्या नावाचा एक मनुष्य आपणावर हात ठेवत आहे असे त्याने पाहिले आहे.” तेव्हा हनन्याने उत्तर दिले, “प्रभो, यरुशलेमेतल्या तुझ्या पवित्र जनांचे ह्या माणसाने किती वाईट केले आहे हे मी पुष्कळांकडून ऐकले आहे; आणि येथेही तुझे नाव घेणार्या सर्वांना बांधावे असा मुख्य याजकांपासून त्याला अधिकार मिळाला आहे.” परंतु प्रभूने त्याला म्हटले, “जा; कारण परराष्ट्रीय, राजे व इस्राएलाची संतती ह्यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे; आणि त्याला माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागेल हे मी त्याला दाखवीन.” तेव्हा हनन्या निघाला आणि त्या घरी गेला; आणि त्याच्यावर हात ठेवून म्हणाला, “शौल भाऊ, तू वाटेने येत असता ज्या प्रभूने म्हणजे येशूने तुला दर्शन दिले, त्याने तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावेस म्हणून मला पाठवले आहे.” तत्क्षणी त्याच्या डोळ्यांवरून खपल्यांसारखे काही पडले व त्याला दृष्टी आली आणि त्याने उठून बाप्तिस्मा घेतला. मग अन्न घेतल्यावर त्याला शक्ती आली. ह्यानंतर तो दिमिष्कातल्या शिष्यांबरोबर काही दिवस राहिला
प्रेषितांची कृत्ये 9:1-19 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
दरम्यानच्या काळात शौलाने प्रभूच्या शिष्यांना खुनाच्या धमक्या देणे चालूच ठेवले होते. त्याने उच्च याजकाकडे जाऊन त्याच्याकडून दिमिष्कमधल्या सभास्थानांसाठी अशी पत्रे मागितली की, प्रभुमार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून यरुशलेम येथे आणावे. तो दिमिष्कजवळ येऊन पोहचला, त्या वेळी त्याच्या सभोवती आकाशातून अकस्मात प्रकाश चमकला. तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी आकाशवाणी ऐकली की, “शौल, शौल, तू माझा छळ का करतोस?” तो म्हणाला, “प्रभो, तू कोण आहेस?” त्याने म्हटले, “ज्या येशूचा तू छळ करतोस, तो मी आहे, ऊठ व नगरात जा, म्हणजे तू काय करायचे ते तुला सांगण्यात येईल.” त्याच्याबरोबर जी माणसे जात होती ती स्तब्ध उभी राहिली. त्यांनी वाणी ऐकली खरी, पण त्यांना कोणी दिसले नाही. शौल जमिनीवरून उठला, तेव्हा त्याने डोळे उघडले, परंतु त्याला काही दिसेना. त्यांनी त्याला हात धरून दिमिष्क नगरात नेले. तेथे तो तीन दिवस आंधळ्यासारखा होता व त्याने काही अन्नपाणी घेतले नाही. इकडे दिमिष्क नगरात हनन्या नावाचा एक शिष्य होता, त्याला प्रभू दृष्टान्तात म्हणाला, “हनन्या!” त्याने म्हटले, “काय प्रभो?” प्रभू त्याला म्हणाला, “उठून सरळ नावाच्या रस्त्यावर जा आणि यहुदाच्या घरी तार्स येथील शौल नावाच्या मनुष्याचा शोध घे. पाहा, तो प्रार्थना करत आहे, आणि हनन्या नावाचा एक मनुष्य, आपल्याला पुन्हा दिसावे म्हणून आपणावर हात ठेवत आहे, असे त्याने दृष्टान्तात पाहिले.” हनन्याने उत्तर दिले, “प्रभो, यरुशलेममधल्या तुझ्या पवित्र जनांचे ह्या माणसाने किती वाईट केले आहे, हे मी पुष्कळांकडून ऐकले आहे आणि येथेही तुझे नाव घेणाऱ्या सर्वांना बेड्या घालाव्यात असा अधिकार त्याला महायाजकांकडून मिळाला आहे.” परंतु प्रभूने त्याला म्हटले, “जा, परराष्ट्रीय, राजे व इस्राएलची प्रजा ह्यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता मी त्याला निवडले आहे. माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागते, हे मी त्याला दाखवीन.” हे ऐकून हनन्या निघाला आणि त्या विशिष्ट घरी गेला. शौलाच्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला, “भाऊ शौल, तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे म्हणून तू वाटेने येत असता ज्या प्रभूने म्हणजे येशूने तुला दर्शन दिले, त्याने मला पाठवले आहे.” त्याच्या डोळ्यांवरून खपल्यांसारखे काही पडले व त्याला दृष्टी आली. त्याने उठून बाप्तिस्मा घेतला. मग अन्न घेतल्यावर त्याला शक्ती आली. ह्यानंतर तो दिमिष्क नगरात शिष्यांबरोबर काही दिवस राहिला.