१ राजे 7:1-51 - Compare All Versions
१ राजे 7:1-51 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शलमोनाला आपला वाडा बांधून पूर्ण करण्यास तेरा वर्षे लागली. त्याने लबानोनगृह नावाची इमारत बांधली होती; तिची लांबी शंभर हात, रुंदी पन्नास हात व उंची तीस हात होती; ती इमारत गंधसरू लाकडाच्या खांबांच्या चार रांगांवर उभी होती; त्या खांबांवर गंधसरूच्या तुळया ठेवल्या होत्या. खांबांच्या वर एकेका मजल्यावर पंधरा-पंधरा अशा पंचेचाळीस कोठड्या त्याने केल्या होत्या; त्यांना गंधसरूचा कडीपाट होता. तिन्ही मजल्यांवर तुळया असून तिन्ही मजल्यांवर समोरासमोर खिडक्या होत्या. सर्व दारे व त्यांच्या चौकटी चौरस होत्या, तिन्ही मजल्यांवरील खिडक्या समोरासमोर होत्या. आणखी त्याने खांबांची एक देवडी केली होती, तिची लांबी पन्नास हात व रूंदी तीस हात होती; त्या खांबांपुढे एक देवडी केली असून सर्वांपुढे एक ओटी होती; तिला खांब होते. आणि सिंहासनावर बसून न्याय करण्यासाठी एक दिवाणखाना त्याने केला होता; हीच न्यायसभा होय; तिला खालपासून वरपर्यंत गंधसरूची तक्तपोशी केली होती. त्या दिवाणखान्याच्या आतल्या बाजूच्या चौकात त्याचे राहायचे घर होते; तेही वरच्यासारखेच बनवले होते. शलमोनाने फारोच्या कन्येशी लग्न केले होते; तिच्यासाठी ह्या दिवाणखान्यासारखेच घर बांधले होते. ह्या सगळ्या इमारतीस पायापासून मुंढेरीपर्यंत आतून बाहेरून मोलवान ताशीव चिरे लावले होते. ते चिरे मापून करवतींनी चिरून तयार केले होते; बाहेरच्या मोठ्या अंगणात ते लावले होते. त्यांचा पायाही दहा-दहा, आठ-आठ हात लांबीच्या मोठ्या व मोलवान पाषाणांचा घातला होता. त्यांवर मापून तासलेले मोलवान पाषाण व गंधसरूची लाकडे ही होती. मोठ्या अंगणाच्या सभोवार तासलेल्या चिर्यांच्या तीन रांगा व गंधसरूच्या तुळयांची एक रांग होती. परमेश्वराच्या मंदिराचे आतले अंगण व त्या मंदिराची देवडी ह्यांच्याप्रमाणे ही रचना होती. मग शलमोन राजाने सोर येथून हीरामास बोलावून आणले. तो नफताली वंशातील एका विधवेचा पुत्र होता; त्याचा बाप सोरातला एक तांबट होता. पितळेचे सगळे काम करण्यास लागणारे शहाणपण, अक्कल व कौशल्य हे त्याच्या ठायी भरपूर होते; तो शलमोन राजाकडे येऊन त्याचे सर्व काम करू लागला. त्याने पितळेचे अठरा-अठरा हात उंच असे दोन खांब तयार केले; त्या प्रत्येकाला वेढायला बारा हात दोरी लागे. त्याने त्या खांबांच्या शेंड्यावर बसवण्यासाठी पितळेचे दोन ओतीव कळस केले. एकेका कळसाची उंची पाच-पाच हात होती. खांबांच्या शेंड्यावरील कळसांना बुट्टीदार जाळ्या आणि साखळीच्या माळा केल्या; एकाला सात व दुसर्याला सात. ह्या प्रकारे त्याने खांब तयार करून त्यांच्या शेंड्यांवर प्रत्येक कळसाला झाकण्यासाठी जाळ्यांच्या एका रांगेवर डाळिंबांच्या दोन रांगा केल्या. जे कळस देवडीच्या खांबांच्या शेंड्यांवर होते त्यांच्या चार हात जागेत कमळांचे काम केले होते. प्रत्येक खांबाच्या शेंड्यावर जाळीला लागून असलेल्या गोलाईच्या जवळ आणखी एक कळस केला होता; आणि प्रत्येक कळसावर ओळीने दोनशे डाळिंबांच्या रांगा काढल्या होत्या. हे खांब त्याने मंदिराच्या देवडीजवळ उभे केले होते; उजवीकडला खांब उभा केला त्याला याखीन (तो स्थापील) हे नाव दिले होते व डाव्या बाजूला खांब उभा केला त्याला बवाज (त्याच्या ठायी सामर्थ्य) हे नाव दिले होते. खांबांच्या शेंड्यावर कमळे काढलेली होती; खांबांचे काम अशा प्रकारे संपले. मग त्याने एक गंगाळसागर ओतवला होता; त्याचा काठाकडला व्यास दहा हात होता; त्याचा आकार गोल असून त्याची उंची पाच हात होती व त्याचा परीघ तीस हात होता. त्याच्या काठाखाली सभोवार एकेका हाताच्या अंतराने दहा-दहा इंद्रावणे कोरली होती, ती त्या सगळ्या गंगाळसागरासभोवती होती, हा गंगाळसागर ओतला तेव्हाच इंद्रावणांच्या ह्या दोन रांगा त्याच्या अंगच्याच ठेवल्या होत्या. हा गंगाळसागर बारा बैलांवर ठेवला होता; त्यांपैकी तीन उत्तराभिमुख, तीन पश्चिमाभिमुख, तीन दक्षिणाभिमुख, व तीन पूर्वाभिमुख होते; त्यांच्यावर तो गंगाळसागर ठेवला असून त्या सर्वांचे मागले भाग आतल्या अंगाला होते. त्याची जाडी वीतभर होती; त्याचा काठ कटोर्याच्या काठासारखा असून त्यावर कमलपुष्पे कोरली होती; त्यात दोन हजार बथ1 पाणी राहत असे. त्याने पितळेचे दहा चौरंग केले होते; प्रत्येक चौरंगाची लांबी चार हात, रुंदी चार हात व उंची तीन हात होती. चौरंगाची घडण येणेप्रमाणे होती; त्याला पत्रे लावले होते आणि ह्या पत्र्यांना सभोवार कंगोरे होते; कंगोर्यांमधल्या पत्र्यांवर सिंह, बैल व करूब ह्यांच्या आकृती कोरल्या होत्या; त्या कंगोर्यावर एक बैठक होती; आणि सिंहाच्या व बैलांच्या खाली लोंबत्या माळा कोरल्या होत्या. प्रत्येक चौरंगाला पितळेची चार-चार चाके व पितळेच्या धुर्या केल्या होत्या. प्रत्येकाच्या चार्ही पायांना लागून ओतीव खांदे होते; ते खांदे गंगाळ ठेवण्यासाठी वरच्या भागी ओतून जोडले होते; त्यांच्या बाजू माळांनी शृंगारल्या होत्या. कळसांच्या आतल्या बाजूपासून वरपर्यंत त्याचे तोंड एक हात उंच होते; हे तोंड बैठकीसारखे असून त्याचा व्यास दीड हात होता; त्याच्यावरही काही कोरीव काम होते; त्याच्या पट्ट्या गोल नसून चौकोनी होत्या. चार्ही चक्रे पट्ट्यांच्या खाली होती. आणि प्रत्येक चक्राच्या धुर्या तळाशी जोडल्या होत्या; त्या प्रत्येक चक्राची उंची दीड हात होती. चक्राची घडण रथचक्रासारखी होती; त्यांच्या धुर्या, पुठ्ठे, आरे आणि तुंबे हे सर्व ओतीव होते. प्रत्येक चौरंगाच्या चार्ही कोपर्यांना चार खांदे होते; हे खांदे व चौरंग दोन्ही अखंड होते. प्रत्येक चौरंगावर अर्धा हात उंच गोलाकार झाकण होते; आणि त्या झाकणाचे टेकावे व त्याच्या पट्ट्या चौरंगाशी अखंड होत्या. त्या टेकाव्यांच्या पृष्ठभागावर व पत्र्यांवर त्यांच्या-त्यांच्या परिमाणाप्रमाणे करूब, सिंह, व खजुरीची झाडे कोरली होती व सभोवार माळा दाखवल्या होत्या. ह्या प्रकारे त्यांनी ते दहा चौरंग केले; ते सर्व एकाच साच्याचे, एकाच मापाचे व एकाच आकाराचे होते. आणखी त्याने पितळेची दहा गंगाळे केली होती; एकेका गंगाळात चाळीस-चाळीस बथ पाणी राहत असे; त्या प्रत्येक गंगाळाचा व्यास चार हात होता; त्या दहा चौरंगांतील प्रत्येकावर एकेक गंगाळ होते. त्याने पाच गंगाळे मंदिराच्या दक्षिणेस व पाच गंगाळे उत्तरेस ठेवली होती; आणि गंगाळसागर मंदिराच्या उजवीकडे, आग्नेयेस ठेवला होता. तसेच हीरामाने गंगाळे, फावडी व कटोरी ही बनवली. ह्या प्रकारे हीरामाने शलमोन राजासाठी परमेश्वराच्या मंदिराचे जे काम करायचे होते ते संपवले ते असे : दोन खांब, त्या खांबांच्या शेंड्यांवरील कळसांचे प्याल्याच्या आकाराचे भाग व त्या दोन्ही खांबांच्या शेंड्यांवरील कळसाचे प्याल्याच्या आकाराचे भाग झाकण्यासाठी जाळ्या केल्या; त्या दोन जाळ्यांसाठी चारशे डाळिंबे केली; खांबांच्या शेंड्यांवरील प्याल्याच्या आकाराच्या कळसांचे भाग झाकायच्या जाळ्यांसाठी ह्या डाळिंबाच्या दोन-दोन रांगा होत्या; दहा चौरंग व त्यांच्यावरील दहा गंगाळे; आणि एक गंगाळसागर व त्याच्याखालचे बारा बैल. तशीच पात्रे, फावडी व कटोरे ही बनवली होती; परमेश्वराच्या मंदिरातील ही जी पात्रे हीरामाने शलमोन राजासाठी बनवली होती ती सर्व उजळ पितळेची होती. राजाने ती यार्देन खोर्यात सुक्कोथ व सारतान ह्यांच्यामधील प्रदेशातल्या चिकणमातीत ओतवली होती. ती पात्रे पुष्कळ असल्यामुळे शलमोनाने ती वजन केल्यावाचून ठेवली होती, पितळेचे वजन केले नव्हते; परमेश्वराच्या मंदिरात जितकी पात्रे होती तितकी सगळी शलमोनाने करवली ती ही : वेदी व समर्पित भाकरी ठेवण्याचे मेज ही सोन्याची केली होती; गाभार्यासमोरील उजवीकडल्या पाच व डावीकडल्या पाच समया शुद्ध सोन्याच्या करवल्या होत्या; त्यांचा पुष्पशृंगार, चाडी व चिमटे ही सोन्याची करवली होती; पेले, कातरी, कटोरे, चमचे व धुपाटणी ही शुद्ध सोन्याची करवली होती; तसेच मंदिराचा अंतर्भाग म्हणजे परमपवित्रस्थान ह्याच्या दारांची व मंदिराच्या म्हणजे पवित्रस्थानाच्या दारांची बिजागरे सोन्याची करवली होती. ह्या प्रकारे परमेश्वराच्या मंदिराचे जे जे काम शलमोन राजाने हाती घेतले ते समाप्त झाले. नंतर आपला बाप दावीद ह्याने समर्पित केलेले सोने, चांदी आणि पात्रे ही शलमोनाने आत आणून परमेश्वराच्या मंदिराच्या भांडारात ठेवली.
१ राजे 7:1-51 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शलमोनाला स्वत:साठी महाल बांधण्यास तेरा वर्षे लागली. त्याने लबानोनगृह वनातील घरही बांधले. त्याची लांबी शंभर हात, रूंदी पन्नास हात व उंची तीस हात होती. ती ईमारत गंधसरुच्या स्तंभाच्या चार रांगावर असून प्रत्येक स्तंभावर गंधसरूच्या तुळ्या ठेवल्या होत्या. त्यावर छत म्हणून गंधसरुच्या लाकडाची पाटण होती. प्रत्येक ओळीत पंधरा खांब अशा पंचेचाळीस खांबांवर तुळ्या होत्या. तिन्ही मजल्यावर तुळ्या असून भिंतींवर समोरासमोर येतील अशा खिडक्यांच्या तीन ओळी होत्या. दोन्ही टोकांना तीन तीन दरवाजे होते. दाराची कवाडे आणि चौकटी काटकोन चौकोनात होत्या. शलमोनाने एक द्वारमंडपही उभारला होता. हा राजासनाचा मंडप पन्नास हात लांब आणि तीस हात रुंद होता. दर्शनी बाजूला आधार देणाऱ्या स्तंभाची रांग होती. मग सिंहासनावर बसून न्यायनिवाडा करण्यासाठी त्याने एक दालन बांधून घेतले. त्यास त्याने “न्यायासनाचा मंडप” असे नाव दिले होते. हे दालनही जमिनीपासून छतापर्यंत गंधसरुच्या लाकडाने आच्छादलेले होते. याच्याच आतल्या बाजूला त्याचे घर होते. त्याची बांधणी न्यायासनाच्या मंडपासारखीच होती. मिसरच्या फारो राजाची कन्या म्हणजे शलमोनची पत्नी हिच्यासाठीही त्याने असाच महाल बांधून घेतला. या सर्व इमारतींच्या बांधकामात किंमती दगडी चिरे वापरले होते. पुढून मागून घासून ते करवतीने योग्य मापाने कातले होते. पायापासून वळचणीपर्यंत त्यांचाच वापर केला होता. अंगणाभोवतालच्या भिंतीही याच बहुमूल्य दगडांनी बांधल्या होत्या. पायासाठी वापरलेले चिरेही असेच प्रशस्त व भारी होते. काहींची लांबी आठ व इतरांची दहा हात होती. त्यांच्यावर आणखी चांगल्या प्रतीचे चिरे आणि गंधसरुचे वासे होते. महाल, मंदिर आणि द्वारमंडप यांच्या सभोवती भिंत होती. तिला दगडांच्या तीन चिऱ्या आणि गंधसरुच्या लाकडाची एक ओळ परमेश्वराच्या मंदिराचे आतले अंगण व त्या मंदिराची देवडी यांच्याप्रमाणे ही रचना होती. राजा शलमोनाने सोराहून (तायरहून) हिराम नावाच्या मनुष्यास निरोप पाठवून यरूशलेम येथे बोलावून घेतले. हिरामची आई नफताली वंशातील होती. त्याचे वडिल सोराचे (तायरचे) होते. ते चांगले तांबट कारागीर होते. हिराम हा एक ज्ञानाने, बुद्धीने, आणि कसबी तांबट होता. म्हणून शलमोन राजाने त्यालाच बोलावून घेतले. त्यानेही हे आमंत्रण स्विकारले. राजाने हिरामला सर्व पितळी कारागिरीवरील प्रमुख म्हणून नेमले. हिरामने पितळेपासून बनवलेल्या सर्व वस्तू घडविल्या. हिरामने दोन पितळी स्तंभ घडवले. ते स्तंभ अठरा हात उंचीचे होते. त्या प्रत्येकाला वेढावयास बारा हात दोरी लागे. शिवाय त्याने त्या खांबाच्या शेंड्यावर बसवण्यासाठी पितळेच दोन ओतीव कळस केले. त्या एकाएका कळसाची उंची पाच पाच हात होती. या खांबाच्या घुमटांना आच्छादण्यासाठी दोन जाळीदार, साखळीची आच्छादने केली. एकाला सात व दुसऱ्याला सात. याप्रकारे त्याने खांब तयार करून त्यांच्या शेडंयावर प्रत्येक कळसास झाकण्यासाठी जाळ्यांच्या एका रांगेवर डाळिंबाच्या दोन रांगा केल्या. जे कळस देवडीच्या खांबांच्या शेंड्यांवर होते त्यांच्या चार हात जागेत कमळांचे काम केले होते. हे घुमट स्तंभावर बसविलेले होते. परडीच्या आकाराच्या जाळीवर ते बसवले होते. या सगळ्या कळसांच्या भोवती रांगेने दोनशे डाळिंबे लावली होती. हे दोन पितळी स्तंभ हिरामने द्वारमंडपाशी लावले. दक्षिणेकडील खांबाला याखीन (तो स्थापील) आणि उत्तरे कडील खांबाला बवाज (त्याच्या ठायी सामर्थ्य) असे नाव ठेवले. कमळाच्या आकाराचे कळस या खांबांवर चढवले आणि या दोन स्तंभाचे काम संपले. मग त्याने एक गंगाळसागर ओतविला होता, त्याचा काठाकडला व्यास दहा हात होता; त्याचा आकार गोल असून त्याची उंची पाच हात होती व त्यास वेढायला तीस हात दोरी लागत असे. या हौदाच्या कडेल्या बाहेरच्या बाजूला एक पट्टी बसवली होती. तिच्याखाली पितळी रानकाकड्यांच्या दोन रांगा होत्या. या काकड्या हौदाचाच एक भाग म्हणून एकसंधपणे करून घेतल्या होत्या. बारा पितळी बैलांच्या पाठीवर हा हौद विसावलेला होता. बैलांची तोंडे बाहेरच्या बाजूला होती. तिघांची तोंडे उत्तरेला, तिघांची दक्षिणेला, तिघांची पूर्वेला आणि तिघांची पश्चिमेला होती. हौदाची जाडी वितभर होती; आणि वरची कड कटोऱ्याच्या कडेसारखी अथवा कमळफुलासारखी उमललेली होती. यामध्ये दोन हजार बथ पाणी मावत असे. मग हिरामने दहा पितळी चौरंग बनवले. प्रत्येक चौरंग चार हात लांब, चार हात रुंद आणि तीन हात उंच होते. चौरंग याप्रकारे बनविण्यात आले होते; त्यास पत्रे लावलेले होते आणि या पत्र्यास सभोवार कंगोरे होते. पितळी पत्रे आणि चौकट यांच्यावर सिंह, बैल व करुब देवदूत यांचे कोरीव काम होते. सिंह आणि बैल यांच्याखाली फुलांची वेलबुट्टी बसवलेली होती. प्रत्येक चौरंगाला पितळी धुऱ्यांवर पितळेची चारचार चाके लावलेली होती आणि चारही कोपऱ्यातून प्रशस्त घंगाळासाठी पितळी आधार दिलेले होते. त्यावरही फुलांचे सुबक काम केलेले होते. कळसाच्या आतल्या बाजूपासून वरपर्यंत त्याचे तोंड एक हात उंच होते हे तोंड बैठकीसारखे असून त्याचा व्यास दीड हात होता, त्यावर काही कोरीव काम होते, त्याच्या पट्टया गोल नसून चौकोनी होत्या. चारही चाके पट्यांच्या खाली होती व प्रत्येक चाकाच्या धुऱ्या तळाशी जोडल्या होत्या, त्या प्रत्येक चाकाची उंची दीड हात होती. रथाच्या चाकांसारखी ही चाके होती. आणि त्याच्या धुऱ्या धावा, आरे आणि तुंबे असे सर्वकाही ओतीव पितळेचे होते. प्रत्येक चौरंगाच्या चारही कोपऱ्यांना आधार दिलेले होते. तेही एकसंध होते. प्रत्येक चौरंगावर अर्धा हात उंच गोलाकार झाकण होते, व त्या झाकणाचे टेकावे व त्याच्या पट्टया ही चौरंगाशी अंखड होत्या. चौरंगाची बाहेरची बाजू आणि चौकट यांच्यावर करुब देवदूत, सिंह, खजूरीची झाडे यांचे कोरीव काम पितळेचे केलेले होते. ही नक्षी अगदी भरगच्च असून त्यामध्ये कुठेही मोकळी जागा नव्हती. शिवाय भोवताली फुलांची नक्षी होती. हिरामने अशाप्रकारे अगदी एकसारखे एक असे दहा पितळी चौरंग घडवले. हे सर्व ओतीव काम होते त्यामुळे ते तंतोतंत एकसारखे होते. हिरामने अशीच दहा गंगाळे केली. ती या दहा चौरंगासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे होती. प्रत्येक गंगाळाचा व्यास चार हात होतो. त्यामध्ये चाळीस बथ पाणी मावू शकत असे. त्याने पाच बैठकी मंदिराच्या उत्तरेला आणि दक्षिणेला पाच व गंगाळसागर मंदिराच्या उजवीकडे पूर्व दिशेला ठेवल्या. याखेरीज हिरामने वाडगी, पावडी, लहान गंगाळे बनवली. शलमोन राजाने सांगितले ते सर्व हिरामने केले. परमेश्वराच्या मंदिरासाठी हिरामने ज्या वस्तू घडवल्या त्यांची यादी पुढीलप्रमाणे: दोन स्तंभ स्तंभाच्या कळसांवर बसवायच्या दोन घुमट्या त्यांच्या भोवतीच्या दोन जाळ्या या दोन जाळ्यांसाठी चारशे नक्षीदार डाळिंबे तयार केली खांबाच्या शेंडयावरील प्याल्याच्या आकाराचे कळसाचे भाग झाकावयाच्या जाळ्यासाठी या डाळींबाच्या दोन-दोन रांगा होत्या. दहा चौंरग व त्यांच्यावरील दहा गंगाळे, एक गंगाळसागर व त्याच्याखालचे बारा बैल; याखेरीज हंडे, पातेली, पावडी अशी परमेश्वराच्या मंदिरासाठी वेगवेगळी पात्रे शलमोन राजाच्या इच्छेखातर हिरामने बनवले. ते सर्व लखलखीत पितळेच होते. सुक्कोथ आणि सारतान यांच्यामध्ये यार्देन नदीच्या तीरावर असलेल्या मैदानावर शलमोन राजाने हे काम करायला सांगितले. पितळ वितळवून मातीच्या साच्यात हे ओतकाम करण्यात आले. या सगळ्यासाठी किती पितळ लागले ते शलमोन राजाने बघितले नाही. वजन करायचे म्हटले तरी ते खूपच होते. त्यामुळे या सर्व वस्तूंचे नक्की वजन कधीच माहीत झाले नाही. शलमोनाने परमेश्वराच्या मंदिरासाठी सोन्याच्याही कितीतरी वस्तू करवून घेतल्या. त्या अशा: सोन्याचे मेज (देवाची सोन्याची वेदी समर्पित भाकर ठेवण्यासाठी) शुद्ध सोन्याच्या समया. (या परमपवित्र गाभाऱ्यासमोर उजवीडावीकडे पाच पाच लावलेल्या होत्या) सोन्याची फुले, दिवे आणि चिमटे ही सोन्याची करवली होती. पेले, कातरी, कटोरे, चमचे व धूपदाने ही शुद्ध सोन्याची करवली होती; तसेच मंदिराचा आतील भाग म्हणजे परमपवित्रस्थान यांचे दरवाजे व पवित्रस्थानाच्या दाराच्या बिजागऱ्या सोन्याच्या बनवल्या होत्या. परमेश्वराच्या मंदिराचे हे काम शलमोन राजाने स्वत:च्या हाती घेतले ते संपवले. मग आपले वडिल दावीद यांनी समर्पिलेले सोने, चांदी व पात्रे ही शलमोनाने आत आणून परमेश्वराच्या मंदिराच्या भांडारात ठेवली.
१ राजे 7:1-51 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शलोमोनच्या राजवाड्याचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी तेरा वर्षे लागली. त्याने लबानोनच्या वनात जो राजवाडा बांधला त्याची लांबी शंभर हात, रुंदी पन्नास हात व उंची तीस हात होती, त्याला गंधसरूच्या खांबांच्या चार रांगा होत्या व त्याला आधार देण्यासाठी गंधसरूच्या छाटलेल्या तुळया होत्या. त्या खांबांवर एका ओळीत पंधरा तुळया; अशा पंचेचाळीस तुळया होत्या व त्यावर देवदारूच्या फळ्यांचे छत होते. त्याच्या खिडक्या उंचावर समोरासमोर तीन अशा जोडीने बसविल्या होत्या. सर्व दरवाजांना चौकट बाह्या होत्या; त्या समोरच्या बाजूने समोरासमोर तीन अशा जोडीने होत्या. त्याने पन्नास हात लांब व तीस हात रुंद अशी खांबांची एक पंक्ती बनविली. त्याच्यासमोर एक द्वारमंडप होता व त्यासमोर खांब व त्यावर छत होते. त्याने राजासनासाठी खोली बांधली, जी न्यायाची खोली, जिथे बसून तो लोकांचा न्याय करणार, त्या खोलीला जमिनीपासून छतापर्यंत गंधसरूच्या फळ्यांनी झाकले. आणि ज्या राजवाड्यात तो राहणार त्याची रचना याच खोलीप्रमाणे होती. फारोहच्या ज्या कन्येशी त्याने विवाह केला होता तिच्यासाठी सुद्धा शलोमोनने याच खोलीसारखा राजवाडा बनविला. या सर्व इमारती, बाहेरच्या बाजूपासून ते दरबारापर्यंत आणि त्यांच्या पायापासून छपराच्या वळचणीपर्यंत, उच्च प्रतीचे दगड घेऊन त्यांना आकारात कापून आतील व बाहेरील बाजूने त्यांना गुळगुळीत बनवून वापरले होते. उत्तम दर्जाच्या मोठमोठ्या दगडांनी त्यांचा पाया घातला गेला. काही दगड दहा हात तर काही आठ हात लांबीचे होते. त्याच्या वरच्या बाजूने योग्य आकारात कापलेले उच्च दर्जाचे दगड आणि गंधसरूच्या तुळया होत्या. मोठ्या अंगणाच्या सभोवती घडलेल्या दगडांच्या तीन रांगा व छाटलेल्या गंधसरूच्या तुळयांची एक रांग होती, याहवेहच्या मंदिराच्या आतील अंगणाला व द्वारमंडपालाही तसेच होते. शलोमोन राजाने सोर येथून हीराम याला बोलावून घेतले. त्याची आई नफताली गोत्रातील एक विधवा होती आणि त्याचा पिता सोरचा होता, तो कास्याचे काम करण्यात निपुण कारागीर होता. हुराम सर्वप्रकारचे कास्याचे काम करण्यास ज्ञानाने, शहाणपणाने व विद्येने भरलेला होता. तो शलोमोन राजाकडे आला व त्याला नेमून दिलेली सर्व कामे केली. त्याने कास्याचे दोन खांब तयार केले, प्रत्येक खांबाची उंची अठरा हात आणि घेर बारा हात होती. खांबांच्या शिखरांवर बसविण्यासाठी त्याने कास्याचे दोन ओतीव कळस केले; प्रत्येकाची उंची पाच हात होती. खांबांवर असलेल्या प्रत्येक कळसांना सात साखळीच्या विणलेल्या जाळ्या बसविल्या होत्या. खांबांच्या वरच्या कळसांना सजविण्यासाठी त्याने प्रत्येक जाळ्याला गोलाकारात दोन रांगेत डाळिंबे बनविली. प्रत्येक कळस त्याने असेच घडविले. द्वारमंडपात असलेल्या खांबांवरील कळस कमळांच्या फुलांच्या आकाराचे, चार हात उंच होते. दोन्ही खांबांच्या कळसांना लागून वाटीच्या आकाराच्या जाळीभोवती, दोनशे डाळिंबाच्या रांगा केलेल्या होत्या. त्याने हे खांब मंदिराच्या द्वारमंडपाकडे ठेवले. दक्षिणेकडे ठेवलेल्या खांबाला त्याने याखीन आणि उत्तरेकडील खांबाला बवाज असे नाव दिले. खांबांवर असलेले कळस कमळांच्या आकाराचे होते. याप्रकारे खांबांचे काम पूर्ण झाले. त्याने ओतीव धातूचा हौद तयार केला, तो गोलाकार असून त्याचा व्यास एका काठापासून दुसर्या काठापर्यंत दहा हात होता व पाच हात उंच होता. त्याचे सभोवार माप घेण्यास तीस हात दोरी लागत असे. त्याच्या काठाखाली सभोवार एकेका हाताच्या अंतरावर दहा काकड्या होत्या. या काकड्या हौदाबरोबरच एकांगी अशा दोन रांगेत ओतीव केल्या होत्या. हा हौद बारा बैलांवर उभा होता, तीन बैल उत्तरेकडे, तीन पश्चिमेकडे, तीन दक्षिणेकडे आणि तीन पूर्वेकडे तोंड करून होते आणि त्यांच्यावर हौद विसावला होता आणि त्यांचे मागचे अंग आतील बाजूस होते. त्याची जाडी चार बोटे होते, आणि पेल्याचा घेर, कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे बाहेरच्या बाजूला वळलेला होता. त्यामध्ये तीन हजार बथ पाणी मावत असे. त्याने कास्याचे दहा चौरंग बनविले; प्रत्येकाची लांबी चार हात, रुंदी चार हात आणि उंची तीन हात होती. चौरंग याप्रकारे बनविले होते: त्याला बाजूने लाकडाच्या फळ्या जोडल्या होत्या. फळ्यांच्या मध्यभागी व तिवडीवरही सिंह, बैल आणि करूब यांच्या आकृती कोरल्या होत्या आणि सिंहाच्या व बैलांच्या ठोकलेल्या लोंबत्या झालरी होत्या. प्रत्येक चौरंगाला चार कास्याची चाके व कास्याच्या धुर्या होत्या आणि प्रत्येकाला गंगाळे होती, ज्याला आधार देण्यासाठी ओतीव स्तंभ असून त्यांच्या बाजूंनी लोंबत्या माळा होत्या. तिवडीच्या आतील बाजूस त्याचे तोंड उघडे होते व त्याला एका हाताएवढी खोल गोलाकार पट्टी होती. हा उघडा भाग गोल होता, आणि त्याच्या व्यासाचे माप दीड हात होते. त्याच्या तोंडाभोवती कोरीव काम होते. तिवडीचे खांब गोल नसून चौकोनी होते. चार चाके खांबांच्या खाली होती आणि चाकांच्या धुर्या तिवडीला जोडलेल्या होत्या. प्रत्येक चाकाचा व्यास दीड हात होती. ही चाके रथाच्या चाकांप्रमाणे बनविली होती; धुर्या, कडा, आरे आणि तुंबे हे सर्व ओतीव काम होते. प्रत्येक तिवडीला, चारही कोपर्यांना चार दांडे होते, जे तिवडीला अखंड असे होते. तिवडीच्या वरच्या बाजूला अर्धा हात गोलाकाराची खोल पट्टी होती. त्याचे आधारस्तंभ आणि खांब तिवडीच्या वरच्या बाजूने जोडलेले होते. आधारस्तंभाच्या आणि खांबांच्या पृष्ठभागावर करूब, सिंह आणि खजुरीची झाडे कोरली होती आणि सभोवार लोंबत्या माळा होत्या. अशाप्रकारे त्याने या दहा तिवड्या तयार केल्या. त्या सर्व एकाच साच्यात तयार केलेल्या असून ते सारख्याच मापाच्या आणि आकाराच्या होत्या. त्यानंतर त्याने कास्याची दहा गंगाळे बनविली, प्रत्येकात चाळीस बथ पाणी मावत असे आणि त्याचा व्यास चार हात होता, त्या दहा तिवडीतील प्रत्येकावर एकेक गंगाळ होते. त्याने पाच तिवड्या मंदिराच्या दक्षिणेकडे ठेवल्या आणि पाच उत्तरेकडे. त्याने हौद मंदिराच्या दक्षिणेस; दक्षिणपूर्वेच्या कोपर्यात ठेवला. त्याने मडके आणि फावडे आणि शिंपडण्याचे भांडेही बनविले. हीरामाने याहवेहच्या मंदिरात शलोमोन राजासाठी हाती घेतलेले हे सर्व काम पूर्ण केले: दोन खांब; खांबांच्या वर दोन वाटीच्या आकाराचे कळस; खांबांवर वाटीच्या आकाराच्या दोन कळसांना सजविणार्या जाळ्यांचे दोन संच; त्या जाळ्यांच्या दोन संचासाठी चारशे डाळिंबे (खांबावरील वाट्यांच्या आकाराचे कळस सजविणार्या एका जाळीसाठी डाळिंबांच्या दोन रांगा); दहा तिवड्या व त्यांची दहा गंगाळे; हौद आणि त्याखालील बारा बैल; भांडी, फावडे आणि शिंपडण्याच्या वाट्या. शलोमोन राजासाठी हीरामाने याहवेहच्या मंदिरातील बनविलेल्या या सर्व वस्तू उजळ कास्याच्या होत्या. राजाने त्या वस्तू सुक्कोथ आणि सारेथान प्रदेशामध्ये यार्देनेच्या पठारावर मातीच्या साच्यात घडवून घेतल्या होत्या. शलोमोनने या सर्व वस्तूंचे वजन केले नाही, कारण ते पुष्कळ होते; कास्याचे वजन करणे शक्य नव्हते. याहवेहच्या मंदिरामध्ये असलेली उपकरणेसुद्धा शलोमोनाने तयार करून घेतली होती: सोन्याची वेदी; मेजावर समक्षतेची भाकर ठेवली होती; शुद्ध सोन्याचे दीपस्तंभ (आतील पवित्रस्थानासमोर पाच उजवीकडे व पाच डावीकडे); सोन्याच्या फुलांची सजावट, दिवे आणि चिमटे; शुद्ध सोन्याची गंगाळे, वाती कापण्याची कात्री, शिंपडण्याचे कटोरे, पात्रे व धूपदाण्या; आतील खोलीच्या, म्हणजेच परमपवित्रस्थानाच्या आणि मंदिराच्या मुख्य खोलीच्या दरवाजासाठी सोन्याच्या कड्या. याहवेहच्या मंदिराचे सर्व काम शलोमोन राजाने पूर्ण केल्यानंतर, त्याने आपला पिता दावीदाने समर्पित केलेल्या वस्तू मंदिरात आणल्या; चांदी, सोने आणि पडदे; शलोमोनने त्या वस्तू याहवेहच्या मंदिराच्या भांडारात ठेवल्या.