१ करिंथ 12:4-14
१ करिंथ 12:4-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आता कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, पण आत्मा एकच आहे. तसेच सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, पण प्रभू एकच आहे. आणि कार्यांचे निरनिराळे प्रकार आहेत पण सर्वात सर्व कार्ये करणारा तो देव एकच आहे. पण आत्म्याचे प्रकटीकरण हे सर्वांस उपयोगी होण्यास एकेकाला दिले आहे. कारण एकाला आत्म्याच्याद्वारे ज्ञानाचे वचन मिळते, आणखी एकाला त्याच आत्म्याच्या इच्छेप्रमाणे विद्येचे वचन दिले जाते. दुसर्याला त्याच आत्म्याच्या योगे विश्वास, आणखी एकाला त्याच आत्म्याच्या योगे निरोगी करण्याची कृपादाने, आणखी एकाला चमत्कार करण्याची शक्ती व दुसऱ्याला भविष्य सांगण्याची शक्ती, तर दुसऱ्याला आत्म्या आत्म्यातील फरक ओळखण्याची, आणखी एकाला विविध प्रकारच्या भाषा बोलण्याची, आणखी एकाला भाषांतर करून अर्थ सांगण्याची शक्ती दिली आहे. पण या सर्वात तोच एक आत्मा कार्य करतो. तो आपल्या इच्छेप्रमाणे प्रत्येक जणाला कृपादान वाटून देतो. कारण शरीर ज्याप्रमाणे एक असून त्याचे अवयव पुष्कळ असतात आणि एका शरीराचे अवयव पुष्कळ असून एक शरीर असते त्याप्रमाणेच ख्रिस्त आहे. कारण आपण यहूदी किंवा ग्रीक होतो, दास किंवा स्वतंत्र होतो तरी एका आत्म्याने आपण सर्वाचा एका शरीरात बाप्तिस्मा झाला आहे आणि सर्वांना एकाच पवित्र आत्म्याने भरण्यात आले. कारण शरीर हे एक अवयव नसून पुष्कळ अवयव मिळून एक आहे.
१ करिंथ 12:4-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
निरनिराळ्या प्रकारची दाने आहेत, परंतु ती दाने वाटून देणारा पवित्र आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, पण प्रभू एकच आहे. कार्य निरनिराळ्या प्रकारचे आहेत, परंतु त्या सर्व गोष्टींमध्ये आणि प्रत्येकामध्ये कार्य करणारे परमेश्वर एकच आहेत. आता प्रत्येकाला आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक कल्याणासाठी होते. एकाला आत्म्याद्वारे ज्ञानाचा संदेश, तर तोच दुसर्याला बुद्धीचा संदेश एकाच आत्म्याद्वारे देतो. त्याच आत्म्याद्वारे एकाला विश्वास, तर त्या एका आत्म्याद्वारे दुसर्याला रोग बरे करण्याची दाने मिळतात. तोच आत्मा काही जणांना चमत्कार करण्याचे सामर्थ्य देतो, तर इतर काही जणांना संकल्प सांगण्याचे, तर कित्येकांना आत्मे ओळखण्याचे सामर्थ्य देतो. आणखी काहींना तो अन्य भाषा बोलण्याचे ज्ञान देतो; आणि त्याचप्रमाणे इतरांना अन्य भाषेचे स्पष्टीकरण करण्याची क्षमता देतो. ही सर्व कार्ये एक आणि एकच आत्मा करतो आणि आपल्या निर्धारानुसार प्रत्येकाला वाटून देतो. जसे शरीर एक असून, अनेक अवयव आहेत, तरी हे सर्व अवयव मिळून एकच शरीर होते, तसेच ख्रिस्ताविषयीही आहे. काही यहूदी किंवा गैरयहूदी, काही गुलाम किंवा स्वतंत्र, आपण सर्व एकाच आत्म्याद्वारे एक शरीर होण्यासाठी बाप्तिस्मा पावलेलो आहोत आणि आपल्या प्रत्येकाला एक आत्मा प्यावयास दिला आहे. आता शरीर एकच अवयव नाही, तर ते अनेक अवयवांनी मिळून बनलेले आहे.
१ करिंथ 12:4-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे; सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभूएकच आहे; आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वांत सर्व कार्ये करणारा देव एकच आहे. तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते; एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन; एखाद्याला त्याच आत्म्यात4 विश्वास; एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने; एखाद्याला अद्भुत कार्ये करण्याची शक्ती; एखाद्याला संदेश देण्याची शक्ती; एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती; एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते; तरी ही सगळी कार्ये तोच एक आत्मा करतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. कारण आपण यहूदी असू किंवा हेल्लेणी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे.1 आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत. कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे, तर अनेक अवयव असे आहे.
१ करिंथ 12:4-14 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, परंतु एकच पवित्र आत्मा ती दाने देत असतो. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, परंतु त्यांच्याद्वारे एकाच प्रभूची सेवा केली जाते आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वांत सर्व कार्ये करणारा देव एकच आहे. सार्वजनिक हितासाठी प्रत्येक माणसाच्या जीवनात पवित्र आत्म्याचा अविष्कार होत असतो. एखाद्याला पवित्र आत्म्याद्वारे शहाणपणाचे बोल मिळतात तर दुसऱ्याला त्याच पवित्र आत्म्याकडून विद्येची वाणी दिली जाते. एखाद्याला त्याच आत्म्याकडून विश्वास, एखाद्याला त्याच आत्म्याद्वारे निरोगी करण्याची कृपादाने, अद्भुत कार्य करणे, संदेश देणे, आत्मे ओळखणे, अपरिचित भाषा बोलणे, निरनिराळ्या अपरिचित भाषांचा अर्थ सांगणे ही कृपादाने एकेकाला दिली जातात. ही सर्व कृपादाने देणारा व कार्ये करून घेणारा पवित्र आत्मा एकच आहे; तो आपल्या इच्छेप्रमाणे ती एकेकाला वाटून देतो. जसे शरीर एक असून त्याला पुष्कळ अवयव असतात आणि त्या शरीराचे पुष्कळ अवयव असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. त्याचप्रमाणे आपण यहुदी असू किंवा ग्रीक असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने अभिषिक्त झालो आहोत. कारण शरीर म्हणजे एक अवयव नव्हे, तर अनेक अवयव मिळून शरीर झालेले असते.