प्रेषितांची कृत्ये 10:9-23 - Compare All Versions
प्रेषितांची कृत्ये 10:9-23 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुसऱ्या दिवशीही माणसे यापो गावाजवळ आली, ती दुपारची वेळ होती, त्याचवेळी प्रार्थना करावयास पेत्र गच्चीवर गेला. पेत्राला भूक लागली होती, त्यास काही खावेसे वाटले, ते पेत्रासाठी जेवणाची तयारी करीत असता पेत्राला तंद्री लागली. आणि आपल्यासमोर आकाश उघडले असून मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून सोडलेली एक चादर पृथ्वीवर उतरत आहे असा दृष्टांत त्यास झाला. त्यामध्ये पृथ्वीवरील सर्वप्रकारचे चालणारे, सरपटणारे, आकाशात उडणारे पक्षी होते. नंतर एक वाणी पेत्राने ऐकली, “पेत्रा, ऊठ; यापैकी कोणताही प्राणी मारून खा.” पण पेत्र म्हणाला, “मी तसे कधीच करणार नाही, प्रभू जे अशुद्ध व अपवित्र आहे असे कोणतेही अन्न मी कधी खाल्लेले नाही.” पण ती वाणी त्यास पुन्हा म्हणाली, “देवाने या गोष्टी शुद्ध केल्या आहेत, त्यांना अशुद्ध म्हणू नकोस.” असे तीन वेळा घडले; मग ते पात्र आकाशात वर घेतले गेले. पेत्र भयचकित होऊन या दृष्टांताचा अर्थ काय असावा याविषयी विचार करू लागला, ज्या लोकांस कर्नेल्याने पाठवले होते, त्यांना शिमोनाचे घर सापडले ते दाराजवळ उभे होते. त्यांनी विचारले, “शिमोन पेत्र येथेच राहतो काय?” पेत्र या दृष्टांताविषयीच विचार करत असतांना, आत्मा त्यास म्हणाला, “ऐक, तीन माणसे तुला शोधीत आहेत. ऊठ आणि पायऱ्या उतरून खाली जा, कारण मीच त्यांना पाठवले आहे, काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा.” मग पेत्र खाली त्या मनुष्यांकडे गेला, तो म्हणाला, “तुम्ही ज्याचा शोध करीत आहात तो मीच आहे, तुम्ही येथे का आलात?” ती माणसे म्हणाली, “एका पवित्र देवदूताने तुम्हास आमंत्रित करण्याविषयी कर्नेल्याला सांगितले होते कर्नेल्य हा शताधिपती आहे, तो नीतिमान मनुष्य आहे तो देवाची उपासना करतो, सर्व यहूदी लोक त्याचा आदर करतात, तुम्हास घरी बोलावून तुमचे शब्द ऐकावेत असे देवदूताने त्यास सांगितले आहे.” पेत्राने त्यांना आत बोलावून घेतले व रात्रभर मुक्काम करण्यास सांगितले, दुसऱ्या दिवशी पेत्र तयार झाला व त्या तीन मनुष्याबरोबर गेला, यापो येथील काही बंधूही पेत्राबरोबर गेले.
प्रेषितांची कृत्ये 10:9-23 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दुसर्या दिवशी दुपारच्या सुमारास ते प्रवास करीत शहराजवळ येत होते आणि इकडे पेत्र प्रार्थना करण्यासाठी घराच्या धाब्यावर गेला. त्याला भूक लागली आणि काहीतरी खावे अशी त्याला इच्छा झाली, जेवण तयार होत असताना त्याचे देहभान सुटले. त्याने पाहिले आकाश उघडलेले आहे आणि मोठ्या चादरी सारखे काहीतरी चारही कोपरे धरून खाली जमिनीकडे सोडले जात आहे. तिच्यात पृथ्वीवरील सर्वप्रकारचे चतुष्पाद प्राणी, त्याचप्रमाणे सरपटणारे जीवजंतू व आकाशातील पाखरे होती. मग एक वाणी त्याला म्हणाली, “पेत्रा ऊठ, व मारून खा.” “खात्रीने नाही, प्रभू!” पेत्राने उत्तर दिले, “मी अस्वच्छ व अशुद्ध असे कधीही खाल्ले नाही.” दुसर्या वेळेस त्याला वाणी ऐकू आली, “परमेश्वराने जे शुद्ध केले आहे, ते अशुद्ध म्हणू नकोस.” असे तीन वेळा झाले, मग लागलीच ती चादर पुन्हा स्वर्गात वर घेतली गेली. त्या दृष्टान्ताचा काय अर्थ असावा याविषयी पेत्र विचारात पडला असता, कर्नेल्याने पाठविलेल्या माणसांना शिमोनाचे घर सापडले आणि ती बाहेर दरवाजाजवळ येऊन उभी राहिली. त्यांनी हाक मारून अशी विचारणा केली, “शिमोन, ज्याला पेत्र असेही म्हणतात, येथेच राहत आहेत काय?” इकडे पेत्र त्या दृष्टान्ताविषयी विचार करीत असताना, आत्मा त्याला म्हणाला, “शिमोना, तीन माणसे तुला शोधत आहेत. म्हणून ऊठ आणि खाली जा. त्यांच्याबरोबर जाण्यास संकोच करू नको, कारण मीच त्यांना पाठविले आहे.” पेत्र खाली गेला आणि त्या माणसांना म्हणाला, “मी तोच आहे ज्याचा तुम्ही शोध घेत आहात. तुम्ही कशासाठी आला आहात?” त्या माणसांनी उत्तर दिले, “आम्ही कर्नेल्य शताधिपतीकडून आलो आहोत. ते नीतिमान आणि परमेश्वराला भिऊन वागणारे मनुष्य आहेत, सर्व यहूदी लोकांकडून सन्मानित झालेले आहेत. एका पवित्र दूताने त्यांना सांगितले की तुम्ही पेत्राला तुमच्या घरी बोलवावे म्हणजे तुमच्याकडील संदेश त्यांना ऐकता येईल” तेव्हा पेत्राने त्या माणसांना पाहुणे म्हणून घरात बोलाविले.
प्रेषितांची कृत्ये 10:9-23 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते दुसर्या दिवशी वाटेवर असता गावाजवळ येताना दोन प्रहराच्या सुमारास पेत्र प्रार्थना करण्यास धाब्यावर गेला. तेव्हा त्याला भूक लागून काही खावेसे वाटले; आणि जेवणाची तयारी होत आहे इतक्यात त्याचे देहभान सुटले. तेव्हा आकाश उघडलेले व मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून सोडलेले एक पात्र पृथ्वीवर उतरत आहे असा दृष्टान्त त्याला झाला. त्यात पृथ्वीवरील सर्व चतुष्पाद, सरपटणारे जीव व आकाशातील पाखरे होती. मग त्याने अशी वाणी ऐकली की, ‘पेत्रा, ऊठ; मारून खा.’ पेत्र म्हणाला, “नको, नको, प्रभू; कारण निषिद्ध आणि अशुद्ध असे काही मी कधीही खाल्ले नाही.” मग दुसर्यांदा अशी वाणी झाली की, “देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नकोस.” असे तीन वेळा झाले आणि लगेच ते पात्र आकाशात वर घेतले गेले. आपण पाहिलेल्या दृष्टान्ताचा अर्थ काय असावा ह्याविषयी पेत्र विचारात पडला असता, पाहा, कर्नेल्याने पाठवलेली माणसे शिमोनाचे घर शोधल्यावर दरवाजाजवळ येऊन उभी राहिली; आणि त्यांनी हाक मारून विचारले, “शिमोन पेत्र येथे पाहुणा उतरला आहे काय?” पेत्र त्या दृष्टान्ताविषयी विचार करत असता आत्मा त्याला म्हणाला, “पाहा, तीन माणसे तुझा शोध करत आहेत. तर ऊठ, खाली ये आणि काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा; कारण मीच त्यांना पाठवले आहे.” पेत्र त्या माणसांकडे खाली येऊन म्हणाला, “पाहा, ज्याचा शोध तुम्ही करत आहात तो मी आहे; तुम्ही कोणत्या कारणामुळे येथे आलात?” ते म्हणाले, “कर्नेल्य शताधिपती हा नीतिमान मनुष्य असून देवाचे भय बाळगणारा आहे आणि सर्व यहूदी लोक त्याच्याविषयी चांगली साक्ष देतात. त्याला पवित्र देवदूताने सुचवले आहे की, आपणाला घरी बोलावून आपणाकडून संदेश ऐकावा.” मग त्याने त्यांना आत बोलावून त्यांचा पाहुणचार केला. दुसर्या दिवशी पेत्र त्यांच्याबरोबर निघाला आणि यापोतील बंधुजनांपैकी कित्येक त्याच्याबरोबर गेले.
प्रेषितांची कृत्ये 10:9-23 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
दुसऱ्या दिवशी ते गावाजवळ आले, तेव्हा मध्यान्हीच्या वेळी पेत्र प्रार्थना करावयास छपरावर गेला, त्याला भूक लागून काही खावेसे वाटले पण जेवणाची तयारी होत आहे, इतक्यात त्याला गाढ तंद्री लागली. आकाश उघडले आहे व मोठ्या चादरीसारखे चार कोपरे धरून सोडलेले एक पात्र पृथ्वीवर उतरत आहे, असा त्याने दृष्टान्त पाहिला. त्यात पृथ्वीवरील सर्व चतुष्पाद, सरपटणारे जीव व आकाशातील पक्षी होते. त्याला अशी वाणी ऐकू आली की, “पेत्रा, ऊठ, मारून खा.” परंतु पेत्र म्हणाला, “नको, प्रभो, कारण निषिद्ध आणि अशुद्ध असे काही मी कधीही खाल्ले नाही.” दुसऱ्यांदा त्याला वाणी ऐकू आली, “देवाने जे शुद्ध केले आहे. ते तू निषिद्ध मानू नकोस.” असे तीन वेळा झाले आणि लगेच ते पात्र आकाशात वर घेतले गेले. आपण पाहिलेल्या दृष्टान्ताचा अर्थ काय असावा, ह्याविषयी पेत्र विचारात पडला असता, पाहा, कर्नेल्यने पाठवलेली माणसे शिमोनचे घर शोधत त्याच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन उभी राहिली, त्यांनी हाक मारून विचारले, “शिमोन पेत्र येथे पाहुणा उतरला आहे काय?” पेत्र त्या दृष्टान्ताविषयी विचार करत असता पवित्र आत्मा त्याला म्हणाला, “पाहा, तीन माणसे तुझा शोध घेत आहेत. ऊठ, खाली जा आणि मनात काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा, कारण मीच त्यांना पाठवले आहे.” पेत्र खाली येऊन त्या माणसांना म्हणाला, “पाहा, ज्याचा तुम्ही शोध घेत आहात तो मी आहे. तुम्ही येथे कशाकरिता आला आहात?” ते म्हणाले, “रोमन अधिकारी कर्नेल्य हा सद्गृहस्थ असून देवाचे भय बाळगणारा आहे आणि सर्व यहुदी लोक त्याला आदरणीय मानतात. त्याला पवित्र देवदूताने सुचविले आहे की, आपल्याला घरी बोलावून आपणाकडून संदेश ऐकावा.” पेत्राने त्यांना आत बोलावून त्यांना रात्रभर तेथे ठेवून घेतले. दुसऱ्या दिवशी पेत्र त्यांच्याबरोबर निघाला आणि यापो येथील बंधुजनांपैकी काही जण त्याच्याबरोबर गेले.