YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 13:1-12

प्रेषितांची कृत्ये 13:1-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

अंत्युखिया येथील ख्रिस्ती मंडळीत काही संदेष्टे व शिक्षक होते, ते पुढीलप्रमाणेः बर्णबा, शिमोन निग्र, लूक्य कुरेनेकर, मनाएन (जो हेरोदाबरोबर लहानाचा मोठा झाला होता) आणि शौल. ही सर्व माणसे परमेश्वराची आराधना करीत व उपवास करीत असता, पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, “बर्णबा व शौलाला ह्यांना ज्या कामासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करा.” म्हणून मंडळीने उपवास व प्रार्थना केल्या, त्यांनी बर्णबा व शौल यांच्या डोक्यांवर हात ठेवून प्रार्थना केली, मग त्यांना पाठवून दिले. पवित्र आत्म्याच्याद्वारे बर्णबा व शौल यांना पाठविण्यात आले, ते सलुकीयात गेले, नंतर तेथून समुद्रमार्गे कुप्र बेटावर गेले. ते जेव्हा सलमी शहरात आले, तेव्हा त्यांनी देवाचे वचनाची यहूदी लोकांच्या सभास्थानात घोषणा केली मार्क म्हटलेला योहान हाही त्यांच्या मदतीला होता. ते संपूर्ण बेट पार करून पफे शहरास गेले, पफे येथे त्यांना एक यहूदी मनुष्य भेटला, तो जादूच्या करामती करीत असे, त्याचे नाव बर्येशू होते, तो खोटा संदेष्टा होता. बर्येशू नेहमी सिर्ग्य पौल याच्या निकट राहण्याचा प्रयत्न करायचा, सिर्ग्य पौल राज्यपाल होता व तो हुशार होता, त्याने बर्णबा व शौल यांना आपणाकडे बोलावले, त्यास त्यांच्याकडून देवाचे वचन ऐकण्याची उत्कंठा दाखवली. परंतु अलीम “जादूगार” (त्याच्या नावाचा अर्थ हाच आहे) हा बर्णबा व शौल यांच्याविरुद्ध होता, राज्यपालाने विश्वास ठेवू नये म्हणून अलीमने त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. पण शौल, ज्याला पौलहि म्हणत, तो पवित्र आत्म्याने भरला होता, पौलाने त्याच्याकडे रोखून पाहिले व म्हणाला. “सैतानाच्या पुत्रा तू दुष्टाईने व खोटेपणाने भरलेला आहेस, अवघ्या नीतिमानाच्या वैऱ्या, तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय? तर आता पाहा, प्रभूचा हात तुझ्यावर आहे, तू आंधळा होशील व काही वेळपर्यंत तुला सूर्य दिसणार नाही,” मग लागलेच अलीमावर धुके व अंधार पडला आणि तो आपल्याला कोणी हाती धरून चालवावे म्हणून इकडेतिकडे फिरुन मनुष्यांचा शोध करू लागला. तेव्हा जे झाले ते पाहून राज्यपालाने विश्वास ठेवला, प्रभूच्या शिक्षणाने तो चकित झाला.

प्रेषितांची कृत्ये 13:1-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

आता अंत्युखिया येथील मंडळीत संदेष्टे व शिक्षक होते: बर्णबा, शिमोन, ज्याला निगेर देखील म्हणत, कुरेनेचा लूक्य, मनायेन ज्याचे संगोपन मांडलिक हेरोद राजाकडून झाले होते आणि शौल. हे सर्वजण प्रभूची आराधना आणि उपास करीत असताना, पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, “बर्णबा व शौल यांना ज्या कामासाठी मी पाचारण केले आहे त्यासाठी त्यांना वेगळे करा.” तेव्हा उपास आणि प्रार्थना केल्यावर त्यांनी आपले हात त्यांच्यावर ठेवले व त्यांना निरोप दिला. पवित्र आत्म्याने त्या दोघांना त्यांच्या मार्गावर पाठविले, ते खाली सलुकीयाला गेले आणि तारवात बसून सायप्रस बेटावर उतरले. सलमीस या शहरात आल्यानंतर, ते यहूदी लोकांच्या सभागृहांमध्ये गेले व त्यांनी परमेश्वराचे वचन जाहीर केले. योहान त्यांच्याबरोबर मदतनीस म्हणून गेला होता. त्या संपूर्ण बेटावर प्रवास करीत ते पाफोस येथे जाऊन पोहोचले. तिथे त्यांना यहूदी बार-येशू नावाचा जादूगार व खोटा संदेष्टे भेटला. सेर्गियोस पौलुस नावाच्या राज्यपालाचा तो एक सेवक होता. सेर्गियोस पौलुस हा बुद्धिमान व ज्ञानी मनुष्य होता. या राज्यपालाने बर्णबा व शौलना बोलाविले, कारण परमेश्वराचे वचन ऐकण्याची त्याची इच्छा होती. परंतु अलीम जादूगार (असा त्याच्या नावाचा अर्थ आहे) त्याने त्यांना विरोध केला आणि विश्वास ठेवण्यापासून राज्यपालाला दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केला. मग पवित्र आत्म्याने भरलेला शौल, ज्याला पौल देखील म्हणत असत, त्याने अलीमाकडे रोखून पाहात म्हटले, “तू सैतानाचा पुत्र आहेस आणि सर्व चांगुलपणाचा वैरी आहेस! तू सर्वप्रकारच्या कपटाने व चातुर्याने भरलेला आहेस. प्रभूच्या चांगल्या मार्गाला भ्रष्ट करण्याचे तू कधीच सोडणार नाहीस काय? तर पाहा, आताच प्रभूचा हात तुझ्याविरुद्ध उठला आहे. तू आंधळा होशील आणि काही वेळ तुला सूर्याचा प्रकाश सुद्धा दिसणार नाही.” तत्काळ धुके व अंधकार यांनी तो ग्रासल्यासारखा झाला आणि आपल्याला हाती धरून न्यावे, म्हणून तो इकडे तिकडे कोणाचा तरी चाचपडत शोध करू लागला. राज्यपालाने जे घडले ते पाहिले, तेव्हा त्याने विश्वास ठेवला आणि प्रभूच्या शिक्षणाविषयी तो आश्चर्यचकित झाला.

प्रेषितांची कृत्ये 13:1-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

अंत्युखियाच्या मंडळीत बर्णबा, शिमोन निग्र, लूक्य कुरेनेकर, जो बाळपणापासून मांडलिक हेरोद राजाबरोबर वाढला होता तो मनाएन व शौल हे संदेष्टे व शिक्षक होते. ते प्रभूची सेवा व उपास करत असता पवित्र आत्मा म्हणाला की, “बर्णबा व शौल ह्यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरता वेगळे करून ठेवा.” तेव्हा त्यांनी उपास व प्रार्थना करून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली. ह्याप्रमाणे पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांची रवानगी झाल्यावर ते सलुकीयात येऊन तारवातून कुप्रास गेले. मग ते सलमीनात असता त्यांनी यहूद्यांच्या सभास्थानामध्ये देवाच्या वचनाची घोषणा केली; आणि योहान हाही त्यांचा सहायक होता. पुढे ते सबंध बेटातून चालून पफेस गेल्यावर बर्येशू नावाचा कोणीएक यहूदी जादूगार व खोटा संदेष्टा त्यांना आढळला. तो तेथील सुभेदार सिर्ग्य पौल ह्या बुद्धिमान मनुष्याच्या पदरी होता. ह्या सुभेदाराने बर्णबा व शौल ह्यांना बोलावून देवाचे वचन ऐकण्याची उत्कंठा दर्शवली. परंतु अलीम जादूगार (त्याच्या नावाचा अर्थ हाच आहे) ह्याने त्यांना अडवून सुभेदाराला विश्वासापासून फितवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शौल, ज्याला पौलही म्हणत, तो पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला, “अरे सर्व कपटाने व सर्व लुच्चेगिरीने भरलेल्या सैतानाच्या पोरा, अवघ्या नीतिमत्त्वाच्या वैर्‍या, तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय? तर पाहा, आता प्रभूचा हात तुला प्रतिकूल आहे, तू आंधळा होशील, व काही वेळपर्यंत तुला सूर्य दिसणार नाही.” तत्क्षणीच त्याच्यावर धुके पडल्यासारखे होऊन त्याच्या डोळ्यांना अंधारी आली; तेव्हा आपल्याला कोणीतरी हात धरून न्यावे म्हणून तो इकडे तिकडे माणसांचा शोध करू लागला. तेव्हा जे झाले ते पाहून त्या सुभेदाराने प्रभूच्या शिक्षणावरून आश्‍चर्य करून विश्वास ठेवला.

प्रेषितांची कृत्ये 13:1-12 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

अंत्युखिया येथील ख्रिस्तमंडळीत बर्णबा, निग्र म्हटलेला शिमोन, लूक्य कुरेनेकर, हेरोद राज्यपालाच्या सहवासात वाढलेला मनाएन व शौल हे संदेष्टे व शिक्षक होते. ते प्रभूची सेवा व उपवास करत असता पवित्र आत्मा म्हणाला, “बर्णबा व शौल ह्यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरता वेगळे करून ठेवा.” त्यांनी उपवास व प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवून प्रार्थना केली व त्यांची रवानगी केली. ह्याप्रमाणे पवित्र आत्म्याद्वारे त्यांची रवानगी झाल्यावर ते सलुकीयात येऊन तारवातून कुप्र येथे गेले. ते सलमीना या ठिकाणी आल्यावर त्यांनी देवाच्या वचनाची यहुदी लोकांच्या सभास्थानांमध्ये घोषणा केली. योहान ऊर्फ मार्क हा त्यांचा सेवक त्यांच्याबरोबर होता. पुढे ते सबंध बेट चालून पफे या ठिकाणी गेल्यावर बर्येशू नावाचा कोणी एक यहुदी जादूगार व खोटा संदेष्टा त्यांना आढळला. तो तेथील राज्यपाल सिर्ग्य पौल ह्या बुद्धिमान माणसाचा मित्र होता. ह्या राज्यपालाने बर्णबा व शौल ह्यांना बोलावून देवाचे वचन ऐकण्याची उत्कंठा दर्शविली, परंतु अलीम (त्या नावाचा अर्थ जादूगार असा आहे) ह्याने त्यांना अडवून राज्यपालाला विश्वासापासून फितविण्याचा प्रयत्न केला. शौल, ज्याला पौल देखील म्हणत, पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला, “अरे सर्व कपटाने व सर्व लुच्चेगिरीने भरलेल्या सैतानाच्या पोरा, अवघ्या चांगुलपणाच्या वैऱ्या, तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय? आता प्रभूचा हात तुला प्रतिकूल आहे. तू आंधळा होशील, व काही वेळेपर्यंत तुला सूर्य दिसणार नाही.” तत्क्षणीच त्याच्यावर धुके पडल्यासारखे होऊन त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. आपणाला कोणीतरी हाताला धरून न्यावे म्हणून तो आजूबाजूला माणसाचा शोध घेऊ लागला. जे झाले ते पाहून त्या राज्यपालाने प्रभूच्या संदेशाविषयी आश्चर्य व्यक्त करून विश्वास ठेवला.