YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 4:1-20

प्रेषितांची कृत्ये 4:1-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

पेत्र आणि योहान लोकांशी बोलत असता, याजक परमेश्वराच्या भवनाची रखवाली करणाऱ्यांच्या सरदार व सदूकी हे त्यांच्यावर चालून आले. कारण ते लोकांस शिक्षण देऊन येशूच्या द्वारे पुनरुत्थान असे उघडपणे सांगत होते म्हणून त्यांना फार संताप आला. तेव्हा त्यांनी त्यांना अटक केली व आता संध्याकाळ झाली होती म्हणून सकाळपर्यंत त्यांना बंदिशाळेत ठेवले. तरी वचन ऐकणाऱ्यातील पुष्कळांनी विश्वास ठेवला; आणि विश्वास ठेवलेल्या पुरूषांची संख्या सुमारे पाच हजार होती. मग दुसऱ्या दिवशी असे झाले, की त्यांचे अधिकारी, वडील व नियमशास्त्र शिक्षक हे यरूशलेम शहरात एकत्र जमले. त्यामध्ये महायाजक हन्ना व कयफा, योहान, आलेक्सांद्र मुख्य याजकाचे जे सर्व नातेवाईक ते होते. त्यांनी पेत्र व योहानाला मध्ये उभे करून विचारले, “हे तुम्ही कोणत्या सामर्थ्याने, किंवा कोणत्या नावाने केले?” तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण झालेला असता, त्यांना म्हणाला, “अहो लोकांच्या अधिकाऱ्यांनो, आणि वडिलांनो, एका आजारी मनुष्यावर उपकार झाला म्हणजे तो कशाने बरा करण्यात आला याविषयी जर आमची चौकशी आज होत आहे? तर तुम्हा सर्वास व सर्व इस्राएल लोकांस हे माहित असावे, की ज्याला तुम्ही वधस्तंभी दिले, ज्याला देवाने मरण पावलेल्यामधून उठवले, त्या नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने, हा मनुष्य बरा होऊन येथे तुमच्यापुढे उभा राहिला आहे. जो धोंडा तुम्ही बांधणाऱ्यांनी नाकारला तो कोनशिला झाला तो हाच आहे. आणि तारण दुसऱ्या कोणामध्ये नाही कारण जेणेकरून आपले तारण होईल; असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही.” तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, आणि ही निरक्षर व अशिक्षित माणसे आहेत, हे जाणून त्यांनी आश्चर्य केले, आणि हे येशूच्या संगतीत होते असे त्यांनी ओळखले. तेव्हा तो बरा झालेला मनुष्य त्यांच्याजवळ उभा असलेला पाहून, यहूदी पुढाऱ्यांना त्यांच्याविरुद्ध काही बोलता येईना. मग त्यांना सभेच्या बाहेर जाण्याची आज्ञा करून ते आपसात विचार करू लागले. ते म्हणाले, “या मनुष्यांस आपण काय करावे? कारण खरोखर यांच्याकडून प्रसिद्ध चमत्कार घडला आहे यरूशलेम शहरात राहणाऱ्या सर्वास माहित आहे; व ते आपण नाकारू शकत नाही. परंतु हे लोकांमध्ये अधिक पसरू नये, म्हणून आपण त्यांना अशी धमकी द्यावी की, यापुढे तुम्ही या नावाने कोणाशीही बोलू नये.” मग त्यांनी पेत्र व योहानला बोलावून आज्ञा केली की तुम्ही येशूच्या नावाने मुळीच बोलू नका व शिकवूही नका. परंतु पेत्र व योहान यांनी त्यांना उत्तर देऊन म्हटले, “देवापेक्षा तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे, हे तुम्हीच ठरवा. कारण ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या व ऐकल्या त्या आम्ही बोलू नयेत हे आम्हास शक्य नाही.”

प्रेषितांची कृत्ये 4:1-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

पेत्र व योहान लोकांशी बोलत असताना याजकगण, मंदिराच्या रक्षकांचा प्रमुख आणि काही सदूकी लोक त्यांच्याकडे आले. ते अत्यंत अस्वस्थ झाले, कारण प्रेषित शिक्षण देत होते व येशूंच्याद्वारे मृतांचे पुनरुत्थान होईल असे लोकांना जाहीरपणे सांगत होते. त्यांनी पेत्र व योहानाला अटक केली आणि संध्याकाळ झाल्यामुळे त्यांना दुसर्‍या दिवशीही कैदेतच ठेवले. त्यांच्यातील अनेकांनी संदेश ऐकला आणि विश्वास ठेवला; म्हणून विश्वास ठेवणार्‍या पुरुषांची संख्या सुमारे पाच हजारापर्यंत गेली. नंतर दुसर्‍या दिवशी असे झाले की शासक, वडीलजन आणि नियमशास्त्र शिक्षक यरुशलेममध्ये एकत्रित भेटले. महायाजक हन्ना तिथे होता, तसेच कयफा, योहान, आलेक्सांद्र आणि महायाजकांच्या कुटुंबातील इतर सर्वजण तिथे हजर होते. त्यांनी पेत्र व योहान यांना आपल्यासमोर बोलाविले व त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली: “तुम्ही कोणत्या अधिकाराने किंवा कोणाच्या नावाने हे केले आहे?” नंतर पेत्र पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन त्यांना म्हणाला: “अधिकारी आणि वडीलजनांनो! या लंगड्या मनुष्याच्या बाबतीत दयाळूपणाचे जे कृत्य करण्यात आले व तो कसा बरा झाला याची जर आपण तपासणी करीत असाल, तर मला तुम्हाला आणि सर्व इस्राएली लोकांना सांगू द्या की, ज्या येशूंना तुम्ही क्रूसावर चढवून ठार मारले, परंतु परमेश्वराने त्यांना मरणातून पुनः उठविले, त्याच नासरेथकर येशू ख्रिस्ताच्या नावाने, हा मनुष्य येथे पूर्ण बरा होऊन तुमच्यासमोर उभा आहे.” धर्मशास्त्रात याच येशूंबद्दल असे लिहिले आहे, “ ‘जो दगड बांधणार्‍यांनी नाकारला, तोच इमारतीचा कोनशिला झाला आहे.’ तारण दुसर्‍या कोणामध्येही सापडणार नाही, कारण ज्या नावाने आपले तारण होईल, असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मानवजातीमध्ये दिलेले नाही.” त्यांनी पेत्र व योहान यांचे धैर्य पाहिले तेव्हा त्याचे त्यांना नवल वाटले आणि त्यांना कळून आले की ती अशिक्षित व सर्वसामान्य माणसे असून ते येशूंच्या सहवासात राहत होते. आणि त्या बरे झालेल्या मनुष्याला त्यांच्याजवळ उभे असलेले पाहून, त्यांच्याने काही बोलवेना. त्यावेळी त्यांनी त्यांना न्यायसभेच्या बाहेर जाण्यास सांगितले आणि एकत्र चर्चा केली. “आपण या मनुष्यांचे काय करावे?” ते म्हणाले, “यरुशलेमकरांना माहीत आहे की त्यांनी हा असाधारण चमत्कार करून दाखविला आहे आणि आम्ही हे नाकारू शकत नाही. तरी या गोष्टी लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून आपण त्यांना अशी धमकी द्यावी की यापुढे त्यांनी या नावाने कोणाबरोबर काहीही बोलू नये.” तेव्हा त्यांनी त्यांना परत आत बोलाविले आणि येशूंच्या नावाने पुन्हा बोलू नये किंवा शिक्षण देऊ नये, अशी ताकीद दिली. परंतु पेत्र व योहानाने उत्तर दिले, “परमेश्वराच्या दृष्टीने काय योग्य आहे याचा न्याय तुम्हीच करा! तुमचे ऐकावे की त्यांचे? ज्यागोष्टी आम्ही पाहिल्या आणि ऐकल्या आहेत, त्याबद्दल सांगण्याचे आम्ही थांबविणार नाही.”

प्रेषितांची कृत्ये 4:1-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ते लोकांबरोबर बोलत असता त्यांच्यावर याजक, मंदिराचा सरदार व सदूकी हे चालून आले; कारण ते लोकांना शिक्षण देऊन, येशूच्या द्वारे मेलेल्यांतून पुन्हा उठणे आहे असे उघडपणे सांगत होते, ह्याचा त्यांना संताप आला. तेव्हा त्यांनी त्यांना अटक केली व संध्याकाळ झाली होती म्हणून सकाळपर्यंत त्यांना चौकीत ठेवले. तथापि वचन ऐकणार्‍यांतील पुष्कळांनी विश्वास ठेवला आणि अशा पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार झाली. नंतर दुसर्‍या दिवशी असे झाले की, त्यांचे अधिकारी, वडील व शास्त्री, आणि प्रमुख याजक हन्ना आणि कयफा, योहान, आलेक्सांद्र व प्रमुख याजकाच्या कुळातील जितके होते तितके यरुशलेमेत एकत्र जमले. आणि त्यांनी त्यांना मध्ये उभे करून विचारले, “तुम्ही हे कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने केले?” तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यांना म्हणाला, “अहो लोकाधिकार्‍यांनो व वडील जनांनो, एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला म्हणजे तो कशाने बरा झाला, ह्याविषयी आमची आज चौकशी व्हायची असेल, तर तुम्हा सर्वांना व सर्व इस्राएल लोकांना हे कळावे की, ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले, ज्याला देवाने मेलेल्यांतून उठवले, त्या नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्यापुढे उभा राहिला आहे. तुम्ही ‘बांधकाम करणार्‍यांनी तुच्छ मानलेला जो दगड कोनशिला झाला’ तो हाच आहे. आणि तारण दुसर्‍या कोणाकडून नाही; कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.” तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून ते आश्‍चर्य करू लागले; आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले. तरी बर्‍या झालेल्या त्या माणसाला त्यांच्याजवळ उभे असलेले पाहून त्यांना काही विरुद्ध बोलता येईना. मग त्यांनी त्यांना न्यायसभेच्या बाहेर जाण्याची आज्ञा केली आणि ते आपसांत विचार करून म्हणाले, “ह्या माणसांना आपण काय करावे? कारण त्यांच्याकडून खरोखर प्रसिद्ध चमत्कार घडला आहे, हे सर्व यरुशलेमकरांना कळून चुकले आहे; तेव्हा ते आपल्याला नाकारता येत नाही. तरी ते लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून त्यांना अशी ताकीद द्यावी की, ह्यापुढे तुम्ही ह्या नावाने लोकांपैकी कोणाबरोबरही बोलू नये.” मग त्यांनी त्यांना बोलावून असे निक्षून सांगितले की, ‘येशूच्या नावाने अगदी बोलू नका अथवा शिकवूही नका.’ परंतु पेत्र व योहान ह्यांनी त्यांना उत्तर दिले की, “देवाच्या ऐवजी तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे हे तुम्हीच ठरवा; कारण जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हांला शक्य नाही.”

प्रेषितांची कृत्ये 4:1-20 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

ते लोकांबरोबर बोलत असता काही याजक, मंदिराच्या रक्षकांचा अधिकारी व सदूकी हे तेथे आले. हे लोक संतप्त झाले होते कारण पेत्र व योहान लोकांना शिकवण देऊन, येशूद्वारे मेलेल्यांतून पुन्हा उठणे आहे, असे उघडपणे सांगत होते. म्हणून त्यांनी त्यांना अटक केली व संध्याकाळ झाली होती म्हणून सकाळपर्यंत त्यांना तुरुंगात ठेवले. वचन ऐकणाऱ्यांतील पुष्कळांनी विश्वास ठेवला. अशा पुरुषांची संख्या सुमारे पाच हजारांपर्यंत वाढत गेली. दुसऱ्या दिवशी यहुदी अधिकारी, वडीलजन व शास्त्री यरुशलेम नगरात एकत्र जमले. त्यांनी उच्च याजक हन्ना आणि कयफा, योहान, आलेक्सांद्र व उच्च याजकाचे कुटुंबीय ह्यांची भेट घेतली. ह्या सर्वांनी प्रेषितांना मध्ये उभे करून विचारले, “तुम्ही हे कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने केले?” तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन त्यांना म्हणाला, “अहो, लोकाधिकाऱ्यांनो व वडीलजनांनो, एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला म्हणजे तो कशाने बरा झाला, ह्याविषयी आमची आज चौकशी व्हावयाची असेल, तर तुम्हां सर्वांना व सर्व इस्राएली लोकांना हे समजायला हवे की, ज्याला तुम्ही क्रुसावर चढवून मारले व ज्याला देवाने मेलेल्यांमधून उठवले, त्या नासरेथकर येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य पूर्णपणे बरा होऊन तुमच्यापुढे उभा राहिला आहे. तुम्ही बांधकाम करणाऱ्यांनी नाकारलेला दगड कोनशिला झाला, तो हाच येशू आहे. तारण फक्त त्याच्याद्वारेच होऊ शकते; पृथ्वीवर मर्त्य मानवांत ज्याच्याद्वारे आपले तारण होऊ शकेल असा दुसरा कोणीही नाही.” पेत्राचे व योहानचे धैर्य पाहून तसेच हे निरक्षर व अज्ञानी आहेत, हे जाणून न्यायसभेच्या सदस्यांना आश्चर्य वाटले. हे येशूच्या सहवासात होते, हेही त्यांनी ओळखले. मात्र बऱ्या झालेल्या त्या माणसाला त्यांच्याजवळ उभे असलेले पाहून त्यांना त्यांच्याविरुद्ध काही बोलता येईना. मग त्यांनी प्रेषितांना न्यायसभेच्या बाहेर जाण्यास सांगून ते आपसात विचार करून म्हणाले, “ह्या माणसांचे आपण काय करावे? त्यांच्याकडून खरोखर असामान्य चमत्कार घडला आहे, हे सर्व यरुशलेमवासियांना कळून चुकले आहे आणि ते आपणाला नाकारता येत नाही. परंतु ही गोष्ट लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून त्यांना अशी ताकीद देऊ की, ह्यापुढे लोकांपैकी कोणाबरोबरही तुम्ही येशूच्या नावाने बोलू नये.” त्यांनी त्यांना बोलावून असे निक्षून सांगितले की, “येशूच्या नावाने मुळीच बोलू नका अथवा शिकवूही नका.” परंतु पेत्र व योहान ह्यांनी त्यांना उत्तर दिले, “देवाच्याऐवजी तुमचे ऐकावे, हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य हे तुम्हीच ठरवा. कारण जे आम्ही पाहिले व ऐकले त्याविषयी न बोलणे, हे आम्हांला शक्य नाही.”