२ शमुवेल 21:1-14
२ शमुवेल 21:1-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
दावीदाच्या कारकिर्दीत एकदा दुष्काळ पडला. हा दुष्काळ तीन वर्षे टिकला तेव्हा दावीदाने परमेश्वराची प्रार्थना केली परमेश्वराने सांगितले, “शौल आणि त्याचे खुनी रक्तपिपासू घराणे यावेळच्या दुष्काळाला जबाबदार आहेत. शौलने गिबोन्यांना मारले म्हणून हा दुष्काळ पडला.” गिबोनी म्हणजे इस्राएली नव्हेत ते अमोरी होत इस्राएलींनी त्यांना दुखापत न करण्याचे वचन दिले होते. तरी शौलाने गिबोन्यांच्या वधाचा प्रयत्न केला. इस्राएली आणि यहूदा लोकांविषयीच्या अति उत्साहामुळे त्याने तसे केले गिबोन्यांना एकत्र बोलावून राजा दावीदाने त्यांच्याशी बोलणे केले. दावीद त्यांना म्हणाला, “तुमच्यासाठी मी काय करू? इस्राएलाचा कलंक पुसला जाईल आणि तुम्ही या परमेश्वराच्या प्रजेला आशीर्वाद द्याल यासाठी मी काय करू शकतो?” तेव्हा गिबोनी दावीदाला म्हणाला, “शौलाच्या घराण्याने जे केले त्याची सोन्यारुप्याने भरपाई होऊ शकत नाही. पण त्यासाठी इस्राएलींना जिवे मारण्याचाही आम्हास हक्क नाही.” दावीद म्हणाला, “ठीक तर तुमच्यासाठी मी आता काय करावे?” ते राजाला म्हणाले, “ज्या मनुष्याने आमचा नाश केला व इस्राएली प्रदेशात राहणाऱ्या आमच्या सर्व लोकांचा नाश करण्याचे ज्याने योजिले होते त्या शौलाच्या वंशातले सात मुले आमच्या हवाली कर. शौलाला परमेश्वराने राजा म्हणून निवडले होते. म्हणून शौलाच्या गिबा डोंगरावर त्याच्या मुलांना आम्ही देवासमक्षच फाशी देऊ.” राजा दावीद म्हणाला, “मला हे मान्य आहे. त्यांना मी तुमच्या हवाली करतो.” पण योनाथानाचा मुलगा मफीबोशेथ याला राजाने अभय दिले. योनाथान हा शौलाचा मुलगा. पण दावीदाने त्यास त्याच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेचे परमेश्वरास स्मरून वचन दिले होते, म्हणून मफीबोशेथला राजाने इजा पोचू दिली नाही. अरमोनी आणि मफीबोशेथ हे शौलाला अय्याची कन्या रिस्पा या पत्नीपासून झालेली अपत्य शौलला मीखल नावाची कन्याही होती. अद्रीएलशी तिचे लग्न झाले होते. महोलाथी येथील बर्जिल्ल्याचा हा पुत्र. या दांपत्याची पाच मुलेही दावीदाने ताब्यात घेतली. या सात जणांना त्याने गिबोन्यांच्या स्वाधीन केले. गिबोन्यांनी त्यांना गिबा डोंगरावर परमेश्वरासमोर फाशी दिली. ते सातजण एकदमच प्राणाला मुकले त्यांना ठार केले गेले ते दिवस हंगामाच्या सुरुवातीचे होते. जवाच्या पिकाच्या सुरुवातीचा तो वसंतातील काळ होता. अय्याची कन्या रिस्पा हिने शोकाकुल होऊन एक मोठे कापड त्या गिबाच्या खडकावर अंथरले. तेव्हापासून पावसास सुरुवात होईपर्यंत ते तसेच राहू दिले. रिस्पाने रात्रंदिवस त्या मृत देहांची निगराणी केली. दिवसा पक्ष्यांनी आणि रात्री जंगली जनावरांनी त्याचे लचके तोडू नयेत म्हणून राखण केली. शौलाची उपपत्नी व अय्याची कन्या रिस्पा काय करत आहे ते लोकांनी दावीदाच्या कानावर घातले. तेव्हा दावीदाने याबेश गिलाद मधील लोकांकडून शौल आणि योनाथान यांच्या अस्थी आणवल्या शौल आणि योनाथान यांचा गिलबोवा येथे वध झाल्यावर याबोश गिलादाच्या लोकांनी त्या नेल्या होत्या. बेथ-शान मधील भिंतीवर पलिष्ट्यांनी या दोघांचे देह टांगले होते. पण बेथशानच्या लोकांनी येऊन भरवस्तीतील ती प्रेते चोरून नेली. याबेश-गिलाद मधून शौल आणि त्याचा पुत्र योनाथान या दोघांच्या अस्थी दावीदाने आणल्या. तसेच त्या फाशी दिल्या गेलेल्या सात जणांचे मृतदेहही आणले. शौल आणि योनाथानाच्या अस्थी त्यांनी बन्यामीन प्रदेशातील सेला येथे पुरल्या. शौलाचे वडील कीश यांच्या कबरीत त्या पुरल्या राजाच्या आज्ञे बरहुकूम लोकांनी हे सर्व केले. तेव्हा देवाने लोकांची प्रार्थना ऐकली आणि तिला त्याने प्रतिसाद दिला.
२ शमुवेल 21:1-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
दावीदाच्या कारकिर्दीत लागोपाठ तीन वर्षे दुष्काळ पडला होता; म्हणून दावीद याहवेहसमोर गेला. याहवेह म्हणाले, “हे शौल आणि त्याच्या रक्तदोषी घराण्यामुळे आहे; कारण त्याने गिबोनी लोकांना मारले होते.” तेव्हा राजाने गिबोनी लोकांस बोलावून घेतले आणि त्यांना म्हटले. (गिबोनी लोक इस्राएलचा भाग नव्हते, परंतु अमोरी लोकांतून उरलेले लोक होते; त्यांना जिवंत ठेवावे अशी इस्राएली लोकांनी शपथ घेतली होती, परंतु इस्राएल आणि यहूदाह यांच्याबद्दल असलेल्या त्याच्या आवेशामुळे शौलाने त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.) दावीदाने गिबोनी लोकांना विचारले, “मी तुमच्यासाठी काय करावे? कशाप्रकारे मी प्रायश्चित करावे की तुम्ही याहवेहच्या वतनाला आशीर्वाद द्याल?” गिबोनी लोकांनी राजाला उत्तर दिले, “शौल आणि त्याच्या घराण्याकडून आम्ही चांदी किंवा सोन्याची मागणी करावी असा अधिकार आम्हाला नाही, किंवा इस्राएलातील कोणालाही जिवे मारण्याचा अधिकार आम्हाला नाही.” दावीदाने विचारले, “मग तुमच्यासाठी मी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?” त्यांनी राजाला उत्तर दिले, “ज्या मनुष्याने आमचा नाश केला आणि आमची संख्या कमी व्हावी आणि इस्राएलमध्ये कुठेही आम्हाला स्थान नसावे म्हणून आमच्याविरुद्ध योजना केली, तर आता त्याच्या वंशातील सात पुरुषांना आमच्याकडे द्यावे म्हणजे शौल जो याहवेहद्वारे निवडला गेला होता, त्याच्या गिबियाहमध्ये आम्ही त्यांना मारून टाकून त्यांची शरीर तिथे उघडे टाकू.” तेव्हा राजा म्हणाला, “मी त्यांना तुमच्या हाती देईन.” शौलाचा पुत्र योनाथान व दावीदामध्ये याहवेहसमोर झालेल्या शपथेमुळे राजाने शौलाचा पुत्र योनाथान याचा पुत्र मेफीबोशेथ याची गय केली. परंतु अय्याहची कन्या रिजपाह हिचे दोन पुत्र अरमोनी आणि मेफीबोशेथ जे तिला शौलापासून झाले होते, त्याबरोबर शौलाची कन्या मीखल हिचे पाच पुत्र जे तिला महोलाथी बारजिल्लई याचा पुत्र अद्रीएल याच्यापासून झाले होते यांना राजाने घेतले. त्याने त्यांना गिबोनी लोकांच्या हाती सोपवून दिले, ज्यांनी त्यांना मारून टाकले आणि त्यांची शरीरे डोंगरावर याहवेहसमोर प्रदर्शित केली. ते सातही जण एकत्र मरण पावले; हंगामाच्या सुरवातीच्या दिवसांमध्ये त्यांना मारण्यात आले होते, जेव्हा जवाच्या हंगामाची सुरुवात झाली होती. तेव्हा अय्याहची मुलगी रिजपाह हिने गोणपाट घेतले, आणि ते स्वतःसाठी खडकावर पसरविले. हंगामाच्या सुरुवातीपासून त्या शरीरावर आकाशातून पाऊस पडेपर्यंत, तिने दिवसा पक्ष्यांना आणि रात्री जंगली प्राण्यांना त्या शवांना स्पर्श करू दिला नाही. अय्याहची कन्या रिजपाह, जी शौलाची उपपत्नी होती तिने जे केले ते दावीदाला कळले, दावीद गेला आणि याबेश-गिलआद येथील नागरिकांकडून शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्या अस्थी घेतल्या. (त्यांनी त्यांची शरीरे बेथ-शान नगराच्या चौकातून चोरली होती, जिथे पलिष्ट्यांनी शौलाला गिलबोआत मारून टाकल्यानंतर त्यांना तिथे टांगले होते.) तेव्हा दावीदाने शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्या अस्थी तिथून आणल्या आणि ज्यांना मारून टाकून डोंगरावर प्रदर्शित केले होते त्यांच्या अस्थी सुद्धा गोळा केल्या. त्यांनी बिन्यामीन प्रांतातील सेला येथे शौल व त्याचा पुत्र योनाथान यांच्या अस्थी, शौलाचा पिता कीश याच्या कबरेत पुरल्या आणि राजाने आज्ञापिल्याप्रमाणे सर्वकाही केले, त्यानंतर देशाच्या वतीने केलेल्या प्रार्थनेचे परमेश्वराने उत्तर दिले.
२ शमुवेल 21:1-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दाविदाच्या कारकिर्दीत लागोपाठ तीन वर्षे दुष्काळ पडला; तेव्हा दाविदाने परमेश्वरासमोर जाऊन प्रश्न केला. परमेश्वराने उत्तर दिले, “शौल व त्याचे खुनी घराणे ह्यांच्यामुळे हा दुष्काळ पडला आहे, कारण त्याने गिबोनी लोकांचा संहार केला.” राजाने गिबोनी लोकांना बोलावून त्यांच्याशी बोलणे केले. (हे गिबोनी लोक इस्राएल लोकांपैकी नसून अवशिष्ट अमोर्यांपैकी होते; इस्राएल लोकांनी त्यांच्याशी शपथ वाहून करार केला होता; पण इस्राएल लोक व यहूदी लोक ह्यांच्या अभिमानास्तव शौलाने गिबोनी लोकांचा संहार करण्याचा प्रयत्न केला होता.) दाविदाने गिबोनी लोकांना विचारले, “तुमच्यासाठी मी काय करू? असे कोणत्या प्रकारचे प्रायश्चित्त मी करू की जेणेकडून तुम्ही परमेश्वराच्या वतनाचे अभीष्ट चिंताल?” गिबोनी लोक त्याला म्हणाले, “शौल व त्याचे घराणे ह्यांच्याशी आमचा सोन्यारुप्यासंबंधी काही देणेघेणे नाही; तसेच इस्राएलातील कोणा पुरुषाला जिवे मारायचे आम्हांला कारण नाही.” तो त्यांना म्हणाला, “तुम्ही सांगाल ते मी तुमच्यासाठी करीन.” ते राजाला म्हणाले, “ज्या पुरुषाने आमचा नाश केला आणि आमचा निःपात व्हावा आणि इस्राएल देशात आमचे कोणी उरू देऊ नये असे योजले होते, त्याच्या वंशातले सात जण आमच्या हाती द्या, म्हणजे परमेश्वराने निवडलेल्या शौलाच्या गिब्यात परमेश्वराप्रीत्यर्थ आम्ही त्यांना फाशी देतो.” तेव्हा राजा म्हणाला, “मी त्यांना देईन.” दावीद व शौलाचा पुत्र योनाथान ह्यांची परमेश्वराच्या नावाने आणभाक झाली होती म्हणून शौलाचा नातू योनाथानाचा पुत्र मफीबोशेथ ह्याची राजाने गय केली. पण अय्याची कन्या रिस्पा हिला शौलापासून अरमोनी व मफीबोशेथ असे दोन पुत्र झाले होते ते आणि शौलाची कन्या मीखल हिला महोलाथी येथील बर्जिल्लय ह्याचा पुत्र अद्रीएल ह्याच्यापासून पाच पुत्र झाले होते त्यांना राजाने पकडले, आणि गिबोनी लोकांच्या हवाली केले; त्यांनी त्यांना डोंगरावर परमेश्वरासमोर फाशी दिले. त्या सातांचा एकदम निःपात झाला. त्यांना ठार मारण्यात आले ते दिवस हंगामाचे होते, ते जवाच्या हंगामाचे पहिले दिवस होते. मग अय्याची कन्या रिस्पा ही हंगामाच्या सुरुवातीपासून आकाशातून त्या शवांवर पर्जन्यवृष्टी होईपर्यंत त्या खडकावर गोणपाट पसरून बसली; दिवसा आकाशातले पक्षी व रात्री वनपशू ह्यांना तिने त्या शवांना शिवू दिले नाही. अय्याची कन्या व शौलाची उपपत्नी जी रिस्पा हिने जे केले ते कोणी दाविदाच्या कानावर घातले. तेव्हा दाविदाने जाऊन शौल व त्याचा पुत्र योनाथान ह्यांच्या अस्थी याबेश-गिलाद येथील लोकांकडून आणल्या. पलिष्टी लोकांनी गिलबोवाच्या डोंगरावर शौलाचा वध केला तेव्हा त्यांनी बेथ-शानच्या चव्हाट्यावर त्यांना टांगले होते, तेथून त्यांची शवे त्या लोकांनी चोरून आणली होती. त्याने तेथून शौल व त्याचा पुत्र योनाथान ह्यांच्या अस्थी आणल्या, तसेच ज्यांना फाशी दिले होते त्यांच्याही अस्थी लोकांनी जमा केल्या. शौल व त्याचा पुत्र योनाथान ह्यांच्या अस्थी बन्यामीन प्रदेशातील सेला येथे शौलाचा बाप कीश ह्याच्या थडग्यात पुरल्या; दाविदाच्या आज्ञेप्रमाणे लोकांनी सर्वकाही केले, त्यानंतर देशासाठी केलेली प्रार्थना देवाने ऐकली.