YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 17:32-37

१ शमुवेल 17:32-37 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तेव्हा दावीदाने शौलाला म्हटले, “त्या मनुष्यामुळे कोणाचे हृदय खचू नये तुमचा सेवक जाऊन त्या पलिष्ट्याशी लढेल.” तेव्हा शौलाने दावीदाला म्हटले, “त्या पलिष्ट्याबरोबर जाऊन लढाई करावयास तू शक्तीमान नाहीस. कारण तू केवळ कोवळा तरुण आहेस. तो तर त्याच्या तरुणपणापासून लढाईचा पुरुष आहे.” मग दावीद शौलाला म्हणाला, “तुमचा सेवक आपल्या बापाची मेंढरे राखत होता, तेव्हा एक सिंह व एक अस्वल यांनी येऊन एक मेंढरू कळपातून नेले. मग मी त्याच्या पाठीस लागून त्यास मारले आणि मेंढरू त्याच्या जबडयातून काढले आणि जेव्हा तो माझ्या अंगावर आला तेव्हा मी त्याची दाढी धरून त्यास ठार मारले. तुझ्या दासाने सिंह व अस्वल दोघांनाही जीवे मारिले. हा बेसुंती पलिष्टी त्यातील एकासारखा होईल कारण, त्यांने जिवंत परमेश्वराच्या सैन्याची निंदा केली आहे.” आणखी दावीदाने म्हटले, “ज्या परमेश्वराने सिंह व अस्वल यांच्या पंज्यापासून मला राखिले तो या पलिष्ट्याच्या हातातून मला राखील.” मग शौलाने म्हटले, “जा परमेश्वर तुझ्या बरोबर असो.”

सामायिक करा
१ शमुवेल 17 वाचा

१ शमुवेल 17:32-37 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

दावीद शौलाला म्हणाला, “या पलिष्ट्यामुळे कोणी मनुष्याने खचून जाऊ नये; तुमचा सेवक पुढे जाऊन त्याच्याशी लढेल.” शौलाने दावीदाला उत्तर दिले, “या पलिष्ट्यांविरुद्ध लढण्यास तू सक्षम नाहीस; तू केवळ कोवळा तरुण आहेस आणि तो त्याच्या तारुण्यापासून योद्धा आहे.” परंतु दावीद शौलाला म्हणाला, “तुमचा सेवक त्याच्या वडिलांची मेंढरे राखीत असताना, एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन त्याने कळपातील मेंढरू उचलून घेतले, मी त्याच्यामागे गेलो, त्याला मारले व त्याच्या जबड्यातून मेंढरू बाहेर काढले. जेव्हा त्याने माझ्यावर झडप घातली, मी त्याचे केस धरून त्याला ठार मारले. आपल्या दासाने सिंह व अस्वल हे दोन्ही मारले; हा बेसुंती पलिष्टीही त्यापैकी एकासारखा असेल, कारण त्याने जिवंत परमेश्वराच्या सेनेचा उपहास केला आहे. ज्या याहवेहने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजांतून सोडविले, तेच याहवेह मला या पलिष्ट्यांपासूनही सोडवेल.” शौल दावीदाला म्हणाला, “जा, याहवेह तुझ्याबरोबर असो.”

सामायिक करा
१ शमुवेल 17 वाचा

१ शमुवेल 17:32-37 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग दावीद शौलाला म्हणाला, “त्या पलिष्ट्यामुळे कोणाही माणसाचे मन कचरू नये; आपला दास जाऊन त्याच्याशी लढेल.” शौल दाविदाला म्हणाला, “ह्या पलिष्ट्याशी लढायला तू समर्थ नाहीस, कारण तू केवळ तरुण आहेस, आणि तो बाळपणापासून कसलेला योद्धा आहे.” दावीद शौलास म्हणाला, “आपला दास आपल्या बापाची शेरडेमेंढरे राखत असता एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन कळपातील एक कोकरू घेऊन गेले, तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्याला मारले आणि कोकराला त्याच्या जबड्यातून सोडवले; माझ्यावर त्याने झडप घातली, तेव्हा मी त्याची आयाळ धरून त्याला हाणून ठार केले. आपल्या दासाने त्या सिंहाला व अस्वलाला मारून टाकले. हा असुंती पलिष्टी त्या दोहोंपैकी एकासारखा ठरेल, कारण त्याने जिवंत देवाच्या सेनेला तुच्छ लेखले आहे.” दावीद आणखी म्हणाला, “ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडवले तोच मला ह्या पलिष्ट्याच्या हातून सोडवील.” तेव्हा शौल दाविदाला म्हणाला, “जा, परमेश्वर तुझ्याबरोबर असो.”

सामायिक करा
१ शमुवेल 17 वाचा