1 पेत्र 2:13-23 - Compare All Versions
1 पेत्र 2:13-23 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रत्येक प्रकारच्या मानवी व्यवस्थेला, प्रभूकरता, आज्ञाधारक रहा. राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या अधीन राहा. जे अधिकारी असतील त्यांना आज्ञांकित रहा; कारण वाईट करणार्यांना शिक्षा करण्यास व चांगले करणार्यांची प्रशंसा करण्यास ते पाठवलेले आहेत. कारण देवाची इच्छा आहे की, तुम्ही चांगले करीत राहून निर्बुद्ध मनुष्यांच्या अज्ञानाला गप्प करावे. तुम्ही स्वतंत्र आहात, परंतु वाईट प्रवृतीवर पांघरूण घालण्यास स्वातंत्र्याचा उपयोग न करता, देवाचे दास म्हणून जगावे सर्वांना मान द्या; बंधुवर्गावर प्रीती करा; देवाचे भय धरा; राजाला मान द्या. घरच्या नोकरांनो, तुम्ही पूर्ण आदराने आपल्या स्वामीच्या आज्ञेत रहा. जे चांगले आणि सहनशील असतील त्यांनाच नव्हे, पण कठोर असतील त्यांनादेखील आज्ञेत रहा कारण, जर कोणी देवाविषयी विवेक बाळगून, अन्याय सोसून, दुःख सहन करीत असेल, तर ते स्तुत्य आहे; पण तुम्ही पाप करता तेव्हा तुम्हास ठोसे दिले गेले आणि तुम्ही ते सहन केलेत तर त्यामध्ये काय मोठेपणा आहे? पण चांगले करून सोसावे लागते तेव्हा तुम्ही ते सहन केले, तर ते देवाला आवडणारे आहे. कारण ह्यासाठीच तुम्हास पाचारण करण्यात आले आहे; कारण ख्रिस्तानेही तुमच्यासाठी दुःख सोसले आहे; आणि तुम्ही त्याच्या पावलांवरून मागोमाग जावे म्हणून त्याने तुमच्यासाठी कित्ता ठेवला आहे. त्याने पाप केले नाही व त्याच्या मुखात काही कपट आढळले नाही. त्याची हेटाळणी होत असता त्याने फिरून हेटाळले नाही, आणि सोशीत असता त्याने धमकावले नाही; पण देव जो नीतीने न्याय करतो त्याच्या हातात त्याने स्वतःस सोपवले.
1 पेत्र 2:13-23 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही प्रभूकरिता मनुष्यांमध्ये स्थापित केलेल्या प्रत्येक अधिकार्याच्या अधीन असा: मग तो सर्वोच्च अधिकारी म्हणून राजासुद्धा असेल अथवा राज्यपाल असेल, कारण जे अयोग्य गोष्टी करतात त्यांना शिक्षा करण्यासाठी आणि जे योग्य गोष्टी करतात, त्यांची प्रशंसा करण्यासाठी ते परमेश्वराकडून पाठविलेले आहेत. कारण परमेश्वराची अशी इच्छा आहे की चांगली कार्ये करून तुम्ही मूर्ख लोकांची अज्ञानी बोलणी बंद करावीत. तुम्ही मुक्त आहात, परंतु तुमचे स्वातंत्र्य वाईट कृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी वापरू नका, तर परमेश्वराच्या दासासारखे जगा. प्रत्येकाला योग्य आदर दाखवा. विश्वासणार्यांच्या कुटुंबावर प्रीती करा. परमेश्वराचे भय बाळगा व राजाचा मान राखा. दासांनो, आदराने परमेश्वराचे भय बाळगून तुम्ही स्वतःला तुमच्या धन्याच्या अधीन करा, फक्त जे चांगले आणि कृपाळू आहेत अशांच्याच नाही, तर जे कठोर आहेत अशा धन्यांच्यासुद्धा अधीन राहा. कारण त्याला परमेश्वराची जाणीव असल्यामुळे जर कोणी मनुष्य अन्यायी दुःखाच्या वेदना सहन करतो, तर ते प्रशंसनीय आहे. परंतु चूक केल्याबद्दल मिळालेली शिक्षा तुम्ही सहन केली तर त्यात काय मोठेपणा आहे? परंतु जर चांगले केल्याबद्दल तुम्ही दुःख भोगले आणि ते सहन केले तर हे परमेश्वराच्या दृष्टीने प्रशंसनीय आहे. यासाठीच तुम्हाला पाचारण करण्यात आलेले आहे, कारण ख्रिस्ताने तुमच्यासाठी दुःख सहन करून तुमच्यासमोर एक आदर्श ठेवला आहे, यासाठी की तुम्ही त्यांचे अनुकरण करावे. “त्यांनी कधीही पाप केले नाही; आणि त्यांच्या मुखात कोणतेही कपट आढळले नाही.” जेव्हा त्यांनी त्यांचा अपमान केला, तरी त्यांनी कधी उलट उत्तर दिले नाही, जेव्हा दुःख भोगले त्यांनी धमकाविले नाही. त्यापेक्षा त्यांनी जो न्यायीपणाने न्याय करतो त्यांच्याकडे स्वतःला सोपवून दिले.
1 पेत्र 2:13-23 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रभूकरता तुम्ही, माणसांनी स्थापलेल्या प्रत्येक व्यवस्थेच्या अधीन असा; राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या अधीन; आणि अधिकारी हे वाईट करणार्यांना शिक्षा करण्यासाठी व चांगले करणार्यांची प्रशंसा करण्यासाठी त्याने पाठवलेले आहेत, म्हणून त्यांच्याही अधीन असा. कारण देवाची इच्छा अशी आहे की, तुम्ही चांगले करत राहून निर्बुद्ध माणसांच्या अज्ञानाला कुंठित करावे. दुष्टपणा झाकण्यासाठी आपल्या स्वतंत्रतेचा उपयोग न करता तुम्ही स्वतंत्र, तरी देवाचे दास, असे राहा. सर्वांना मान द्या. बंधुवर्गावर प्रीती करा. ‘देवाचे भय धरा.’ राजाचा मान राखा. घरच्या चाकरांनो, तुम्ही पूर्ण भयाने आपल्या धन्यांच्या अधीन असा; जे चांगले व सौम्य त्यांच्याच केवळ नव्हे, तर जे कठोर त्यांच्याही अधीन असा. जर कोणी अन्याय सोसताना देवाचे स्मरण ठेवून दुःखे सहन करतो तर ते उचित आहे. कारण पाप केल्याबद्दल मिळालेले ठोसे तुम्ही निमूटपणे सहन केल्यास त्यात काय मोठेपणा? पण चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे व ते निमूटपणे सहन करणे हे देवाच्या दृष्टीने उचित आहे. कारण ह्याचकरता तुम्हांला पाचारण करण्यात आले आहे; कारण ख्रिस्तानेही तुमच्यासाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुमच्याकरता कित्ता घालून दिला आहे. त्याने पाप ‘केले नाही, आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही.’ त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही; दुःख भोगत असता त्याने धमकावले नाही; तर यथार्थ न्याय करणार्याकडे स्वतःला सोपवून दिले.
1 पेत्र 2:13-23 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
प्रभूकरिता तुम्ही, माणसांनी स्थापिलेल्या प्रत्येक व्यवस्थेच्या अधीन असा. राजा श्रेष्ठ, म्हणून त्याच्या अधीन राहा. अधिकारी, हे वाईट करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी व चांगले करण्यासाठी व चांगले करणाऱ्यांची प्रशंसा करण्यासाठी त्याने पाठविलेले आहेत, म्हणून त्यांच्याही अधीन असा. देवाची इच्छा अशी आहे की, तुम्ही चांगले करीत राहून निर्बुद्ध माणसाचे अज्ञान दूर करावे. दुष्टपणा झाकण्यासाठी आपल्या स्वतंत्रतेचा उपयोग न करता तुम्ही स्वतंत्र तरी देवाचे दास असे राहा. सर्वांना मान द्या. बंधुवर्गावर प्रीती करा. देवाचे भय धरा. राजाचा मान राखा. घरच्या चाकरांनो, तुम्ही पूर्ण आदरभावाने आपल्या धन्याच्या अधीन असा, जे कोणी चांगले व समंजस आहेत केवळ त्यांच्याच नव्हे, तर जे कठोर आहेत त्यांच्याही अधीन असा. जर कोणी अन्याय सोसताना परमेश्वराचे स्मरण ठेवून दुःख सहन करत असेल, तर देव त्याला आशीर्वाद देईल. चूक केल्याबद्दल मिळालेली शिक्षा तुम्ही निमूटपणे सहन केल्यास त्यात काय मोठेपणा? पण चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे व ते निमूटपणे सहन करणे, हे देवाच्या दृष्टीने आशीर्वादपात्र आहे. ह्याचकरिता तुम्हांला पाचारण करण्यात आले आहे. कारण ख्रिस्तानेही तुमच्यासाठी दुःख भोगले. तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुमच्याकरिता कित्ता घालून दिला आहे. त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात असत्य आढळले नाही. त्याचा अपमान होत असता, त्याने उलट अपमान केला नाही, दुःख भोगत असता, त्याने धमकाविले नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्यावर भिस्त ठेवली.