प्रेषितांची कृत्ये 17:1-15
प्रेषितांची कृत्ये 17:1-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर ते अंफिपुली व अपुल्लोनिया या शहरांच्यामधून जाऊन थेस्सलनीकास शहरास गेले, तेथे यहूद्यांचे सभास्थान होते. तेथे पौलाने आपल्या परिपाठाप्रमाणे त्याच्याकडे जाऊन तीन शब्बाथ त्यांच्याबरोबर शास्त्रलेखावरून वादविवाद केला. त्यांने शास्त्रलेखाचा उलगडा करून असे प्रतिपादन केले की, ख्रिस्ताने दुःख सोसावे व मरण पावलेल्यांमधून पुन्हा उठावे ह्याचे अगत्य होते आणि ज्या येशूची मी तुमच्यापुढे घोषणा करीत आहे तोच तो ख्रिस्त आहे. तेव्हा त्याच्यापैकी काही जणांची खातरी होऊन पौल सीला ह्यांना येऊन मिळाले; आणि ग्रीक उपासक ह्यांचा मोठा समुदाय त्यांना मिळाला, त्यामध्ये प्रमुख स्त्रिया काही थोड्या थोडक्या नव्हत्या. परंतु यहूद्यांनी हेव्याने आपणाबरोबर बाजारचे काही गुंड लोक घेऊन व घोळका जमवून नगरांत घबराट निर्माण केली आणि यासोनाच्या घरावर हल्ला करून त्यांना लोंकाकडे बाहेर काढून आणण्याची खटपट करून पाहिली. परंतु त्यांचा शोध लागला नाही तेव्हा त्यांनी यासोनाला व कित्येक बंधूना नगराच्या अधिकाऱ्यांकडे ओढीत नेऊन आरडाओरड करीत म्हटले, ज्यांनी जगाची उलटापालट केली ते येथेही आले आहेत. त्यास यासोनाने आपल्या घरात घेतले आहे आणि हे सर्वजण कैसराच्या आज्ञेविरुद्ध वागतात, म्हणजे येशू म्हणून दुसराच कोणी राजा आहे असे म्हणतात. हे ऐकवून त्यांनी लोकांस व शहराच्या अधिकाऱ्यास खवळून सोडले. मग त्यांनी यासोनाचा व इतरांचा जामीन घेऊन त्यांना सोडून दिले. नंतर बंधुजनांनी पौल व सीला ह्यांना लागलेच रातोरात बिरुया शहरास पाठवले, ते तेथे पोहचल्यावर यहूदयांचे सभास्थानात गेले. तेथील लोक थेस्सलनीकातल्या लोंकापेक्षा मोठया मनाचे होते; त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला आणि या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी ते शास्त्रलेखात दररोज शोध करीत गेले. त्यातील अनेकांनी व बऱ्याच प्रतिष्ठित ग्रीक स्त्रिया व पुरूष ह्यांनी विश्वास ठेवला. तरीही पौल देवाचे वचन बिरुयातही सांगत आहे हे थेस्सलनीकांतल्या यहूद्यांना समजले तेव्हा त्यांनी तिकडेही जाऊन लोकांस खवळून चेतविले. त्यावरून बंधुजनांनी पौलाला समुद्राकडे जाण्यास लागलेच पाठवले; आणि सीला व तीमथ्य हे तेथेच राहीले. तेव्हा पौलाला पोहचविणाऱ्यांनी त्यास अथेनैपर्यंत नेले आणि सीला व तीमथ्य ह्यांनी आपणाकडे होईल तितके लवकर यावे अशी त्यांची आज्ञा घेउन ते निघाले.
प्रेषितांची कृत्ये 17:1-15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा पौल व त्याचे सहकारी प्रवास करीत अंफिपुली व अपल्लोनिया या शहरांमधून जात होते तेव्हा ते थेस्सलनीका येथे आले, ज्या ठिकाणी यहूद्यांचे सभागृह होते. आपल्या रीतीप्रमाणे, पौल सभागृहामध्ये गेला आणि लागोपाठ तीन शब्बाथ दिवस त्याने धर्मशास्त्रावरून त्यांच्याशी संवाद केला, त्याने त्यांना स्पष्टीकरण करून पटवून दिले की, ख्रिस्ताने दुःख सोसावे व मेलेल्यामधून पुन्हा उठावे याचे अगत्य आहे. तो त्यांना म्हणाला, “या येशूंची मी तुम्हाला घोषणा करीत आहे, तेच ख्रिस्त आहेत.” ऐकणार्यांपैकी काही यहूदीयांची खात्री झाली आणि ती माणसे पौल व सीला यांना येऊन मिळाली. यामध्ये परमेश्वराचे भय धरणार्या ग्रीक लोकांची संख्या मोठी होती आणि त्यात काही प्रमुख स्त्रियाही समाविष्ट होत्या. परंतु इतर यहूदीयांना मत्सर वाटला; म्हणून त्यांनी रस्त्यावरील काही गुंड लोकांना घेऊन शहरात त्यांना दंगल करण्यास चिथावणी दिली. पौल व सीला यांना बाहेर काढून लोकांकडे आणण्यासाठी ते त्यांना शोधीत यासोनाच्या घराकडे धावले. पण ते तिथे नाहीत, असे पाहून त्यांनी यासोन व इतर काही विश्वासणार्यांना ओढून काढले व त्यांना शहर न्यायाधीशांपुढे नेऊन आरडाओरड करून म्हणाले, “या माणसांनी सर्व जगात उलथापालथ केली आहे आणि आता ते येथेही आलेले आहेत; आणि यासोनाने त्यांचे आपल्या घरामध्ये स्वागत केले आहे. हे सर्व कैसराच्या हुकुमाविरुद्ध वागतात आणि म्हणतात की येशू म्हणून कोणी एक दुसरा राजा आहे.” शहरातील अधिकारी व लोकसमुदाय यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांची धांदल उडाली. मग यासोन व इतरांकडून जामीन घेतल्यानंतरच त्यांना जाऊ दिले. रात्र झाल्याबरोबर विश्वासणार्यांनी पौल व सीला यांना बिरुयास पाठविले. तिथे पोहोचल्यावर ते यहूदी सभागृहामध्ये गेले. आता बिरुया येथील यहूदी थेस्सलनीकातील लोकांपेक्षा थोर चरित्राचे होते, त्यांनी संदेश मोठ्या उत्सुकतेने ऐकला पौलाची विधाने खरी आहेत की नाहीत, हे ते प्रतिदिवशी वचनांची तपासणी करून पाहात असत. याचा परिणाम असा झाला की अनेकांनी विश्वास ठेवला, यामध्ये बर्याच संख्येने प्रमुख ग्रीक स्त्रिया व अनेक ग्रीक पुरुष देखील होते. थेस्सलनीकातील यहूद्यांनी पौल बिरुया येथे परमेश्वराच्या वचनाचा प्रचार करीत आहे असे ऐकले, तेव्हा काहीजण तिथे गेले आणि त्यांनी तिथेही समुदायामध्ये चळवळ व खळबळ उडवून दिली. विश्वासणार्यांनी पौलाला ताबडतोब समुद्रकिनारी पाठविले, परंतु सीला व तीमथ्य हे बिरुया येथे राहिले. पौलाबरोबर जे गेले होते त्यांनी त्याला ॲथेन्सला पोहोचविले आणि सीला व तीमथ्य यांनी त्वरा करून त्याला येऊन मिळावे अशी आज्ञा त्यांना केली.
प्रेषितांची कृत्ये 17:1-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर ते अंफिपुली व अपुल्लोनिया ह्यांच्यामधून जाऊन थेस्सलनीकास गेले. तेथे यहूद्यांचे सभास्थान होते. तेथे पौलाने आपल्या परिपाठाप्रमाणे त्यांच्याकडे जाऊन तीन शब्बाथ त्यांच्याबरोबर शास्त्रावरून वादविवाद केला. त्याने शास्त्राचा उलगडा करून असे प्रतिपादन केले की, “ख्रिस्ताने दुःख सोसावे व मेलेल्यांमधून पुन्हा उठावे ह्याचे अगत्य होते, आणि ज्या येशूची मी तुमच्यापुढे घोषणा करत आहे तोच तो ख्रिस्त आहे.” तेव्हा त्यांच्यापैकी काही जणांची खातरी होऊन ते पौल व सीला ह्यांना येऊन मिळाले; आणि भक्तिमान हेल्लेणी ह्यांचा मोठा समुदाय त्यांना मिळाला. त्यात प्रमुख स्त्रिया काही थोड्याथोडक्या नव्हत्या. परंतु ज्या यहूद्यांनी विश्वास ठेवला नाही त्यांनी हेव्याने आपणांबरोबर बाजारचे काही गुंड लोक घेऊन व घोळका जमवून नगरात घबराट निर्माण केली, आणि यासोनाच्या घरावर हल्ला करून त्यांना लोकांकडे बाहेर काढून आणण्याची खटपट करून पाहिली. परंतु त्यांचा शोध लागला नाही तेव्हा त्यांनी यासोनाला व कित्येक बंधूंना नगराच्या अधिकार्यांकडे ओढत नेऊन आरडाओरड करत म्हटले, “ज्यांनी जगाची उलटापालट केली ते येथेही आले आहेत; त्यांना यासोनाने आपल्या घरात घेतले आहे, आणि हे सर्व जण कैसराच्या हुकमांविरुद्ध वागतात, म्हणजे येशू म्हणून दुसराच कोणी राजा आहे असे म्हणतात.” हे ऐकवून त्यांनी लोकांना व शहराच्या अधिकार्यांना खवळवून सोडले. मग त्यांनी यासोनाचा व इतरांचा जामीन घेऊन त्यांना सोडून दिले. नंतर बंधुजनांनी पौल व सीला ह्यांना लगेच रातोरात बिरुयास पाठवले. ते तेथे पोहचल्यावर यहूद्यांच्या सभास्थानात गेले. तेथील लोक थेस्सलनीकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते; त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला, आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करत गेले. त्यांतील अनेकांनी व बर्याच प्रतिष्ठित हेल्लेणी स्त्रिया व पुरुष ह्यांनी विश्वास ठेवला. तरीपण पौल देवाचे वचन बिरुयातही सांगत आहे हे थेस्सलनीकातल्या यहूद्यांना समजले, तेव्हा त्यांनी तिकडेही जाऊन लोकांना खवळवून चेतवले. त्यावरून बंधुजनांनी पौलाला समुद्राकडे जाण्यास लगेच पाठवले; आणि सीला व तीमथ्य हे तेथेच राहिले. तेव्हा पौलाला पोहचवणार्यांनी त्याला अथेनैपर्यंत नेले, आणि सीला व तीमथ्य ह्यांनी आपल्याकडे होईल तितक्या लवकर यावे अशी त्यांची आज्ञा घेऊन ते निघाले.
प्रेषितांची कृत्ये 17:1-15 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
पौल व सीला अंफिपुली व अपुल्लोनिया ह्यांच्यामधून जाऊन थेस्सलनीकास गेले. तेथे यहुदी लोकांचे प्रार्थनामंदिर होते. तेथे पौलाने आपल्या परिपाठाप्रमाणे त्यांच्याकडे जाऊन तीन साबाथ त्यांच्याबरोबर धर्मशास्त्राविषयी वादविवाद केला. त्याने धर्मशास्त्राचा उलगडा करून असे प्रतिपादन केले, “ख्रिस्ताने दुःख सोसावे व मेलेल्यांमधून पुन्हा उठावे ह्याचे अगत्य होते आणि ज्या येशूची मी तुमच्यापुढे घोषणा करीत आहे, तोच तो ख्रिस्त आहे.” तेव्हा त्यांच्यापैकी काही जणांची खातरी होऊन ते पौल व सीला ह्यांना येऊन मिळाले. तसेच ग्रीक लोकांचा मोठा समुदाय त्यांना मिळाला. त्यांत प्रमुख स्त्रिया काही थोड्याथोडक्या नव्हत्या. परंतु यहुदी लोकांनी हेव्याने आपल्याबरोबर बाजारातले काही लोक घेऊन व घोळका जमवून शहरभर भय निर्माण केले. यासोन नावाच्या गृहस्थाच्या घरावर ह्रा करून पौल व सीला ह्यांना बाहेर काढून आणण्याची खटपट करून पाहिली. परंतु ते त्यांना मिळाले नाहीत, तेव्हा त्यांनी यासोनला व कित्येक बंधूंना नगराच्या अधिकाऱ्यांकडे ओढत नेऊन आरडाओरड करत म्हटले, “ज्यांनी जगाची उलथापालथ केली, ते येथेही आले आहेत. त्यांना यासोनने आपल्या घरात घेतले आहे आणि हे सर्व जण कैसराच्या हुकुमाविरुद्ध वागतात म्हणजे येशू म्हणून दुसराच कोणी राजा आहे, असे म्हणतात.” ह्या वक्तव्यामुळे लोक व शहराचे अधिकारी खवळले. त्यानंतर त्यांनी यासोनचा व इतरांचा जामीन घेऊन त्यांना सोडून दिले. बंधुजनांनी पौल व सीला ह्यांना लगेच रातोरात बिरुया येथे पाठवले. ते तेथे पोहचल्यावर यहुदी लोकांच्या प्रार्थनामंदिरात गेले. तेथील लोक थेस्सलनीकामधल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते, त्यांनी मोठ्या उत्सुकतेने त्यांच्या संदेशाचा स्वीकार केला आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी ते दररोज धर्मशास्त्राचा अभ्यास करू लागले. ह्यावरून त्यांतील अनेकांनी व बऱ्याच प्रतिष्ठित ग्रीक स्त्रीपुरुषांनी विश्वास ठेवला. परंतु पौल देवाचे वचन बिरुयातही सांगत आहे, हे थेस्सलनीकातल्या यहुदी लोकांना समजले, तेव्हा त्यांनी तिकडेही जाऊन लोकांचे कान फुंकले. त्यावरून बंधुजनांनी पौलाला समुद्रकिनाऱ्याजवळ त्वरित पाठवले. मात्र सीला व तीमथ्य हे तेथेच राहिले. पौलाला पोहचविणाऱ्यांनी त्याला अथेनैपर्यंत नेले. सीला व तीमथ्य ह्यांनी आपणाकडे होईल तितक्या लवकर यावे, असा पौलाचा आदेश घेऊन ते परत आले.