YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 25:13-19

प्रेषितांची कृत्ये 25:13-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग काही दिवस झाल्यावर अग्रिप्पा राजा व बर्णीका ही दोघे कैसरीयास येऊन फेस्ताला भेटली. तेथे ती पुष्कळ दिवस राहिली, तेव्हा फेस्ताने राजापुढे पौलाचे प्रकरण काढून म्हटले, “फेलिक्साने बंदीत ठेवलेला एक मनुष्य येथे आहे. मी यरूशलेम शहरास गेलो होतो तेव्हा यहूद्यांच्या मुख्य याजकांनी व वडीलांनी फिर्याद करून त्याच्याविरुध्द ठराव व्हावा म्हणून विनंती केली. त्यांना मी उत्तर दिले की, आरोपी व वादी हे समोरासमोर येऊन आरोपाविषयी प्रत्युत्तर देण्याची आरोपीला संधी मिळण्यापूर्वी कोणालाही शिक्षेकरीता सोपवून देण्याची रोमी लोकांची रीत नाही.” म्हणून ते येथे आल्यावर काही उशीर न करता, दुसऱ्या दिवशी न्यायासनावर बसून मी त्या मनुष्यास आणण्याचा हुकूम केला. त्याच्यावर आरोप करणारे जेव्हा त्याच्याविरुध्द बोलण्यास उभे राहिले, तेव्हा माझ्या अपेक्षेप्रमाणे कसल्याही गुन्ह्याबाबत त्यांनी त्याच्यावर आरोप केले नाहीत. उलट आपल्या धर्माविषयी आणि कोणाएका मनुष्याविषयी ज्याचे नाव येशू आहे, त्याच्यावरून यहूदी लोकांनी त्या मनुष्याशी वाद केला, येशू हा जरी मरण पावलेला असला, तरी पौलाचा असा दावा आहे की, येशू जिवंत आहे.

प्रेषितांची कृत्ये 25:13-19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

पुढे थोड्याच दिवसांनी राजा अग्रिप्पा आणि बर्णीका कैसरीयास फेस्तास आदर देण्यासाठी आले. ते तिथे अनेक दिवस वास्तव्य करीत असल्यामुळे, फेस्ताला राजाबरोबर पौलाच्या प्रकरणाची चर्चा करण्यास वेळ मिळाला. तो म्हणाला: “फेलिक्साने ज्याला कैदेत तसेच ठेवले होते असा एक मनुष्य येथे आहे. मी यरुशलेम येथे गेलो होतो, तेव्हा तेथील प्रमुख याजकांनी व इतर यहूदी पुढार्‍यांनी त्याच्यावर दोषारोप करून त्याला शिक्षा द्यावी अशी मला विनंती केली. “मी त्यांना सांगितले की, रोमी प्रथेनुसार आरोपी व वादी समोरासमोर येणे व आरोपीला स्वतः आरोपाचे खंडन करण्याची संधी मिळाल्याशिवाय कोणालाही दंड देणे योग्य नाही. ते ज्यावेळी येथे चौकशीसाठी आले, त्यावेळी मी दुसर्‍याच दिवशी न्यायासनावर बसून तो वाद सुनावणीसाठी उशीर न करता घेतला व त्याला न्यायालयात आणण्याचा हुकूम केला. परंतु त्याच्याविरुद्ध केलेले आरोप माझ्या कल्पनेप्रमाणे मुळीच नव्हते. ते आरोप त्यांच्या धर्मासंबंधी आणि मरण पावलेल्या कोणा येशूंसंबंधी होते. पौल खात्रीने सांगतो की तो जिवंत आहे.

प्रेषितांची कृत्ये 25:13-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग काही दिवस झाल्यावर अग्रिप्पा राजा व बर्णीका ही दोघे कैसरीयास येऊन फेस्ताला भेटली. तेथे ती पुष्कळ दिवस राहिली. तेव्हा फेस्ताने राजापुढे पौलाचे प्रकरण काढून म्हटले, “फेलिक्साने बंदीत ठेवलेला एक माणूस येथे आहे. मी यरुशलेमेस गेलो होतो तेव्हा त्याच्यावर यहूद्यांच्या मुख्य याजकांनी व वडिलांनी फिर्याद करून त्याच्याविरुद्ध ठराव व्हावा म्हणून विनंती केली. त्यांना मी उत्तर दिले की, आरोपी व वादी हे समोरासमोर येऊन आरोपाविषयी प्रत्युत्तर देण्याची आरोपीला संधी मिळण्यापूर्वी कोणालाही शिक्षेकरता सोपवून देण्याची रोमी लोकांची रीत नाही. म्हणून ते येथे आल्यावर काही उशीर न करता, दुसर्‍या दिवशी न्यायासनावर बसून मी त्या माणसाला आणण्याचा हुकूम केला. वादी उभे असता ज्या वाईट गोष्टींचा त्याच्याविषयी माझ्या मनात संशय आला होता, त्यांबाबत एकही आरोप त्यांनी त्याच्यावर ठेवला नाही; केवळ त्यांच्या धर्माविषयी व जो जिवंत आहे असे पौल म्हणतो असा कोणी मृत झालेला येशू, ह्याच्याविषयी ह्याचा व त्यांचा वाद होता.

प्रेषितांची कृत्ये 25:13-19 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

काही दिवसांनंतर राजा अग्रिप्पा व बर्णीका ही दोघे कैसरियास येऊन फेस्तला भेटली. तेथे ती दोघे पुष्कळ दिवस राहिली. तेव्हा फेस्तने राजापुढे पौलाचे प्रकरण काढून म्हटले, “फेलिक्सने बंदीत ठेवलेला एक माणूस येथे आहे. मी यरुशलेमला गेलो होतो, तेव्हा त्याच्यावर यहुदी लोकांच्या मुख्य याजकांनी व वडीलजनांनी फिर्याद करून त्याला शिक्षा करावी अशी विनंती केली. त्यांना मी उत्तर दिले की, आरोपी व वादी हे समोरासमोर येऊन आरोपाविषयी प्रत्युत्तर देण्याची संधी आरोपीला मिळण्यापूर्वी कोणालाही शिक्षेकरता सोपवून देण्याची रोमन लोकांची रीत नाही. म्हणून ते तेथे आल्यावर काही उशीर न करता दुसऱ्या दिवशी न्यायासनावर बसून मी त्या माणसाला आणावयाचा हुकूम केला. वादी उभे असता ज्या दुष्ट गुन्ह्यांचा त्याच्याविषयी माझ्या मनात संशय आला होता, त्याबाबत एकही आरोप त्यांनी त्याच्यावर ठेवला नाही. केवळ त्यांच्या धर्माविषयी व जो जिवंत आहे म्हणून पौल म्हणतो असा कोणी मृत झालेला येशू, ह्याच्याविषयी त्यांचा व पौलाचा वाद होता.