YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 4:1-34

१ राजे 4:1-34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

राजा शलमोन सर्व इस्राएलाचा राजा होता. त्यास शासनात मदत करणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यांची नावे अशी: सादोकाचा पुत्र अजऱ्या, हा याजक होता. शिशाचे पुत्र अलिहोरेफ आणि अहीया. न्यायालयातील घडामोडींची टिपणे ठेवणे हे त्यांचे काम होते. अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट हा बखरकार होता. बनाया हा यहोयादाचा पुत्र सेनापती होता सादोक आणि अब्याथार याजक होते नाथानचा पुत्र अजऱ्या हा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रमुख होता, नाथानाचा पुत्र जाबूद याजक असून राजाचा सल्लागार होता. अहीशार हा राजाच्या महालातील सर्व गोष्टींचा प्रमुख होता, अब्दाचा पुत्र अदोनीराम गुलामांच्या खात्याचा प्रमुख होता. इस्राएलचे कारभाराच्या सोयीसाठी बारा भाग पाडलेले होते. प्रत्येक भागावर शलमोनाने कारभारी नेमले होते. त्या त्या भागातून अन्नधान्य गोळा करून राजाच्या कुटुंबियांना देण्याची त्यांची जबाबदारी होती. बारा कारभाऱ्यापैकी प्रत्येकावर प्रतिवर्षी एक महिना ही पाळी येई. त्या बारा कारभाऱ्याची नावे अशी: बेन-हूर, हा एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशावर अधिकारी होता. माकस, शालबीम, बेथ-शेमेश व एलोन बेथ-हानान यांच्यावर बेन-देकेर हा कारभारी. अरुबोथ, सोखो आणि हेफेर या प्रांतावर बेन-हेसेद हा कारभारी होता. बेन-अबीनादाब पूर्ण दोर प्रांतावर होता. शलमोनाची कन्या टाफाथ ही याची पत्नी. तानख, मगिद्दो व पूर्ण बेथ-शान म्हणजेच सारतानाजवळ इज्रेलच्या खाली बेथ-शानापासून आबेल-महोलापर्यंत व यकमामाच्या उतारापर्यंत अहीलुदाचा पुत्र बाना हा होता. रामोथ-गिलादावर बेन-गेबेर; हा प्रमुख होता. गिलाद येथील मनश्शेचा पुत्र याईर याची सर्व गावे, बाशानातले अर्गोब प्रांत हे भाग त्याच्याकडे होते. या भागात भक्कम तटबंदीची आणि पितळेची अडसर असणारी साठ मोठी नगरे होती. इद्दोचा पुत्र अहीनादाब महनाईम प्रांतावर होता. नफतालीवर अहीमास होता. (ज्याने शलमोनाची कन्या बासमथ हिच्याशी लग्न केले होते.) हूशयाचा पुत्र बाना, हा आशेर आणि आलोथ यांच्यावर कारभारी होता. पारुहाचा पुत्र, यहोशाफाट इस्साखारवर होता. एलाचा पुत्र शिमी बन्यामीनचा कारभारी होता. उरीचा पुत्र गेबेर गिलाद प्रांतावर होता. अमोऱ्यांचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग हे या प्रांतात राहत होते. गेबेर मात्र त्या प्रांताचा एकमेव कारभारी होता. यहूदा आणि इस्राएलमध्ये समुंद्रातील वाळूसारखी बहुसंख्य माणसे होती. ती खात, पीत व मजा करत आनंदाने जगत होती. नदीपासून ते पलिष्ट्यांच्या भूमीपर्यंत व मिसराच्या सीमेपर्यंत शलमोनाची सत्ता होती. या देशांकडून शलमोनाला नजराणे येत आणि ते आयुष्यभर त्याचा आदर करीत. शलमोनाला एका दिवसास जेवणाऱ्या सर्वांसाठी खालील अन्नपदार्थ लागत:तीस कोर मापाचे सपीठ; साठ कोर मापाचे पीठ, दहा पुष्ट गुरे कुरणावर चरलेली वीस गुरे, शंभर मेंढरे, हरीण, सांबरे, भेकर, खाण्यायोग्य पक्षी. महानदाच्या अलीकडील सर्व देशांवर म्हणजे तिफसाह येथून गज्जापर्यंतच्या सर्व देशांवर व जितके राजे होते त्यावर त्याची सत्ता होती. या प्रदेशात सर्वत्र शांतता नांदत होती. शलमोनाच्या दिवसात दानपासून बैर-शेबापर्यंत, यहूदा आणि इस्राएलमधील सर्व लोक निर्धास्तपणे व शांततेने राहत होते. आपापल्या अंजीर वृक्षांखाली आणि द्राक्षबागांमध्ये ते निवांत होते. रथाच्या चार हजार घोड्यांसाठी पागा होत्या. तसेच शलमोनाकडे बारा हजार स्वार होते. शिवाय ते बारा कारभारी प्रत्येक महिन्याला शलमोनाला सर्व जीवनावश्यक गोष्टी पुरवत होते. राजाच्या पंगतीला बसून जेवणाऱ्या सर्वांना ते पुरेसे होते. रथाच्या आणि स्वारीच्या घोड्यांसाठी पुरेसा पेंढा आणि सातूही ते कारभारी पुरवीत. नेमलेल्या ठिकाणी प्रत्येकजण हे धान्य आणून टाकी. देवाने शलमोनाला भरपूर शहाणपण व बुध्दी दिली होती. आणि समुद्राच्या वाळूप्रमाणे विशाल मन दिले. पूर्वेकडील सर्वांपेक्षा शलमोनाचे शहाणपण अधिक होते. मिसरमधल्यापेक्षा ते थोर होते. पृथ्वीच्या पाठीवर त्याच्याइतका सूज्ञ कोणी नव्हता. एज्राही एथान तसेच माहोलची पुत्र, हेमान व कल्यकोल व दर्दा, यांच्यापेक्षा तो शहाणा होता. त्याचे नाव इस्राएल राष्ट्रा बाहेर सर्वत्र पसरले होते. आपल्या आयुष्यात त्याने तीन हजार बोध वचने आणि पंधराशे गीते लिहिली. निसर्गाविषयी ही त्यास ज्ञान होते. लबानोनातल्या गंधसरुपासून भिंतीतून उगवणाऱ्या वनस्पतीपर्यंत सर्व तऱ्हेच्या झाडांचे त्यास ज्ञान होते. प्राणी, पक्षी, मासे आणि सरपटणारे प्राणी यांचेही त्याने वर्णन केले आहे. देशोदेशीचे लोक त्याच्याकडे ज्ञानार्जनासाठी येत. सर्व राष्ट्रांचे राजे आपल्या पदरच्या हुशार मनुष्यांना शलमोनाकडून ज्ञान घ्यायला पाठवत.

सामायिक करा
१ राजे 4 वाचा

१ राजे 4:1-34 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

शलोमोन राजाने सर्व इस्राएलवर राज्य केले. हे सर्व मुख्य अधिकारी होते: सादोकाचा पुत्र अजर्‍याह याजक; शिशाचे पुत्र एलिहोरेफ आणि अहीयाह सचिव; अहीलुदचा पुत्र यहोशाफाट, नोंदणी करणारा; यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, मुख्य सेनापती होता; सादोक व अबीयाथार, हे याजक होते. नाथानचा पुत्र अजर्‍याह, हा राज्याधिकार्‍यांचा मुख्य होता. नाथानचा पुत्र जाबूद, राजाचा याजक व सल्लागार होता; अहीशार, राजवाड्या संबंधीच्या कामकाजाचा व्यवस्थापक होता. अब्दाचा पुत्र अदोनिराम हा मजुरांवर अधिकारी होता. शलोमोनने सर्व इस्राएलात बारा जिल्हाधिकारीही नेमले होते. ते राजाला आणि राजघराण्याला अन्नसामुग्री पुरवित असत. प्रत्येकाला वर्षातून एकदा, महिनाभर सामुग्री पुरवावी लागत असे. त्यांची नावे ही होती: बेन-हूर हा एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशावर होता; बेन-देकेर हा माकाज, शालब्बीम, बेथ-शेमेश आणि एलोन-बेथ-हानान या प्रदेशांवर होता. बेन-हेसेद हा अरुब्बोथवर होता (सोकोह आणि हेफेरचा सर्व प्रदेश त्याच्याकडे होता); बेन-अबीनादाब हा नाफोथ दोर यावर (शलोमोनची कन्या ताफाथ हिच्याशी त्याचा विवाह झाला होता); अहीलुदचा पुत्र बाअना याच्याकडे तानख व मगिद्दो आणि येज्रीलखाली असलेल्या सारेथान जवळील बेथ-शानपर्यंत सर्व प्रदेश, तसेच बेथ-शानपासून योकमेअम पर्यंतचा आबेल-महोलाहचा प्रदेश; बेन-गेबेर हा रामोथ-गिलआदवर (मनश्शेहहचा पुत्र याईरची गावे, त्याचप्रमाणे बाशानातील अर्गोब व त्यातील तटबंदीची व कास्याच्या अडसरांची फाटके असलेली साठ मोठी नगरे याच्याकडे होती); इद्दोचा पुत्र अहीनादाबकडे महनाईम. अहीमाजकडे नफताली होते (त्याने शलोमोनची कन्या बासमाथ हिच्याशी विवाह केला होता); हूशाईचा पुत्र बआना आशेर आणि बालोथवर; पारुआहचा पुत्र यहोशाफाट हा इस्साखारमध्ये होता; एलाचा पुत्र शिमी हा बिन्यामीन प्रांतावर. उरीचा पुत्र गेबेर हा गिलआद प्रांतावर (अमोर्‍यांचा राजा सीहोन आणि बाशानचा राजा ओग यांचा प्रदेश). त्या जिल्ह्यावर तो एकटाच अधिकारी होता. इस्राएल आणि यहूदीयाच्या लोकांची संख्या समुद्र किनार्‍यावरील वाळू इतकी अगणित होती. ते खाऊन पिऊन मजेत होते. आणि फरात नदीपासून पलिष्ट्यांच्या देशापर्यंत आणि पुढे खाली इजिप्तच्या हद्दीपर्यंत या सर्व राज्यांवर शलोमोनचे राज्य होते. या सर्व राष्ट्रांनी शलोमोनला कर दिला व शलोमोनच्या सर्व आयुष्यभर ते त्याच्या अधीन राहिले. शलोमोनचा रोजचा पुरवठा तीस कोर सपीठ व साठ कोर पीठ, गोठ्यात चारलेले दहा बैल, कुरणात चरणारे वीस बैल आणि शंभर मेंढरे व बोकडे, याशिवाय हरिण, सांबरे, भेकरे आणि पुष्ट पक्षी. कारण फरात नदीच्या पश्चिमेकडील तिफसाहपासून गाझापर्यंतच्या सर्व राज्यांवर शलोमोनचे राज्य होते आणि सर्व बाजूने शांती होती. शलोमोनच्या जीवनभरात यहूदीया आणि इस्राएलचे लोक, दानपासून बेअर-शेबापर्यंत सुरक्षित होते, प्रत्येकजण आपआपल्या द्राक्षवेली व अंजिराच्या झाडाखाली होते. शलोमोनकडे रथाच्या घोड्यांसाठी चार हजार तबेले आणि बारा हजार घोडे होते. जिल्हाधिकारी आपआपल्या महिन्यात शलोमोन राजाला व त्यांच्या मेजावर भोजन करणार्‍यांसाठी अन्नसामुग्रींचा पुरवठा करीत असत. कशाचीही वाण पडणार नाही याची ते दक्षता घेत असत. त्याचप्रमाणे रथाच्या घोड्यांसाठी व इतर घोड्यांसाठी देखील जव व वैरण त्यांच्या नेमलेल्या ठिकाणी आणत असत. परमेश्वराने शलोमोनला ज्ञान व समुद्रकाठच्या वाळूप्रमाणे मोजमाप काढता येत नाही इतके फार मोठे शहाणपण व अगाध समज दिली होती. पूर्वेकडील देशातील सर्व लोकांपेक्षा किंवा इजिप्तमधील सर्व ज्ञानापेक्षा शलोमोनचे ज्ञान फार मोठे होते. इतर मनुष्यांपेक्षा, म्हणजेच एज्रावासी एथान, माहोलचे पुत्र हेमान, कल्कोल व दारदा यांच्यापेक्षा शलोमोन ज्ञानी होता. आणि त्याची किर्ती आसपासच्या सर्व राष्ट्रांपर्यंत पसरली. शलोमोनने तीन हजार नीतिसूत्रे आणि एक हजार पाच गीते रचली. लबानोनातील गंधसरूपासून भिंतीतून उगविणार्‍या एजोबापर्यंत वनस्पती जीवनाविषयी तो बोलला. पशू व पक्षी, सरपटणारे जंतू व मासे याबद्दलही त्याने वर्णन केले. शलोमोनच्या ज्ञानाचे बोल ऐकायला सर्व राष्ट्रांतून लोक येत असत, ते जगातील सर्व राजे ज्यांनी शलोमोनच्या ज्ञानाविषयी ऐकले होते, त्यांच्याद्वारे पाठवले जात असत.

सामायिक करा
१ राजे 4 वाचा

१ राजे 4:1-34 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

शलमोन राजा सर्व इस्राएलाचा राजा होता. त्याचे सरदार हे होते : सादोकाचा पुत्र अजर्‍या याजक, शिशाचे पुत्र अलिहोरेफ व अहीया हे चिटणीस, अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट बखरनवीस (इतिहासलेखक); यहोयादाचा पुत्र बनाया सैन्यावर होता; सादोक व अब्याथार हे याजक होते. नाथानाचा पुत्र अजर्‍या कमावीसदारांवर (कारभारी) होता; नाथानाचा पुत्र जाबूद हा प्रधान व राजमित्र होता; अहीशार हा खानगी कारभारी (घरकारभारी) होता; व अब्दाचा पुत्र अदोनीराम बिगार्‍यांवर होता. शलमोनाचे बारा कमावीसदार असत; ते सर्व इस्राएलावर नेमलेले असून राजाला व त्याच्या घराण्याला अन्नसामग्री पुरवत; वर्षातून एकेका महिन्याचा पुरवठा करण्याचे काम एकेकाकडे असे. त्यांची नावे ही : एफ्राइमाच्या डोंगरी प्रदेशात बेन-हूर; माकस, शालबीम, बेथ-शेमेश व एलोन-बेथ-हानान ह्यांत बेन-देकर; अरुबोथात बेन हेसेद (ह्याच्याकडे सोखो व हेफेर प्रदेश होते); दोरच्या सर्व पठारात बेन-अबीनादाब (शलमोनाची कन्या टाफाथ ही त्याची स्त्री होती); तानख, मगिद्दो आणि बेथ-शानचा अवघा प्रदेश म्हणजे सारतानाजवळील इज्रेलाखालचा बेथ-शानापासून आबेल-महोलापर्यंत आणि यकमामाच्या पलीकडच्या बाजू-पर्यंत असलेला प्रदेश ह्यांत अहीलुदाचा पुत्र बाना हा होता; रामोथ-गिलादात बेन-गेबेर होता (ह्याच्याकडे मनश्शेचा पुत्र याईर ह्याची गिलादातली गावे होती; ह्याशिवाय आणखी बाशानातला अर्गोब प्रांत ह्यातली तटबंदी व पितळेचे अडसर असलेली साठ मोठी नगरे त्याच्याकडे होती); इद्दोचा पुत्र अहीनादाब महनाइमात होता; नफतालीत अहीमास हा होता (त्याने शलमोनाची कन्या बासमथ हिच्याशी विवाह केला होता); आशेर व आलोथ ह्यांत हूशयाचा पुत्र बाना हा होता; इस्साखारात पारूहाचा पुत्र यहोशाफाट हा होता; बन्यामिनात एलाचा पुत्र शिमी हा होता; ऊरीचा पुत्र गेबेर हा गिलादात होता; ह्या एवढ्या देशात तो एकटाच कमावीसदार होता. हा देश पूर्वी अमोर्‍यांचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग ह्यांचा होता. यहूदा व इस्राएल हे समुद्रकिनार्‍याच्या वाळूप्रमाणे संख्येने बहुत असत; ते खाऊनपिऊन चैनीत असत. महानदापासून पलिष्ट्यांच्या देशापर्यंत व मिसर देशाच्या सरहद्दीपर्यंत सर्व राज्यांवर शलमोनाने राज्य केले; तेथील लोकांनी शलमोनाच्या सर्व आयुष्यभर त्याला करभार दिला व ते त्याचे अंकित राहिले. शलमोनाला एका दिवसाची भोजनसामग्री लागे, ती येणेप्रमाणे : तीस कोर मापाचे सपीठ; साठ कोर मापाचे पीठ; दहा पुष्ट बैल, कुरणातले वीस बैल, शंभर मेंढरे, ह्याखेरीज हरिणे, सांबरे, भेकरे व आणखी पुष्ट पक्षी. महानदाच्या अलीकडच्या सर्व देशांवर म्हणजे तिफसाह येथून गज्जापर्यंतच्या देशांवर जितके राजे होते त्या सर्वांवर शलमोनाचे प्रभुत्व होते; आणि आसपासच्या सर्व देशांच्या लोकांशी त्याचे सख्य असे. दानापासून बैर-शेब्यापर्यंत सारे यहूदी व इस्राएल आपापली द्राक्षलता व अंजीर वृक्ष ह्यांच्याखाली शलमोनाच्या सर्व कारकिर्दीत निर्भय राहत होते. रथांच्या घोड्यांची चाळीस हजार ठाणी व बारा हजार स्वार शलमोन बाळगून होता. शलमोन राजाला व त्याच्या पंक्तीला भोजन करणार्‍यांसाठी कमावीसदार त्यांच्या-त्यांच्या नेमलेल्या महिन्यांत अन्नाचा पुरवठा करीत; कोणत्याही पदार्थाची वाण ते पडू देत नसत. रथांच्या व स्वारीच्या घोड्यांसाठी जव व पेंढा लागे तो प्रत्येक कमावीसदार नियमाप्रमाणे पोचता करीत असे. देवाने शलमोनाला अलोट शहाणपण व बुद्धी दिली आणि समुद्रकाठच्या वाळूसारखे विशाल मन दिले. शलमोनाचे शहाणपण सर्व पूर्वदेशनिवासी आणि मिसरी ह्यांच्याहून अधिक होते. तो सर्व मनुष्यांहून, एज्राही एथान, हेमान व माहोलाचे पुत्र कल्कोल व दर्दा ह्या सर्वांहून शहाणा होता, आणि त्याची कीर्ती आसपासच्या सर्व राष्ट्रांमध्ये पसरली. त्याने तीन हजार नीतिसूत्रे कथन केली व एक हजार पाच गीते रचली. त्याने लबानोनावरील देवदारूपासून ते भिंतीतून उगवणार्‍या एजोब झाडापर्यंत सर्व उद्भिज्जांचे विवेचन केले; तसेच पशू, पक्षी, रांगणारे जंतू व मासे ह्यांचेही त्याने विवेचन केले. पृथ्वीवरील ज्या ज्या राष्ट्रांनी व ज्या ज्या राजांनी शलमोनाच्या शहाणपणाची कीर्ती ऐकली त्यांच्याकडून लोक त्याचे शहाणपण ऐकायला येत असत.

सामायिक करा
१ राजे 4 वाचा