YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 1:1-10

१ शमुवेल 1:1-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथाईम-सोफीम या नगरामधील एक पुरुष होता व त्याचे नाव एलकाना होते. तो यरोहामाचा मुलगा तो एलीहूचा मुलगा तो तोहचा मुलगा तो सूफाचा मुलगा तो एलकाना एफ्राईमी होता. त्यास दोन स्त्रिया होत्या, एकीचे नाव हन्ना व दुसरीचे नाव पनिन्ना होते. पनिन्नेला लेकरे होती परंतु हन्नेला नव्हती. तो पुरुष आपल्या नगराहून प्रतिवर्षी शिलो येथे सैन्यांचा देव परमेश्वर ह्याची उपासना करायला व यज्ञ करायला जात असे. तेथे एलीचे दोन पुत्र हफनी व फिनहास देवाचे याजक होते. यज्ञ करायचा दिवस आला म्हणजे एलकाना आपली पत्नी पनिन्ना हिला व तिची सर्व मुले तिच्या सर्व मुली यांना मांसाचे वाटे देत असे. परंतु हन्नेला तो दुप्पट वाटा देत असे कारण हन्नेवर तो जास्त प्रीती करत असे, पण परमेश्वराने तिची कुस बंद केली होती. परमेश्वराने तिची कुस बंद केल्यामुळे तिला खिन्न करण्यासाठी तिची सवत तिला फारच चिडवत असे. ती प्रतिवर्षी असेच करीत असे, ती आपल्या परिवारासोबत परमेश्वराच्या मंदिरात जाई तेव्हा तिची सवत तिला असाच त्रास देई म्हणून ती रडत असे व काही खात नसे. तेव्हा तिचा पती एलकाना तिला नेहमी म्हणत असे, “हन्ना तू कां रडतेस? तू का खात नाहीस? आणि तुझे मन का दु:खीत आहे? मी तुला दहा मुलांपेक्षा जास्त नाही काय?” मग अशाच एका प्रसंगी, त्यांनी शिलो येथे खाणेपिणे संपवल्यावर हन्ना उठली. आता एली याजक परमेश्वराच्या घराच्या दाराजवळच्या आपल्या आसनावर बसला होता. तेव्हा ती खूप दु:खीत अशी होती आणि ती परमेश्वराजवळ प्रार्थना करून फार रडली.

सामायिक करा
१ शमुवेल 1 वाचा

१ शमुवेल 1:1-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

एफ्राईम येथील डोंगराळ भागात रामाथाईम-सोफीम या गावात एलकानाह नामक एक मनुष्य राहत होता, जो यरोहामचा पुत्र होता, तो एलीहूचा पुत्र, तो तोहूचा पुत्र, तो सूफाचा पुत्र, तो एफ्राईम गोत्रातील होता. त्याला दोन पत्नी होत्या; एकीचे नाव हन्नाह आणि दुसरीचे नाव पनिन्नाह असे होते. पनिन्नाहला मुलेबाळे होती, परंतु हन्नेहला एकही मूल नव्हते. दरवर्षी हा मनुष्य त्याच्या नगरापासून शिलोह येथे सर्वसमर्थ याहवेहची उपासना आणि यज्ञ करण्यासाठी जात असे, जिथे एलीचे दोन पुत्र होफनी आणि फिनहास हे याहवेहचे याजक होते. यज्ञ करण्यासाठी जेव्हा एलकानाहचा दिवस येत असे, तेव्हा तो आपली पत्नी पनिन्नाह आणि तिच्या सर्व मुलांना आणि मुलींना मांसाचा वाटा देत असे. परंतु हन्नेहला तो दुप्पट वाटा देई, कारण त्याची तिच्यावर प्रीती होती, आणि याहवेहने तिचे उदर बंद केले होते. कारण याहवेहने हन्नाहचे उदर बंद केले होते, यामुळे तिची सवत तिला चिडवून त्रास देत असे. वर्षानुवर्षे हे असेच चालू होते. जेव्हा हन्नाह याहवेहच्या मंदिरात जात असे, तेव्हा तिची सवत पनिन्नाह, ती रडेपर्यंत चिडवीत असे आणि मग ती काही खात नसे. तिचा पती एलकानाह तिला म्हणत असे, “हन्नाह तू का रडत आहेस? तू काही का खात नाहीस? मी तुला दहा पुत्रांपेक्षा अधिक नाही काय?” एकदा, शिलोह येथे त्यांनी खाणेपिणे संपविल्यानंतर हन्नाह उठली. तेव्हा एली याजक याहवेहच्या मंदिराच्या दारात त्याच्या खुर्चीवर बसलेला होता. तीव्र वेदनेने हन्नेहने याहवेहकडे प्रार्थना केली, मोठ्या दुःखाने ती रडली.

सामायिक करा
१ शमुवेल 1 वाचा

१ शमुवेल 1:1-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथाईम-सोफीम नामक नगराचा रहिवासी एक पुरुष होता; त्याचे नाव एलकाना बिन यरोहाम बिन एलीहू बिन तोहू बिन सूफ एफ्राइमी असे होते. त्याला दोन बायका होत्या; एकीचे नाव हन्ना व दुसरीचे नाव पनिन्ना. पनिन्नेला मुलेबाळे झाली होती, पण हन्नेला काही अपत्य नव्हते. हा पुरुष दरवर्षी आपल्या नगराहून सैन्यांचा देव परमेश्वर ह्याची आराधना करण्यासाठी व होमबली अर्पण करण्यासाठी शिलो येथे जात असे. एलीचे दोन पुत्र हफनी व फिनहास हे परमेश्वराचे याजक तेथे असत. एलकाना यज्ञ करी, तेव्हा तो आपली स्त्री पनिन्ना हिला व तिच्या सर्व पुत्रांना व कन्यांना वाटे देत असे. हन्नेला तो दुप्पट वाटा देई; कारण तिच्यावर त्याची प्रीती असे; परंतु परमेश्वराने तिची कूस बंद केली होती. तिची सवत तिने कुढत राहावे म्हणून तिला सारखी चिडवीत असे, कारण परमेश्वराने तिची कूस बंद केली होती. शिलोस जाण्याचा त्याचा हा परिपाठ वर्षानुवर्ष होता आणि हन्ना परमेश्वराच्या मंदिरी गेली म्हणजे पनिन्ना तिला चिडवत असे; तेव्हा ती रडे व काही खात नसे. तिचा पती एलकाना तिला एकदा म्हणाला, “हन्ना, तू का रडतेस? तू अन्नपाणी का वर्ज केलेस? तुझे हृदय खिन्न का? मी तुला दहा पुत्रांपेक्षा अधिक नाही काय?” शिलो येथे त्यांचे खाणेपिणे आटोपल्यावर हन्ना उठून गेली. तेव्हा एली परमेश्वराच्या मंदिराच्या दाराजवळ असलेल्या आपल्या आसनावर बसला होता. तिचे मन व्यथित झाल्यामुळे ती परमेश्वराची करुणा भाकून ढळढळा रडली.

सामायिक करा
१ शमुवेल 1 वाचा