YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 11:1-15

प्रेषितांची कृत्ये 11:1-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

यहूदी नसलेल्या लोकांनीसुद्धा देवाच्या वचनाचा स्वीकार केला आहे हे यहूदीया प्रांतातील प्रेषितांनी व बंधूनी ऐकले. पण जेव्हा पेत्र यरूशलेम शहरास आला, तेव्हा सुंता झालेला यहूदी विश्वासी गट त्याच्यावर टिका करू लागले. ते म्हणाले, “जे सुंता न झालेले व परराष्ट्रीय आहेत अशा विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या घरी तुम्ही गेला, एवढेच नव्हे तर तुम्ही त्यांच्यासह जेवणही केले.” म्हणून पेत्राने त्यांना सर्व घटना सविस्तर स्पष्ट करून सांगितल्या. पेत्र म्हणाला, मी यापो शहरात प्रार्थना करीत असताना मला तंद्री लागल्यासारखे झाले व मी एक दृष्टांत पाहिला की, मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून सोडलेली एक चादर माझ्यापर्यंत आली. मी त्याच्याकडे न्याहाळून पाहून विचार करीत होतो, मी त्यामध्ये पृथ्वीवरील चार पायाचे प्राणी, जंगली पशू, सरपटणारे प्राणी आणि आकाशात उडणारे पक्षी मी त्यामध्ये पाहिले. एक वाणी माझ्याशी बोलताना मी ऐकली, “पेत्रा, ऊठ, मारून खा!” पण मी म्हणालो, “प्रभू, मी असे कधीही करणार नाही, मी अपवित्र किंवा अशुद्ध असे कधीच खाल्ले नाही.” आकाशातून त्या वाणीने पुन्हा उत्तर दिले, “देवाने या गोष्टी शुद्ध केल्या आहेत, त्यांना अशुद्ध म्हणू नकोस.” असे तीन वेळा घडले, मग ते सर्व पुन्हा वर आकाशात घेतले गेले. इतक्यात पाहा, तीन माणसे ज्या घरामध्ये आम्ही होतो त्यापुढे कैसरीयाहून माझ्याकडे पाठवलेली तीन माणसे येऊन उभी राहिली. आत्म्याने मला कोणत्याही प्रकारचा संशय न धरिता त्यांच्याबरोबर जाण्यास सांगितले, हे सहा बंधू जे येथे आहेत, तेही माझ्याबरोबर होते, आम्ही कर्नेल्याच्या घरी गेलो. कर्नेल्याने आपल्या घरात देवदूत उभा असलेला कसा दिसला हे आम्हास सांगितले, देवदूत कर्नेल्याला म्हणाला, “काही माणसे यापोस पाठव, शिमोन पेत्राला बोलावून घे. तो तुझ्याशी बोलेल, तो ज्या गोष्टी तुला सांगेल, त्यामुळे तुझे व तुझ्या कुटुंबाचे तारण होईल.” त्यानंतर मी माझ्या भाषणाला सुरुवात केली, सुरुवातीला ज्याप्रमाणे पवित्र आत्मा आपल्यावर आला तसाच तो त्यांच्यावरही आला.

प्रेषितांची कृत्ये 11:1-15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

गैरयहूदी लोकांनीही परमेश्वराचे वचन ग्रहण केले हे प्रेषितांच्या आणि यहूदीया प्रांतातील विश्वासणार्‍यांच्या कानी गेले. मग पेत्र वर यरुशलेमला गेला, त्यावेळी सुंता झालेल्या विश्वासणार्‍यांनी त्याच्यावर टीका केली ते म्हणाले, “तू असुंती लोकांच्या घरी गेलास आणि त्यांच्याबरोबर भोजन केले.” त्यावर पेत्राने सुरुवातीपासून, सर्वगोष्टी सविस्तर सांगितल्या: तो म्हणाला, “मी योप्पा शहरात प्रार्थना करीत असताना, माझे देहभान सुटले तेव्हा मी दृष्टान्त पाहिला. त्यामध्ये मोठ्या चादरी सारखे काहीतरी चारही कोपरे धरून आकाशातून खाली सोडले जात आहे आणि मी जिथे होतो तिथे ते खाली आले. मी त्यामध्ये डोकावून पाहिले मला पृथ्वीवरील चतुष्पाद प्राणी, श्वापदे, सरपटणारे जीवजंतू व आकाशातील पाखरे दिसली. तेव्हा एक वाणी माझ्याशी बोलताना मी ऐकली, ‘पेत्रा, ऊठ व मारून खा.’ “मी उत्तर दिले, ‘प्रभू खात्रीने नाही! कारण अस्वच्छ व अशुद्ध असे कधीही माझ्या तोंडात गेलेले नाही.’ “स्वर्गातून दुसर्‍या वेळेस वाणी ऐकू आली, ‘परमेश्वराने जे शुद्ध केले आहे, ते अशुद्ध असे म्हणू नकोस.’ असे तीन वेळा झाले आणि ते सर्व परत स्वर्गाकडे घेतले गेले. “नेमक्या याच वेळी कैसरीयाहून मजकडे पाठविलेली तीन माणसे मी राहत होतो त्या घराच्या समोर येऊन उभी राहिली. तेव्हा आत्मा मला म्हणाला त्यांच्याबरोबर जाण्यास संकोच करू नको. मजबरोबर सहा बंधूही सोबतीला होते आणि आम्ही त्या मनुष्याच्या घरी प्रवेश केला. त्याने आम्हाला सांगितले की परमेश्वराचा दूत त्याच्या घरात प्रकट झाला आणि म्हणाला, ‘योप्पा येथे शिमोन ज्याला पेत्र म्हणतात त्याला बोलावून घे. तो तुला संदेश सांगेल त्याद्वारे तुझे आणि तुझ्या सर्व घराण्याचे तारण होईल.’ “मी बोलण्यास सुरुवात केली, तेव्हाच पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला, जसा तो सुरुवातीला आपल्यावर उतरला होता.

प्रेषितांची कृत्ये 11:1-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

प्रेषितांनी व यहूदीया प्रांतात असलेल्या बंधुजनांनी असे ऐकले की, परराष्ट्रीयांनीही देवाचे वचन ग्रहण केले. मग पेत्र यरुशलेमेस गेला तेव्हा सुंता झालेले लोक त्याच्याबरोबर वाद घालू लागले की, “सुंता न झालेल्या माणसांकडे जाऊन त्यांच्याबरोबर तुम्ही जेवलात.” तेव्हा पेत्राने अनुक्रमाने सविस्तर सांगण्यास सुरुवात केली : “मी यापो नगरात प्रार्थना करत होतो; तेव्हा देहभान सुटून मी असा एक दृष्टान्त पाहिला की, एक पात्र उतरले, व ते मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून आकाशातून सोडलेले असे माझ्यापर्यंत आले. त्याच्याकडे मी न्याहाळून पाहत होतो तेव्हा पृथ्वीवरले चतुष्पाद, श्वापदे, सरपटणारे जीव व आकाशातील पाखरे माझ्या दृष्टीस पडली. आणि मी अशी वाणी माझ्याबरोबर बोलताना ऐकली की, ‘पेत्रा, ऊठ; मारून खा.’ परंतु मी म्हणालो, “नको, नको, प्रभू; कारण निषिद्ध किंवा अशुद्ध असे काही माझ्या तोंडात अजून कधी गेले नाही. मग दुसर्‍यांदा आकाशातून वाणी होऊन ती मला म्हणाली, ‘देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नकोस.’ असे तीनदा झाले; नंतर ती अवघी पुन्हा आकाशात वर ओढली गेली. इतक्यात पाहा, ज्या घरात आम्ही होतो त्याच्यापुढे कैसरीयातून माझ्याकडे पाठवलेली तीन माणसे येऊन उभी राहिली. तेव्हा आत्म्याने मला सांगितले की, ‘काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा.’ मग हे सहा बंधूही माझ्याबरोबर आले आणि आम्ही त्या माणसाच्या घरी गेलो. त्याने आम्हांला सांगितले की, ‘मी आपल्या घरी देवदूत उभा राहिलेला पाहिला. तो म्हणाला, यापोस कोणाला तरी पाठवून पेत्र म्हटलेल्या शिमोनास बोलावून आण; ज्यांच्या योगे तुझे व तुझ्या सर्व कुटुंबाचे तारण होईल अशा गोष्टी तो तुला सांगेल.’ मी बोलू लागलो तेव्हा, जसा आरंभी आपल्यावर तसा त्यांच्यावरही पवित्र आत्मा उतरला.

प्रेषितांची कृत्ये 11:1-15 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

प्रेषितांनी व यहुदिया प्रांतांत असलेल्या बंधुजनांनी असे ऐकले की, यहुदीतरांनीही देवाचे वचन स्वीकारले आहे. पेत्र यरुशलेम येथे गेला, तेव्हा सुंता झालेले लोक त्याच्याबरोबर वाद घालू लागले की, “सुंता न झालेल्या माणसांकडे जाऊन त्यांच्याबरोबर तुम्ही भोजन घेतले.” पेत्राने अनुक्रमाने सविस्तर सांगण्यास सुरुवात केली: “मी यापो नगरात प्रार्थना करत होतो, तेव्हा देहभान सुटून मी असा एक दृष्टान्त पाहिला की, एक पात्र उतरले व ते मोठ्या चादरीसारखे चार कोपरे धरून आकाशांतून सोडलेले असे माझ्यापर्यंत आले. त्याच्याकडे मी न्याहाळून पाहून विचार करत होतो तो पृथ्वीवरचे चतुष्पाद, श्वापदे, सरपटणारे जीव व आकाशातले पक्षी माझ्या दृष्टीस पडले. मी अशी वाणीही माझ्याबरोबर बोलताना ऐकली की, ‘पेत्र, ऊठ, मारून खा.’ परंतु मी म्हणालो, ‘नको नको, प्रभो, कारण निषिद्ध किंवा अशुद्ध असे काही माझ्या तोंडात अजून कधी गेले नाही.’ दुसऱ्यांदा आकाशातून वाणी होऊन ती मला म्हणाली, ‘देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नकोस.’ असे तीनदा झाले, नंतर सर्व काही पुन्हा आकाशात वर ओढले गेले. इतक्यात ज्या घरात आम्ही होतो त्या घरापुढे कैसरियामधून माझ्याकडे पाठवलेली तीन माणसे येऊन उभी राहिली. तेव्हा पवित्र आत्म्याने मला सांगितले, ‘काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा.’ ते सहा बंधूही माझ्याबरोबर आले आणि आम्ही कर्नेल्यच्या घरी गेलो. त्याने आम्हांला सांगितले, “मी माझ्या घरी देवदूत उभा राहिलेला पाहिला. तो म्हणाला, ‘यापो येथे कोणाला पाठवून पेत्र म्हटलेल्या शिमोनला बोलावून आण. ज्यांच्या योगे तुझे व तुझ्या सर्व कुटुंबाचे तारण होईल, अशा गोष्टी तो तुला सांगेल’. मी बोलू लागलो तेव्हा, जसा आरंभी आपल्यावर उतरला तसा त्यांच्यावरही पवित्र आत्मा उतरला.