प्रेषितांची कृत्ये 24:17-27
प्रेषितांची कृत्ये 24:17-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी पुष्कळ वर्षांनी आपल्या लोकांस दानधर्म करण्यास व यज्ञार्पणे वाहण्यास आलो. शुद्धीकरणाच्या विधीत मी व्रतस्थ असा परमेश्वराच्या भवनात आढळलो, माझ्याबरोबर लोकांचा घोळका नव्हता किंवा दंगा होत नव्हता; पण तेथे आशिया प्रांतातले कित्येक यहूदी होते. त्यांचे माझ्याविरूद्ध काही असते तर त्यांनी आपणा पूढे येऊन माझ्यावर दोषारोप करायचा होता. किंवा मी न्यायसभेपूढे उभा राहीलो असता माझा कोणता अपराध ह्यांना दिसून आला ते ह्यांनी तरी सांगावे; ह्यांच्यामध्ये उभे राहून, मरण पावलेल्यांचा पुनरुत्थानाविषयी माझा न्याय आज तुमच्यापुढे होत आहे, हे शब्द मी मोठ्याने बोललो, हा एवढा उद्गार अपराध असला तर असेल.” फेलिक्सास त्या मार्गाची चांगली माहीती असल्यामुळे त्याने खटला तहकूब करून म्हटले, “लुसीयाचा सरदार येईल तेव्हा तुमच्या प्रकरणाचा निकाल करीन.” आणि त्याने शताधिपतीला हुकुम केला की, ह्याला पहाऱ्यात ठेवावे; तरी ह्याला मोकळीक असावी आणि ह्याच्या स्वकीयांना याची सेवा करण्यास मनाई नसावी. मग काही दिवसानंतर फेलिक्स आपली यहूदी पत्नी द्रुसिल्ला हिच्यासह आला व त्याने पौलाला बोलावून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याच्यापासून ऐकून घेतले. तेव्हा नीतिमत्त्व, इंद्रियदमन व पुढे होणारा न्याय ह्यांविषयी तो भाषण करत असता, फेलिक्साने भयभीत होऊन म्हटले, “आता जा, संधी सापडली म्हणजे तुला बोलावीन.” आणखी आपणास पौलाकडून पैसे मिळतील अशी आशाही त्यास होती, म्हणून तो त्यास पुनःपुन्हा बोलावून घेवून त्याच्याबरोबर संभाषण करत असे. पुढे दोन वर्षांनंतर फेलिक्साच्या जागेवर पुर्क्य फेस्त हा आला; तेव्हा यहूद्यांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेलिक्स पौलाला कैदेतच ठेवून गेला.
प्रेषितांची कृत्ये 24:17-27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“अनेक वर्षे बाहेर राहिल्यानंतर, मी गरीब लोकांना साहाय्य करण्यासाठी देणग्या व अर्पण वाहण्यासाठी यरुशलेमला परतलो. यांनी मला मंदिराच्या अंगणात शुद्धीकरणाचा विधी पूर्ण करताना पाहिले. तिथे माझ्याभोवती जमाव नव्हता आणि मी कोणत्याही गोंधळात सहभागी झालो नव्हतो. परंतु आशिया प्रांतातील काही यहूदीयांची माझ्याविरुद्ध काही तक्रार असेल तर त्यांनी येथे हजर राहणे आवश्यक होते. येथे प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या या लोकांना विचारा की त्यांच्या न्यायसभेपुढे मी उभा होतो तेव्हा त्यांना मजमध्ये कोणता अपराध आढळून आला, ही केवळ एक गोष्ट सोडून मी त्यांच्यासमोर उच्च आवाजाने ओरडलो: ‘मृतांचे पुनरुत्थान यामुळे मी आज आपणापुढे चौकशीसाठी उभा आहे.’ ” फेलिक्सला या मार्गाबद्दल चांगली माहिती होती, त्याने सुनावणी तात्पुरती थांबविली. “जेव्हा सेनापती लुसिया येईल, तेव्हा आपण या प्रकरणाचा निकाल लावू,” असे त्याने म्हटले. त्याने शताधिपतीला हुकूम केला की, पौलावर पहारा ठेवावे परंतु त्याला थोडीफार स्वतंत्रता दिली जावी आणि त्याच्या मित्रांना त्याची सेवा करण्याची अधिकृत परवानगी द्यावी. मग काही दिवसानंतर आपली यहूदी पत्नी द्रुसिल्लासह फेलिक्स आला. पौलाला बोलविल्यानंतर तो येशू ख्रिस्तावरील विश्वासासंबंधी जे बोलला ते त्यांनी ऐकले. तो जेव्हा नीतिमत्व, इंद्रियदमन आणि भावी न्याय या गोष्टीसंबंधाने बोलत होता, तेव्हा फेलिक्स भयभीत झाला आणि म्हणाला, “आतासाठी हे पुरे आहे! तू जाऊ शकतोस. मला पुढे अधिक सवड लाभली, तर मी तुला पुन्हा बोलावेन.” त्याचवेळेस त्याने अशीही आशा बाळगली होती की पौल त्याला लाच देईल आणि म्हणून तो त्याला वारंवार बोलावून घेत होता व त्याच्याबरोबर बोलणे करीत होता. दोन वर्षे निघून गेल्यानंतर, पुढे पुर्क्य फेस्त हा राज्यपाल म्हणून फेलिक्सच्या जागेवर आला. परंतु फेलिक्सला यहूदीयावर कृपादृष्टी दाखवायची होती म्हणून तो पौलाला कैदेतच ठेऊन निघून गेला.
प्रेषितांची कृत्ये 24:17-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी पुष्कळ वर्षांनी आपल्या लोकांना दानधर्म करण्यास व यज्ञार्पणे वाहण्यास आलो. हे करत असता मी व्रतस्थ असा मंदिरात आढळलो. माझ्याबरोबर लोकांचा घोळका नव्हता किंवा दंगा होत नव्हता; पण तेथे आशिया प्रांतातले कित्येक यहूदी होते; त्यांचे माझ्याविरुद्ध काही असते तर त्यांनी आपणापुढे येऊन माझ्यावर दोषारोप करायचा होता; किंवा मी न्यायसभेपुढे उभा राहिलो असता माझा कोणता अपराध ह्यांना दिसून आला ते ह्यांनी तरी सांगावे. त्यांच्यामध्ये उभे राहून, ‘मेलेल्यांच्या पुनरुत्थानाविषयी माझा न्याय आज तुमच्यापुढे होत आहे,’ हे शब्द मी मोठ्याने बोललो; हा एवढा उद्गार अपराध असला तर असेल.” फेलिक्साला त्या मार्गाची चांगली माहिती असल्यामुळे त्याने खटला तहकूब करून म्हटले, “लुसिया सरदार येईल तेव्हा तुमच्या प्रकरणाचा निकाल करीन.” आणि त्याने शताधिपतीला हुकूम केला की, “ह्याला पहार्यात ठेवावे; तरी ह्याला मोकळीक असावी आणि ह्याच्या स्वकीयांना ह्याची सेवा करण्यास मनाई नसावी.” मग काही दिवसांनंतर फेलिक्स आपली यहूदी पत्नी द्रुसिल्ला हिच्यासह आला, व त्याने पौलाला बोलावून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याच्यापासून ऐकून घेतले. तेव्हा नीतिमत्त्व, इंद्रियदमन व पुढे होणारा न्याय ह्यांविषयी तो भाषण करत असता, फेलिक्साने भयभीत होऊन म्हटले, “आता जा; संधी सापडली म्हणजे तुला बोलावीन.” आणखी आपणास पौलाला सोडण्यासाठी त्याच्याकडून द्रव्य मिळेल अशी आशाही त्याला होती. म्हणून तो त्याला पुनःपुन्हा बोलावून घेऊन त्याच्याबरोबर संभाषण करत असे. पुढे दोन वर्षांनंतर फेलिक्साच्या जागेवर पुर्क्य फेस्त हा आला; तेव्हा यहूद्यांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेलिक्स पौलाला कैदेतच ठेवून गेला.
प्रेषितांची कृत्ये 24:17-27 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मी काही वर्षांनी माझ्या स्वतःच्या लोकांना दानधर्म व त्यांच्यासाठी यज्ञार्पणे करण्यास आलो. हे करत असता मी व्रतस्थ असा मंदिरात होतो. माझ्याबरोबर लोकांचा घोळका नव्हता किंवा दंगा होत नव्हता, पण तेथे आशिया प्रांतातले कित्येक यहुदी होते, माझ्याविरुद्ध काही असते, तर त्यांनी आपणापुढे येऊन माझ्यावर दोषारोप करावयाचा होता. किंवा मी न्यायसभेपुढे उभा राहिलो असता, माझा कोणता अपराध ह्यांना दिसून आला ते तरी ह्यांनी सांगावे. ह्यांच्यामध्ये उभे राहून, ‘मेलेल्यांच्या पुनरुत्थानाविषयी माझा न्याय आज तुमच्यापुढे होत आहे’, हे शब्द मी मोठ्याने बोललो, हा एवढा माझा अपराध असला तर असो.” परंतु फेलिक्सला प्रभुमार्गाची चांगली माहिती असल्यामुळे त्याने खटला तहकूब करून म्हटले, “लुसिया सहस्त्राधिपती येईल, तेव्हा मी तुमच्या खटल्याविषयी निर्णय देईन.” त्याने शताधिपतीला हुकूम केला, “पौलाला पहाऱ्यात ठेवावे, तरी ह्याला मोकळीक असावी आणि ह्याच्या स्वकीयांना ह्याची सेवा करण्यास मनाई नसावी.” काही दिवसांनंतर फेलिक्स आपली यहुदी पत्नी द्रुसिल्ला हिच्यासह आला व त्याने पौलाला बोलावून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याच्याकडून ऐकून घेतले. तेव्हा नीतिमत्व, इंद्रियदमन व पुढे होणारा न्याय ह्यांविषयी पौल भाषण करत असता फेलिक्सने भयभीत होऊन म्हटले, “सध्या जा. संधी सापडली म्हणजे तुला परत बोलावीन.” शिवाय आपणास पौलाकडून पैसा मिळेल अशी आशाही त्याला होती म्हणून तो त्याला पुन्हा पुन्हा बोलावून घेऊन त्याच्याबरोबर संभाषण करत असे. पुढे दोन वर्षांनंतर फेलिक्सच्या जागेवर पुर्क्य फेस्त ह्याची नेमणूक झाली. तेव्हा यहुदी लोकांची मर्जी राखण्यासाठी फेलिक्स पौलाला कैदेतच ठेवून गेला.