1 तीमथ्य 3:1-7
1 तीमथ्य 3:1-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे वचन विश्वसनीय आहेः जर कोणी अध्यक्ष सर्वांगीण काळजीवाहक होण्याची इच्छा धरतो तर तो चांगल्या कामाची इच्छा धरतो. तर अध्यक्ष हा निर्दोष, एका पत्नीचा पती, मिताचारी, सावधान, मर्यादशील, पाहुणचार करणारा, शिकवण्यात निपुण, असा असावा. तो मद्य पिणारा किंवा मारका (किंवा घाणेरड्या लाभाची आवड धरणारा) नसावा तर तो सौम्य, न भांडणारा, पैशाचा लोभ न धरणारा. आपल्या स्वतःच्या घरावर चांगल्या प्रकारचा अधिकार चालवणारा, पूर्ण गंभीरपणे आपल्या मुलांना स्वाधीन राखणारा असा तो असावा. जर एखाद्याला स्वतःच्या कुटुंबाची देखभाल करता येत नसेल तर तो देवाच्या मंडळीची काळजी कशी घेईल? तो या कार्यात नवशिका नसावा म्हणजे तो गर्वाने फुगून सैतानाच्या दंडात पडू नये. त्याचे बाहेरच्या लोकांमध्ये चांगले नाव असावे. यासाठी की त्याच्यावर टीका होऊ नये व त्याने सैतानाच्या जाळ्यात सापडू नये.
1 तीमथ्य 3:1-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हे वचन विश्वासयोग्य आहे की जर कोणी अध्यक्ष होण्याची इच्छा धरतो, तर तो उत्तम कामाची इच्छा बाळगतो. तर अध्यक्ष निर्दोष, एका पत्नीचा पती असावा, सौम्य, सावधान, आदरणीय, अतिथिप्रिय आणि शिकविण्यात निपुण असावा. तो मद्यपी अथवा भांडखोर नसावा, तर तो सौम्य व दयाळू असावा, तो पैशावर प्रीती करणारा नसावा. तो आपल्या घरावर उत्तम अधिकार चालविणारा, त्याने आपल्या लेकरांना आज्ञाधारक ठेवावे आणि हे सर्व आदरयुक्तरितीने करावे. (ज्याला आपल्या कुटुंबाची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, तर तो परमेश्वराच्या मंडळीचा सांभाळ कसा करेल?) अध्यक्ष नव्याने ख्रिस्ती झालेला नसावा, नाही तर तो गर्वाने फुगून जाऊन सैतानाच्या दंडाचा भागीदार होईल. तसेच मंडळीच्या बाहेरील लोकांचेही त्याच्याविषयी चांगले मत असावे, जेणेकरून त्याची निंदा होऊ नये आणि सैतानाच्या फासात तो पडू नये.
1 तीमथ्य 3:1-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कोणी अध्यक्षाचे3 काम करू पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरतो, हे वचन विश्वसनीय आहे. अध्यक्ष अदूष्य, एका स्त्रीचा पती, नेमस्त, स्वस्थचित्त, सभ्य, अतिथिप्रिय, निपुण शिक्षक असा असावा. तो मद्यपी व मारका नसावा; तर सौम्य, भांडण न करणारा, द्रव्यलोभ न धरणारा, आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा, आपल्या मुलाबाळांना भीडमर्यादेचे वळण लावून त्यांना स्वाधीन ठेवणारा असा असावा; कारण ज्याला आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, तो देवाच्या मंडळीचा सांभाळ कसा करील? त्याने गर्वाने फुगून जाऊन सैतानाप्रमाणे शिक्षेत पडू नये म्हणून तो नवशिका नसावा. त्याची निंदा होऊ नये व त्याने सैतानाच्या पाशात सापडू नये म्हणून त्याच्याविषयी बाहेरच्या लोकांनीही चांगली साक्ष दिलेली असावी.
1 तीमथ्य 3:1-7 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
कोणी ख्रिस्तमंडळ्यांमध्ये बिशप होऊ पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरतो, हे वचन सत्य आहे. ख्रिस्तमंडळ्यांचा बिशप दोषरहित, एका स्त्रीचा पती, सौम्य, दक्ष, आत्मनियंत्रित, आदरणीय, अतिथिप्रिय व निपुण शिक्षक असा असावा. तो मद्यपी किंवा हिंसक नसावा, तर सौम्य, शांतिप्रिय, द्रव्यलोभ न धरणारा, आपल्या कुटुंबाची चांगली व्यवस्था ठेवणारा व आपल्या मुलांबाळांना आज्ञाधारकपणाचे व भीडमर्यादेचे वळण लावणारा असावा; कारण ज्याला आपल्या कुटुंबाची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, तो देवाच्या मंडळ्यांचा सांभाळ कसा करील? त्याने गर्वाने फुगून जाऊन सैतानाप्रमाणे त्याला दोषी ठरवले जाऊ नये म्हणून तो श्रद्धेत परिपक्व असावा. शिवाय त्याची निंदा होऊ नये व त्याने सैतानाच्या पाशात सापडू नये. त्याच्याविषयी बाहेरच्या लोकांचे चांगले मत असावे