YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 21:1-29

१ राजे 21:1-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

नंतर असे झाले की, अहाब राजाचा राजवाडा शोमरोनात होता. त्याच्या महालाशेजारी इज्रेल येथे एक द्राक्षाचा मळा होता. तो नाबोथ इज्रेलकर नावाच्या मनुष्याचा होता. एकदा अहाब नाबोथला म्हणाला, “तुझा मळा मला दे. तिथे मला भाजीचा मळा करायचा आहे. तुझा मळा माझ्या महालाला लागूनच आहे. त्याच्या ऐवजी मी तुला आणखी चांगला द्राक्षमळा देईन. किंवा तुला हवे असेल तर याचा मोबदला मी पैशात देईन.” नाबोथ अहाबाला म्हणाला, “माझ्या वाडवडिलांचे वतन मी आपणास द्यावे असे परमेश्वर माझ्या हातून न घडवो.” तेव्हा अहाब घरी परतला. पण तो नाबोथावर रागावलेला होता. इज्रेलचा हा मनुष्य जे बोलला ते त्यास आवडले नाही. (नाबोथ म्हणाला होता, “माझ्या कुटुंबाची जमिन मी तुम्हास देणार नाही)” अहाब अंथरुणावर पडला त्याने तोंड फिरवून घेतले आणि अन्नपाणी नाकारले. अहाबाची पत्नी ईजबेल त्याच्याजवळ गेली. त्यास म्हणाली, “तुम्ही असे खिन्न का? तुम्ही जेवत का नाही?” अहाब म्हणाला, “इज्रेल येथल्या नाबोथाला मी त्याचा मळा मला द्यायला सांगितला ‘त्याची पूर्ण किंमत मी मोजायला तयार आहे किंवा हवे तर दुसरी जमीन द्यायला तयार आहे हे ही मी त्यास सांगितले. पण नाबोथ त्याचा मळा द्यायला कबूल होत नाही.” ईजबेल त्यास म्हणाली, “पण तुम्ही तर इस्राएलाचे राजे आहात. उठा, काहीतरी खा म्हणजे तुम्हास बरे वाटेल. नाबोथ इज्रेलकरचा मळा मी आपल्याला मिळवून देईन.” ईजबेलने मग काही पत्रे लिहिली. पत्रांवर तिने अहाबाची सही केली. अहाबाच्या शिक्का वापरुन पत्रांवर तो शिक्का उमटवला. मग तिने ही पत्रे नाबोथाच्या गावच्या वडिलधाऱ्या मंडळींना आणि थोरामोठ्यांना पाठवली. पत्रातला मजकूर असा होता: “एक दिवस उपवासाची घोषणा करा. मग गावातल्या लोकांस एकत्र बोलवा. तिथे नाबोथविषयी बोलणे होईल. नाबोथाबद्दल खोट्या गोष्टी सांगणारी काही अधम माणसे जमवा. नाबोथ राजाविरुध्द आणि देवाविरुध्द बोलला, हे आम्ही ऐकले, असे त्या मनुष्यांनी म्हणावे. एवढे झाल्यावर नाबोथला गावाबाहेर घालवून दगडांचा वर्षाव करून मारा.” ईजबेलीच्या पत्रातील आज्ञेप्रमाणे इज्रेलमधल्या गावातील वयाने आणि मानाने वडिलधाऱ्या (पुढ्याऱ्यांनी) मंडळींनी ही आज्ञा मानली. त्यांनी उपवासाचा म्हणून एक दिवस घोषित केला. त्यादिवशी सर्व लोकांस सभेत बोलावले. नाबोथला सर्वांसमोर खास आसनावर बसवले. मग, “नाबोथ देवाविरुध्द आणि राजाविरुध्द बोलल्याचे आपण ऐकले आहे” असे दोन अधम मनुष्यांनी साक्ष सांगितली. तेव्हा लोकांनी नाबोथला गावाबाहेर घालवले आणि तो मरेपर्यंत त्याच्यावर दगडांचा वर्षाव केला. मग त्या प्रतिष्ठित मनुष्यांनी ईजबेलकडे निरोप पाठवला. “नाबोथचा वध झाला आहे.” असा तो निरोप होता. ईजबेलने हे ऐकले तेव्हा ती अहाबाला म्हणाली, “नाबोथ मेला. आता तुम्हास नाबोथ इज्रेलकरचा हवा होता तो मळा तुम्ही जाऊन ताब्यात घेऊ शकता” जो तो पैसे घेऊनही ताब्यात द्यायला तयार नव्हता नाबोथ आता जिवंत नाही मेला आहे. यावर इज्रेलकर नाबोथ आता मरण पावला आहे हे अहाबाने ऐकले तेव्हा त्याने तो द्राक्षमळा आपल्या ताब्यात घेतला. यावेळी परमेश्वर एलीया तिश्बीशी बोलला, “ऊठ शोमरोनमधल्या इस्राएलचा राजा अहाबाकडे जा तो नाबोथाच्या द्राक्षमळ्यात असेल. तो मळा वतन करून घ्यायला तिथे गेला आहे. अहाबाला जाऊन सांग की परमेश्वर म्हणतो, ‘अहाब, नाबोथला तू मारलेस. आता त्याचा मळा वतन करून घ्यायला निघालास तेव्हा आता मी सांगतो ते ऐक. नाबोथ मेला त्याच जागी तू सुध्दा मरशील ज्या कुत्र्यांनी नाबोथाचे रक्त चाटले तीच कुत्री त्याच ठिकाणी तुझे रक्त चाटतील.” तेव्हा एलीया अहाबाकडे गेला. अहाबाने एलीयाला पाहिले आणि तो म्हणाला, तुला मी पुन्हा सापडलो. “तू नेहमीच माझ्याविरुध्द आहेस” एलीया म्हणाला, हो, “तुला मी पुन्हा शोधून काढले आहे. तुझे आयुष्य तू परमेश्वराचे अपराध करण्यातच घालवलेस. तेव्हा परमेश्वर तुला काय सांगतो ते ऐक, मी तुझा नाश करीन. मी तुला आणि तुझ्या कुटुंबातील सर्व पुरुषांना तो इस्राएलात कोंडलेला असो किंवा मोकळा असो त्यास मी ठार करीन. नबाटाचा पुत्र यराबाम याच्या कुटुंबासारखीच तुझ्या घराचीही वाताहत होईल. अहीयाचा पुत्र बाशाच्या कुटुंबासारखीच तुझी दशा होईल. या दोन्ही घराण्यांचा समूळ नाश झाला. तू माझा क्रोध जागा केलास. इस्राएल लोकांसही पाप करायला लावलेस.” शिवाय परमेश्वर असे म्हणतो, “तुझी पत्नी ईजबेल हिच्या शरीरावर इज्रेलमध्ये कुत्री तुटून पडतील. अहाबाच्या घरातल्या ज्याला कुणाला गावात मरण येईल त्यास कुत्री खातील आणि जो कोणी शेतात मरेल तो पक्ष्यांचे भक्ष्य होईल” अहाबाने जितकी पापे केली, जितके अपराध केले तेवढे कोणीच केले नाहीत. त्याची पत्नी ईजबेल हिने त्यास भर दिल्यामुळे त्याने परमेश्वराच्या दृष्टीने हे सर्व करायला लावले. अहाबाने आणखी एक पातक केले ते म्हणजे अमंगळ मूर्तींची पूजा केली. अमोरी लोकांनीही हेच केले तेव्हा परमेश्वराने त्यांच्याकडून हा प्रदेश काढून घेऊन इस्राएल लोकांस दिला. एलीयाचे बोलून झाल्यावर अहाबाला फार दु:ख झाले. दु:खाने त्याने अंगावरचे कपडे फाडले. मग विशेष शोकवस्त्रे परिधान केली. त्याने अन्नत्याग केला. त्याच कपड्यात तो झोपला. तो अतिशय दु:खी आणि खिन्न झाला होता. परमेश्वर एलीया तिश्बी संदेष्ट्याला म्हणाला, “अहाब माझ्यापुढे नतमस्तक झाला आहे असे दिसते. तेव्हा तो जिवंत असेपर्यंत मी त्यास संकटात लोटणार नाही. त्याचा पुत्र राज्यावर येईपर्यंत मी थांबेन. मग त्याच्या घराला मी उपद्रव देईन.”

सामायिक करा
१ राजे 21 वाचा

१ राजे 21:1-29 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

काही काळानंतर, येज्रीली नाबोथच्या द्राक्षमळ्यासंबंधी एक घटना घडली, हा द्राक्षमळा अहाब राजाच्या शोमरोनातील येज्रील राजवाड्याजवळ होता. अहाब नाबोथला म्हणाला, “तुझ्या द्राक्षमळ्यात मला भाजीपाल्याची बाग करू दे, कारण तो माझ्या राजवाड्याजवळ आहे. त्याचा मोबदला म्हणून मी तुला त्याहून चांगला द्राक्षमळा देईन किंवा तुझी इच्छा असली तर त्याचे योग्य मोल मी तुला देईन.” परंतु नाबोथने अहाबाला उत्तर दिले, “माझ्या पूर्वजांचे वतन मी तुला द्यावे असे याहवेह माझ्या हातून कधी न घडवो.” त्यामुळे अहाब खिन्न व रागाने भरून आपल्या घरी गेला कारण येज्रीली नाबोथने त्याला म्हटले, “माझ्या पूर्वजांचे वतन मी तुला देणार नाही.” अहाब रुसून व अन्न खाण्यास नाकारीत आपल्या बिछान्यावर पडून राहिला. तेव्हा त्याची पत्नी ईजबेल आत आली व त्याला विचारले, “तुम्ही इतके खिन्न का आहात? तुम्ही अन्न का खात नाही?” तो तिला म्हणाला, “कारण येज्रीली नाबोथला मी म्हणालो, ‘तुझा द्राक्षमळा मला विकत दे; नाहीतर तुझी इच्छा असली तर, त्याबदल्यात त्याच किमतीत मी तुला दुसर्‍या ठिकाणी द्राक्षमळा देईन.’ परंतु तो म्हणाला, ‘मी तुला माझा द्राक्षमळा देणार नाही.’ ” त्याची पत्नी ईजबेल म्हणाली, “इस्राएलचा राजा असताना तुमचे वर्तन असे असावे काय? उठा आणि भोजन करा! आपले मन आनंदित करा. येज्रीली नाबोथचा द्राक्षमळा मी तुम्हाला मिळवून देईन.” मग तिने अहाबाच्या नावाने पत्रे लिहिली, त्यावर त्याचा शिक्का मारला आणि नाबोथच्या शहरात त्याच्याबरोबर राहत असलेले वडीलजन व प्रतिष्ठित लोकांकडे ती पाठवली. त्या पत्रांमध्ये तिने लिहिले: “शहरात उपास जाहीर करा आणि नाबोथला सर्वात महत्त्वाच्या स्थळी बसवा. परंतु त्याच्यासमोर दोन अधम व्यक्तींना बसवावे आणि ज्या परमेश्वराने आशीर्वाद दिला त्यांना व राजाला शाप दिल्याचा आरोप त्याच्यावर आणावा. मग त्याला बाहेर नेऊन तो मरेपर्यंत धोंडमार करा.” तेव्हा नाबोथच्या शहरात राहत असलेल्या वडीलजन व प्रतिष्ठित लोकांनी ईजबेलने लिहिलेल्या पत्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे केले. त्यांनी उपास जाहीर केला व लोकांमधील अगदी महत्त्वाच्या स्थळी नाबोथला बसविले. मग दोन अधम व्यक्ती त्याच्यासमोर येऊन बसले आणि लोकांसमक्ष नाबोथविरुद्ध आरोप आणले. ते म्हणाले, “नाबोथने परमेश्वराला व राजाला शाप दिला आहे.” म्हणून त्यांनी त्याला शहराच्या बाहेर नेले आणि तो मरेपर्यंत त्याला धोंडमार केली. नंतर त्यांनी ईजबेलला निरोप पाठवून म्हटले: “नाबोथला धोंडमार करून जिवे मारले आहे.” येज्रीली नाबोथला धोंडमार करून मारले आहे हे ईजबेलने ऐकताच, ती अहाबाला म्हणाली, “उठा आणि ज्या येज्रीली नाबोथने तुम्हाला आपला द्राक्षमळा पैसे घेऊन देण्यास नाकारले त्याचा द्राक्षमळा ताब्यात घ्या. तो आता जिवंत नाही, तो मेला आहे.” येज्रीली नाबोथ मेला आहे असे जेव्हा अहाबाने ऐकले, तेव्हा तो उठला व नाबोथचा द्राक्षमळा ताब्यात घेण्यास निघाला. त्यानंतर तिश्बीचा एलीयाहकडे याहवेहचे वचन आले: “खाली जाऊन इस्राएलचा राजा अहाब, जो शोमरोनमध्ये राज्य करतो त्याला भेट, आता तो नाबोथच्या द्राक्षमळ्यात आहे, तो आपल्या ताब्यात घ्यावा म्हणून तो तिथे गेला आहे. त्याला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: तू एका मनुष्याचा खून करून त्याची मालमत्ता ताब्यात घेतली नाही काय?’ तेव्हा त्याला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: ज्या ठिकाणी कुत्र्यांनी नाबोथचे रक्त चाटले, त्याच ठिकाणी कुत्रे तुझे रक्त; होय, तुझेच रक्त चाटतील!’ ” अहाब एलीयाहला म्हणाला, “हे माझ्या वैर्‍या, शेवटी तू मला शोधलेच!” तो म्हणाला, “मी तुला शोधलेच, कारण याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते करण्यास तू स्वतःस विकून टाकले आहेस. याहवेह म्हणतात, ‘मी तुझ्यावर अरिष्ट आणणार आहे. मी तुझी संतती नष्ट करून टाकीन व इस्राएलात अहाबाच्या कुटुंबातून प्रत्येक शेवटचा पुरुष; तो गुलाम असो किंवा स्वतंत्र असो, तो मी उपटून टाकीन. मी तुझ्या कुटुंबाचे नेबाटाचा पुत्र यरोबोअम व अहीयाहचा पुत्र बाशा यांच्याप्रमाणे करेन, कारण तू माझा क्रोध भडकविला आहेस आणि इस्राएलास पाप करण्यास भाग पाडले आहे.’ “आणि ईजबेलविषयी याहवेह म्हणतात: ‘येज्रीलच्या भिंतीजवळ ईजबेलला कुत्रे खातील.’ “अहाबाच्या संबंधातील लोक जे शहरात मरतील त्यांना कुत्रे खातील, आणि वेशीच्या बाहेर जे मरतील त्यांना आकाशातील पक्षी खातील.” (अहाबासारखा कोणी कधीही झाला नाही, ज्याने आपली पत्नी ईजबेल हिच्या सांगण्यानुसार, याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते करण्यास स्वतःला विकून टाकले. याहवेहने इस्राएली लोकांच्या पुढून घालवून दिलेल्या अमोरी लोकांप्रमाणे त्याने मूर्तींच्या मागे लागून अमंगळ कृत्ये केली.) अहाबाने जेव्हा हे शब्द ऐकले, त्याने आपली वस्त्रे फाडली व गोणपाट नेसून उपास केला. तो गोणपाटात राहून दीनपणे जगू लागला. नंतर एलीयाह तिश्बीकडे याहवेहचे वचन आले: “अहाब माझ्यासमोर कसा नम्र झाला आहे हे तुला दिसते का? कारण त्याने स्वतःला नम्र केले आहे, म्हणून हे अरिष्ट मी तो जिवंत असताना आणणार नाही, परंतु ते मी त्याच्या घराण्यावर त्याच्या पुत्राच्या काळात आणेन.”

सामायिक करा
१ राजे 21 वाचा

१ राजे 21:1-29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

वरील गोष्टीनंतर असे झाले की इज्रेलकर नाबोथ ह्याचा द्राक्षमळा इज्रेल येथे शोमरोनचा राजा अहाब ह्याच्या राजवाड्याजवळ होता. अहाब नाबोथास म्हणाला, “तुझा द्राक्षमळा माझ्या वाड्यानजीक आहे, तो मला दे, म्हणजे मी त्यात भाजीपाला लावीन; त्याच्याऐवजी मी तुला त्याहून चांगला द्राक्षमळा देतो किंवा तुझी इच्छा असल्यास मी तुला त्याचे पैसे देतो.” नाबोथ अहाबाला म्हणाला, “माझ्या वाडवडिलांचे वतन मी आपणाला द्यावे असे परमेश्वर माझ्या हातून न घडवो.” “मी आपल्या वाडवडिलांचे वतन तुला देणार नाही,” असे इज्रेलकर नाबोथ म्हणाला, म्हणून अहाब उदास व खिन्न होऊन आपल्या घरी गेला. तो जाऊन बिछान्यावर पडला आणि आपले तोंड फिरवून अन्न सेवन करीना. तेव्हा त्याची स्त्री ईजबेल ही त्याच्याकडे येऊन विचारू लागली, “आपण अन्न सेवन करीत नाही, इतके आपले मन का खिन्न झाले आहे?” तो तिला म्हणाला, “इज्रेलकर नाबोथ ह्याला मी म्हणालो की, ‘पैसे घेऊन मला तुझा द्राक्षमळा दे, अथवा तुला पसंत वाटल्यास मी त्याच्याऐवजी तुला दुसरा द्राक्षमळा देतो’; ह्यावर तो म्हणाला, ‘मी आपला द्राक्षमळा तुला देणार नाही.”’ त्याची बायको ईजबेल त्याला म्हणाली, “सांप्रत इस्राएलावर तुमची राजसत्ता आहे ना! चला, उठा, अन्न सेवन करा, तुमचे मन आनंदित करा; इज्रेलकर नाबोथाचा द्राक्षमळा मी तुम्हांला मिळवून देते.” मग तिने अहाबाच्या नावाने पत्रे लिहिली व त्यांवर त्याची मुद्रा केली; आणि नाबोथ राहत होता त्या गावात त्याच्या शेजारी राहणारे वडील जन व सरदार ह्यांच्याकडे ती रवाना केली. तिने पत्रात ह्याप्रमाणे लिहिले, “उपवासाचा जाहीरनामा काढा व नाबोथाला लोकांसमोर उच्च स्थानी बसवा; आणि दोन अधम माणसे त्याच्यासमोर बसवा; ‘त्याने देवाचा व राजाचा धिक्कार केला’ अशी साक्ष त्या दोघांनी द्यावी; मग गावाबाहेर नेऊन त्याला मरेपर्यंत दगडमार करावा.” ईजबेलीच्या पत्रातील आज्ञेप्रमाणे त्या गावात राहणार्‍या वडील जनांनी व सरदारांनी केले. त्यांनी उपवासाचा जाहीरनामा काढला, आणि नाबोथाला लोकांसमोर उच्च स्थानी बसवले. दोन अधम पुरुष येऊन त्याच्यासमोर बसले; त्या अधम पुरुषांनी लोकांसमक्ष नाबोथाविरुद्ध साक्ष दिली; ते म्हणाले, “नाबोथाने देवाचा व राजाचा धिक्कार केला आहे.” ह्यानंतर त्यांनी त्याला नगराबाहेर नेऊन तो मरेपर्यंत दगडमार केला. त्यांनी ईजबेलीस सांगून पाठवले की, “नाबोथाला दगडमार केला व तो मेला.” नाबोथाला दगडमार होऊन तो मेला हे ईजबेलीने ऐकले तेव्हा ती अहाबाला म्हणाली, “उठा, जो द्राक्षमळा इज्रेलकर नाबोथ पैसे घेऊन तुम्हांला देण्यास कबूल नव्हता तो ताब्यात घ्या. नाबोथ आता जिवंत नाही, मेला आहे.” इज्रेलकर नाबोथ मरण पावला हे अहाबाने ऐकले तेव्हा तो त्याच्या द्राक्षमळ्याचा ताबा घ्यायला जाण्यासाठी उठला. इकडे एलीया तिश्बी ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, “ऊठ, शोमरोननिवासी इस्राएलाचा राजा अहाब ह्याच्या भेटीस जा; तो नाबोथाच्या द्राक्षमळ्यात आहे; त्याचा ताबा घेण्यासाठी तो तेथे गेला आहे. तू त्याला सांग, परमेश्वर म्हणतो, तू खून करून मळ्याचा ताबा घेतला आहेस काय? तू त्याला सांग, ज्या ठिकाणी कुत्र्यांनी नाबोथाचे रक्त चाटून खाल्ले त्याच ठिकाणी कुत्री तुझेही रक्त चाटून खातील.” अहाब एलीयाला म्हणाला, “माझ्या वैर्‍या, तू मला गाठलेस काय?” तो म्हणाला, “होय, मी तुला गाठले आहे, कारण परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करावे म्हणून तू स्वतःला विकून टाकले आहेस. पाहा, मी तुझ्यावर असे अरिष्ट आणीन की तुझा अगदी धुव्वा उडेल, आणि अहाबाचा प्रत्येक मुलगा, मग तो इस्राएल लोकांच्या अटकेत असो की मोकळा असो, त्याचा मी उच्छेद करीन; तू मला संताप आणला आणि इस्राएल लोकांना पाप करायला लावलेस, ह्यास्तव मी तुझ्या घराण्याचे नबाटाचा पुत्र यराबाम व अहीयाचा पुत्र बाशा ह्यांच्या घराण्यांप्रमाणे करीन.” ईजबेलीविषयीही परमेश्वर असे म्हणतो, “इज्रेलाच्या तटाजवळ ईजबेलीस कुत्री खातील. अहाबाचा जो कोणी नगरात मरेल त्याला कुत्री खातील व जो कोणी रानावनात मरेल त्याला आकाशातले पक्षी खातील.” (अहाबासारखा दुसरा कोणी झाला नाही; त्याची बायको ईजबेल हिने त्याला उत्तेजन दिल्यामुळे त्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते करण्यासाठी स्वतःला विकून टाकले होते; परमेश्वराने इस्राएलापुढून देशातून घालवून दिलेल्या अमोरी लोकांप्रमाणे त्याने मूर्तींच्या नादी लागून पुष्कळ अमंगळ कर्मे केली.) एलीयाचे हे शब्द ऐकून अहाबाने आपली वस्त्रे फाडली व अंगास गोणपाट गुंडाळून उपवास केला; तो गोणपाटावर निजू लागला व मंद गतीने चालू लागला. ह्यानंतर एलीया तिश्बी ह्याला परमेश्वराचे असे वचन प्राप्त झाले की, “अहाब माझ्यापुढे कसा दीन झाला आहे हे तू पाहतोस ना? तो माझ्यापुढे दीन झाला आहे म्हणून मी हे अरिष्ट त्याच्या हयातीत आणणार नाही, तर त्याच्या पुत्राच्या हयातीत त्याच्या घराण्यावर हे अरिष्ट आणीन.”

सामायिक करा
१ राजे 21 वाचा