२ राजे 19:14-19
२ राजे 19:14-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हिज्कीयाने जासूदांच्या हातून पत्र घेऊन ते वाचले. मग परमेश्वराच्या मंदिरात जाऊन परमेश्वरापुढे ते उघडून ठेवले. परमेश्वराची प्रार्थना करून हिज्कीया म्हणाला. “परमेश्वर देवा, करुबांच्यावर राजासनी बसणारा तूच इस्राएलचा देव आहेस. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राज्यांचा तू आणि एकमेव तूच नियंता आहेस. आकाश आणि पृथ्वीचा तू निर्माता आहेस, परमेश्वरा, माझे म्हणणे ऐक आपले डोळे उघड आणि हे पत्र पाहा. सन्हेरीबची जिवंत परमेश्वराचा अवमान करणारी वचने पाहा. खरोखरच परमेश्वराचा अवमान करणारी वचने पाहा. खरोखरच परमेश्वरा असे घडले आहे. अश्शूरच्या राजाने ही सर्व राष्ट्रे नामशेष केली आहेत. तिथले दैवत त्याने आगीच्या भक्ष्यस्थानी टाकले. पण ते काही खरे देव नव्हते. मनुष्याने केलेल्या लाकडाच्या आणि दगडाच्या मूर्ती होत्या. म्हणून तर अश्शूरच्या राजाला त्या नष्ट करता आल्या. तेव्हा परमेश्वर देवा आता आम्हास या राजापासून वाचव. म्हणजे तूच खरा परमेश्वर आहेस हे जगातील सर्व राजांना कळेल.”
२ राजे 19:14-19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हिज्कीयाहला दूताद्वारे पत्र मिळाले आणि त्याने ते वाचले. त्यानंतर त्याने जाऊन याहवेहच्या मंदिरात याहवेहसमोर ते उघडून ठेवले. आणि हिज्कीयाहने याहवेहला प्रार्थना केली: “अहो याहवेह इस्राएलांचे परमेश्वर, करुबांच्या सिंहासनावर आरूढ असलेल्या परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांचे तुम्ही एकमेव परमेश्वर आहात. स्वर्ग व पृथ्वी तुम्हीच उत्पन्न केली आहे. हे याहवेह, आपले कान लावा आणि ऐका; याहवेह, आपले डोळे उघडा आणि पाहा; आणि जिवंत परमेश्वराचा उपहास करण्यास पाठविलेले सन्हेरीबचे शब्द ऐका. “हे याहवेह, हे खरे आहे की अश्शूरच्या राजांनी या राष्ट्रांचा आणि त्यांच्या भूमीचा नाश केला आहे. आणि त्यांनी त्यांची दैवते अग्नीत फेकून दिली आहेत, कारण त्या मूर्ती परमेश्वर नव्हत्या. ते तर मनुष्याने घडविलेले लाकूड आणि दगड होते. आता हे याहवेह, आमच्या परमेश्वरा, त्याच्या तावडीतून आम्हाला सोडवा, म्हणजे याहवेह केवळ तुम्हीच परमेश्वर आहात, हे पृथ्वीवरील सर्व राज्यांना कळेल.”
२ राजे 19:14-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हिज्कीयाने जासुदांच्या हातून हे पत्र घेऊन वाचले; मग हिज्कीया परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि ते त्याने परमेश्वरापुढे उघडून ठेवले. हिज्कीयाने परमेश्वराची प्रार्थना केली की, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, करूबारूढ असलेल्या देवा, तूच काय तो पृथ्वीवरील सर्व राज्यांचा देव आहेस; तूच आकाश व पृथ्वी ही निर्माण केली. हे परमेश्वरा, कान लावून ऐक; हे परमेश्वरा, तू डोळे उघडून पाहा आणि सन्हेरिबाने तुझा म्हणजे जिवंत देवाचा उपमर्द करण्यासाठी जो निरोप पाठवला आहे त्याचे शब्द ऐक. हे परमेश्वरा, खरोखर अश्शूराच्या राजांनी सर्व राष्ट्रे व त्यांच्या जमिनी ओसाड केल्या आहेत; त्यांचे देव त्यांनी अग्नीत टाकले आहेत; कारण ते देव नव्हते, ते माणसांच्या हातांनी घडलेले काष्ठ व पाषाण होते म्हणून त्यांनी त्यांचा नाश केला. आता परमेश्वरा, आमच्या देवा, त्याच्या हातातून आम्हांला सोडव, म्हणजे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे जाणतील की तूच काय तो परमेश्वर देव आहेस.”