YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 तीमथ्य 1:1-20

1 तीमथ्य 1:1-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

देव आपला तारणारा आणि ख्रिस्त येशू आपली आशा यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याजकडून: विश्वासातील माझे खरे मूल तीमथ्य यास आपला देव जो पिता आणि आपला ख्रिस्त येशू आमचा प्रभू याच्याकडून कृपा, दया आणि शांती असो. मासेदोनियास जातांना जशी मी तुला कळकळीने विनंती केली होती तशी आताही करतो की, तू इफिसात रहावे, जेणेकरून तू कित्येकास निक्षून सांगावे की, त्यांनी अन्य शिकवण शिकवू नये. आणि जी दैवी व्यवस्था विश्वासाच्याद्वारे आहे तिच्या उपयोगी न पडणाऱ्या पण वाद मात्र उत्पन्न करणाऱ्या कहाण्यांकडे व अनंत वंशावळ्यांकडे लक्ष देऊ नका. तेच मी आतांही सांगतो. आणि या आज्ञेचे उद्दिष्ट प्रीती आहे, जी शुद्ध अंतःकरणातून, चांगल्या विवेकभावातून व निष्कपट विश्वासातील असावी. या गोष्टी सोडून कित्येकजण व्यर्थ बोलण्याकडे वळले आहेत. त्यांना नियमशास्त्राचे शिक्षक व्हायचे होते पण ते ज्या गोष्टीविषयी मोठ्या आत्मविश्वासाने बोलतात व सांगतात त्या त्यांनाच कळत नाहीत. परंतु आम्हास हे माहीत आहे की, कोणी नियमशास्त्राचा खरोखरच यथार्थ उपयोग केल्यास ते चांगले आहे. आणि आपल्याला हे ठाऊकच आहे की, नियमशास्त्र हे नीतिमान लोकांसाठी केलेले नाही तर आज्ञाभंग करणाऱ्या आणि विद्रोही, पापी, भक्तिहीन, अधर्मी, अशुद्ध, वडिलांना ठार मारणारे व आईला ठार मारणारे, मनुष्यघातक जारकर्मी, समलैंगीक, मनुष्यांचा व्यापार करणारे, खोटारडे, खोटी शपथ वाहणारे यांच्यासाठी आहे आणि शुद्ध शिकवणीविरुद्ध जर काही दुसरे असेल तर त्यासाठीही आहे. गौरवी सुवार्ता जी धन्यवादित देवाकडून येते आणि जी माझ्यावर सोपवली आहे, तिला हे अनुसरून आहे. ज्याने मला शक्ती दिली त्या ख्रिस्त येशू आपल्या प्रभूचे मी उपकार मानतो कारण त्याने मला विश्वासू मानून सेवेत ठेवले आहे. जरी मी पूर्वी देवनिंदा करणारा, छळणारा आणि हिंसक होतो पण मी ते अजाणता व अविश्वासाने केले म्हणून माझ्यावर दया झाली. परंतु विश्वास आणि प्रीती जी ख्रिस्त येशूमध्ये सापडते ती आपल्या प्रभूच्या कृपेने ओसंडून वाहिली. ही गोष्ट विश्वसनीय व पूर्ण अंगीकार करण्यास योग्य आहे की, ख्रिस्त येशू पापी लोकांस तारावयला जगात आला आणि त्या पापी लोकांपैकी मी मुख्य पापी आहे. परंतु केवळ याच हेतूने माझ्यावर दया दाखविण्यात आली की माझ्यासारख्या अत्यंत वाईट पाप्यावर ख्रिस्त येशूने सहनशीलता दाखवली त्या उदाहरणावरून, पुढील काळात जे त्याजवर विश्वास ठेवतील त्यांना सर्वकाळचे जीवन मिळावे. आता सर्वकाळचा राजा जो अविनाशी व अदृश्य आहे अशा एकाच देवाला सन्मान आणि गौरव सदासर्वकाळासाठी असो. आमेन. तीमथ्या, माझ्या मुला, मी तुला तुझ्याविषयी पूर्वीच सांगण्यात आलेल्या संदेशानुसार ही आज्ञा सोपवत आहे. यासाठी की तू त्यांच्याद्वारे चांगली लढाई करावी. आणि विश्वास व चांगला विवेकभाव धर. कित्येकांनी हा झुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरुपी तारू फुटले. त्यामध्ये हूमनाय आणि आलेक्सांद्र आहेत त्यांना मी सैतानाच्या स्वाधीन केले आहे यासाठी की, निंदा न करण्यास शिकावे.

सामायिक करा
1 तीमथ्य 1 वाचा

1 तीमथ्य 1:1-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

परमेश्वर आपले तारणकर्ता व ख्रिस्त येशू आपली आशा, यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूंचे प्रेषित म्हणून नेमलेला पौल याजकडून, विश्वासातील माझा खरोखरचा पुत्र तीमथ्य यास, परमेश्वर आपले पिता आणि ख्रिस्त येशू आपला प्रभू यांच्याकडून तुला कृपा, दया आणि शांती असो. मासेदोनियास जाताना मी तुला सांगितल्याप्रमाणे, विनंती करतो इफिस येथेच राहा आणि चुकीचे शिक्षण देणार्‍यांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न कर आणि ज्यांच्याकडून विश्वासातील परमेश्वरासंबंधी रचना न होता, वाद मात्र तयार होतात, अशा गोष्टींवर आणि अखंडित वंशावळ्यांवर चित्त त्यांनी ठेवू नये. आज्ञेचा उद्देश हा आहे की, शुद्ध अंतःकरणातून, चांगल्या विवेकभावातून आणि निष्कपट विश्वासातून येणारी प्रीती तुम्हामध्ये असावी. या गोष्टी सोडून अनेकजण निरर्थक बोलण्याकडे वळले आहेत. ते नियमशास्त्राचे शिक्षक होण्यास अभिलाषी आहेत, परंतु ज्या गोष्टींबद्दल ते मोठ्या आत्मविश्वासाने बोलतात आणि सांगतात त्या गोष्टी त्यांनाच समजत नाहीत. आपल्याला ठाऊक आहे की नियमशास्त्र चांगले आहे—जर त्याचा योग्य रीतीने उपयोग करण्यात आला तर. नीतिमानांसाठी नियमशास्त्र तयार करण्यात आलेले नाही; तर आज्ञा मोडणारे, विद्रोही, भक्तिहीन व पापी, अपवित्र आणि अधर्मी, आईवडीलांवर हल्ला करणारे, आणि खून करणारे जारकर्मी, समलैंगिक, दासांचा व्यापार करणारे, लबाड, खोटी शपथ वाहणारे यांच्यासाठी—आणि इतर जे काही शुद्ध शिक्षणाविरुद्ध आहे. जे धन्यवादित परमेश्वराच्या गौरवाशी संबंधित शुभवार्तेला सुसंगत आहे, ते माझ्याकडे सोपविण्यात आले आहे. मी आपल्या प्रभू ख्रिस्त येशूंचा आभारी आहे, ज्यांनी मला सामर्थ्य दिले आणि त्यांनी मला विश्वासयोग्य मानून त्यांच्या सेवेसाठी निवडले. मी पूर्वी परमेश्वराची निंदा करणारा, छळ करणारा आणि जुलमी होतो, तरी देखील मजवर दया झाली, यासाठी की जे काही मी करीत होतो ते अज्ञानामुळे आणि अविश्वासामुळे केले. ख्रिस्त येशू आपले प्रभू यांची कृपा माझ्यावर विश्वास आणि प्रीतीद्वारे विपुलतेने ओतण्यात आली आहे. ही गोष्ट विश्वसनीय आणि पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे, की ख्रिस्त येशू पाप्यांना तारावयास जगात आले आणि त्या पातक्यांमध्ये सर्वात मोठा मीच आहे. परंतु माझ्यावर दया झाली की, ख्रिस्त येशूंनी माझा उदाहरणादाखल उपयोग करावा आणि माझ्यासारख्या मोठ्या पातक्यांबाबतही परमेश्वराने किती सहनशीलता दाखविली, म्हणजे इतरांनाही विश्वासाने सार्वकालिक जीवन मिळू शकते. जे सर्वकाळचे राजा, अविनाशी व अदृश्य असे एकच परमेश्वर यांना सदासर्वकाळ सन्मान आणि गौरव असो. आमेन. माझ्या मुला, तीमथ्या, माझी तुला ही आज्ञा आहे: संदेष्ट्यांच्याद्वारे तुझ्याविषयी पूर्वीच सांगितल्याप्रमाणे, तू त्यांच्याद्वारे उत्तम युद्ध करावे. आणि विश्वास व चांगल्या विवेकशीलतेस घट्ट बिलगून राहा, ज्यांनी त्याचा नकार केला त्यांचे विश्वासरूपी तारू फुटले. हुमनाय व आलेक्सांद्र हे त्यांच्यामध्ये आहेत; त्यांनी ईश्वराची निंदा करू नये हे शिकावे, म्हणून मी त्यांना सैतानाच्या स्वाधीन केले आहे.

सामायिक करा
1 तीमथ्य 1 वाचा

1 तीमथ्य 1:1-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

देव आपला तारणारा व प्रभू येशू ख्रिस्त आपली आशा ह्यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून : विश्वासातील माझे खरे लेकरू तीमथ्य ह्याला, देवपिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्यांच्यापासून कृपा, दया व शांती असो. मी मासेदोनियास जाताना तुला इफिसात राहण्याची विनंती केली, ह्यासाठी की, तू कित्येक लोकांना ताकीद द्यावी की, अन्य शिक्षण देऊ नका. आणि जी ईश्वरी व्यवस्था विश्वासाच्या द्वारे आहे तिच्या उपयोगी न पडणार्‍या, पण वाद मात्र उत्पन्न करणार्‍या कहाण्यांकडे व अनंत वंशावळ्यांकडे लक्ष देऊ नका. तेच मी आताही सांगतो. ताकीद देण्याचा हेतू हा आहे की, शुद्ध अंतःकरणात, चांगल्या विवेकभावात व निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीती व्यक्त व्हावी. हे सोडून कित्येक लोक व्यर्थ वटवटीकडे वळले आहेत; ते नियमशास्त्राचे शिक्षक होऊ पाहतात, परंतु ते काय बोलतात व कशाविषयी खातरीने सांगतात ते त्यांचे त्यांनाच समजत नाही. नियमशास्त्राचा जर कोणी यथार्थ उपयोग करील तर ते चांगले आहे, हे आपल्याला ठाऊक आहे; आणि हेही ठाऊक आहे की, नियमशास्त्र नीतिमानांसाठी केलेले नाही, तर अधर्मी व अनावर, भक्तिहीन व पापी, अपवित्र व अमंगळ, बापाला ठार मारणारे व आईला ठार मारणारे, मनुष्यहत्या करणारे, जारकर्मी, पुंमैथुनी, गुलामांचा व्यापार करणारे, लबाड, खोटी शपथ वाहणारे ह्यांच्यासाठी आणि जे काही सुशिक्षणाविरुद्ध आहे त्यासाठी केलेले आहे; धन्यवादित देवाच्या गौरवाची जी सुवार्ता मला सोपवलेली आहे तिला हे अनुसरून आहे. ज्याने मला शक्ती दिली त्या आपल्या प्रभू ख्रिस्त येशूचे मी आभार मानतो; कारण मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो त्या मला त्याने विश्वासू मानून आपल्या सेवेकरता ठेवले; मी असा होतो तरी मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून माझ्यावर दया झाली; आणि ख्रिस्त येशूमधील विश्वास व प्रीती ह्यांसह आपल्या प्रभूची कृपा विपुल झाली. ख्रिस्त येशू पापी लोकांना तारण्यास जगात आला, हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारण्यास योग्य आहे; त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. तरी जे युगानुयुगाच्या जीवनासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणार आहेत, त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने, मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया झाली. जो सनातन, अविनाशी, अदृश्य राजा, असा एकच ज्ञानी देव, त्याला सन्मान व गौरव युगानुयुग असो. आमेन. माझ्या मुला तीमथ्या, तुझ्याविषयी पूर्वीच झालेल्या संदेशानुसार ही आज्ञा मी तुला सांगून ठेवतो की, तू त्यांच्या द्वारेच सुयुद्ध कर; विश्वास व चांगला विवेकभाव धर. कित्येकांनी हा झुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरूपी तारू फुटले; त्यांच्यात हुमनाय व आलेक्सांद्र हे आहेत; त्यांनी निंदा करण्याचे सोडून देण्यास शिकावे म्हणून मी त्यांना सैतानाच्या स्वाधीन केले आहे.

सामायिक करा
1 तीमथ्य 1 वाचा

1 तीमथ्य 1:1-20 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

देव आपला तारणारा व ख्रिस्त येशू आपली आशा ह्यांच्या आदेशानुसार ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून, विश्वासातील माझे एकनिष्ठ लेकरू तीमथ्य ह्याला: देवपिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू तुम्हांला कृपा, दया व शांती देवो. मी मासेदोनियाला जाताना तुला विनंती केली होती त्यानुसार तू इफिस येथे राहावे, अशी माझी इच्छा आहे. तेथे काही जण लोकांना चुकीचे धर्मशिक्षण देत आहेत. त्यांना ते बंद करण्याविषयी तू ताकीद दे व अफवांना खतपाणी घालणाऱ्या दंतकथा व प्रदीर्घ वंशावळ्या ह्यामध्ये त्यांनी गुंतून राहू नये तर श्रद्धेने ईश्‍वरी योजना जाणून घेता येते, हे त्यांच्या लक्षात आणून द्यावे. ताकीद देण्याचा हेतू हा आहे की, शुद्ध अंतःकरणात, निर्मळ सदसद्विवेकबुद्धीत व अस्सल विश्वासात उद्भवणारी प्रीती उत्तेजित व्हावी. हे सोडून कित्येक लोक निरर्थक चर्चेकडे वळले आहेत. ते नियमशास्त्राचे शिक्षक होऊ पाहतात, परंतु ते काय बोलतात व कशाविषयी ठामपणे सांगतात ते त्यांचे त्यांनाच समजत नाही. नियमशास्त्राचा जर कोणी यथार्थ उपयोग करील, तर ते चांगले आहे, हे आपल्याला ठाऊक आहे, तसेच हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, नियमशास्त्र निर्दोष लोकांसाठी केलेले नाही, तर कायदा न पाळणारे व आज्ञाभंग करणारे, भक्तिहीन व पापी, अपवित्र व अमंगल, बापाला व आईला ठार मारणारे, मनुष्यहत्या करणारे, जारकर्मी, लैंगिक विपर्यास करणारे, गुलामांचा व्यापार करणारे, लबाड, खोटी शपथ वाहणारे व शिकवणीविरुद्ध वागणारे ह्यांच्यासाठी केलेले आहे. धन्यवादित देवाच्या गौरवशाली शुभवर्तमानाला जी साजेशी आहे ती शिकवण आमच्याकडे सोपविण्यात आली आहे. ज्याने मला समर्थ केले त्या आपल्या प्रभू ख्रिस्त येशूचे मी आभार मानतो. मला ह्या सेवाकार्यासाठी पात्र ठरविल्याबद्दल व माझी नेमणूक केल्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो. जरी मी पूर्वी अपप्रचार करणारा, छळ करणारा व हिंसक होतो, तरी मी जे केले, ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून देवाने माझ्यावर दया केली. येशू ख्रिस्तामधील श्रद्धेने व प्रीतीने आपल्या प्रभूने माझ्यावर कृपेचा विपुल वर्षाव केला. ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावयास जगात आला, हे वचन विश्वसनीय व स्वीकारावयास पूर्णपणे योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी मी सर्वप्रथम आहे. जे शाश्वत जीवनासाठी येशू ख्रिस्तावर पुढे विश्वास ठेवणार आहेत, त्यांना दाखला मिळावा म्हणून, मी जो सर्वांत अधिक पापी, त्या माझ्या बाबतीत येशू ख्रिस्ताने सर्वात जास्त धीर दाखवावा ह्याच कारणाकरिता माझ्यावर दया करण्यात आली. शाश्वत राजा, अविनाशी आणि अदृश्य असा एकच देव ह्याचा सन्मान व गौरव युगानुयुगे होवो! आमेन. माझ्या मुला तीमथ्य, तुझ्याविषयी पूर्वीच झालेल्या भविष्यवाणीनुसार हा आदेश मी तुला देऊन ठेवतो की, तू त्या संदेशाद्वारेच श्रद्धेने व चांगल्या सदसद्विवेकबुद्धीने सुयुद्ध कर. कित्येकांनी सदसद्विवेकबुद्धी झुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरूपी तारू फुटले, त्यांत हुमनाय व आलेक्सांद्र हे आहेत. त्यांनी दुर्भाषण करण्याचे सोडून द्यावे म्हणून मी त्यांना सैतानाच्या स्वाधीन केले आहे.

सामायिक करा
1 तीमथ्य 1 वाचा