२ करिंथ 12:11-21
२ करिंथ 12:11-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी मूढ बनलो, असे बनण्यास तुम्ही मला भाग पाडले; तुम्ही माझ्याविषयी खातरी द्यायला पाहिजे होती कारण मी काहीच नसलो, तरी त्या अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा मी कोणत्याही गोष्टीत कमी नाही. चिन्हे, अद्भूते व सामर्थ्याची कृत्ये यांच्या योगाने खऱ्या प्रेषितांची चिन्हे खरोखरच सर्व सहनशीलतेने तुम्हामध्ये घडविण्यात आली. कारण मी आपला भार तुम्हावर टाकला नाही, या एका गोष्टीशिवाय तुम्ही दुसर्या कोणत्या गोष्टीत दुसर्या मंडळ्यांपेक्षा कमी आहात? मला या अपराधाची क्षमा करा. बघा, मी तिसर्या वेळी तुमच्याकडे येण्यास तयार आहे आणि तुमच्यावर भार घालणार नाही; कारण मी तुमच्यापासून काही मिळवू पाहत नाही, तर मी तुम्हास मिळवू पाहतो कारण मुलांनी आई-वडीलांसाठी साठवू नये पण आई-वडीलांनी मुलांसाठी साठवले पाहिजे. मी तुमच्या जीवांसाठी फार आनंदाने खर्च करीन आणि स्वतः सर्वस्व खर्ची पडेन. मी तुमच्यावर अतिशयच प्रीती करतो म्हणून तुम्ही माझ्यावर कमी प्रीती करता की काय? असो, मी तुमच्यावर भार घातला नाही, पण मी धूर्त असल्यामुळे मी तुम्हास युक्तीने धरले. मी तुमच्यासाठी ज्यांना पाठवले अशा कोणाकडून मी तुमचा फायदा घेतला काय? मी तीताला विनंती केली आहे आणि मी एका बंधूला त्याच्याबरोबर पाठवत आहे. तीताने तुमच्याकडून फायदा मिळवला काय? आम्ही एकाच आत्म्याने चाललो नाही काय? एकाच चालीने चाललो नाही काय? तुम्हास इतका वेळ वाटत असेल की आम्ही तुमच्यापुढे आमचे समर्थन करीत आहोत, आम्ही देवासमोर ख्रिस्ताच्या ठायी बोलत आहो आणि प्रियांनो या सर्व गोष्टी तुमच्या उन्नतीसाठी आहेत. कारण मला भीती वाटते की, मी येईन तेव्हा, मी अपेक्षा करीत असेन तसे, कदाचित्, तुम्ही मला आढळणार नाही; आणि तुम्ही अपेक्षा करणार नाही असा मी तुम्हास आढळेन. कदाचित्, तुमच्यात कलह, ईर्ष्या, राग, विरोध, स्वार्थी महत्त्वकांक्षा, कुरकुरी, गर्व, अफवा व गोंधळ मला आढळून येतील. किंवा मी पुन्हा येईन तेव्हा माझा देव तुमच्यासमोर मला लीन करील आणि ज्यांनी पाप केले असून आपण केलेल्या अमंगळपणाचा, व्यभिचाराचा व कामातुरपणाचा ज्यांनी पश्चात्ताप केलेला नाही अशा पुष्कळ जणांसाठी मला शोक करावा लागेल.
२ करिंथ 12:11-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अशा रीतीने प्रौढी मिरवायला लावून, मी स्वतःला मूर्ख बनविले आहे आणि तुम्ही मला तसे वागायला भाग पाडले आहे. खरेतर तुम्ही माझी प्रशंसा करावयास पाहिजे होती, जरी मी तुच्छ असलो तरी त्या “उच्च प्रेषितांच्या” तुलनेत मी कमी नाही. मी तुमच्याबरोबर राहत असताना मी निश्चित प्रेषित आहे, याचा पुरावा धीराने तुमच्यामध्ये अनेक चमत्कार, चिन्हे आणि महत्कृत्ये केली यामधून दिसून येते. मी माझे ओझे तुमच्यावर टाकले नाही तर इतर मंडळ्यांच्या तुलनेत कोणत्या गोष्टीत तुम्ही कमी भरला? या चुकीबद्दल तुम्ही मला कृपा करून क्षमा करा! आता मी तिसर्यांदा तुमच्या भेटीला येण्याची तयारी करत आहे; आणि मी तुम्हावर ओझे होणार नाही, कारण मला तुमची संपत्ती नको परंतु तुम्ही हवे आहात. तसे पाहिले तर, मुलांनी आपल्या आईवडिलांसाठी संचय करण्याची गरज नाही तर उलट आईवडिलांनीच आपल्या मुलांसाठी करावे. मी तुम्हासाठी जे काही आहे ते आनंदाने सर्व खर्च करण्यासाठी तयार आहे आणि मला स्वतःसही खर्च करण्यास तयार आहे. जर मी तुमच्यावर अधिक प्रीती करतो, तर तुम्ही माझ्यावर कमी प्रीती करता का? काही असो, मी तुमच्यावर ओझे झालो नाही. तरीही, मी धूर्त आहे आणि मी आपल्याला फसविले असे तुम्हाला वाटते का? ज्या लोकांना मी तुमच्याकडे पाठविले त्यांच्याद्वारे मी तुमचा गैरफायदा घेतला का? तीताला मी विनंती करून तुमच्या भेटीला पाठविले आणि त्याच्याबरोबर आमच्या भावाला पाठविले, तीताने तुमचा गैरफायदा घेतला का? कारण आम्ही एकाच आत्म्याच्या सारख्याच पावलांवर पाऊल टाकून चाललो नाही का? आम्ही स्वतःच्या बचावासाठी हे करतो असे तुम्हाला वाटते का? आम्ही परमेश्वराच्या दृष्टीने जे ख्रिस्तामध्ये आहेत त्यांच्याशी बोलत आहोत. प्रिय मित्रांनो, जे काही आम्ही करतो ते तुमच्या वृद्धीसाठी आहे. कारण मला अशी भीती वाटते की जेव्हा मी येईन, तेव्हा तुम्ही मला जसे पाहिजे तसे आढळणार नाही, आणि जसा तुम्हाला पाहिजे तसा मी तुम्हाला आढळणार नाही. मला भीती वाटते की तुम्हामध्ये भांडणे, द्वेष, राग, स्वार्थी आकांक्षा, निंदा, चहाड्या, आढ्यता आणि अव्यवस्था यांनी भरलेले असे आढळाल. होय, मला वाटते की मी पुन्हा आलो की माझा परमेश्वर मला तुमच्यापुढे नम्र करेल आणि ज्या अनेकांनी पूर्वी पाप केलेले आहे आणि आपल्या हातून घडलेल्या अशुद्धता, लैंगिक पाप व कामातुरपणा, या गोष्टींबद्दल पश्चात्ताप केला नाही त्याबद्दल मला दुःख करावे लागेल.
२ करिंथ 12:11-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी मूढ बनलो! असे बनण्यास तुम्ही मला भाग पाडले; माझी शिफारस तुम्ही करायची होती; कारण जरी मी काही नसलो तरी ह्या अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा मी किंचितही उणा नव्हतो. चिन्हे, अद्भुते व महत्कृत्ये ह्यांच्या योगे तुमच्यामध्ये प्रेषिताने करायची चिन्हे पूर्ण धीराने करून दाखवण्यात आली. कारण मी आपला भार तुमच्यावर टाकला नाही, ह्याखेरीज कोणत्या गोष्टीत इतर मंडळ्यांपेक्षा तुम्ही कमी ठरलात? माझ्या ह्या अपराधाची क्षमा करा. पाहा, तिसर्यांदा तुमच्याकडे येण्यास मी तयार आहे; आणि मी तुमच्यावर भार टाकणार नाही; कारण मी तुमचे काही मागत नाही, तर स्वतः तुम्हीच मला पाहिजे आहात; आईबापांनी मुलांसाठी संग्रह केला पाहिजे, मुलांनी आईबापांसाठी नव्हे. मी तुमच्या जिवांसाठी फार आनंदाने खर्च करीन व मी स्वत: सर्वस्वी खर्ची पडेन. मी तुमच्यावर अतिशयच प्रीती करतो म्हणून तुम्ही माझ्यावर कमी प्रीती करता की काय? असो, मी तुमच्यावर भार घातला नाही; तरी तुम्ही म्हणता मी धूर्त होतो म्हणून तुम्हांला कपटाने पकडले. ज्यांना मी तुमच्याकडे पाठवले त्यांच्यातील एकाच्या द्वारे तरी मी तुमचा गैरफायदा घेतला काय? मी तीतास विनंती केली, व त्याच्याबरोबर एका बंधूला पाठवले. तीताने तुमचा गैरफायदा घेतला काय? आम्ही एकाच आत्म्याने, सारख्याच चालीने चाललो नाही काय? तुमच्याशी आम्ही प्रतिवाद करत आहोत असे इतका वेळ तुम्हांला वाटले असेल; पण आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठायी बोलत आहोत. प्रियजनहो, हे सर्व तुमच्या उन्नतीसाठी आहे. कारण मला भीती वाटते की, मी आल्यावर, जशी माझी अपेक्षा आहे तसे कदाचित तुम्ही मला दिसून येणार नाही, आणि तुमची अपेक्षा नाही तसा मी तुम्हांला दिसून येईन; कदाचित भांडणतंटे, ईर्ष्या, राग, तट, चहाड्या, कानगोष्टी, रुसणेफुगणे, अव्यवस्था ही मला आढळून येतील. मला भीती वाटते की, मी पुन्हा आल्यावर माझा देव मला तुमच्यापुढे खाली पाहायला लावील; आणि ज्यांनी पूर्वी पाप करून आपण आचरलेल्या अशुद्धपणाचा, जारकर्माचा व कामातुरपणाचा पश्चात्ताप केला नाही, अशा पुष्कळ लोकांविषयी मला शोक करावा लागेल.
२ करिंथ 12:11-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मी मूढ बनलो. असे बनण्यास तुम्ही मला भाग पाडले. माझी शिफारस तुम्ही करावयाची होती; कारण जरी मी काही नसलो तरी ह्या परमश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा मी किंचितही हलक्या दर्जाचा नाही. खऱ्या प्रेषिताची चिन्हे, अद्भूत कृत्ये व महत्कृत्ये तुमच्यामध्ये अत्यंतिक धीराने करून दाखविण्यात आली. मी आपला आर्थिक भार तुमच्यावर लादला नाही, ही बाब सोडली तर इतर ख्रिस्तमंडळ्यांपेक्षा तुमची दुरावस्था झाली काय? माझ्या ह्या दुष्कृत्याबद्दल मला क्षमा करा! पाहा, तिसऱ्यांदा तुमच्याकडे येण्यास मी तयार आहे. मी तुमच्यावर भार टाकणार नाही, मी तुमचे काही मागत नाही, तर स्वतः तुम्हीच मला पाहिजे आहात. आईबापांनी मुलांसाठी संग्रह केला पाहिजे, मुलांनी आईबापांसाठी नव्हे. मी तुमच्या जिवासाठी फार आनंदाने खर्च करीन व मी स्वतः सर्वस्वी खर्ची पडेन. मी तुमच्यावर फारच प्रीती करतो म्हणून तुम्ही माझ्यावर कमी प्रीती करता की काय? तर मग तुम्ही हे मान्य कराल की, मी तुमच्यावर भार घातला नाही, परंतु एखादा म्हणेल मी धूर्त होतो म्हणून तुम्हांला खोटारडेपणाने पकडले. कसे? ज्यांना मी तुमच्याकडे पाठवले त्यांच्यातील एकाद्वारे तरी मी तुमचा गैरफायदा घेतला काय? मी तीताला तुमच्याकडे येण्याची विनंती केली, व त्याच्याबरोबर एका बांधवाला पाठवले. तीताने तुमचा गैरफायदा घेतला, असे तुम्ही म्हणाल काय? आम्ही दोघे सारख्याच हेतूंनी कार्य करीत नव्हतो काय? सारख्याच पद्धतीने वागत नव्हतो काय? कदाचित आम्ही स्वतःचे समर्थन करीत आहोत, असे इतका वेळ तुम्हांला वाटले असेल. नाही! आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताला अनुसरून बोलत आहोत. प्रियजनहो, हे सर्व तुमच्या उभारणीसाठी आहे. मला भीती वाटते की, मी आल्यावर जशी माझी अपेक्षा आहे, तसे कदाचित तुम्ही मला दिसून येणार नाही आणि तुमची अपेक्षा नाही, तसा मी तुम्हांला दिसून येईन. कदाचित भांडणतंटे, मत्सर, राग, स्वार्थी वृत्ती, निंदानालस्ती, गप्पाटप्पा, घमेंड व गैरवागणूक हे सारे मला आढळून येईल. मला भीती वाटते की, मी पुन्हा आल्यावर माझा देव मला तुमच्यापुढे खाली पाहावयास लावील आणि ज्यांनी पूर्वी पाप करून आपण केलेल्या अनैतिक गोष्टींचा, जारकर्माचा व कामातुरपणाचा पश्चात्ताप केला नाही, अशा पुष्कळ लोकांविषयी मला अश्रू ढाळावे लागतील.