२ शमुवेल 1:1-27
२ शमुवेल 1:1-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शौलाच्या मृत्यूनंतर, अमालेक्यांचा संहार करून दावीद सिकलाग नगरात येऊन दोन दिवस राहिल्यानंतर, तिसऱ्या दिवशी, तेथे एक तरुण सैनिक आला. तो शौलाच्या छावणीतील होता. त्याचे कपडे फाटलेले आणि डोके धुळीने माखलेले होते. त्याने सरळ दावीदाजवळ येऊन लोटांगण घातले. दावीदाने त्यास विचारले, “तू कोठून आलास?” आपण नुकतेच इस्राएलांच्या छावणीतून आल्याचे त्याने सांगितले. तेव्हा दावीद त्यास म्हणाला, “मग युध्दात कोणाची सरशी झाली ते सांग बरे. तो म्हणाला, लोकांनी लढाईतून पळ काढला. बरेच जण युध्दात मरण पावले व शौल आणि त्याचा मुलगा योनाथान दोघेही प्राणाला मुकले.” दावीद त्या तरुणाला म्हणाला, “शौल व त्याचा पुत्र योनाथान हेही मरण पावले आहेत हे तुला कसे कळले?” यावर तो तरुण सैनिक म्हणाला, “योगायोगाने मी गिलबोवाच्या डोंगरावरच होतो. तिथे शौल आपल्या भाल्यावर पडलेला मला दिसला. पलिष्ट्यांचे रथ आणि घोडेस्वार त्याच्या अगदी नजीक येऊन ठेपले होते. शौलाने मागे वळून पाहिले तेव्हा त्यास मी दिसलो त्याने मला बोलावले आणि मी त्याच्याजवळ गेलो. त्याने माझी चौकशी केली मी अमालेकी असल्याचे त्यास सांगितले. तेव्हा शौल म्हणाला, ‘मला अत्यंत दुखापत झाली आहे. तेव्हा मला मारून टाक. कारण मी मरणाच्या दाराशी उभा आहे.’ त्याची जखमी अवस्था पाहता तो वाचणार नाही हे दिसतच होते, तेव्हा मी त्याचा वध केला. मग त्याचा मुकुट आणि दंडावरचे आभूषण काढून घेतले. स्वामी महाराज, त्याच वस्तू येथे तुमच्यासाठी मी आणल्या आहेत.” हे ऐकून दावीदाला इतके दुःख झाले की त्या भरात त्याने आपले कपडे फाडले. त्याच्या सोबतच्या लोकांनीही त्याच्या सारखेच केले. दुःखाने त्यांनी आक्रोश केला. संध्याकाळपर्यंत त्यांनी काही खाल्ले नाही. शौल, त्याचा मुलगा योनाथान त्याचप्रमाणे परमेश्वराचे लोक म्हणजे इस्राएलाचे लोक युद्धात मृत्युमुखी पडले याबद्दल त्यांनी शोक केला. शौलाच्या मृत्युची बातमी आणणाऱ्या त्या तरुण सैनिकाला दावीदाने विचारले, “तू कुठला?” यावर तो म्हणाला, “मी अमालेकी असून एका परदेशी मनुष्याचा मुलगा आहे.” दावीदाने त्यास विचारले, “परमेश्वराने निवडलेल्या राजाचा वध करताना तुला भीती कशी वाटली नाही?” मग दावीदाने आपल्या एका तरुण सेवकाला बोलावून त्या अमालेक्याचा वध करण्यास फर्मावले. त्याप्रमाणे त्या इस्राएली तरूणाने अमालेक्याला मारले. दावीद त्यास म्हणाला, “तुझ्या मृत्यूला तूच जबाबदार आहेस. परमेश्वराच्या अभिषिक्त राजाला आपण मारले असे तू बोलून चुकला आहेस तू अपराधी आहेस. याची तूच आपल्या तोंडाने साक्ष दिली आहेस.” शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांना उद्देशून दावीदाने एक विलापगीत म्हटले. त्याने यहूद्यांना एक शोकगीत शिकवायला सांगितले हे शोकगीत धनुर्विलाप या नावाने ओळखले जाते. याशारच्या पुस्तकात हे गीत लिहिलेले आहे. “हे इस्राएला, तुझे सौंदर्य तुझ्या डोंगरावर नष्ट झाले. पाहा, हे शूर कसे धारातीर्थी पडले! ही बातमी गथमध्ये सांगू नका. अष्कलोनच्या रस्त्यांवर जाहीर करू नका. नाही तर, पलिष्ट्यांच्या त्या कन्या आनंदीत होतील. नाहीतर बेसुंत्याच्या त्या मुलींना आनंद होईल. गिलबोवाच्या डोंगरावर पाऊस किंवा दव न पडो! तिथल्या शेतातून अर्पण करण्यापुरतेही काही न उगवो! कारण शूरांच्या ढालींना तिथे गंज चढला. शौलाची ढाल तेल-पाण्यावाचून तशीच पडली. योनाथानाच्या धनुष्याने आपल्या वाटच्या शत्रुंचे पारिपत्य केले. शौलाच्या तलवारीने ही आपले बळी घेतले. रक्ताचे पाट वाहवून त्यांनी लोकांस वधिले, बलाढ्यांची हत्या केली. शौल आणि योनाथान यांनी आयुष्यभर परस्परांवर प्रेम केले. एकमेकांना आनंद दिला मृत्यूनेही त्यांची ताटातूट केली नाही. गरुडांहून ते वेगवान आणि सिंहापेक्षा बलवान् होते! इस्राएली कन्यांनो, शौलासाठी शोक करा. किरमिजी वस्त्रे त्याने तुम्हास दिली वस्त्रांवरचे सोन्याचे जरीकाम त्याने दिले. युध्दात शूर पुरुष कामी आले. गिलबोवाच्या डोंगरावर योनाथानाला मरण आले. बंधू योनाथान, मी अतिशय दुःखी असून तुझ्यासाठी फार अस्वस्थ आहे. तुझ्या सहवासाचा लाभ मला मिळाला. स्त्रियांच्या प्रेमापेक्षाही तुझे माझ्यावरील प्रेम अधिक होते. या युध्दात पराक्रमी पुरुषांचे पतन झाले त्यांची शस्त्रे नष्ट झाली.”
२ शमुवेल 1:1-27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
शौलाच्या मृत्यूनंतर, अमालेक्यांची कत्तल करून दावीद परत आला आणि सिकलाग येथे दोन दिवस राहिला. तिसर्या दिवशी शौलाच्या छावणीतून एक मनुष्य आला, त्याचे कपडे फाटलेले होते आणि डोक्यावर धूळ घातलेली होती. तेव्हा तो दावीदाकडे आला आणि जमिनीवर पालथा पडून दंडवत घातले. “तू कुठून आला आहेस?” दावीदाने त्याला विचारले. त्याने उत्तर दिले, “मी इस्राएलच्या छावणीतून निसटून पळून आलो आहे.” दावीदाने विचारले, “काय झाले आहे, ते मला सांग.” त्याने उत्तर दिले, “सैनिक युद्धातून पळून गेले, पुष्कळजण पडले आणि मरण पावले. शौल आणि त्याचा पुत्र योनाथान हे सुद्धा मरण पावले आहेत.” तेव्हा ज्या तरुणाने निरोप आणला होता त्याला दावीदाने विचारले, “शौल आणि त्याचा पुत्र योनाथान हे मरण पावले हे तुला कसे समजले?” तो तरुण मनुष्य म्हणाला, “मी सहज गिलबोआच्या डोंगरावर होतो आणि तिथे शौल त्याच्या भाल्यावर टेकलेला आणि रथाचा सारथी आणि त्यांचे स्वार जोरात त्याचा पाठलाग करीत होते असे मला दिसले. जेव्हा तो मागे वळला आणि त्याने मला पाहिले व मला बोलाविले आणि मी म्हणालो, ‘मी काय करू शकतो?’ “त्याने मला विचारले, ‘तू कोण आहेस?’ “ ‘मी अमालेकी आहे.’ मी उत्तर दिले. “तेव्हा तो मला म्हणाला, ‘येथे माझ्या बाजूला उभा राहा आणि मला मारून टाक! मी मृत्यूच्या यातनेत आहे, परंतु अजूनही मी जिवंतच आहे.’ “तेव्हा मी त्याच्या बाजूला उभा राहिलो आणि त्याला मारून टाकले, कारण मला माहीत होते की, भाल्यावर पडल्याने तो जगू शकला नसता. आणि जो राजमुकुट त्याच्या डोक्यावर होता आणि त्याच्या बाहुंवरचा कडा मी येथे माझ्या धन्याजवळ आणले आहेत.” तेव्हा दावीदाने आणि त्याच्या बरोबरच्या माणसांनी आपली वस्त्रे धरली व फाडली. शौल आणि त्याचा पुत्र योनाथान आणि याहवेहचे सैन्य आणि इस्राएली राष्ट्र यांच्यासाठी त्यांनी शोक केला आणि ते रडले आणि संध्याकाळपर्यंत उपास केला कारण ते तलवारीने मारले गेले होते. नंतर दावीदाने बातमी घेऊन आलेल्या मनुष्याला विचारले, “तू कुठला आहेस?” त्याने उत्तर दिले, “मी एका परदेशी मनुष्याचा पुत्र, एक अमालेकी आहे.” दावीदाने त्याला विचारले, “याहवेहच्या अभिषिक्ताचा नाश करण्यासाठी तुझा हात उचलताना तुला भीती कशी वाटली नाही?” तेव्हा दावीदाने त्याच्या माणसांतील एकाला बोलाविले आणि म्हटले, “जा, त्याला मारून टाक!” तेव्हा त्याने त्याच्यावर वार केला आणि तो मनुष्य मरण पावला. कारण दावीद त्याला म्हणाला होता, “तुझ्या रक्ताचा दोष तुझ्याच डोक्यावर असो. जेव्हा तू असे म्हणालास की, ‘मी याहवेहच्या अभिषिक्ताला ठार मारले आहे,’ तुझ्या स्वतःच्या तोंडाने स्वतःविरुद्ध साक्ष दिली आहे.” शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्याविषयी दावीदाने हे विलापगीत रचले, आणि यहूदीयाच्या लोकांना हे धनुष्याचे विलापगीत शिकविले जावे असा आदेश दिला (ते याशेरच्या पुस्तकात लिहिलेले आहे): “हे इस्राएला, तुझ्या डोंगरांवर जसे एक चपळ हरिण मरून पडते, तसे शूरवीर पडले आहेत! “गथमध्ये हे सांगू नका, अष्कलोनच्या रस्त्यांवर याची घोषणा करू नका, नाहीतर पलिष्ट्यांच्या कन्या हर्ष पावतील, बेसुंत्यांच्या कन्या आनंद करतील. “गिलबोआच्या डोंगरांनो, तुम्हावर दव किंवा पाऊस न येवो; तुमच्या उतरणीच्या शेतांवर पावसाच्या सरी न पडोत. कारण तिथे शूरवीराची ढाल तिरस्कृत झाली, शौलाची ढाल—यापुढे तेलाने पुसली जाणार नाही. “वध केलेल्यांच्या रक्तापासून शूरवीरांच्या मांसापासून योनाथानचा बाण मागे फिरला नाही, शौलाची तलवार असमाधानाने परत आली नाही. शौल आणि योनाथान, जिवंत असता प्रिय व आवडते होते, मृत्यूमध्येही त्यांचा वियोग झाला नाही. ते गरुडांपेक्षा वेगवान होते, सिंहांपेक्षा बलवान असे होते. “अहो, इस्राएलच्या कन्यांनो, शौलासाठी रुदन करा, ज्यांनी तुम्हाला किरमिजी रंगाची आणि भरजरीत कपडे घातली, ज्यांनी तुमची वस्त्रे सोन्याच्या अलंकारांनी सुशोभित केली. “हे बलवान युद्धात कसे पडले! योनाथान तुमच्या डोंगरावर मारला गेला आहे. योनाथान माझ्या भावा, मी तुझ्यासाठी शोक करतो; तू मला फार प्रिय होतास. माझ्यावरील तुझे प्रेम अद्भुत असे होते, स्त्रीच्या प्रेमापेक्षा ते अधिक अद्भुत होते! “पाहा, बलवान कसे पडले आहेत! युद्धाची शस्त्रे नष्ट झाली आहेत!”
२ शमुवेल 1:1-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
शौलाच्या मृत्यूनंतर दावीद अमालेक्यांचा संहार करून परत सिकलाग येथे दोन दिवस राहिला; ह्यानंतर तिसर्या दिवशी छावणीतून शौल होता तेथून एक माणूस आला; त्याने आपले कपडे फाडले होते व डोक्यात धूळ घातली होती. तो दाविदाजवळ येऊन पोहचल्यावर त्याने त्याला साष्टांग दंडवत घातले. दाविदाने त्याला विचारले, “तू कोठून आलास?” तो त्याला म्हणाला, “मी इस्राएलाच्या छावणीतून निभावून आलो आहे.” दाविदाने त्याला विचारले, “कसे काय वर्तमान आहे ते मला सांग बरे.” तो म्हणाला, “लोक रणभूमीवरून पळाले, पुष्कळ लोक पडले व प्राणास मुकले; शौल व त्याचा पुत्र योनाथान हेही प्राणास मुकले.” दाविदाने बातमी आणणार्या त्या तरुणाला विचारले, “शौल व त्याचा पुत्र योनाथान हे मेले हे तुला कशावरून कळले?” तो बातमी आणणारा तरुण म्हणाला, “मी सहज गिलबोवाच्या डोंगरात फिरत असता शौल आपल्या भाल्यावर टेकलेला आहे आणि रथ व स्वार त्याच्या पाठीशी येऊन अगदी भिडले आहेत असे मला दिसले. शौलाने मागे पाहिले तो मी त्याला दिसलो आणि त्याने मला हाक मारली; तेव्हा मी म्हणालो, ‘काय आज्ञा?’ तो मला म्हणाला, ‘तू कोण आहेस?’ मी त्याला म्हणालो, ‘मी अमालेकी आहे.’ तो मला म्हणाला, ‘माझ्याजवळ उभा राहून माझा वध कर; मला यातना होत आहेत तरी माझा प्राण अद्यापि कायमच आहे.’ तेव्हा मी त्याच्याजवळ उभे राहून त्याचा वध केला, कारण त्याचे असे पतन झाल्यावर तो वाचणार नाही अशी माझी खात्री झाली होती. मी त्याच्या मस्तकावरचा मुकुट व त्याची बाहुभूषणे काढून येथे माझ्या स्वामीजवळ आणली आहेत.” हे ऐकून दाविदाने आपली वस्त्रे धरून फाडली आणि जितके लोक त्याच्याबरोबर होते त्यांनीही तसेच केले. शौल, त्याचा पुत्र योनाथान, परमेश्वराचे लोक आणि इस्राएलाचे घराणे हे सर्व तलवारीने पडले म्हणून त्यांच्याबद्दल त्यांनी शोक केला, विलाप केला आणि संध्याकाळपर्यंत ते उपाशी राहिले. मग दाविदाने आपल्याला बातमी देणार्या त्या तरुण मनुष्याला विचारले, “तू कोठला?” तो म्हणाला, “मी एका परदेशीयाचा पुत्र आहे, मी अमालेकी आहे.” दावीद त्याला म्हणाला, “परमेश्वराच्या अभिषिक्ताचा वध करायला हात चालवण्याची तुला भीती कशी नाही वाटली?” दाविदाने एका तरुणाला बोलावून सांगितले, “जवळ जाऊन त्याच्यावर हल्ला कर.” त्याने त्याच्यावर असा वार केला की तो मेलाच. दावीद त्याला म्हणाला, “तुझा रक्तपात तुझ्याच माथी असो; परमेश्वराच्या अभिषिक्ताचा मी वध केला असे म्हटल्याने तुझ्याच मुखाने तुझ्याविरुद्ध साक्ष दिली आहे.” मग दाविदाने शौल व त्याचा पुत्र योनाथान ह्यांच्यासंबंधाने पुढील विलापगीत गाईले; आणि हे धनुष्य नामक गीत यहूद्यांना शिकवण्याची आज्ञा केली; पाहा, हे गीत याशाराच्या पुस्तकात लिहिलेले आहे : “हे इस्राएला, तुझा शिरोमणी उच्च स्थानी वधला आहे. बलाढ्य पाहा कसे पतन पावले आहेत! गथात हे सांगू नका, अष्कलोनच्या आळ्यांत हे जाहीर करू नका; पलिष्ट्यांच्या कन्या आनंदित होतील, बेसुंत्यांच्या कन्या जयघोष करतील; असे न होवो. गिलबोवाच्या डोंगरांनो, तुमच्यावर दहिवर न पडो, पर्जन्यवृष्टी न होवो नजराणा म्हणून देण्यास तुमच्यासाठी अर्पणयोग्य शेते न होवोत. कारण तेथे पराक्रम्यांची ढाल भ्रष्ट झाली आहे, शौलाची ढाल तैलाभ्यंगावाचून भ्रष्ट होऊन पडली आहे. वधलेल्यांचे रक्त प्राशन केल्यावाचून व बलाढ्यांचे मांदे भक्षण केल्यावाचून योनाथानाचे धनुष्य कधी परत येत नसे, शौलाची तलवार कधी रिकामी परतत नसे. शौल व योनाथान प्रेमळ व मनमिळाऊ असत; जीवनात व मरणात त्यांचा वियोग झाला नाही. ते गरुडाहून वेगवान व सिंहाहून बलवान होते. इस्राएली कन्यांनो, शौलासाठी रुदन करा; तो तुम्हांला किरमिजी वस्त्रे लेववून शृंगारित असे; तो तुमच्या वस्त्रांवर सोन्याचे अलंकार घालीत असे. रणभूमीवर बलाढ्य पाहा कसे पतन पावले आहेत! योनाथाना, तू उच्च स्थानी वधला गेला आहेस! माझ्या बंधो, योनाथाना, मी तुझ्याकरिता विव्हळ होत आहे. तू माझ्यावर फार माया करत असायचास. तुझे माझ्यावर विलक्षण प्रेम होते, स्त्रियांच्या प्रेमाहूनही ते अधिक होते. बलाढ्य पाहा कसे पतन पावले आहेत! युद्धाची शस्त्रे कशी नाश पावली आहेत!”