१ राजे 4:20-25
१ राजे 4:20-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यहूदा आणि इस्राएलमध्ये समुंद्रातील वाळूसारखी बहुसंख्य माणसे होती. ती खात, पीत व मजा करत आनंदाने जगत होती. नदीपासून ते पलिष्ट्यांच्या भूमीपर्यंत व मिसराच्या सीमेपर्यंत शलमोनाची सत्ता होती. या देशांकडून शलमोनाला नजराणे येत आणि ते आयुष्यभर त्याचा आदर करीत. शलमोनाला एका दिवसास जेवणाऱ्या सर्वांसाठी खालील अन्नपदार्थ लागत:तीस कोर मापाचे सपीठ; साठ कोर मापाचे पीठ, दहा पुष्ट गुरे कुरणावर चरलेली वीस गुरे, शंभर मेंढरे, हरीण, सांबरे, भेकर, खाण्यायोग्य पक्षी. महानदाच्या अलीकडील सर्व देशांवर म्हणजे तिफसाह येथून गज्जापर्यंतच्या सर्व देशांवर व जितके राजे होते त्यावर त्याची सत्ता होती. या प्रदेशात सर्वत्र शांतता नांदत होती. शलमोनाच्या दिवसात दानपासून बैर-शेबापर्यंत, यहूदा आणि इस्राएलमधील सर्व लोक निर्धास्तपणे व शांततेने राहत होते. आपापल्या अंजीर वृक्षांखाली आणि द्राक्षबागांमध्ये ते निवांत होते.
१ राजे 4:20-25 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
इस्राएल आणि यहूदीयाच्या लोकांची संख्या समुद्र किनार्यावरील वाळू इतकी अगणित होती. ते खाऊन पिऊन मजेत होते. आणि फरात नदीपासून पलिष्ट्यांच्या देशापर्यंत आणि पुढे खाली इजिप्तच्या हद्दीपर्यंत या सर्व राज्यांवर शलोमोनचे राज्य होते. या सर्व राष्ट्रांनी शलोमोनला कर दिला व शलोमोनच्या सर्व आयुष्यभर ते त्याच्या अधीन राहिले. शलोमोनचा रोजचा पुरवठा तीस कोर सपीठ व साठ कोर पीठ, गोठ्यात चारलेले दहा बैल, कुरणात चरणारे वीस बैल आणि शंभर मेंढरे व बोकडे, याशिवाय हरिण, सांबरे, भेकरे आणि पुष्ट पक्षी. कारण फरात नदीच्या पश्चिमेकडील तिफसाहपासून गाझापर्यंतच्या सर्व राज्यांवर शलोमोनचे राज्य होते आणि सर्व बाजूने शांती होती. शलोमोनच्या जीवनभरात यहूदीया आणि इस्राएलचे लोक, दानपासून बेअर-शेबापर्यंत सुरक्षित होते, प्रत्येकजण आपआपल्या द्राक्षवेली व अंजिराच्या झाडाखाली होते.
१ राजे 4:20-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
यहूदा व इस्राएल हे समुद्रकिनार्याच्या वाळूप्रमाणे संख्येने बहुत असत; ते खाऊनपिऊन चैनीत असत. महानदापासून पलिष्ट्यांच्या देशापर्यंत व मिसर देशाच्या सरहद्दीपर्यंत सर्व राज्यांवर शलमोनाने राज्य केले; तेथील लोकांनी शलमोनाच्या सर्व आयुष्यभर त्याला करभार दिला व ते त्याचे अंकित राहिले. शलमोनाला एका दिवसाची भोजनसामग्री लागे, ती येणेप्रमाणे : तीस कोर मापाचे सपीठ; साठ कोर मापाचे पीठ; दहा पुष्ट बैल, कुरणातले वीस बैल, शंभर मेंढरे, ह्याखेरीज हरिणे, सांबरे, भेकरे व आणखी पुष्ट पक्षी. महानदाच्या अलीकडच्या सर्व देशांवर म्हणजे तिफसाह येथून गज्जापर्यंतच्या देशांवर जितके राजे होते त्या सर्वांवर शलमोनाचे प्रभुत्व होते; आणि आसपासच्या सर्व देशांच्या लोकांशी त्याचे सख्य असे. दानापासून बैर-शेब्यापर्यंत सारे यहूदी व इस्राएल आपापली द्राक्षलता व अंजीर वृक्ष ह्यांच्याखाली शलमोनाच्या सर्व कारकिर्दीत निर्भय राहत होते.