प्रेषितांची कृत्ये 2:1-47
प्रेषितांची कृत्ये 2:1-47 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना. अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला, व ज्या घरात ते वसले होते ते सर्व त्याने भरले. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीभांसारख्या जीभा त्यांना दिसल्या, व प्रत्येकावर त्या एकएक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली, तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले. त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहूदी यरूशलेम शहरात राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपआपल्या भाषेत बोलताना ऐकले. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन; म्हणाले, “पाहा, हे बोलणारे सर्व गालील प्रांतातील ना? तर आपण प्रत्येकजण आपआपली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पार्थी, मेदी, एलामी, मेसोपटेम्या, यहूदीया, कप्पदुकिया, पंत, आशिया, फ्रुगिया, पंफुलिया, मिसर व कुरणेच्या जवळचा लिबुवा देश ह्यात राहणारे, यहूदी व यहूदीयमतानूसारी असे रोमन प्रवासी, क्रेतीय, अरब, असे आपण त्यांना आपआपल्या भाषांत देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो.” तेव्हा ते सर्व विस्मित होऊन; व गोंधळून जाऊन एकमेकांस म्हणाले, “हे काय असेल?” परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, “हे नवीन द्राक्षरसाने मस्त झाले आहेत.” तेव्हा पेत्र अकरा प्रेषितांबरोबर उभा राहून, त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहूदी लोकांनो व यरूशलेम शहरातील रहिवाश्यांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. तुम्हास वाटते हे मस्त झाले आहेत, पण असे नाही कारण सकाळचे नऊ वाजले आहेत. परंतु योएल संदेष्ट्याने जे सांगितले होते ते हे आहे: देव म्हणतो, “शेवटच्या दिवसात असे होईल, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. तुमच्या तरूणांस दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील. आणखी त्या दिवसात मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, म्हणजे ते संदेश देतील. आणि वर आकाशात अद्भूते व खाली पृथ्वीवर चिन्हे, म्हणजे रक्त, अग्नी व धूम्ररूप वाफ अशी मी दाखवीन. परमेश्वराचा महान व प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराच्या नावाने त्याचा धावा करील तो तरेल.” “अहो इस्राएल लोकांनो, या गोष्टी ऐका: नासोरी येशूच्या द्वारे देवाने जी महत्कृत्ये, अद्भूते व चिन्हे तुम्हास दाखविली त्यावरून देवाने तुम्हाकरिता मान्यता दिलेला असा तो मनुष्य होता, याची तुम्हास माहिती आहे. तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर, तुम्ही त्यास धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले; त्यास देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले, कारण त्यास मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते. दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो, ‘मी परमेश्वरास आपणापुढे नित्य पाहिले आहे; मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे. म्हणून माझे हृदय आनंदित व माझी जीभ उल्लसित झालीच आणखी माझा देह ही आशेवर राहील. कारण तू माझा जीव मृतलोकात राहू देणार नाहीस, व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहेत; ते आपल्या समक्षतेने मला हर्षभरीत करशील.’” “बंधुजनहो, कुलाधिपति दावीद: ह्याच्याविषयी मी तुम्हाबरोबर प्रशस्तपणे बोलतो तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये आहे. तो संदेष्टा होता, आणि त्यास ठाऊक होते की देवाने त्यास अभिवचन दिले की तुझ्या संतानातील एकाला तुझ्या राजासनावर बसवीन. ह्याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या: पुनरुत्थानाविषयी असे बोलला की, त्यास मृतलोकात सोडून दिले नाही, व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही. त्या येशूला देवाने उठवले, ह्याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत. म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसविलेला आहे त्यास पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे, आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे. कारण दावीद राजा स्वर्गास चढून गेला नाही, पण तो स्वतः म्हणतो, ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की, मी तुझ्या शत्रूचे तुझे पादासन करेपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’” “म्हणून, इस्राएलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्यास देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे.” हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, “बंधुजनहो, आम्ही काय करावे?” पेत्र त्यांना म्हणाला, “पश्चात्ताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी, म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हास पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण हे वचन तुम्हास तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत, त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलावील तितक्यांना दिले आहे.” आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यास साक्ष दिली व बोध करून; म्हटले, “या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या.” तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला, आणि त्यादिवशी त्यांच्यांत सुमारे तीन हजार मनुष्यांची भर पडली. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यांत व प्रार्थना करण्यांत तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्यास भय वाटले, आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भूत कृत्ये व चिन्हे घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्वकाही सामाईक होते, ते आपआपली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे, तसतसे सर्वांना वांटून देत असत. ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने परमेश्वराच्या भवनात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवत; सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत, असलेल्या मनुष्यांची दररोज मंडळीत भर घालीत असे.
प्रेषितांची कृत्ये 2:1-47 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा पेंटेकॉस्टचा दिवस आला, त्यावेळी ते सर्व एका ठिकाणी जमले होते. एकाएकी स्वर्गातून प्रचंड सोसाट्याच्या वार्यासारखा आवाज आला आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व घर त्याने भरले. त्यावेळी अग्नीच्या जिभांसारख्या दिसणार्या जिभा वेगवेगळ्या होऊन प्रत्येकावर एकएक अशा स्थिरावताना त्यांना दिसल्या. तिथे उपस्थितीत असलेले सगळे जण पवित्र आत्म्याने भरले आणि आत्म्याने हे करण्यास त्यांना समर्थ केल्यामुळे ते वेगवेगळ्या भाषेत बोलू लागले. त्यावेळेस आकाशाखालील प्रत्येक देशामधून आलेले भक्तिमान यहूदी यरुशलेममध्ये राहत होते. जेव्हा त्यांनी तो मोठा आवाज ऐकला, तेव्हा त्या ठिकाणी लोकांची मोठी गर्दी जमली आणि ते गोंधळून गेले, कारण प्रत्येकाने स्वतःची मातृभाषा बोलली जात असलेली ऐकले. विस्मित होऊन त्यांनी विचारले: “हे सर्व बोलत आहेत ते गालीलकर आहेत ना? तरीसुद्धा ते आमच्या मातृभाषांमध्ये बोलताना आम्ही ऐकत आहोत हे कसे? आम्ही येथे पार्थी, मेदिया आणि एलामी लोक आहोत; मेसोपोटामिया रहिवासी, यहूदीया आणि कप्पदुकिया, पंत आणि आशिया, फ्रुगिया आणि पंफुल्या, इजिप्त व कुरणेच्या जवळचा लिबिया; रोमहून आलेले पाहुणे यहूदी व धर्मांतर झालेले यहूदी; क्रेतीय व अरब लोक हे देखील आमच्यात आहेत. तरी देखील परमेश्वराच्या अद्भुत कृत्यांबद्दल आमच्या भाषेमध्ये बोलताना ऐकत आहोत!” ते चकित झाले व गोंधळून एकमेकांना विचारू लागले, “याचा अर्थ काय असेल?” पण काहीजण थट्टा करीत म्हणाले, “हे द्राक्षारसाचे अति सेवन करून मस्त झाले आहे.” त्यावेळी पेत्र अकरा प्रेषितांसह उभा राहून, त्या जमावाला उद्देशून मोठ्याने म्हणाला: “यरुशलेममधील यहूदी बंधूंनो आणि रहिवाशांनो, तुम्हाला या गोष्टी स्पष्ट समजणे आवश्यक आहे; म्हणून माझे बोलणे लक्षपूर्वक ऐका. तुम्ही समजता त्याप्रमाणे ही माणसे द्राक्षारसाने मस्त झालेली नाहीत. आता तर सकाळचे फक्त नऊ वाजले आहेत! तर पाहा याविषयी संदेष्टा योएलने असे भविष्य केले होते: “ ‘परमेश्वर म्हणतात, शेवटच्या दिवसात, मी माझा आत्मा सर्व लोकांवर ओतेन. तुमचे पुत्र व तुमच्या कन्या भविष्यवाणी करतील, व तुमचे वृद्ध स्वप्ने पाहतील, तुमचे तरुण दृष्टान्त पाहतील. माझ्या दासांवर म्हणजेच, स्त्री आणि पुरुष दोघांवरही, त्या दिवसांत मी माझा आत्मा ओतेन. आणि ते भविष्यवाणी करतील. वर आकाशात व खाली पृथ्वीवर, रक्त व अग्नी व धुरांचे स्तंभ अशी विलक्षण चिन्हे मी दाखवेन. प्रभूचा महान व गौरवी दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. आणि जो कोणी प्रभूच्या नावाने त्यांचा धावा करेल तोच वाचेल.’ “अहो इस्राएली लोकहो! आता हे लक्ष देऊन ऐका: तुम्हाला चांगलेच माहीत आहे की, परमेश्वराने नासरेथकर येशूंना अधिकृत मान्यता देऊन त्यांच्याद्वारे तुमच्यामध्ये चमत्कार, अद्भुत गोष्टी व चिन्हे केली. परमेश्वराच्या पूर्वनियोजित योजनेप्रमाणे व त्यांच्या पूर्वज्ञानानुसार या मनुष्यास तुमच्या हातात सोपवून दिले आणि तुम्ही दुष्ट लोकांच्या मदतीने, त्यांना क्रूसावर खिळे ठोकून जिवे मारले. परंतु परमेश्वराने त्यांची मृत्यूच्या वेदनांपासून सुटका केली व त्यांना मरणातून पुन्हा उठविले, कारण मृत्यूला येशूंवर अधिकार चालविणे अशक्य होते. दावीद राजा त्यांच्यासंबंधी म्हणतो: “ ‘मी माझ्या प्रभूला नित्य दृष्टीसमोर ठेवले आहे. कारण ते माझ्या उजवीकडे आहेत, मी डळमळणार नाही. यास्तव माझे अंतःकरण उल्हासित आहे आणि माझी जीभ स्तुतिगान करीत आहे; माझे शरीर देखील आशेत विसावा घेईल, कारण तुम्ही मला अधोलोकात राहू देणार नाही, किंवा तुमच्या पवित्रजनाला कुजणे पाहू देणार नाही. तुम्ही मला जीवनाचे मार्ग कळविले आहेत; तुमच्या समक्षतेत तुम्ही मला हर्षाने भराल.’ “प्रिय यहूदी बंधूंनो, मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो की, आपला पूर्वज दावीद मरण पावला आणि त्याला पुरले व त्याची कबर आज देखील येथे आहे. परंतु तो संदेष्टा होता व त्याला माहीत होते की परमेश्वराने त्याला शपथ वाहून असे अभिवचन दिले होते, त्याच्या वंशजांपैकी एकाला ते त्याच्या सिंहासनावर बसवतील. पुढे होणार्या गोष्टी पाहता, तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल बोलला, की त्यांना अधोलोकात राहू दिले नाही किंवा त्यांच्या देहाला कुजणे पाहू दिले नाही. त्याच येशूंना परमेश्वराने मरणातून उठवून जिवंत केले आणि त्याचे आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत. आता ते परमेश्वराच्या उजवीकडे उच्च पदावर आहेत, अभिवचन दिल्याप्रमाणे त्यांनी तो पवित्र आत्मा पित्याकडून घेऊन आम्हावर ओतला आहे, त्याचाच हा परिणाम जे तुम्ही आता पाहात आणि ऐकत आहात. कारण दावीद आकाशात चढून गेला नाही, तरी तो म्हणाला, “ ‘प्रभू माझ्या प्रभूला म्हणाले: “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत माझ्या उजव्या हाताला बसून राहा.” ’ “यास्तव इस्राएलातील सर्वजणांनी खात्री करून घ्यावीः ज्या येशूंना तुम्ही क्रूसावर दिले होते, त्यांना परमेश्वराने प्रभू आणि ख्रिस्त केले आहे.” हे त्याचे बोलणे लोकांच्या अंतःकरणाला भेदले आणि ते पेत्राला व इतर प्रेषितांना म्हणाले, “बंधुजनहो, आता आम्ही काय करावे?” पेत्राने उत्तर दिले, “पश्चात्ताप करा आणि तुमच्या पापांच्या क्षमेसाठी येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्यावा आणि तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. हे वचन तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलाबाळांसाठी आणि सर्वांसाठी जे फार दूर आहेत आणि ज्यांना प्रभू आमचे परमेश्वर बोलावतील त्यांच्यासाठी आहे.” आणखी त्याने पुष्कळ शब्दांनी त्यांना इशारा दिला आणि विनवणी करून म्हटले, “या भ्रष्ट पिढीपासून तुम्ही स्वतःला वाचवा.” ज्यांनी हा त्यांचा संदेश ग्रहण केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी सुमारे तीन हजार लोकांची त्यांच्या संख्येत भर पडली. प्रेषितांद्वारे दिले जात असलेले शिक्षण आणि सहभागिता, भाकर मोडणे आणि प्रार्थना यासाठी ते स्वतः समर्पित झाले. प्रेषितांद्वारे झालेली अनेक अद्भुते व चिन्हे पाहून सर्वांच्या मनामध्ये भीतियुक्त आदर निर्माण झाला होता. तेव्हा सर्व विश्वासणारे एकत्र होते आणि त्यांच्याजवळ असलेले सर्वकाही समाईक होते. जे कोणी गरजवंत होते, त्यांना देण्यासाठी त्यांनी त्यांच्या जमिनी आणि मालमत्ता विकल्या. दररोज मंदिराच्या अंगणात ते एकत्र जमत होते आणि त्यांच्या घरांमध्ये भाकर मोडीत असत आणि मोठ्या आनंदाने व कृतज्ञ मनाने एकत्र खात होते, परमेश्वराची स्तुती करीत होते आणि सर्व लोकांकडून त्यांना चांगली वागणूक मिळाल्याचा आनंद ते करीत होते आणि प्रभूने त्यांच्या संख्येत प्रत्येक दिवशी तारण पावलेल्यांची भर घातली.
प्रेषितांची कृत्ये 2:1-47 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आल्यावर ते सर्व एकत्र जमले होते. तेव्हा अकस्मात मोठ्या वार्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एकेक अशा बसल्या. तेव्हा ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले. त्या वेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहूदी यरुशलेमेत राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला; कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, “पाहा, हे बोलणारे सर्व गालीली ना? तर आपण प्रत्येक जण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पार्थी, मेदी, एलामी, मेसोपटेम्या, यहूदीया, कप्पदुकिया, पंत, आसिया, फ्रुगिया, पंफूलिया, मिसर व कुरणेच्या जवळचा लिबुवा देश ह्यांत राहणारे, यहूदी व यहूदीयमतानुसारी असे रोमी प्रवासी, क्रेतीय, अरब, असे आपण त्यांना आपापल्या भाषांत देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो.” तेव्हा ते सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकांना म्हणाले, “हे काय असेल?” परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, “हे द्राक्षारसाने मस्त झाले आहेत.” तेव्हा पेत्र अकरा प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, “अहो यहूदी लोकांनो व यरुशलेमेतील रहिवाशांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. तुम्हांला वाटते तसे हे मस्त झाले नाहीत; कारण हा दिवसाचा पहिला प्रहर आहे; परंतु योएल संदेष्ट्याने जे सांगितले होते ते हे आहे : ‘देव म्हणतो, शेवटल्या दिवसांत असे होईल की, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणांना दृष्टान्त होतील, व तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील; आणखी त्या दिवसांत मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन;’ म्हणजे ते संदेश देतील; ‘आणि’ वर ‘आकाशात अद्भुते, व’ खाली ‘पृथ्वीवर’ चिन्हे, ‘म्हणजे रक्त, अग्नी व धूम्ररूप वाफ अशी मी दाखवीन; परमेश्वराचा महान व प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल; तेव्हा असे होईल की, जो कोणी परमेश्वराच्या नावाने त्याचा धावा करील तो तरेल.’ अहो इस्राएल लोकांनो, ह्या गोष्टी ऐका; नासोरी येशूच्या द्वारे देवाने जी महत्कृत्ये, अद्भुते व चिन्हे तुम्हांला दाखवली त्यांवरून देवाने तुमच्याकरता पाठवलेला असा तो मनुष्य होता, ह्याची तुम्हांला माहिती आहे. तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले. त्याला देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले; कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते. दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो, ‘मी परमेश्वराला आपणापुढे नित्य पाहिले आहे; मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे; म्हणून माझे हृदय आनंदित व माझी जीभ उल्लसित झाली; आणि माझा देहही आशेवर राहील. कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. जीवनाचे मार्ग तू मला कळवले आहेत; तू आपल्या समक्षतेने मला हर्षभरित करशील.’ बंधुजनहो, कुलाधिपती दावीद ह्याच्याविषयी मी तुमच्याबरोबर प्रशस्तपणे बोलतो. तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये आहे. तो संदेष्टा होता आणि त्याला ठाऊक होते की, देव ‘शपथ वाहून त्याला म्हणाला, देहाप्रमाणे तुझ्या संतानांतील एकाला (म्हणजे ख्रिस्ताला) तुझ्या राजासनावर बसवण्यासाठी मी उठवीन.’ ह्याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थाना-विषयी असे बोलला की, ‘त्याला अधोलोकात सोडून दिले नाही’ व त्याच्या देहाला ‘कुजण्याचा अनुभव आला नाही.’ त्या येशूला देवाने उठवले ह्याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत. म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसवलेला आहे, त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे. कारण दावीद स्वर्गास चढून गेला नाही; पण तो स्वत: म्हणतो, ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की, मी तुझ्या शत्रूंचे तुझ्या पायांसाठी आसन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’ म्हणून इस्राएलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे.” हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, “बंधुजनहो, आम्ही काय करावे?” पेत्र त्यांना म्हणाला, “पश्चात्ताप करा व तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या; म्हणजे तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण हे वचन तुम्हांला, तुमच्या मुलाबाळांना व ‘जे दूर आहेत त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना परमेश्वर’ आपला देव ‘स्वतःकडे बोलावील तितक्यांना’ दिले आहे.” आणखी त्याने दुसर्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांना साक्ष दिली व बोध करून म्हटले, “ह्या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या.” तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला; आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे तीन हजार माणसांची भर पडली. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले; आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्वकाही समाईक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असत. ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुती करत हर्षाने व सालस मनाने जेवत असत. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात (मंडळीत) भर घालत असे.
प्रेषितांची कृत्ये 2:1-47 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला, तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना, अकस्मात आकाशातून सोसाट्याच्या वाऱ्यासारखा आवाज झाला व ज्या घरात ते बसले होते ते घर त्या आवाजाने भरले. नंतर अग्नीसारख्या निरनिराळ्या जिभा त्यांना दिसल्या व त्या प्रत्येकावर एक एक अशा स्थिरावल्या. ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली, तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले. त्या वेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातून आलेले यहुदी लोक यरुशलेममध्ये राहत होते. तो ध्वनी ऐकल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन भांबावून गेला कारण प्रत्येकाने आपापल्या भाषेत त्यांना बोलताना ऐकले. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, “पाहा, हे अशा प्रकारे बोलणारे सर्व गालीलकर ना? तर आपण प्रत्येक जण आपापली भाषा ऐकतो हे कसे? आपण पार्थी, मेदी, एलामी, मेसोपटेम्या, यहुदिया, कप्पुदुकिया, पंत, आसिया, फ्रुगिया, पंफूलिया, मिसर व कुरणेजवळील लिबुवा अशा विविध प्रदेशांतले आहोत. आपणांपैकी काही लोक मूळचे यहुदी व इतर काही धर्मांतरित यहुदी असे रोमन आहेत. तसेच इतर काही लोक क्रेती व अरब आहेत. असे असतानाही आपण त्यांना आपापल्या भाषांत देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो.” ते सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकांना विचारू लागले, “हे काय असेल?” परंतु दुसरे कित्येक चेष्टा करत म्हणाले, “हे नव्या द्राक्षारसाने मस्त झाले आहेत.” पेत्र अकरा प्रेषितांबरोबर उभा राहून लोकसमुदायास आवेशाने म्हणाला, “अहो यहुदी लोकांनो व यरुशलेमेतील रहिवाश्यांनो, माझे बोलणे लक्षपूर्वक ऐकून घ्या. त्याचा अर्थ समजून घ्या. तुम्हांला वाटते त्याप्रमाणे हे लोक नशेने धुंद झाले नाहीत. ही तर सकाळची नऊची वेळ आहे, उलट, योएल संदेष्ट्याने जे सांगितले होते, ते हे आहे: देव म्हणतो, ‘शेवटच्या दिवसांत असे होईल की, मी मनुष्यमात्रावर माझ्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या माझा संदेश घोषित करतील, तुमच्या तरुणांना दृष्टान्त होतील व तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील, आणखी त्या दिवसांत मी माझ्या सेवक व सेविकांवर माझ्या आत्म्याचा वर्षाव करीन, म्हणजे तेदेखील माझा संदेश देऊ लागतील. मी वर आकाशात चमत्कार व खाली पृथ्वीवर अद्भूत कृत्ये करीन. म्हणजेच मी रक्त, अग्नी व धुरासारखे धुके ही चिन्हे दाखवीन, परमेश्वराचा महान व वैभवशाली दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय होईल व चंद्र रक्तमय होईल, आणि त्या वेळी जो कोणी परमेश्वराचा धावा करील त्याचा बचाव होईल.’ अहो इस्राएली लोकांनो, ह्या गोष्टी ऐका. नासरेथकर येशूच्याद्वारे देवाची जी महत्कृत्ये, चमत्कार व चिन्हे तुम्हांला पाहायला मिळाली त्यांवरून तो असा मनुष्य होता, त्याचा दैवी अधिकार स्वतः देवाने तुम्हांला सिद्ध करून दाखविला. तो देवाच्या निश्चित योजनेनुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला पापी लोकांद्वारे क्रुसावर चढवून मारले, परंतु त्याला देवाने मरणातून सोडवून उठविले कारण त्याला मरणाच्या सत्तेखाली राहणे अशक्य होते. दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो: मी प्रभूला आपणापुढे नित्य पाहिले आहे, मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे, माझे हृदय आनंदाने भरून गेले आहे व माझी जीभ उल्हसित झाली आहे तसेच मी जरी मर्त्य असलो, तरीही आशेवर विसंबून राहीन, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, आपल्या पवित्र सेवकाला तू कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहेत आणि तुझा सहवास मला आनंदाने भरून टाकील. बंधुजनहो, आपल्या कुलाधिपती दावीदविषयी मी तुमच्याबरोबर उघडपणे बोलतो. तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत इथे आपल्यामध्ये आहे. तो संदेष्टा होता आणि त्याला ठाऊक होते की, देव शपथ वाहून त्याला म्हणाला, ‘तुझ्या संतानांतील एकाला मी तुझ्या राजासनावर बसवीन.’ ह्याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी असे बोलला की, ‘त्याला अधोलोकात सोडून दिले नाही व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही.’ ह्या येशूला देवाने उठविले, ह्याविषयी आम्ही सर्व साक्षीदार आहोत. देवाच्या उजव्या हाताकडे त्याला उच्चस्थान देण्यात आले आहे, पित्याने वचन दिल्याप्रमाणे त्याला पवित्र आत्मा मिळाला असून तुम्ही जे पाहता व ऐकता तो त्याच दानाचा त्याने आमच्यावर केलेला वर्षाव आहे. कारण दावीद स्वर्गात चढून गेला नाही, पण तो स्वतः म्हणतो: परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, ‘मी तुझे वैरी तुझ्या पायांसाठी आसन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’ म्हणून इस्त्राएलच्या सर्व घराण्यांनी हे ठामपणे समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही क्रुसावर चढवून मारलेत, त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे संबोधले आहे!” हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली, ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, “बंधुजनहो, तर आम्ही काय करावे?” पेत्र त्यांना म्हणाला, “पश्चात्ताप करा व तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या म्हणजे तुमच्या पापांची तुम्हांला क्षमा मिळेल आणि तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण देवाचे वचन तुम्हांला, तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना आपला प्रभू परमेश्वर स्वतःकडे बोलावितो तितक्यांना दिले आहे.” आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांना आर्जवून म्हटले, “ह्या भ्रष्ट पिढीला होणाऱ्या शिक्षेपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या!” त्या वेळी त्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला व त्यांना बाप्तिस्मा देण्यात आला. त्या दिवशी त्यांच्यात सुमारे तीन हजार माणसांची भर पडली. ते प्रेषितांच्या शिक्षणात व सहभागितेत, भाकर मोडण्यात आणि प्रार्थना करण्यात वेळ व्यतीत करीत असत. प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भूत कृत्ये व चिन्हे घडत होती म्हणून प्रत्येक मनुष्याला आदरयुक्त भय वाटत होते. विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामाईक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे, तसतशी सर्वांना वाटून देत असत. ते दररोज मंदिरात एकत्र जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि आनंदी व विनम्र वृत्तीने अन्न खात असत. देवाची स्तुती करीत सर्व लोकांच्या सद्भावना त्यांच्या पाठीशी असत. तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची भर प्रभू दररोज त्यांच्यात घालत असे.