YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 13:21-39

२ शमुवेल 13:21-39 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

हे सर्व राजा दावीदाच्या कानावर गेले व तो संतापला. अबशालोमला अम्नोनाचा तिरस्कार वाटू लागला. तो अम्नोनाशी एक चकार शब्द बोलेना. अम्नोनाने आपली बहिण तामार हिच्याशी जो अतिप्रसंग केला त्याने अबशालोम द्वेषाने पेटून उठला होता. दोन वर्षानंतर मेंढरांची लोकर कातरणारे अबशालोमचे काही लोक एफ्राइम जवळील बालहासोरमध्ये आलेले होते अबशालोमने राजाच्या सर्व मुलांना ते पाहायला बोलावले. अबशालोम राजाकडे जाऊन म्हणाला, मेंढ्यांची लोकर कातरायला माझी माणसे आलेली आहेत आपल्या नोकरासहीत येऊन हे दृश्य पाहा. तेव्हा राजा दावीद त्यास म्हणाला, मुला आम्ही सर्व जण येणे काही शक्य नाही. तुझ्यावरही त्याचा भार पडेल. अबशालोमने दावीदाची खूप आर्जवे केली. परंतु दावीद गेला नाही. पण त्याने आपले आशीर्वाद दिले. अबशालोम म्हणाला, तुम्ही नाही तर निदान माझा भाऊ अम्नोन याला तरी पाठवा. राजा दावीद म्हणाला, तो तरी तुला कशासाठी बरोबर यायला हवा आहे? पण अबशालोमने आपला हट्ट सोडला नाही. शेवटी, अम्नोन आणि इतर सर्व मुले यांना अबशालोमाबरोबर जायला राजा दावीदाने संमती दिली. अबशालोमने आपल्या नोकरांना आज्ञा दिली. तो म्हणाला, अम्नोनावर नजर ठेवा. मद्याचा आनंद घेत त्यास जेव्हा त्याची नशा चढेल, तेव्हा मी तुम्हास संकेत करीन. मग त्याच्यावर हल्ला करून तुम्ही त्यास ठार करा शिक्षेची भीती बाळगू नका. अखेर तुम्ही माझ्या आज्ञेचे पालन करत आहात. धैर्याने आणि खंबीरपणाने वागा. तेव्हा अबशालोमच्या नोकरांनी त्याचा शब्द पाळला. अम्नोनाला त्यांनी ठार केले. पण दावीदाची बाकीची सर्व मुले निसटली. आपापल्या खेचरावर बसून ती पळाली. राजाचे पुत्र नगराच्या वाटेवर असतानाच राजा दावीदाला या घडामोडीची खबर मिळाली. ती अशी, अबशालोमने राजाच्या सर्व मुलांना ठार केले कोणालाही त्यातून वगळले नाही. राजा दु:खाने आपले कपडे फाडून जमिनीवर पडून राहिला. राजाच्या जवळ असणाऱ्या इतर अधिकाऱ्यांनीही आपली वस्त्रे फाडली. परंतु दावीदाचा भाऊ शिमा याचा मुलगा योनादाब राजाला म्हणाला, सर्व मुले गेली असे समजू नका. फक्त अम्नोन मरण पावला आहे. अम्नोनाने तामार या आपल्या बहिणीवर बलात्कार केला तेव्हा पासूनच अबशालोमच्या डोक्यात ही योजना तयार होत होती. स्वामी, सर्व मुले मरण पावली असे कृपा करून समजू नका. फक्त अम्नोन गेला. अबशालोमने पळ काढला. नगराच्या वेशीवर एक पहारेकरी उभा होता. त्याने डोंगरापलीकडून बऱ्याच लोकांस येताना पाहिले. तेव्हा योनादाब राजाला म्हणाला, बघा मी म्हटले ते खरे आहे की नाही? हे पाहा राजपुत्र येत आहेत. योनादाबाचे बोलणे संपत आले तोच राजपुत्र समोर आले. ते सुध्दा मोठ्याने आक्रोश करत होते. दावीद आणि त्याचे आधिकारीही शोक करू लागले. रडण्याचा हलकल्लोळ उडाला. दावीद अम्नोनासाठी रोज अश्रू ढाळे. अम्मीहूरचा मुलगा तलमय गशूरचा राजा होता अबशालोम त्याच्याकडे आश्रयाला आला. मग अबशालोम गेशूरच्या राजाकडे पळून गेला, तिथे तो तीन वर्षे राहिला. राजा दावीद अम्नोनाच्या दु:खातून सावरला, पण अबशालोमच्या आठवणीने तो व्याकुळ होत असे.

सामायिक करा
२ शमुवेल 13 वाचा

२ शमुवेल 13:21-39 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

जेव्हा दावीद राजाने हे सर्व ऐकले, तेव्हा त्याला संताप आला. आणि अबशालोम अम्नोनास चांगले किंवा वाईट काहीही बोलला नाही; त्याने अम्नोनाचा तिरस्कार केला कारण त्याने त्याची बहीण तामारला बेअब्रू केले होते. दोन वर्षानंतर, जेव्हा एफ्राईमच्या सीमेवर बआल-हासोर येथे अबशालोमच्या मेंढरांची लोकर कातरणी होती, तेव्हा त्याने राजांच्या सर्व पुत्रांना तिथे येण्यास आमंत्रण दिले. अबशालोम राजाकडे गेला आणि म्हणाला, “तुमच्या सेवकाकडे मेंढ्यांची लोकर कातरणी आहे, राजा आणि त्याचे सेवक कृपा करून माझ्या सहभागी होतील काय?” राजाने उत्तर दिले, “नाही, माझ्या पुत्रा, आम्ही सर्वांनीच जाऊ नये; आम्ही तुझ्यासाठी केवळ भार होऊ.” जरी अबशालोमाने त्याला आग्रह केला, तरीही राजाने जाण्यास नकार दिला परंतु त्याने त्याला आशीर्वाद दिला. तेव्हा अबशालोम म्हणाला, “आपण येत नाही, तर माझा भाऊ अम्नोन याला आमच्याबरोबर येऊ द्या.” राजाने त्याला विचारले, “त्याने तुमच्याबरोबर का जावे?” परंतु अबशालोमाने त्याला विनंती केली, म्हणून त्याने त्याच्याबरोबर अम्नोन व बाकीच्या राजपुत्रांना पाठवले. अबशालोमाने त्याच्या माणसांना आज्ञा केली, “ऐका! जेव्हा अम्नोन द्राक्षारस पिऊन मस्त झालेला असेल आणि मी तुम्हाला सांगेन, ‘अम्नोनावर वार करा,’ तेव्हा त्याला ठार मारा. घाबरू नका. ही आज्ञा मी तुम्हाला केली नाही काय? खंबीर व्हा आणि धैर्य धरा.” तेव्हा अबशालोमने सांगितल्याप्रमाणे त्याच्या माणसांनी अम्नोनाचे केले. तेव्हा राजाचे सर्व पुत्र उठले, आपआपल्या खेचरावर बसून पळून गेले. ते त्यांच्या मार्गावर असता, दावीदाकडे निरोप आला: “अबशालोमने राजाच्या सर्व पुत्रांना मारून टाकले आहे; त्यांच्यातील एकही जिवंत राहिलेले नाही.” तेव्हा राजा उभा राहिला, आपली वस्त्रे फाडली आणि जमिनीवर पडून राहिला; आणि त्याचे सर्व सेवक त्यांची वस्त्रे फाडून राजाच्या बाजूला उभे राहिले. परंतु दावीदाचा भाऊ शिमिआह याचा पुत्र योनादाब म्हणाला “सर्वच राजपुत्रांना मारून टाकले आहे असा माझ्या धन्याने विचार करू नये; केवळ अम्नोन मरण पावला आहे. कारण अम्नोनाने त्याची बहीण तामार हिच्यावर बलात्कार केला होता, तेव्हापासून अबशालोमाने हा निश्चय केला होता. माझ्या धनीराजाने या वृत्तांताबाबतीत काळजी करू नये की, राजाची सर्व मुले मरण पावली आहेत. केवळ अम्नोन मरण पावला आहे.” तोपर्यंत अबशालोम पळून गेला होता. पहार्‍यावर असलेल्या मनुष्याने वर दृष्टी करून पाहिले आणि त्याला रस्त्याच्या पश्चिमेकडून डोंगरावरून खाली पुष्कळ लोक येताना दिसले. पहारेकर्‍याने जाऊन राजाला सांगितले, “होरोनाइमच्या दिशेकडे डोंगराच्या वरील बाजूला मला लोक दिसत आहेत.” योनादाब राजाला म्हणाला, “पाहा, राजपुत्र आले आहेत; तुमचा सेवक जसे म्हणाला तसेच घडले आहे.” त्याचे बोलणे संपताच, राजाचे पुत्र मोठ्याने आक्रोश करीत आत आले. राजा आणि त्याचे सर्व सेवक मोठ्या दुःखाने रडले. अबशालोम तिथून पळाला आणि अम्मीहूदाचा पुत्र, गशूरचा राजा तलमय याच्याकडे गेला. परंतु दावीद राजाने आपल्या पुत्रासाठी पुष्कळ दिवस शोक केला. अबशालोम तिथून पळून गशूरकडे गेला व तिथे तीन वर्ष राहिला. आणि दावीद राजाला अबशालोमकडे जाण्याची इच्छा झाली, कारण अम्नोनाच्या मृत्यूबद्दल त्याचे सांत्वन झाले होते.

सामायिक करा
२ शमुवेल 13 वाचा

२ शमुवेल 13:21-39 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ह्या सर्व गोष्टी दावीद राजाच्या कानी आल्या तेव्हा त्याला फार क्रोध आला. अबशालोम अम्मोनास बरेवाईट काही बोलला नाही; अम्मोनाने त्याची बहीण तामार भ्रष्ट केली म्हणून अबशालोमाने त्याच्याशी वैर धरले. पुरी दोन वर्षे गेल्यावर एफ्राइमानजीक बाल-हासोर गावी अबशालोमाने आपल्या मेंढरांची लोकर कातरवली; त्या वेळी सर्व राजकुमारांना आमंत्रण केले. तो राजाकडे जाऊन म्हणाला, “माझी अशी विनंती आहे की आपल्या सेवकाच्या मेंढ्यांच्या लोकरीची कातरणी आहे म्हणून राजाने आपले चाकर घेऊन ह्या सेवकाबरोबर यावे.” राजा अबशालोमाला म्हणाला, “माझ्या पुत्रा, नाही, आम्ही सर्वांनी येणे बरे नाही; आमचा भार तुझ्यावर पडू नये.” त्याने फार आग्रह केला तरी तो गेला नाही, पण त्याने त्याला आशीर्वाद दिला. मग अबशालोम म्हणाला, “आपण येत नाही तर माझा भाऊ अम्नोन ह्याला तरी आमच्याबरोबर येऊ द्या.” राजाने त्याला विचारले, “त्याने तुझ्याबरोबर का यावे?” अबशालोमाने त्याला एवढा आग्रह केला की त्याने अम्नोनास व सर्व राजकुमारांना त्याच्याबरोबर जाऊ दिले. अबशालोमाने आपल्या सर्व सेवकांना अशी ताकीद देऊन ठेवली होती की, “सावध राहा, अम्नोन द्राक्षारस पिऊन रंगात आला म्हणजे मी तुम्हांला इशारा केल्याबरोबर तुम्ही अम्नोनावर प्रहार करून त्याला ठार करा, काही भिऊ नका; मी तुम्हांला हुकूम करतो आहे ना? हिंमत धरा, शौर्य दाखवा.” अबशालोमाच्या आज्ञेप्रमाणे त्याच्या चाकरांनी अम्नोनाचे केले. तेव्हा सर्व राजकुमार उठून आपापल्या खेचरांवर बसून पळून गेले. ते वाट चालत असताना दाविदाला अशी खबर आली की, “अबशालोमाने सर्व राजकुमार मारून टाकले, त्यांतला एकही उरला नाही.” हे ऐकून दाविदाने उठून आपली वस्त्रे फाडली व जमिनीवर अंग टाकले; त्याचे सर्व सेवकही आपली वस्त्रे फाडून त्याच्याजवळ उभे राहिले. तेव्हा दाविदाचा भाऊ शिमा ह्याचा पुत्र योनादाब म्हणाला, “माझे स्वामी, सर्व राजपुत्र मरण पावले अशी कल्पना महाराजांनी मनात आणू नये; केवळ अम्नोनाचा वध झाला आहे; कारण ज्या दिवशी त्याने अबशालोमाची बहीण तामार भ्रष्ट केली त्या दिवशी त्याच्या संकल्पाने ही गोष्ट निश्‍चित झाली होती. तर आता, अहो माझे स्वामीराज, सर्व राजकुमार मरण पावले आहेत असा आपल्या मनाचा समज करून घेऊन आपण कष्टी होऊ नका; कारण केवळ अम्नोन मृत्यू पावला आहे.” इकडे अबशालोमाने पलायन केले. पहार्‍यावर असलेल्या तरुण पुरुषाने वर दृष्टी करून पाहिले तर मागल्या बाजूस पहाडाच्या वाटेने पुष्कळ लोक येत आहेत असे त्याला दिसले. तेव्हा योनादाब राजाला म्हणाला, “पाहा, राजकुमार येत आहेत; आपल्या दासाने सांगितले तेच खरे.” त्याचे बोलणे संपते न संपते तोच राजकुमार आले व गळा काढून रडू लागले; तेव्हा राजाही आपल्या सेवकांसह मोठ्याने रडू लागला. अबशालोम पळून गशूराचा राजा तलमय बिन अम्मीहूर ह्याच्याकडे गेला. दावीद आपल्या पुत्रासाठी नित्य विलाप करत राहिला. अबशालोम पळून गशूरास गेला; तेथे तो तीन वर्षे राहिला. अबशालोमाला भेटायला दावीद राजा फार आतुर झाला; कारण अम्नोन मरून बरेच दिवस झाल्यामुळे त्याचे चित्त शांत झाले होते.

सामायिक करा
२ शमुवेल 13 वाचा