YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 23:24-29

१ शमुवेल 23:24-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग ते उठले आणि शौलापुढे जीफाकडे गेले; परंतु दावीद व त्याची माणसे यशीमोनाच्या दक्षिणेकडे मावोनाच्या रानात अराबात होती. शौल व त्याची माणसे त्याचा शोध करायला आली. हे कोणी दावीदाला सांगितले, म्हणून तो खडकावरून उतरून मावोनाच्या रानात राहिला हे ऐकून शौल मावोनाच्या रानात दावीदाच्या मागे लागला. शौल डोंगराच्या एका बाजूने चालला आणि दावीद व त्याची माणसे डोंगराच्या दुसऱ्या बाजूने चालली आणि दावीदाने शौलापासून पळायला घाई केली कारण शौल व त्याची माणसे, दावीदाला आणि त्याच्या मनुष्यांना धरायला घेरीत होती. परंतु एक निरोप्या शौलाकडे येऊन म्हणाला, लवकर ये कारण पलिष्ट्यांनी देशावर घाला घातला आहे. तेव्हा शौल दावीदाचा पाठलाग सोडून पलिष्ट्यांवर चाल करून गेला. याकरिता त्या जागेचे नाव सेला हम्मालकोथ म्हणजे निसटून जाण्याचा खडक असे पडले. मग दावीद तेथून वर जाऊन एन-गेदीच्या गडामध्ये राहिला.

सामायिक करा
१ शमुवेल 23 वाचा

१ शमुवेल 23:24-29 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तेव्हा ते बाहेर पडले आणि शौलाच्यापुढे जीफकडे गेले. आता दावीद आणि त्याची माणसे यशीमोनच्या दक्षिणेकडील अराबाह येथे माओनच्या वाळवंटात होती. शौल आणि त्याच्या माणसांनी शोध सुरू केला आणि जेव्हा दावीदाला याबद्दल सांगण्यात आले तेव्हा तो खाली खडकाकडे गेला आणि माओनच्या वाळवंटात राहिला. जेव्हा शौलाने हे ऐकले तेव्हा तो दावीदाचा पाठलाग करीत माओनच्या वाळवंटात गेला. शौल डोंगराच्या एका बाजूने जात होता तर दावीद आणि त्याची माणसे दुसर्‍या बाजूला होती, शौलापासून दूर जाण्याची ते घाई करत होते. कारण शौल आणि त्याचे सैनिक दावीद व त्याच्या माणसांना पकडण्यास जवळ येत होते, एक संदेशवाहक शौलाकडे आला, व म्हणाला, “लवकर या! पलिष्ट्यांनी देशावर हल्ला केला आहे.” तेव्हा शौलाने दावीदाचा पाठलाग करण्याचे सोडून दिले आणि तो पलिष्ट्यांशी लढण्यास गेला. याच कारणामुळे या ठिकाणाला सेला-हम्माहलेकोथ असे म्हटले जाते. नंतर दावीद तिथून पुढे गेला आणि एन-गेदीच्या गडांमध्ये राहिला.

सामायिक करा
१ शमुवेल 23 वाचा

१ शमुवेल 23:24-29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग ते निघून शौलाच्या अगोदर जीफ येथे गेले; पण दावीद व त्याचे लोक रानाच्या दक्षिणेस अराबात मावोनाचे अरण्य आहे तेथील मैदानात होते. शौल आपले लोक बरोबर घेऊन त्याच्या शोधासाठी गेला; ही बातमी दाविदाला समजली तेव्हा तो खडकाळीतून उतरून मावोनाच्या रानात जाऊन राहिला. हे शौलाला समजले तेव्हा त्याने मावोनाच्या रानात दाविदाचा पाठलाग केला. शौल डोंगराच्या ह्या बाजूने चालला आणि दावीद व त्याचे लोक डोंगराच्या त्या बाजूने चालले. शौलाच्या भीतीने दावीद निसटून जाण्याची त्वरा करीत होता, कारण शौल व त्याचे लोक दाविदाला व त्याच्या लोकांना पकडण्यासाठी त्यांना घेरू पाहत होते. इतक्यात एका जासुदाने शौलाला येऊन सांगितले, “चला, त्वरा करा, कारण पलिष्ट्यांनी देशावर स्वारी केली आहे. तेव्हा शौल दाविदाचा पाठलाग करण्याचे सोडून पलिष्ट्यांशी सामना करण्यासाठी गेला म्हणून त्या ठिकाणाचे नाव सेला-हम्मालकोथ (निसटून जाण्याचा खडक) असे पडले. दावीद तेथून निघून एन-गेदीच्या गढ्यांमध्ये राहू लागला.

सामायिक करा
१ शमुवेल 23 वाचा