1 तीमथ्य 1:12-17
1 तीमथ्य 1:12-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ज्याने मला शक्ती दिली त्या ख्रिस्त येशू आपल्या प्रभूचे मी उपकार मानतो कारण त्याने मला विश्वासू मानून सेवेत ठेवले आहे. जरी मी पूर्वी देवनिंदा करणारा, छळणारा आणि हिंसक होतो पण मी ते अजाणता व अविश्वासाने केले म्हणून माझ्यावर दया झाली. परंतु विश्वास आणि प्रीती जी ख्रिस्त येशूमध्ये सापडते ती आपल्या प्रभूच्या कृपेने ओसंडून वाहिली. ही गोष्ट विश्वसनीय व पूर्ण अंगीकार करण्यास योग्य आहे की, ख्रिस्त येशू पापी लोकांस तारावयला जगात आला आणि त्या पापी लोकांपैकी मी मुख्य पापी आहे. परंतु केवळ याच हेतूने माझ्यावर दया दाखविण्यात आली की माझ्यासारख्या अत्यंत वाईट पाप्यावर ख्रिस्त येशूने सहनशीलता दाखवली त्या उदाहरणावरून, पुढील काळात जे त्याजवर विश्वास ठेवतील त्यांना सर्वकाळचे जीवन मिळावे. आता सर्वकाळचा राजा जो अविनाशी व अदृश्य आहे अशा एकाच देवाला सन्मान आणि गौरव सदासर्वकाळासाठी असो. आमेन.
1 तीमथ्य 1:12-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी आपल्या प्रभू ख्रिस्त येशूंचा आभारी आहे, ज्यांनी मला सामर्थ्य दिले आणि त्यांनी मला विश्वासयोग्य मानून त्यांच्या सेवेसाठी निवडले. मी पूर्वी परमेश्वराची निंदा करणारा, छळ करणारा आणि जुलमी होतो, तरी देखील मजवर दया झाली, यासाठी की जे काही मी करीत होतो ते अज्ञानामुळे आणि अविश्वासामुळे केले. ख्रिस्त येशू आपले प्रभू यांची कृपा माझ्यावर विश्वास आणि प्रीतीद्वारे विपुलतेने ओतण्यात आली आहे. ही गोष्ट विश्वसनीय आणि पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे, की ख्रिस्त येशू पाप्यांना तारावयास जगात आले आणि त्या पातक्यांमध्ये सर्वात मोठा मीच आहे. परंतु माझ्यावर दया झाली की, ख्रिस्त येशूंनी माझा उदाहरणादाखल उपयोग करावा आणि माझ्यासारख्या मोठ्या पातक्यांबाबतही परमेश्वराने किती सहनशीलता दाखविली, म्हणजे इतरांनाही विश्वासाने सार्वकालिक जीवन मिळू शकते. जे सर्वकाळचे राजा, अविनाशी व अदृश्य असे एकच परमेश्वर यांना सदासर्वकाळ सन्मान आणि गौरव असो. आमेन.
1 तीमथ्य 1:12-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ज्याने मला शक्ती दिली त्या आपल्या प्रभू ख्रिस्त येशूचे मी आभार मानतो; कारण मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो त्या मला त्याने विश्वासू मानून आपल्या सेवेकरता ठेवले; मी असा होतो तरी मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून माझ्यावर दया झाली; आणि ख्रिस्त येशूमधील विश्वास व प्रीती ह्यांसह आपल्या प्रभूची कृपा विपुल झाली. ख्रिस्त येशू पापी लोकांना तारण्यास जगात आला, हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारण्यास योग्य आहे; त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. तरी जे युगानुयुगाच्या जीवनासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणार आहेत, त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने, मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया झाली. जो सनातन, अविनाशी, अदृश्य राजा, असा एकच ज्ञानी देव, त्याला सन्मान व गौरव युगानुयुग असो. आमेन.
1 तीमथ्य 1:12-17 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ज्याने मला समर्थ केले त्या आपल्या प्रभू ख्रिस्त येशूचे मी आभार मानतो. मला ह्या सेवाकार्यासाठी पात्र ठरविल्याबद्दल व माझी नेमणूक केल्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो. जरी मी पूर्वी अपप्रचार करणारा, छळ करणारा व हिंसक होतो, तरी मी जे केले, ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून देवाने माझ्यावर दया केली. येशू ख्रिस्तामधील श्रद्धेने व प्रीतीने आपल्या प्रभूने माझ्यावर कृपेचा विपुल वर्षाव केला. ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावयास जगात आला, हे वचन विश्वसनीय व स्वीकारावयास पूर्णपणे योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी मी सर्वप्रथम आहे. जे शाश्वत जीवनासाठी येशू ख्रिस्तावर पुढे विश्वास ठेवणार आहेत, त्यांना दाखला मिळावा म्हणून, मी जो सर्वांत अधिक पापी, त्या माझ्या बाबतीत येशू ख्रिस्ताने सर्वात जास्त धीर दाखवावा ह्याच कारणाकरिता माझ्यावर दया करण्यात आली. शाश्वत राजा, अविनाशी आणि अदृश्य असा एकच देव ह्याचा सन्मान व गौरव युगानुयुगे होवो! आमेन.