YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ इतिहास 24:1-27

२ इतिहास 24:1-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

योवाश राजा झाला तेव्हा सात वर्षांचा होता. त्याने यरूशलेमामध्ये चाळीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव सिब्या. ही बैर-शेबा नगरातली होती. यहोयादा हयात असेपर्यंत योवाशाची वागणूक परमेश्वराच्या दृष्टीने उचित अशी होती. यहोयादाने योवाशाला दोन पत्नी करून दिल्या. त्यास अपत्ये झाली. पुढे योवाशाने परमेश्वराच्या मंदिराची पुन्हा उभारणी करण्याचे ठरवले. तेव्हा त्याने याजक आणि लेवी यांना बोलवून घेतले आणि त्यांना तो म्हणाला, “यहूदामधील सर्व गावांमध्ये जा आणि इस्राएल लोकांकडून पैसे जमा करा. त्या पैशातून देवाच्या मंदिराच्या दुरुस्तीचे काम हाती घ्या.” या कामाला विलंब लावू नका पण लेवींनी याबाबतीत तप्तरता दाखवली नाही. तेव्हा राजा योवाशाने मुख्य याजक यहोयादा याला बोलावून घेतले आणि विचारले की, “लेवीना तू यहूदा आणि यरूशलेमेतून कर गोळा करायला का लावले नाहीस? परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्राएली लोक यांनी हा कर आज्ञापटाच्या तंबूसाठी म्हणून वापरलेला आहे.” पूर्वी अथल्याच्या पुत्रांनी परमेश्वराच्या मंदिरात घुसून तिथल्या पवित्र वस्तू बआल दैवतांच्या पूजेसाठी वापरल्या होत्या. अथल्या ही एक दुष्ट स्त्री होती. राजा योवाशाच्या आज्ञेवरुन एक पेटी तयार करून ती परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशी ठेवण्यात आली. लेवींनी मग यहूदा व यरूशलेमेमध्ये ते जाहीर केले. परमेश्वरासाठी बसवलेला कर भरायला त्यांनी लोकांस सांगितले. इस्राएल लोक वाळवंटात असताना परमेश्वराचा सेवक मोशे याने तो इस्राएल लोकांवर बसवला होता. तेव्हा अधिकाऱ्यांनी आणि लोकांनी मोठ्या आनंदाने कर आणून पेटीत जमा केला. पेटी भरेपर्यंत ते पैसे देत गेले. पेटी भरली की लेवी राजाच्या कारभाऱ्यांकडे ती जमा करत. पैशाने भरलेली ती पेटी पाहून राजाचे सचिव आणि मुख्य याजकाचा कारभारी येऊन त्यातले पैसे काढून घेत. पेटी पुन्हा पहिल्या जागी नेऊन ठेवली जाई. असे अनेकदा होऊन मुबलक पैसा जमा झाला. राजा योवाश आणि यहोयादा यांनी मग ही रक्कम परमेश्वराच्या मंदिराचे काम करणाऱ्यांच्या हवाली केली. या लोकांनी परमेश्वराच्या मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी कसबी सुतार, कोरीव काम करणारे, लोखंड, पितळ या धातूचे काम करणारे कारागीर यांना मजुरीवर कामाला घेतले. या कामावर देखरेख करणारे लोक अतिशय विश्वासू होते. परमेश्वराच्या मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम पूर्ण झाले. देवाचे मंदिर पुन्हा पूर्वीसारखेच नीटनेटके आणि पहिल्यापेक्षा भक्कम झाले. कारागिरांचे काम आटोपल्यावर उरलेली रक्कम त्यांनी योवाश आणि यहोयादा यांना आणून दिली. त्या पैशातून परमेश्वराच्या मंदिरातील सेवेची उपकरणे आणि होमबलीसाठी वापरायची पात्रे बनविण्यात आली. त्यांनी याव्यतिरिक्त सोन्यारुप्याचे कटोरे व इतर पात्रे तयार केली. या परमेश्वराच्या मंदिरात यहोयाद जिवंत असेपर्यंत याजक दररोज होमबली अर्पण करत असत. पुढे यहोयादा वयोवृध्द झाला. तो दीर्घायुषी होऊन मरण पावला. मृत्युवेळी त्याचे वय एकशेतीस वर्षे इतके होते. दावीद नगरात इतर राजांच्या कबरी शेजारीच लोकांनी त्याचे दफन केले. देवासाठी आणि त्याच्या मंदिरासाठी त्याने इस्राएलमध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्या हयातीत केल्या म्हणून लोकांनी त्याचे याठिकाणी दफन केले. यहोयादा मरण पावल्यावर यहूदाच्या सरदारांनी राजा योवाशाला येऊन मुजरा केला. राजाने त्याचे ऐकून घेतले. पुढे राजा आणि हे सरदार यांनी परमेश्वर देवाच्या मंदिराचा त्याग केला. त्यांचे पूर्वज या परमेश्वर देवाला शरण गेले होते पण यांनी अशेरा देवीचे खांब आणि इतर मूर्ती यांची पूजा सुरु केली. राजा आणि सरदार यांच्या या अपराधांमुळे यहूदा आणि यरूशलेमेच्या लोकांवर देवाचा कोप झाला. लोकांस परत आपल्याकडे वळवायला परमेश्वराने त्यांच्याकडे संदेष्ट्यांना पाठवले, संदेष्ट्यांनी लोकांस परमेश्वराच्या क्रोधाची पूर्वकल्पना दिली पण लोक ऐकेनात. तेव्हा जखऱ्यामध्ये परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला. जखऱ्या हा यहोयादा या याजकाचा पुत्र. जखऱ्या लोकांपुढे उभा राहून म्हणाला, देव म्हणतो, “तुम्ही परमेश्वराच्या आज्ञांचे उल्लंघन का करता? तुम्हास यश येणार नाही. तुम्ही परमेश्वराचा त्याग केलात. आता परमेश्वरही तुम्हास सोडून देत आहे.” पण लोकांनी जखऱ्याविरुध्द कट केला. राजाने लोकांस जखऱ्याचा वध करण्याचा हुकूम दिला. तेव्हा लोकांनी त्यास दगडफेक करून मारले. हे त्यांनी परमेश्वराच्या मंदिराच्या दालनातच केले. जखऱ्याचे पिता यहोयादा यांनी दाखवलेले सौजन्य राजा योवाश विसरला. यहोयादाचा पुत्र जखऱ्या याला राजाने ठार केले. जखऱ्या मृत्यूपूर्वी म्हणाला, “हे पाहून परमेश्वर तुला शासन करो.” वर्ष अखेरीला अरामाच्या सैन्याने योवाशावर हल्ला केला. यहूदा आणि यरूशलेमेवर हल्ला करून त्यांनी सर्व सरदारांची हत्या केली. तेथील सर्व धन लुटून त्यांनी ते दिमिष्काच्या राजाकडे पाठवले. अराम्यांच्या सैन्यात फार थोडे लोक होते तरी यहूदाच्या मोठ्या सेनेवर परमेश्वराने त्यांना विजय मिळवून दिला. आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा यहूदा लोकांनी त्याग केल्यामुळे परमेश्वराने योवाशाला हे शासन केले. अरामी सेना योवाशाला घायाळ अवस्थेत सोडून गेले तेव्हा योवाशाच्या सेवकांनीच त्याच्याविरुध्द कट केला. यहोयादा या याजकाच्या पुत्राला, जखऱ्याला योवाशाने जीवे मारल्यामुळे ते या कारस्थानाला प्रवृत्त झाले. योवाशाला त्यांनी त्याच्या शय्येवरच ठार केले. दावीद नगरात लोकांनी त्यास मूठमाती दिली. पण राजांच्या दफन भूमीत त्याचे दफन केले नाही. जाबाद आणि यहोजाबाद हे ते फितूर सेवक. जाबादच्या आईचे नाव शिमथ. ही अम्मोनची होती. यहोजाबादाच्या आईचे नाव शिम्रिथ. ही मवाबी होती. योवाशाचे पुत्र, त्यास दिलेली मोठी शिक्षा आणि त्याने केलेला देवाच्या मंदिराचा जीर्णोध्दार याविषयी राजांच्या बखरीत राजाविषयी लिहिले आहे. योवाशाचा पुत्र अमस्या हा त्यानंतर राजा झाला.

सामायिक करा
२ इतिहास 24 वाचा

२ इतिहास 24:1-27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

जेव्हा योआश राजा झाला तेव्हा तो सात वर्षांचा होता. आणि त्याने चाळीस वर्षे यरुशलेममध्ये राज्य केले. त्याच्या आईचे नाव सिबियाह होते; ती बेअर-शेबा येथील होती. यहोयादा याजकाच्या सर्व वर्षांमध्ये योआशाने याहवेहच्या दृष्टीने जे योग्य होते तेच केले. यहोयादाने त्याच्यासाठी दोन पत्नींची निवड केली आणि त्याला पुत्र व कन्या झाल्या. काही काळानंतर योआशाने याहवेहच्या मंदिराची दुरुस्ती करण्याचे ठरविले. त्याने याजकांना आणि लेवींना एकत्र बोलाविले आणि त्यांना सांगितले, “यहूदीयाच्या गावांकडे जा आणि तुमच्या परमेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी सर्व इस्राएल लोकांकडून वार्षिक देय रक्कम गोळा करा. आताच हे करा.” परंतु लेवी लोकांनी त्यावर तत्काळ हालचाल केली नाही. तेव्हा राजाने मुख्य याजक यहोयादा याला बोलावून घेतले आणि त्याला म्हणाला, “याहवेहचा सेवक मोशे आणि इस्राएलच्या सभेचे लोक यांनी लावलेला करार नियमांच्या तंबूसाठी लावलेला कर यहूदीया आणि यरुशलेममधून आणण्याची मागणी तुम्ही लेवींकडे का केली नाही?” आता अथल्याह या दुष्ट स्त्रीच्या मुलांनी परमेश्वराचे मंदिर तोडून त्यात प्रवेश केला होता आणि याहवेहच्या घराच्या सर्व पवित्र वस्तूंचा सुद्धा बआल दैवतांसाठी वापर केला होता. राजाच्या आज्ञेनुसार, एक पेटी तयार केली गेली आणि बाहेर याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आली. तेव्हा यहूदीया आणि यरुशलेममध्ये अशी घोषणा देण्यात आली की, परमेश्वराचा सेवक मोशे याने अरण्यात इस्राएलचा जो कर मागितला होता तो त्यांनी याहवेहकडे आणावा. सर्व अधिकारी आणि सर्व लोकांनी आनंदाने त्यांची वर्गणी आणली आणि ती पेटी पूर्ण भरेपर्यंत त्यात टाकत राहिले. जेव्हाही लेवी लोकांद्वारे पेटी राजाच्या अधिकाऱ्यांकडे आणली जात होती आणि त्यांनी पाहिले की, त्यात मोठ्या प्रमाणात पैसे होते, तेव्हा राजेशाही सचिव आणि मुख्य याजकाचा अधिकारी येत असत आणि पेटी रिकामी करीत आणि पुन्हा ती पेटी घेऊन तिच्या जागेवर ठेवीत. त्यांनी हे नियमितपणे केले आणि मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले. राजा आणि यहोयादा यांनी ते याहवेहच्या मंदिरासाठी आवश्यक ते काम करणाऱ्यांना दिले. त्यांनी याहवेहच्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी गवंडी आणि सुतार आणि लोखंडी आणि कास्यकाम करणारे कामगार ठेवले. कामाची जबाबदारी सांभाळणारे लोक कष्टाळू होते आणि त्यांच्या हाताखाली दुरुस्तीचे काम चालू होते. त्यांनी परमेश्वराचे मंदिर त्याच्या मूळ रचनेनुसार पुन्हा बांधले आणि ते भरभक्कम केले. जेव्हा त्यांनी ते काम संपविले, त्यांनी उरलेले पैसे राजा आणि यहोयादा यांच्याकडे आणले आणि त्यातून याहवेहच्या मंदिरासाठी वस्तू बनविल्या: विधीसाठी आणि होमार्पणासाठी वस्तू, आणि ताटेसुद्धा व सोन्या-चांदीच्या इतर वस्तू. जोपर्यंत यहोयादा जिवंत होता, तोपर्यंत याहवेहच्या मंदिरात निरंतर होमार्पण केले जात होते. यहोयादा आता पूर्ण वयस्कर झाला होता आणि तो वयाच्या एकशे तिसाव्या वर्षी मरण पावला. इस्राएलमध्ये परमेश्वरासाठी आणि त्यांच्या मंदिरासाठी केलेल्या चांगल्या गोष्टींमुळे, त्याला दावीदाच्या नगरात राजांबरोबर पुरण्यात आले. यहोयादाच्या मृत्यूनंतर, यहूदीयाचे अधिकारी आले आणि त्यांनी राजाला आदरयुक्त वंदन केले आणि त्याने त्यांचे ऐकले. त्यांनी त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह यांचे मंदिर सोडून दिले, आणि अशेरा खांब आणि मूर्त्या यांची पूजा केली. त्यांच्या या अपराधामुळे परमेश्वराचा क्रोध यहूदीया आणि यरुशलेम यांच्यावर आला. जरी याहवेहनी लोकांना त्यांच्याकडे परत आणण्यासाठी संदेष्टे पाठवले आणि त्यांनी त्यांच्याविरुद्ध साक्ष दिली, तरी त्यांनी ऐकले नाही. मग यहोयादा याजकाचा मुलगा जखर्‍याह याच्यावर परमेश्वराचा आत्मा आला. तो लोकांसमोर उभा राहिला आणि म्हणाला, “परमेश्वर, असे म्हणतात, ‘तुम्ही याहवेहच्या आज्ञांचे पालन का करीत नाही? तुमची भरभराट होणार नाही. कारण तुम्ही याहवेह यांना सोडले आहे, म्हणून त्याने तुमचा त्याग केला आहे.’ ” परंतु त्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला आणि राजाच्या हुकुमावरून याहवेह यांच्या मंदिराच्या अंगणात त्याला दगडमार करून ठार मारले. जखर्‍याहचे वडील यहोयादा याने त्याच्यावर जो दयाळूपणा केला होता त्याची राजा योआशाने आठवण केली नाही, परंतु त्याने त्याच्या पुत्राला ठार मारले, जो त्याच्या मरणाच्या अवस्थेत म्हणाला, “याहवेह हे पाहतील आणि तुला त्याचा हिशोब मागतील.” वर्षाच्या शेवटी, अरामच्या सैन्याने योआशविरुद्ध युद्धासाठी कवायत केली; त्याने यहूदीया आणि यरुशलेमवर आक्रमण केले आणि लोकांच्या सर्व नेत्यांना ठार केले. त्यांनी लूट केलेला सर्व माल दिमिष्कातील त्यांच्या राजाकडे पाठवला. जरी अरामी सैन्य थोडीच माणसे बरोबर घेऊन आले होते, तरी याहवेहनी त्यांच्या हाती पुष्कळ मोठे सैन्य दिले. कारण यहूदाहने त्यांच्या पूर्वजांचा परमेश्वर याहवेह यांना सोडले होते, योआशवर न्यायदंडाची कारवाई करण्यात आली. जेव्हा अरामी लोक मागे फिरले, तेव्हा त्यांनी योआशला गंभीर जखमी करून सोडले. यहोयादा या याजकाच्या मुलाचा खून करण्यासाठी त्याच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला आणि त्यांनी त्याला त्याच्या पलंगावर ठार मारले. म्हणून तो मरण पावला आणि त्याला दावीदाच्या नगरात पुरण्यात आले, परंतु राजांच्या कबरेत नव्हे. ज्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला ते म्हणजे शिमाथ या अम्मोनी स्त्रीचा पुत्र जाबाद आणि यहोजाबाद हा मोआबी स्त्री शिमरीथचा पुत्र. त्याच्या पुत्राचा वृत्तांत, त्याच्याविषयीच्या पुष्कळ भविष्यवाण्या आणि परमेश्वराच्या मंदिराच्या पुनर्स्थापनेची नोंद राजांच्या पुस्तकावरील टिप्पणीत लिहिली आहे. त्याच्यानंतर त्याचा पुत्र अमस्याह हा राजा झाला.

सामायिक करा
२ इतिहास 24 वाचा

२ इतिहास 24:1-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

योवाश राज्य करू लागला तेव्हा तो सात वर्षांचा होता; त्याने चाळीस वर्षे यरुशलेमेत राज्य केले; त्याच्या आईचे नाव सिब्या; ती बैर-शेबा येथली. यहोयादा याजक ह्याच्या सर्व हयातीत योवाश हा परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते करीत असे. यहोयादाने त्याला दोन बायका करून दिल्या; त्याला पुत्र व कन्या झाल्या. ह्यानंतर परमेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा असे योवाशाच्या मनात आले; म्हणून त्याने याजक व लेवी ह्यांना एकत्र करून म्हटले, “वर्षानुवर्षे तुमच्या देवाच्या मंदिराची दुरुस्ती व्हावी म्हणून तुम्ही यहूदाच्या सर्व नगरांत जा व सर्व इस्राएलांपासून पैसे जमा करा; हे कार्य त्वरित करा;” असे त्याने सांगितले असताही लेव्यांनी ते त्वरेने केले नाही. राजाने त्यांचा नायक यहोयादा ह्याला बोलावून विचारले, “आज्ञापटाच्या तंबूसाठी परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्राएलाची मंडळी ह्यांनी वहिवाट लावून दिल्याप्रमाणे यहूदा आणि यरुशलेम ह्यांतल्या लोकांपासून लेव्यांना कर जमा करण्यास का सांगितले नाही?” त्या दुष्ट अथल्येच्या पुत्रांनी देवाचे मंदिर मोडूनतोडून टाकले होते आणि परमेश्वराच्या मंदिरातील सगळ्या समर्पित वस्तू त्यांनी बआलदैवतांना वाहिल्या होत्या. राजाज्ञेवरून लोकांनी एक पेटी तयार करून परमेश्वराच्या मंदिराच्या बाहेर ठेवली. मग संबंध यहूदा व यरुशलेमेत असे जाहीर करण्यात आले की देवाचा सेवक मोशे ह्याने रानात इस्राएलांवर जो कर बसवला होता तो परमेश्वराप्रीत्यर्थ लोकांनी आणावा. तेव्हा सर्व सरदार व प्रजाजन मोठ्या आनंदाने येऊन पुरेशी रक्कम जमेपर्यंत त्या पेटीत पैसे टाकत गेले. लेव्यांच्या हातून राजाच्या प्रधानाकडे ती पेटी पोचती होई व तिच्यात बराच पैसा आहे असे त्यांच्या नजरेस पडले म्हणजे राजाचा चिटणीस व मुख्य याजकांचा नायक हे येऊन ती पेटी रिकामी करीत, मग ती परत जागच्या जागी नेऊन ठेवत. त्यांनी दिवसेंदिवस असे करून पुष्कळ पैसा जमवला. मग राजाने व यहोयादाने तो पैसा परमेश्वराच्या मंदिराचे काम करण्यास दिला व त्यांनी परमेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी रोजाने गवंडी व सुतार लावले आणि परमेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी लोखंडी व पितळी काम करणार्‍या कारागिरांना कामास लावले. ह्या प्रकारे कारागिरांनी कामास लागून ते पुरे केले; त्यांनी देवाचे मंदिर नीटनेटके करून त्याला मजबुती आणली. ते सर्व काम आटोपल्यावर बाकी राहिलेले पैसे त्यांनी नेऊन राजाला व यहोयादाला दिले; परमेश्वराच्या मंदिरा-प्रीत्यर्थ त्या पैशांची सेवेची व अर्पणाची पात्रे, चमचे आणि सोन्यारुप्याची इतर पात्रे बनवली. यहोयादाच्या आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात होमबली नित्य अर्पण करीत असत. पुढे यहोयादा वृद्ध व पूर्ण वयाचा होऊन मृत्यू पावला; तो मृत्यू पावला तेव्हा त्याचे वय एकशे तीस वर्षांचे होते. त्याला दावीदपुरात राजांमध्ये मूठमाती देण्यात आली. कारण त्याने इस्राएलात देव व त्याचे मंदिर ह्यांच्यासंबंधाने चांगले काम केले होते. यहोयादा मरण पावल्यानंतर यहूदाच्या सरदारांनी राजाकडे जाऊन त्याला मुजरा केला व राजाने त्यांचे म्हणणे ऐकले. मग ते आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्या मंदिराचा त्याग करून अशेरा मूर्ती व इतर मूर्ती ह्यांची उपासना करू लागले. ह्या त्यांच्या अपराधामुळे परमेश्वराचा क्रोध यहूदावर व यरुशलेमेवर भडकला. तरी त्यांना आपल्याकडे परत आणावे म्हणून परमेश्वराने त्यांच्याकडे संदेष्टे पाठवले; त्यांनी त्यांचा निषेध केला, पण ते काही ऐकेनात. मग परमेश्वराचा आत्मा यहोयादा याजकाचा पुत्र जखर्‍या ह्याच्या ठायी आला; त्याने उंच जागी उभे राहून लोकांना म्हटले, “देव म्हणतो, ‘तुम्ही परमेश्वराची आज्ञा का उल्लंघता? अशाने तुम्हांला यश येणार नाही; तुम्ही परमेश्वरास सोडले म्हणून त्यानेही तुम्हांला सोडले आहे.”’ मग त्यांनी त्याच्याविरुद्ध कट करून राजाज्ञेने परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात त्याला दगडमार केला. ह्याप्रमाणे त्याचा बाप यहोयादा ह्याने केलेले उपकार योवाश राजा स्मरला नाही, पण त्याने त्याच्या पुत्राचा वध केला. त्याच्या मृत्युसमयी तो म्हणाला, “परमेश्वरा, हे अवलोकन करून ह्याचे उसने फेड.” नवे वर्ष लागताच अराम्यांच्या सेनेने त्यांच्यावर स्वारी केली; यहूदा व यरुशलेम ह्यांच्यावर चालून येऊन त्यांनी लोकांपैकी जे सरदार होते त्यांचा नायनाट केला व त्यांचे सर्व धन लुटून दिमिष्काच्या राजाकडे पाठवून दिले. अराम्यांच्या सैन्यात फार थोडे लोक होते तरी परमेश्वराने त्यांच्या हाती फार मोठे सैन्य लागू दिले, कारण त्यांनी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याचा त्याग केला होता. ह्या प्रकारे त्यांनी योवाशाला शासन केले. ते त्याला मोठाल्या जखमांनी घायाळ करून निघून गेले, तेव्हा त्याच्या सेवकांनी यहोयादा याजकाच्या पुत्राच्या खुनाकरता त्याच्याशी फितुरी करून तो बिछान्यावर पडला असता त्याच्यावर प्रहार करून त्याला ठार केले. त्यांनी त्याला दावीदपुरात मूठमाती दिली, राजांच्या कबरस्तानात दिली नाही. ज्यांनी त्याच्याशी फितुरी केली ते हे : शिमथ अम्मोनीण हिचा पुत्र जाबाद1 व मवाबीण शिम्रिथ2 हिचा पुत्र यहोजाबाद. योवाशाचे पुत्र, त्याला सांगितलेली मोठी शिक्षा व देवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार ह्यांविषयी सर्वकाही राजांच्या बखरीच्या पुस्तकात लिहिले आहे. त्याच्या जागी त्याचा पुत्र अमस्या हा राजा झाला.

सामायिक करा
२ इतिहास 24 वाचा