YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 9:1-28

१ राजे 9:1-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

शलमोनाने परमेश्वराचे मंदिर आणि राजमहाल यांचे काम पूर्ण केले, व त्याच्या मनात जे होते त्याप्रमाणे त्याने केले. यापूर्वी गिबोनामध्ये परमेश्वराने शलमोनाला दर्शन दिले होते. त्याप्रमाणे पुन्हा दुसऱ्यांदा परमेश्वराने त्यास दर्शन दिले. परमेश्वर त्यास म्हणाला, “मी तुझी प्रार्थना ऐकली. तू मला केलेली विनंती ऐकली. तू हे मंदिर बांधलेस. मी आता ते स्थान पवित्र केले आहे. येथे माझा निरंतर सन्मान होत राहील. हे स्थानाकडे माझे मन व दृष्टी सतत राहील. तुझे वडिल दावीद यांच्या प्रमाणेच चांगल्या मनाने व सरळतेने तू माझ्यासमोर चाललास व माझ्या आज्ञा नियम पाळल्यास, तर तुझ्या घराण्यातील व्यक्तीच नेहमी इस्राएलाच्या राजासनावर येईल. तुझे वडिल दावीद याला मी तसे वचन दिले होते. त्यांच्या वंशजांची सत्ता इस्राएलावरून कधीच खुटंणार नाही. पंरतु तू किंवा तुझ्या मुलाबाळांनी हा मार्ग सोडला व माझ्या आज्ञांचे पालन केले नाही, तुम्ही इतर दैवतांच्या भजनी लागलात, तर मात्र मी दिलेल्या या भूमीतून इस्राएलांना हुसकावून लावीन. इतर लोकात तुम्ही निंदेचा विषय होणार. हे मंदिर मी माझ्या नावासाठी पवित्र केले आहे. पण माझे आज्ञापालन केले नाहीतर ते मी नजरेआड करीन. हे मंदिर नामशेष होईल; ते पाहणारे स्तंभित होतील आणि म्हणतील, ‘परमेश्वराने या देशाचा आणि या मंदिराचे असे का केले बरे?’ यावर इतर जण सांगतील, याला कारण या लोकांनी परमेश्वर देवाच्या त्याग केला. परमेश्वराने यांच्या पूर्वजांना मिसरमधून सोडवले. पण या लोकांनी इतर देव आपलेसे केले. त्या दैवतांच्या हे भजनी लागले. म्हणून परमेश्वराने हे अरिष्ट त्यांच्यावर आणले.” परमेश्वराचे मंदिर आणि महाल या दोन्हींचे बांधकाम पूर्ण होण्यास राजा शलमोनाला वीस वर्षे लागली. त्यानंतर शलमोनाने सोराचा (तायर) राजा हिराम याला गालील प्रांतातील वीस नगरे दिली. कारण हिरामने मंदिर व राजमहाल या दोन्हीच्या बांधकामांमध्ये शलमोनला खूप मदत केली होती. देवदार, गंधसरुचे लाकूड तसेच सोनेही हिरामने शलमोनाला लागेल तसे पुरवले होते. शलमोनाने हिराम सोराहून (तायर) ही नगरे पाहण्यासाठी म्हणून आला. पण त्यास ती तितकीशी पसंत पडली नाहीत. राजा हिराम म्हणाला, “माझ्या बंधो काय ही नगरे तू मला दिलीस?” या भूभागाला हिरामने काबूल प्रांत असे नाव दिले. आजही तो भाग काबूल म्हणूनच ओळखला जातो. हिरामने राजा शलमोनाला मंदिराच्या बांधकामासाठी एकशें विस किक्कार सोने पाठवले होते. शलमोन राजाने परमेश्वराचे मंदिर आणि महाल यांच्या बांधकामासाठी वेठबिगारीवर मजूर लावले होते. त्यांच्याकडून राजाने आणखीही वास्तू बांधून घेतल्या. मिल्लो, यरूशलेम सभोवतीचा कोट तसेच हासोर, मगिद्दो व गेजेर या नगरांची पुनर्बांधणी त्याने करवून घेतली. मिसरच्या फारो राजाने पूर्वी गेजेर हे शहर युध्दात घेऊन मग ते जाळून टाकले होते. तेथे राहणाऱ्या कनानी लोकांस त्याने ठार केले होते. या फारोच्या मुलीशी शलमोनाने लग्न केले होते. तेव्हा फाराने हे नगरही शलमोनाला लग्नातील आहेरादाखल दिले होते. शलमोनाने गेजेराखालचे बेथ-होरोनही पुन्हा बांधले. तसेच बालाथ, तामार ही वाळवंटातील नगरे बांधली, शलमोनाने अन्नधान्य आणि इतर वस्तूंची गोदामे, त्याचे रथ आणि घोडे यांच्यासाठी वेगळ्या जागा बांधल्या. यरूशलेमामध्ये, लबानोनात आणि आपल्या अधिपत्याखालील इतर प्रदेशात जे जे त्यास हवे ते ते बांधले. इस्राएल लोकांखेरीज त्या प्रदेशात अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी, यबूसी हेही लोक होते. इस्राएल लोकांस त्यांचा पाडाव करता आलेला नव्हता. पण शलमोनाने त्यांना आपले गुलाम केले. आजही त्यांची स्थिती तशीच आहे. इस्राएल लोकांस मात्र शलमोनाने आपले गुलाम केले नाही. इस्राएली लोक सैनिक, सरकारी अधिकारी, कारभारी, सरदार, रथाधिपती आणि चालक अशा पदांवर होते. शलमोनाने हाती घेतलेल्या कामांवर साडेपाचशे अधीक्षक होते. मजूरांवर ते देखरेख करीत. फारोची कन्या आपला महाल पूर्ण झाल्यावर दावीद नगरातून तेथे राहायला गेली. नंतर शलमोनाने मिल्लो बांधले. शलमोन वर्षातून तीनदा वेदीवर होमबली आणि शांत्यर्पण करीत असे. ही वेदी त्याने परमेश्वरासाठी बांधली होती. तो परमेश्वरापुढे धूपही जाळीत असे. तसेच मंदिरासाठी लागणाऱ्या वस्तू पुरवत असे. एसयोन-गेबेर येथे शलमोन राजाने गलबतेही बांधली. हे नगर अदोम देशात तांबड्या समुद्राच्या काठी एलोथजवळ आहे. समुद्राबद्दल चांगली जाण असलेले लोक राजा हिरामच्या पदरी होते. हे खलाशी बरेचदा समुद्रावर जात. हिरामने त्यांना शलमोनाच्या आरमारात, शलमोनाच्या खलाश्यांबरोबर पाठवले. शलमोनाची गलबते ओफिर येथे गेली आणि त्यांनी तेथून चारशे वीस किक्कार सोने शलमोन राजाकडे आणले.

सामायिक करा
१ राजे 9 वाचा

१ राजे 9:1-28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

शलोमोनने जेव्हा याहवेहचे मंदिर व राजमहाल बांधण्याचे काम संपविले, आणि त्याला जे काही करावयाचे मनोरथ होते ते साधल्यानंतर, याहवेहने शलोमोनला जसे गिबोन येथे दर्शन दिले होते, तसे त्याला दुसर्‍यांदा दर्शन दिले. याहवेह शलोमोनला म्हणाले: “तू माझ्यासमोर केलेली प्रार्थना व विनंती मी ऐकली आहे; हे जे मंदिर तू बांधले आहे तिथे सर्वकाळासाठी माझे नाव देऊन मी ते पवित्र केले आहे. त्यावर माझी दृष्टी व माझे हृदय सदा राहील. “तुझ्या बाबतीत म्हणायचे तर तू आपला पिता दावीद याच्याप्रमाणे माझ्यासमोर विश्वासूपणे हृदयाच्या सरळतेने चालशील आणि सर्वकाही मी आज्ञापिल्याप्रमाणे करशील व माझे विधी व नियम पाळशील, तर इस्राएलवरचे तुझे राजासन मी सर्वकाळासाठी प्रस्थापित करेन, तुझा पिता दावीद याला मी अभिवचन देत म्हटले होते, ‘इस्राएलच्या राजासनावर तुझा वारस कधीही खुंटणार नाही.’ “पण जर तू किंवा तुझी संतती माझ्यापासून दूर वळली आणि मी तुला दिलेल्या आज्ञा व विधी पाळले नाही आणि जाऊन इतर दैवतांची सेवा करून त्यांची उपासना केली, तर जो देश मी त्यांना दिला आहे त्यातून मी इस्राएली लोकांना छेदून टाकीन आणि हे मंदिर जे मी माझ्या नावासाठी पवित्र केले आहे त्याचा मी धिक्कार करेन. मग इस्राएल सर्व लोकांमध्ये थट्टा व निंदेचा विषय होतील. हे मंदिर ढेकळ्यांचा ढिगारा होईल. त्याच्या जवळून जाणारे सर्वजण आश्चर्यचकित होऊन तुच्छतेने म्हणतील, ‘याहवेहने या देशाचे व या मंदिराचे असे का केले आहे?’ तेव्हा लोक उत्तर देतील, ‘याहवेह त्यांचे परमेश्वर, ज्यांनी या लोकांच्या पूर्वजांना इजिप्त देशातून बाहेर आणले त्या याहवेहला सोडून ते इतर दैवतांची उपासना व सेवा करू लागले आहेत; म्हणून याहवेहने त्यांच्यावर हे अरिष्ट आणले आहे.’ ” शेवटच्या वीस वर्षात शलोमोनने याहवेहचे मंदिर आणि राजमहाल या दोन इमारतींचे बांधकाम केले. शलोमोन राजाने सोरचा राजा हीराम याला गालील प्रांतातील वीस नगरे दिली, कारण त्याने हवे असलेले सर्व गंधसरू, देवदारू, आणि सोने शलोमोनला पुरविले होते. परंतु जेव्हा शलोमोनने त्याला दिलेली नगरे पाहण्यासाठी हीराम सोरवरून गेला, ते पाहून त्याला समाधान झाले नाही. तेव्हा तो म्हणाला, “माझ्या भावा, ही कशी नगरे तू मला दिलीस?” आणि त्याने त्यास काबूल प्रांत असे नाव दिले, ते नाव आजही प्रचलित आहे. हीरामाने राजाकडे एकशेवीस तालांत सोने पाठवले होते. शलोमोन राजाने ज्या मजुरांना याहवेहचे मंदिर, आपला स्वतःचा राजवाडा, स्तरीय बांधकाम, यरुशलेमचा तट आणि हासोर, मगिद्दो व गेजेर नगर बांधण्यासाठी कामावर लावले होते त्यांचा अहवाल अशाप्रकारे आहे. (इजिप्तचा राजा फारोहने गेजेरवर हल्ला करून ते ताब्यात घेतले होते. त्याने त्याला आग लावली व त्यातील कनानी रहिवाशांना मारून टाकले व ते नगर आपली कन्या, शलोमोनच्या पत्नीला तिच्या लग्नाची भेट म्हणून दिले. आणि शलोमोनने गेजेर नगराची पुनर्बांधणी केली.) त्याने खालचे बेथ-होरोन बांधले, वाळवंटातील देशाच्या हद्दीतील बालाथ आणि तदमोर बांधली, त्याचप्रमाणे शलोमोनचे रथ व त्याचे घोडे यांच्यासाठी सर्व शहरे व नगरे; यरुशलेमात, लबानोनात आणि ज्या सर्व प्रदेशात त्याचे राज्य होते त्या हद्दींमध्ये त्याच्या मनास येईल ते त्याने बांधले. अमोरी, हिथी, परिज्जी, हिव्वी व यबूसी यांच्यातील आणखी काही लोक बाकी राहिले होते (हे लोक इस्राएली नव्हते). या लोकांचे वंशज जे देशात उरले होते त्यांनाही शलोमोनने सक्तीने गुलाम म्हणून भरती केले; हे ते लोक होते ज्यांना इस्राएल लोक पूर्णपणे नष्ट करू शकले नव्हते, आजवर हे तसेच आहेत. परंतु इस्राएली लोकांपैकी कोणावरही शलोमोनने गुलामी लादली नाही; ते त्याचे योद्धे, त्याचे सरकारी अधिकारी, सरदार, सेनापती व त्याच्या रथांचे व रथस्वारांचे अधिकारी होते. शलोमोनच्या प्रकल्पांवर जे मुख्य अधिकारीसुद्धा होते, ते पाचशे पन्नास जण होते, जे माणसांवर देखरेख ठेवणारे मुकादम होते. फारोहची कन्या दावीदाचे शहर सोडून शलोमोनने तिच्यासाठी बांधलेल्या राजवाड्यात आली, मग त्याने स्तरीय बांधकाम केले. याहवेहसाठी बांधलेल्या वेदीवर शलोमोन वर्षातून तीन वेळा होमार्पणे, शांत्यर्पणे करून त्याबरोबर धूप जाळत असे, अशाप्रकारे त्याने मंदिराची कर्तव्ये पूर्ण केली. शलोमोन राजाने एदोम देशात तांबड्या समुद्रतीरी एलोथजवळ एजिओन-गेबेर येथे सुद्धा गलबते बांधली. आणि हीरामाने त्याच्या अनुभवी खलाश्यांना शलोमोनच्या माणसांबरोबर सेवा करण्यास पाठवले. त्यांनी ओफीरपर्यंत प्रवास करून चारशे वीस तालांत सोने परत आणले व ते शलोमोन राजाला दिले.

सामायिक करा
१ राजे 9 वाचा

१ राजे 9:1-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

शलमोनाने परमेश्वराचे मंदिर व राजवाडा बांधायचे संपवले व ह्याप्रमाणे त्याच्या मनाला जे करावेसे वाटले ते त्याने केले. तेव्हा परमेश्वराने त्याला गिबोन येथे दर्शन दिले होते त्याप्रमाणे त्याला दुसर्‍यांदा दर्शन दिले. परमेश्वर त्याला म्हणाला, “तू माझ्यासमोर केलेली प्रार्थना व विनवणी मी ऐकली आहे; हे जे मंदिर तू बांधले आहेस त्याला माझे नाम सर्वकाळ राहावे म्हणून मी ते पवित्र केले आहे; माझी दृष्टी व माझे चित्त त्यावर सतत राहील. तू आपला पिता दावीद ह्याच्याप्रमाणे खर्‍या मनाने व सरळतेने माझ्या समक्ष चालशील, माझ्या सर्व आज्ञांप्रमाणे वागशील आणि माझे नियम व निर्णय पाळशील, तर इस्राएलांवरील तुझे राजासन मी कायमचे स्थापीन; तुझा पिता दावीद ह्याला मी वचन दिल्याप्रमाणे इस्राएलाच्या गादीवर बसायला तुझ्या कुळातला पुरुष खुंटायचा नाही. पण तुम्ही व तुमच्या संततीने माझे अनुसरण करण्याचे सोडल्यास, मी तुम्हांला लावून दिलेल्या आज्ञा व नियम न पाळल्यास आणि मला सोडून अन्य देवांची उपासना व भजनपूजन केल्यास, जो देश मी इस्राएल लोकांना दिला आहे त्यातून त्यांचा उच्छेद करीन आणि हे जे मंदिर मी आपल्या नामाकरता पवित्र केले आहे ते माझ्या नजरेआड करीन, तसेच इस्राएल लोक इतर सर्व राष्ट्रांत दृष्टान्ताचा व निंदेचा विषय होतील. आणि हे मंदिर उंच स्थानी राहील तरी त्याच्या जवळून येणारेजाणारे चकित होतील व छीथू करून म्हणतील, परमेश्वराने ह्या देशाचे व ह्या मंदिराचे असे का केले? तेव्हा लोक म्हणतील, ‘त्यांचा देव परमेश्वर ह्याने त्यांच्या वाडवडिलांना मिसर देशातून आणले असून ते त्याला सोडून अन्य देवांच्या नादी लागले व त्यांचे भजनपूजन व उपासना करू लागले, ह्यांमुळे परमेश्वराने ही सर्व विपत्ती त्यांच्यावर आणली आहे.”’ परमेश्वराचे मंदिर व राजवाडा ही दोन्ही पूर्ण करण्यासाठी वीस वर्षे लागली. त्यानंतर शलमोनाने सोराचा राजा हीराम ह्याला गालील प्रांतातली वीस नगरे दिली, कारण त्याने शलमोनाला हवे होते तितके गंधसरू, देवदारू व सोने हे पुरवले होते. शलमोनाने आपल्याला दिलेली नगरे पाहण्यास हीराम सोराहून तेथे गेला; ती त्याला पसंत पडली नाहीत. तेव्हा तो म्हणाला, “हे माझ्या बंधो, कसली ही नगरे तू मला दिलीस?” त्याने त्यांना काबूल प्रांत हे नाव ठेवले; हेच नाव आजवर चालू आहे. हीरामाने राजाकडे एकशेवीस किक्कार1 सोने पाठवले. शलमोन राजाने लोक वेठीस धरून परमेश्वराचे मंदिर, आपला राजवाडा, मिल्लो, यरुशलेमेचा तट, हासोर, मगिद्दो व गेजेर ही उभारली त्याचा वृत्तान्त असा. मिसर देशाचा राजा फारो ह्याने गेजेरवर चढाई करून ते घेतले आणि आग लावून जाळून टाकले व तेथल्या कनानी रहिवाशांचा संहार केला. त्याने ते नगर आपली कन्या शलमोनाची बायको हिला आंदण म्हणून दिले. शलमोनाने गेजेराखालचे बेथ-होरोन, बालाथ व रानातले तदमोर ही बांधली; ह्याखेरीज आणखी भांडारासाठी आणि रथ व स्वार ह्यांच्यासाठी नगरे बांधली आणि तसेच यरुशलेमेत, लबानोनावर व आपल्या सर्व राज्यात आपल्या मनास आले तेही सर्व त्याने बांधले. अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्या इस्राएल नसलेल्या लोकांतले अवशिष्ट लोक, देशात राहून गेले होते; त्यांना इस्राएल लोकांना अगदी नष्ट करता आले नाही; त्यांच्या वंशजांवर शलमोनाने बिगार बसवून त्यांना दास्य करायला लावले; आजवर असेच चालत आले आहे. पण इस्राएल लोकांपैकी कोणालाही शलमोनाने दास करून ठेवले नाही; ते योद्धे, कामदार, सरदार, सेनापती आणि रथ व स्वार ह्यांवरचे अधिपती होते. शलमोनाच्या कामावर देखरेख करणारे नायक हेच होते; ते पाचशे पन्नास होते; जे लोक ह्या कामावर होते त्यांच्यावर त्यांची हुकुमत असे. मग फारोची कन्या आपणासाठी शलमोनाने बांधलेल्या मंदिरात राहण्यास दावीदपूर सोडून आली; तेव्हा त्याने मिल्लो नगर बांधले. जी वेदी शलमोनाने परमेश्वराप्रीत्यर्थ बांधली होती तिच्यावर वर्षातून तीन वेळा शलमोन होमबली व शांत्यर्पणे अर्पण करत असे; तसेच परमेश्वरासमोर असलेल्या वेदीवर तो धूप जाळत असे. ह्या प्रकारे त्याने मंदिर समाप्त केले. मग शलमोन राजाने अदोम देशांत तांबड्या समुद्राच्या तीरी एलोथाजवळील एसयोन-गेबेर येथे गलबतांचा तांडा केला. हीरामाने आपल्या ताब्यातील दर्यावर्दी लोक शलमोनाच्या कामदारांबरोबर काम करण्यासाठी त्या गलबतांवर पाठवले. त्यांनी ओफिरास जाऊन तेथून चारशे वीस किक्कार सोने शलमोन राजाकडे आणले.

सामायिक करा
१ राजे 9 वाचा